India
लग्नसमारंभ करून कोव्हिड नियम तोडल्याबद्दल आमदार लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल
या सोहळ्यात काही अपवाद वगळता आमदारांसह अनेक जण विनामास्क वावरत असताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

भाजप आमदार आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना मुलीच्या मांडव टहाळीचा महागात पडण्याची शक्यता आहे. कारण महेश लांडगे यांच्यासह ६० जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचं येत्या ६ जून रोजी लग्न होतं. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळी कार्यक्रम नुकताच पार पडला. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटल्याचं एका व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मात्र, या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे लग्नाची नियोजिततारीख लांब असतानाच आळंदीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.३१) विवाह संपन्न झाला. या सर्व प्रकरणी लांडगे यांचे भाऊ सचिन लांडगे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात आमदारांनी कोरोनासंबंधी सर्व नियम पायदळी तुडवल्यानं टीका होत आहे. या सोहळ्यात काही अपवाद वगळता आमदारांसह अनेक जण विनामास्क वावरत असताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे कारवाई होणार का, याकडे लक्ष लागलं होतं.
महापालिका अधिकाऱ्याचाही डान्स व्हिडीओ
या व्हिडीओत पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी सुनील बेळगावकर हे आमदार लांडगे यांच्यासोबत नृत्य करताना दिसत आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत इतरांनीही नृत्य केलं. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी देखील सहभागी होते. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आमदार आणि अधिकारी दोघांवर आता टीकेची झोड उठत आहे.
कोण आहेत महेश लांडगे?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकारणाला त्यांची सुरुवात झाली होती. २०१७ मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश, राजकारणापूर्वी पैलवान म्हणून महेश लांडगे यांची ओळख होती. सध्या ते भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.
सर्वसामान्यांसाठी 'डॅशिंग' असणारे आयुक्त कारवाई करणार का?
खुद्द आमदारांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं. तर, सोशल डिस्टसिंगचा देखील फज्जा उडाला होता. त्यामुळे आता 'डॅशिंग' पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यासंबंधी काय कारवाई करणार? असा प्रश्न सर्वसमान्यांमधून उपस्थित होत आहे.
समारंभासाठी परवानगी घेतली होती - सचिन लांडगे
सचिन लांडगे म्हणाले, ‘‘मांडव डहाळे समारंभासाठी महापालिका प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतली होती. नियमानुसार २५ मोजक्या आप्तेष्ठांना निमंत्रित केले होते. कौटुंबिक कार्यक्रमात आम्ही आनंद साजरा केला. मात्र, समारंभ ठिकाणी काही कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित राहीले. त्यामुळे गर्दी निर्माण झाली. कोरोना नियमावली अर्थात सोशल डिस्टंन्सींगच्या नियमाचं उल्लंघन झालं. याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पोलीस प्रशासनानं केलेली कारवाई योग्य आहे. प्रशासनानं केलेल्या दंडात्मक कारवाईची पूर्तता आम्ही करणार आहोत. प्रशासनाला सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे.’’