India

राज्यात रोज संक्रमण वाढत असताना राज्य सरकारचा शाळा चालू करण्याच्या विचाराबाबत संभ्रम

'शाळा नक्की कधी सुरू होणार' याबाबत पालकांमध्ये दिवसेंदिवस संभ्रम वाढत आहे.

Credit : The Federal

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना देखील १५ जूनलाच शाळा सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. असे असले तरीही शाळा सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे शिक्षणाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे 'शाळा नक्की कधी सुरू होणार' याबाबत पालकांमध्ये दिवसेंदिवस संभ्रम वाढत आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही नियमितपणे १५ जुनलाच शाळा सूरू करण्याचा मानस राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवड्यात ट्विटरद्वारे जाहीर केला होता. राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटा दरम्यान मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर शाळेच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या होत्या. पण आता राज्य सरकार १५ जूनपासून शाळा सुरु करण्याच्या विचारात असल्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

त्यानंतर राज्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ जूनलाच शाळा सुरु करण्यासाठीच्या तयारीचा आढावा शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर घेतला जात असल्याचे काही मुख्याध्यापकांनी सांगितले.

त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या या भुमिकेची शाळा व्यवस्थापनाने चांगलीच धास्ती घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील रविवारी (ता. २४) दिलेल्या संदेशात,"आपण जुनमध्ये शाळा सूरू करू शकतो की नाही, याबाबत अभ्यास गटासमवेत चर्चा सुरू आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेत आहोत," असे सांगितले. तसेच "शाळा सूरू होण्याचा कालावधी पुढे गेला तरी चालेल, पण शिक्षण कसे सूरू राहील हे पाहणार आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे १५ जुनला प्रत्यक्ष शाळा भरणार का, की नियमितपणे १५ जुनला 'शिक्षण' (शाळा नव्हे) सूरू होणार, याबाबत पालकांमध्ये उत्सुकतेबरोबरच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

 

पालक संभ्रमावस्थेत, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता..! 

शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पालक संभ्रमावस्थेत असून आपल्या पाल्यांच्या आरोग्याची चिंता त्यांना सतावत आहे. याबाबत पालक गणेश बोरा म्हणाले, "सध्या कोरोनाचे संकट फोफावत आहे, कोरोनाच्या संकटात खबरदारी म्हणून सर्व जगभरात सर्व गोष्टी थांबल्या आहेत. आपल्या राज्यात ही दोन महिन्या पासून लॉकडाउन आहे आणि रुग्णसंख्या ही वाढत आहे, त्यात अपुऱ्या आरोग्य सुविधा असल्याने अनेक अडचणींना सामोरे जात कोरोना योद्धे लढत आहे. शाळा चालू करणे तूर्तास तरी घातक आहे."

बोरा पुढे म्हणाले, "ग्रामीण आणि शहरी भागातील बहुतेक सर्व शाळामध्ये हात धुण्याची आणि पाण्याची सुविधा नाहीच किंवा खूप तोकडी आहे, ३०० ते ४०० मुलामागे एक दोन नळ असतात, शौचालये आणि मुतारी ची व्यवस्था ही अपुरीच आहे. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात बऱ्याच गोष्टी कमतरता आहे. खाजगी आणि सरकारी शाळा कोरोनासाठी हातधुण्यास आणि निर्जंतुकीकरण करण्यास सॅनिटायझेर, तापमान चेक करणे आणि सोडियम हायड्रोक्लोराइड सारख्या गोष्टीवर खर्च करण्यास समर्थ आहेत का, ह्या ना त्या कारणाने पालकांचे आर्थिक कंबरडे मोडणाऱ्या शाळा ह्या कारणाने हजारो रुपये पालकांना मागतील तेव्हा पालक ह्याचा भार सोसू शकतील का?"

या विषयी बोलताना शिक्षक सुरेशकुमार नरुटे म्हणाले, "शाळा सुरू होणे महत्त्वाचे आहे. परंतु, विद्यार्थी लहान असतात. त्यांना अजूनही काही गोष्टी आत्मसात करायला वेळ लागतो. सरकार प्रोटोकॉल देईल, पण ते विद्यार्थी किती पाळतील याविषयी साशंकता आहे. कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या परिसरातील शाळा सुरू झाल्या तर त्यात तितकासा धोका नाही. शाळांना अगोदरच अपुरे मनुष्यबळ आहे त्यामुळे भरपूर शाळेतील शिक्षक त्रस्त आहेत, अनेक सरकारी शाळा मधील शिक्षक कोरोनाच्या सर्व्हे मध्ये कॅटेंटमेंट झोन मध्ये कामात व्यस्त आहेत. शाळांमध्ये विविध भागातून मुले येतात तेव्हा प्रसार होण्याचा धोका कसा नियंत्रित करणार, असेही प्रश्न आहेत."

 

दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू करण्याचा विचार

शाळा सुरु करताना दोन पर्यांयाचा सध्या विचार सुरु असून त्यानुसार पहिला पर्याय म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड आणि इव्हन नंबर प्रमाणे दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचे. तर दूसरा पर्याय म्हणजे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे दोन्ही गटांना एक दिवसाआड शाळेत बोलवायचे. आता राज्य सरकार या दोन पर्यायांचा विचार करत आहे. तसेच शाळा सुरु झाल्या तरीही एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांना घ्यायची आहे.

राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातील ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. देशात सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरे ही रेड झोनमध्ये आहेत. पण टप्प्यात राज्यातील शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत असल्याचे इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर शाळा दोन शिफ्टमध्ये सुरु करण्याचा विचार असल्याचेही संकेत वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत दिले आहेत.

शाळा सुरू करण्याबाबत ठोस निर्णय काय हे जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, "रेड झोन मध्ये एकही शाळा सुरु होणार नाही या झोनमधील विद्यार्थ्यांसाठी १५ जून पासून ऑनलाईन शिक्षण सुरू केले जाईल."

मात्र ऑनलाइन शिक्षण हा उपाय सर्वत्र अंमलात आणता येत नाही. आदिवासी, पांडे, डोंगर, गाव, खेडी येथे नेटवर्क चालण्याची गंभीर समस्या आहे अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षण शक्य होणार नाही. त्याचबरोबर ग्रामीण भागात आणि शहरी भागातही सर्व विद्यार्थ्याकडे मोबाईल असला तरी तो अँड्रॉइड मोबाईल असतोच असे नाही. अँड्रॉइड मोबाईल नसेल तर ऑनलाइन शिक्षण होऊ शकत नाही. मात्र या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहणे आवश्यक आहे. या दृष्टीने १५ जून पासून विशेष परिसरात हळूहळू शाळांचे वर्ग सुरू करून त्या अनुभवाच्या आधारावर सुधारणा करीत सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत सर्व शाळा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

जेथे शाळा सुरू होणार आहे तेथेही आम्ही आरोग्याच्यादृष्टीने नियमावली तयार करीत आहोत. सुरक्षित अंतर राहणे, हात धुण्याची व्यवस्था, उपस्थितचे नियम पूर्ण शिथिल करणे, विद्यार्थ्यांचे छोटे गट करून एका गटाला दोन वा तीन तास शिकविणे, असे मार्गदर्शन करणारे नियम तयार होत असून लवकरच आम्ही ही नियमावली जाहीर करू. शाळा सुरू करत असताना शिक्षकांची उपलब्धता आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे अनेक शिक्षक आपल्या गावी असल्याने ते येऊ शकत नाही. खाजगी शाळा बाबतीतही काटेकोर नियम घालण्यात येणार असून 'रेड झोन'मध्ये त्यांनाही शाळा सुरू न करता ऑनलाईन शिक्षण देणे बंधनकारक राहील.