India

ग्रामपंचायतींमध्ये कुठं प्रस्थापितांची सरशी तर कुठं अनपेक्षित धक्का

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला.

Credit : विप्लव विंगकर

गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागला. १५२३ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाल्याने राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या ग्रामपंचायत निकालात 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती दिसून आली तर राजकीय मातब्बरांना प्रतिष्ठेचा विषय केलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये देखील काहींना आपली प्रतिष्ठा जपता आली तर काही जणांवर आत्मचिंतनाची वेळ आल्याचे चित्र या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे.

 

स्वबळाचा नारा

ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं. या निवडणुकीत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७९ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिली.

मदान यांनी सांगितल्यानुसार, "राज्यातील १४ हजार १३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे."

 

बिनविरोध ग्रामपंचायतीना निधी मिळणार का?

निवडणुकांमुळे गावातील तंटे वाढू नयेत, त्याचा विकासावर परिणाम होऊ नये, या उदात्त हेतूनं ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्थानिक आमदारांनी शक्कल लढवत निधी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी ठिकठिकाणच्या लोकप्रतिनिधीनींच पुढाकार घेतला होता. बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावांसाठी आमदार निधीतून गावाला बक्षीस देण्याच्या घोषणा केल्या होत्या. राज्यात एकूण १५२३ ग्रामपंचायतीचा बिनविरोध निकाल लागला आहे.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ग्रामीण भागातली ही पहिलीच मोठी निवडणूक, यातील यशापयशाचा संबंध आघाडी सरकारशी लावला जाऊ शकतो. ती चर्चा टाळण्यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी यासाठी पुढाकार घेतला तर नव्हता ना? अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. यासाठी निधी कसा उपलब्ध करणार, अशी शंका विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी त्यावेळी उपस्थित केला होता, त्यावर आमदार लंके यांनी, 'याची सोय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार करतील', असं उत्तर दिलं होतं. हा निधी खरंच उपलब्ध होईल की १५ लाखांसारखे तोंडाला पाने पुसली जातील का? याबाबत आता पारा-पारावर चर्चा रंगणार यात शंकाच नाही.

 

भाजपची एकाकी लढाई, महाविकास आघाडीचा गुलाल, तर स्थानिक आघाड्यांचं वर्चस्व

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाना तेवढं महत्व नसलं तरीही भाजपाने बाजी मारत २१३५ जागांवर विजय मिळवला. त्याचपाठोपाठ शिवसेना २०४९, स्थानिक आघाडी २०४१, राष्ट्रवादी १८८४, काँग्रेस १५०३, तर मनसेने खातं खोलत ३६ जागांवर विजय मिळवला आहे.

 

ग्रामपंचायत निवडणुकीत काही लढती

१९४९ पासून गाव बिनविरोध, पहिल्यांदाच झाली निवडणूक

यवतमाळ जिल्ह्यातले गहुली हे स्व. वसंतराव नाईक आणि स्व. सुधाकरराव नाईक या महाराष्ट्राच्या दोन मुख्यमंत्र्यांचे गाव, १९४९ पासून बिनविरोध असलेल्या या गावी प्रथमच होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपने ७ पैकी ७ जागा जिंकल्या.

भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटीलवर गुलाल

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्र. चार मधून अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवार विजयी झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नावापुढे लिंगाचा उल्लेख इतर असा उल्लेख केल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. याबाबत अंजली पाटील यांनी आपल्या उमेदवारीसाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली, न्यायालयाने अंजली पाटील यांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला होता.

औरंगाबादेतील सास-बहू लढाई

औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगावात चक्क सासू विरोधात सुनेने तर जावई विरोधात सासऱ्याने निवडणुकीत उडी घेतली होती. शिवशाही पॅनलकडून सासू गोकर्णा आवारे आणि जावई लक्ष्मण काळे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून सून कल्याणी आवारे आणि सासरे रावसाहेब वैद्य एकमेकांच्या विरोधात होते. त्यामुळे सासूच्या विरोधात सून आणि सासऱ्याच्या विरोधात जावयानं निवडून येण्याचं दावा केला होता मात्र आलेल्या निकालानुसार सून कल्याणी आवारे यांनी आपल्या सासू गोकर्णा आवारे यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे जावई लक्ष्मण काळे यांनी सासरे रावसाहेब वैद्य यांचा पराभव केला आहे.

आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर मोहिते-पाटलांचं वर्चस्व कायम

आशिया खंडातील सर्वात मोठ्या अकलुज ग्रामपंचायतीवर भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील गटाची सत्ता कायम, आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलुज ग्रामपंचायतीवर भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील गटाची सत्ता कायम, १७ जागे पैकी एक जागा झाली होती बिनविरोध, १६ पैकी १३ जागांवर विजयसिंह मोहिते पाटील गटाचा झेंडा, या निवडणुकीत जनसेवा संघटनेचे नेते धवलसिह मोहिते पाटील विरुध्द माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी झाली होती लढत, १६ जागांपैकी १४ जागा विजयसिंह मोहिते गटाला तर ३ जागा धवलसिह मोहिते पाटील गटाला मिळाल्या.

भीमा कोरेगावमध्ये राष्ट्रवादी

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या संवेदनशील गावातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवारांनी पुरस्कृत केलेल्या जयमल्हार पॅनलला १७ पैकी ११ जागा तर सहा जागा भाजप पुरस्कृत भैरवनाथ पॅनलला मिळाल्या आहेत.

बाभळगावात देशमुखांना एकहाती विजय नाहीच

लातूरच्या अमित देशमुखांच्या बाभळगावात एकहाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. बाभळगावात अपक्ष उमेदवार श्रीराम गोमरे १६ मतांनी विजयी झाले आहेत. तर बीड जिल्ह्यातील अस्मितेच्या परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटाला मोठं यश, ७ पैकी ६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा.

अण्णा हजारेंचं पॅनल विजयी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव असलेल्या राळेगणसिद्धिमध्ये अण्णा हजारेंचा पाठिंबा असलेल्या ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. ९ पैकी ५ जागांवर ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे.

रक्षा खडसेंची आगेकूच

जळगांवमधील मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या कोथळी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याचा भाजप खासदार रक्षा खडसे यांचा दावा, ११ जागांपैकी २ जागा बिनविरोध, ९ पैकी ६ जागांवर भाजपचे पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी, मागील वेळी कोथळी ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे सरपंच होते, मात्र आता भाजपचा सरपंच होणार, या निवडणुकीत राजकीय झालेल्या बदलामुळे मोठी जबाबदारी माझावर, पहिल्यांदा मी बारकाईने या निवडणुकीत लक्ष घातले असून त्यात मला यश मिळाले असल्याचे भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले.

पेरे-पाटलांना धक्का

औरंगाबादचे आदर्श सरपंच पेरे पाटील यांना धक्का, पाटोदा ग्रामपंचायतीत पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव, अनुराधा पेरे पाटील यांचा झाला पराभव, भास्कर पेरे पाटलांच्या पूर्ण पॅनलचा धुवा, आदर्श गावात आदर्श सारपंचाच झाला पराभव, मुलीसह तीन जागी पेरे पाटलांचे उमेदवार पराभूत, तर उर्वरित ८ जागा विरोधी पॅनलने आधीच मिळवल्या होत्या बिनविरोध, गावातील ११ जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांनी मिळवला विजय, ३० वर्षानंतर भास्कर पेरे पाटील गावाच्या राजकारणातून झाले बाद झाले आहेत असेच म्हणावे लागेल.

परभणीत भाजपला धक्का

परभणी जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या बोरी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना धक्का देत पुन्हा एकदा ग्राम पंचायत वर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बोरी ग्रामपंचायत ही जिंतुर-सेलु विधानसभेतील सर्वात मोठी ग्राम पंचायत आहे. इथला बोर्डीकर विरुद्ध भांबळे हा सामना अख्ख्या राज्याला परिचित आहे. त्यामुळे दोन्ही आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली होती. ज्यात विद्यमान भाजप आमदार मेघना बोर्डीकर विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या गटात थेट लढत झाली. ज्यात भांबळे यांच्या गटाने 17 पैकी 14 जागा जिंकत बोरी ग्रामपंचायत वरील सत्ता कायम ठेवलीय.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना अपयश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे गाव असलेली ग्रामपंचायत भाजपच्या हातुन निसटली तर ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना भोकरदन तालुक्यात धक्का मिळाला आहे. दानवेंच्या तालुक्यात महाविकास आघाडीनं मुसंडी मारली आहे.