India

बहुप्रतीक्षित फलटण-पुणे थेट रेल्वे सेवा अखेर सुरु

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी अनारक्षित डेमु गाडीची नियमित सेवा ३१ मार्चपासून सुरू होईल.

Credit : Twitter/Prakash Javadekar

फलटण आणि पुणे यांच्या दरम्यान डायरेक्ट रेल्वे सेवेला आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सहकार व पणन मंत्री शामराव पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयन भोसले, मंदाकिनी नाईक निंबाळकर, गिरीश बापट, आमदार दीपक चव्हाण, सुनील कांबळे, फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती नीता नेवासे आदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

उदघाटन प्रसंगी प्रकाश जावडेकर म्हणाले, "माझ्या विद्यार्थिदशेपासून प्रलंबित असलेली फलटण आणि पुणे यांच्या दरम्यान डायरेक्ट ट्रेन सेवेची मागणी पूर्ण झाली याचा मला आनंद होत आहे गेल्या सात वर्षांमध्ये रेल्वेचे डबे, रेल्वे स्टेशन आणि रेल्वे मार्ग यांच्या स्वच्छतेमध्ये आमूलाग्र बदल दिसून येत आहे. बायो टॉयलेट वर भर दिल्यामुळे रेल्वे बरोबरच रेल्वे मार्ग देखील स्वच्छ झाले आहेत."

जावडेकर पुढे म्हणाले, "IRCTC द्वारे रेल्वे तिकिटाचे बुकिंग आणि रद्द झालेल्या तिकिटाचा परतावा मिळवणं आता सोपं झालं आहे. तसंच मानव रहित रेल्वे क्रॉसिंग वर होणाऱ्या दुर्घटना पूर्णपणे थांबलेल्या आहेत, कारण मानव रहित रेल्वे क्रॉसिंग ऐवजी आपण आता पर्यायी व्यवस्था देणं सुरू केलं आहे."

मागील अनेक वर्षांपासून बारामती-फलटण रेल्वेमार्गाची चर्चा सुरू आहे. पण विविध कारणांमुळे हा मार्ग अद्याप प्रत्यक्षात येऊ शकलेला नाही. पण चार वर्षांपूर्वी फलटण शहराजवळ रेल्वे स्थानक सज्ज झालं. पण प्रवासी वाहतूक सुरू नसल्यानं या स्थानकाची दुरावस्था झाली होती. अखेर दीड वर्षांपूर्वी फलटण ते लोणंद लोकल सुरू झाली. पण कोरोना काळात ही लोकल बंद करण्यात आल्यानं स्थानकाला पून्हा अवकळा आली.

 

क्यूआर कोड आधारित ओळखपत्र

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना फलटणच्या प्रांत अधिकाऱ्यांकडून क्यूआर कोड आधारित पास दिला जाईल. पुणे पोलिस आयुक्त यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आलं आहे. प्रांत अधिकारी फलटण व पोलीस आयुक्त पुणे अत्यावश्यक सेवेतील लोकांची ओळख पटवून त्यांना ओळख पत्रं देतील. रेल्वे स्थानकांवर क्यूआर कोड आधारित पास दाखवूनच तिकीट घेता येणार असल्याचे रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

 

अशी असेल गाडीची वेळ

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी अनारक्षित डेमु गाडीची नियमित सेवा ३१ मार्चपासून सुरू होईल. या गाडीला सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी, सासवड रोड या स्थानकांवर थांबा असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी या रेल्वेची नियमित सेवा ३१ मार्चपासून सुरू होईल. गाडी क्रमांक ०१४३६ पुणे येथून ५ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि फलटण येथे साडेनऊ वाजता पोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४३६ फलटण येथून संध्याकाळी सहा वाजता सुटेल व पुणे येथे साडेनऊ वाजता पोचेल. गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी व सासवड रोड स्टेशनवर थांबेल. रविवारी ही सेवा बंद राहील.

 

 

शेती-उद्योगांच्या आकांक्षासाठी वरदान

फलटण ते पुणे (लोणंद मार्गे) रेल्वेगाडी सुरू झाल्यानं या भागातील लोकांना आणि शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ पोहोचण्यास, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कामगारांना अधिक रोजगार मिळण्यास मदत होईल. फलटण रेल्वे स्टेशन फलटण शहरापासून अंदाजे ४ कि.मी. अंतरावर आहे आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नगर परिषद येथे आहे.

फलटण हे एक कृषी तसेच उद्योग-आधारित क्षेत्र आहे. ऊस, डाळिंब, कॅप्सिकम, भेंडी आदी इथे उत्पादन होतं. तसंच फलटण जवळील भागात सुप्रसिद्ध साखर कारखाने व इतर कंपन्या आहेत. वरील उत्पादन आणि कंपन्यांमुळे फलटण ते पुणे व इतर शहरांमध्ये ये-जा करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या जास्त आहे. रेल्वे, सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे व पुणे ते फलटण दरम्यान लोणंदमार्गे थेट संपर्क असणं त्यांच्या आकांक्षासाठी वरदान ठरेल.

 

स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद: रणजितसिंह नाईक-निंबाळकर

लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निधनाच्या वर्षपूर्तीपूर्वीच ही रेल्वेसेवा सुरू होत असल्याचा व त्यांचं स्वप्न पूर्ण होत असल्याचा त्यांना व फलटणकरांना मनस्वी आनंद होत असल्याचं प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलं.

निंबाळकर म्हणाले, "ही रेल्वे सुरू व्हावी यासाठी आमचे वडील हिंदुराव निंबाळकर यांनी वर्षानुवर्षे पाठपुरावा केला होता. त्यांच्या निधनानंतर मीही याचा पाठपुरावा केला. सगळ्यात मोठा प्रश्न रेल्वेसाठी जमीन अधिग्रहणाचा होता. तो लवकर मार्गी लागला नसल्यानं या मार्गाचं काम खोळंबलं होतं. आता या नंतर फलटण- बारामती या मार्गासाठी प्रयत्नशील असणार आहोत."