Quick Reads

स्पॉटलाईट: ला ला लँड

दोन व्यक्तींमधील नात्याचा सर्वंकष विचार

Credit : Summit Entertainment

(हलके स्पॉईलर्स)  

आपण अनुभवलेल्या प्रत्येक क्षणाची विशिष्ट अशी एक दृश्य स्वरूपातील आठवण तयार होत असते. त्यामुळे पाहिलेल्या प्रत्येक चित्रपटाशी, मग तो चित्रपटगृहामध्ये पाहिलेला असो वा घरी, त्याच्याशी निगडित असलेली विशिष्ट अशी एखादी आठवण - सुप्तपणे का होईना, पण - तयार होत असते. त्यातही पुन्हा काही विशिष्ट अशा चित्रपटांचं आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान, त्यांचं अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. ‘ला ला लँड’ मला का आवडतो याची अनेक कारणं देता येतील. काही त्याच्या निर्मितीशी निगडित, तो चित्रपट म्हणून महान का आहे याबाबतची असतील, तर काही मला स्वतःला तो भावनिकदृष्ट्या का भावतो याची असतील. अगदी - हथेली पे कलेजा निकाल के रखना - वगैरे केलं तरीही माझं त्याविषयी असलेलं प्रेम पुरेपूररीत्या व्यक्त होणार नाही याची मला भीती वाटते. प्रत्येक दृश्य आणि त्यातील प्रत्येक चौकट लक्षात राहिलेल्या या चित्रपटाबाबत लिहायची, बराच काळ या क्षणाची वाट पाहिल्यानंतर त्याविषयी लिहितोय. 

१/३ 

‘अनादर डे ऑफ सन’ या गाण्यात दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन, अभिनय, संगीत अशी चित्रपटाची निरनिराळी अंगं एकत्र येऊन, लॉस अँजेलिसमधील ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांनी एकत्र येत एक थक्क करणारा नृत्याविष्कार सादर केल्यानंतर कॅमेरा मियाच्या (एमा स्टोन) कारजवळ जाऊन तिच्यावर लक्ष केंद्रित करतो. तो तिची कथा सांगायला लागतो. ती हॉलिवुडमधील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ जवळच्या एका कॅफेमध्ये (अधिक तपशिलात जाऊन सांगायचं झाल्यास, बरिस्ता) काम करत असते. या कामाच्या निमित्ताने खरंतर ती सुप्त पातळीवर स्टुडिओच्या सानिध्यात राहण्याच्या प्रयत्नात असावी. कारण, मियाला अभिनेत्री व्हायचं आहे. अगदी आताही ट्रॅफिकमध्ये अडकलेली असताना ती तिला द्यायला जायच्या असलेल्या ऑडिशनची पटकथा वाचत बसलेली आहे. इतक्यात ट्रॅफिक पुढे सरकत असूनही ती जागची हलत नसल्याने कुठलातरी मूर्ख हॉर्न वाजवत तिच्याशेजारून निघून जातो. तीही तिच्या तंद्रीतून बाहेर येत कॅफेत पोचते. ऑडिशनला वेळेत पोचण्यासाठी कामावरून लवकर निघत असताना आणखी कुठलातरी मूर्ख तिच्या शर्टावर कॉफी सांडवतो. आजचा दिवसच खराब असावा. ऑडिशनला गेल्यावर तिथेही टेबलामागे बसलेले मूर्ख लोक इतर कामं करत बसलेली आहेत. ती खोलीतून बाहेर पडते तेव्हा एका बाजूला रांगेत ऑडिशन द्यायला आलेल्या, तिच्यासारखाच पेहराव केलेल्या इतर काही तरुणी दिसतात. लिफ्टमध्येही पुन्हा पांढरा शर्ट आणि सोनेरी केस असलेल्या दोन स्त्रियांच्या मधे ती उभी राहते. गर्दीत ती एकटीच तिच्यासारखी नाही, खूप जणी आहेत. 

घरी आल्यावर शॉवरमधून बाहेर पडत असताना कुठे तिला उसंत मिळते. ती ‘सिटी ऑफ स्टार्स’ गुणगुणू लागते. इतक्यात तिच्या तीन मैत्रिणी तिला पार्टीला नेण्यासाठी येतात. आधीच पूर्ण दिवस वाईट गेलेला असताना ती जाणार नसते. बेडरूममध्ये तिच्यासारखेच सोनेरी केस असलेल्या, निळा ड्रेस परिधान केलेल्या इन्ग्रिड बर्गमनचं सुंदर चित्र भिंतीवर रेखाटलेलं असतं. तिला आग्रह करणाऱ्या मैत्रिणी ‘समवन इन द क्राउड’ म्हणत तिला उत्साहित करण्याचा प्रयत्न करतात, त्या थकतात आणि निघून जातात. आपल्याच विचारांत मग्न असलेल्या मियामध्ये उत्साह येतो, तीही इन्ग्रिडसारखाच निळा ड्रेस घालत ‘समवन इन द क्राउड’ म्हणत अज्ञाताच्या शोधात बाहेर पडते. एव्हाना डॅमियन शझेलच्या दिग्दर्शनातील सफाईदारपणाला सिनेमॅटिक बहार आलेली असते. लिनस सॅन्डग्रेनच्या कॅमेऱ्यासोबत तो जी काय कामगिरी करतो, तिला तोड नाही. सोबत जस्टिन हरविट्झचं संगीत म्हणजे अहाहा! 

गाण्याचा चढाव आणि आवाज कमी होत जातो, नि मिया तिथून बाहेर पडते. हिला कार कुठे पार्क केली हे विसरायची जुनीच सवय आहे. कार शोधत शोधत असताना एका रेस्टॉरंट जवळून जात असताना सबॅस्टियन (रायन गॉस्लिंग) पियानोवर वाजवत असलेला ‘सिटी ऑफ स्टार्स’चा तुकडा तिच्या कानांवर पडतो. (काय कम्पोजिशन आहे हे!) ती आतमध्ये येते, त्याला वाजवताना पाहते, त्या क्षणांत जगाचे भान, आपले अस्तित्त्व विसरून जाते. नेमका रेस्टॉरंटचा मालक त्याला बोलावतो, दोघांमध्ये काहीतरी बोलणं होतं आणि सबॅस्टियन तिच्या दिशेनं चालत येतो. त्याचं कौतुक करायला पुढे सरकलेल्या तिला धक्का मारून तो तसाच बाहेर निघून जातो. हाय रे साली किस्मत! धक्का मिश्रित आश्चर्य तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं असतानाच कर्कश्श हॉर्नचा आवाज कानात घुमू लागतो, पुन्हा सकाळच्या ट्रॅफिकमधील दृश्याला सुरुवात होते. यावेळी मात्र सबॅस्टियनच्या दृष्टिकोनामधून. सकाळी ती गाडी पुढे नेत नाही म्हणून जोरात हॉर्न वाजवत शेजारून निघालेली व्यक्ती म्हणजे सबॅस्टियन. 

सबॅस्टियन एक पियानोवादक आहे. त्याचं जॅझ संगीतावर प्रेम आहे. तो त्याविषयी - कदाचित नको तितका - पॅशनेट आहे. ट्रॅफिकमधून बाहेर पडल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये येऊन तो मालकाने दिलेली पारंपरिक गीतं वाजवण्याचा शब्द मालकाला देतो, आणि पुन्हा एकदा कामावर रुजू होण्यास सज्ज होतो. नंतर तो त्याच्या छोटेखानी अपार्टमेंटमध्ये परततो तेव्हा बहीण, लॉरा त्याची वाट पाहत बसलेली असते. बरीच वायफळ बडबड करत एखाद्या मुलीच्या प्रेमात पडून गंभीर स्वरूपाच्या नात्याला सुरुवात करायचा सल्ला देत निघून जाते. रात्री रेस्टॉरंटमध्ये पोचल्यावर बराच वेळ ख्रिसमसला वाजवण्याची रटाळ अशी पारंपरिक गीतं वाजवून झाल्यानंतर त्याची बोटं नकळतच पियानो कीजवर फिरत ‘सिटी ऑफ स्टार्स’ वाजवू लागतात… ते संपल्यावर मालक त्याला बोलावतो, आणि काहीच बोलण्याची संधी न देता कामावरून काढून टाकल्याबाबत कळवतो. यावेळी आपल्याला त्याची बाजू कळते, मियाच्या दिशेनं तो चालत असला तरी त्याला तिच्या काय, तर अगदी जगाच्याही अस्तित्त्वाचं भान नसतं. तो तिला धक्का मारून निघून जातो. एकाच कथेचे दोन सर्वस्वी भिन्न पैलू आपल्याला दिसतात. हे निरनिराळे पैलू समोर आणणं ‘ला ला लँड’च्या काही महत्त्वाच्या संकल्पनांपैकी एक आहे. 

दरम्यान एक महिना उलटून जातो, आणि त्यानंतर विधिलिखित की काय ते असल्याप्रमाणे पुन्हा एकदा एका पार्टीत या दोघांची भेट होते. ‘त्या’ दिवसामुळे ‘कौन हैं जिसने पो को मूड के नहीं देखा’ आविर्भावात त्याच्यावर रागावलेली असल्याने ती आज त्याला ‘आय रॅन’ नामक, त्याच्यासारख्या ‘गंभीर’ पियानोवादकाला उथळ वाटेलशा गाण्याची फर्माइश करते. याउपर त्यावर त्याच्यासमोर नाचत त्याला एकप्रकारे डिवचत, चिडवत राहते. दोघांमधील तणाव अजून संपलेला नसतो, त्या उन्हानं तापलेल्या दुपारी तो संपणारही नसतो. दोघं एकमेकांशी बोलतात तेही लटक्या रागानेच. 

रात्री मात्र सगळे घरी जायला निघालेले असताना दुसऱ्या एका कंटाळवाण्या माणसापासून वाचण्यासाठी मिया सबॅस्टियनची मदत घेते. नेहमीप्रमाणे आजही तिची गाडी कुठे पार्क केली हे तिला आठवत नसतं. दोघेही ती शोधता शोधता बऱ्याच दूरवर येऊन पोचतात. एका वळणावरून त्या रात्रीने अवकाशाच्या कॅनव्हासवर केलेली नितांतसुंदर, मनोहर रंगांची कामगिरी पाहत असताना ‘व्हॉट अ वेस्ट ऑफ अ लव्हली नाईट!’ म्हणत दोघेही आपण एकमेकांसाठी कसे योग्य नाहीत याची स्वतःलाच समजूत घालणारं गीत गात राहतात. ‘मौका भी हैं, दस्तूर भी हैं’-वजा भावनांचं अस्तित्त्व जाणवत असतानाच तिला फोन येतो. दोघांदरम्यानच्या शांत, निःशब्द क्षणाला सुरुंग लागतात. लागलीच तिची गाडीही सापडते. ती त्याला कुठे सोडू का विचारते, तो माझी गाडीही जवळच पार्क केलेली आहे म्हणतो. नंतर मात्र दोघेही जिथून बाहेर पडले त्याच ठिकाणी येऊन, अगदी गेटसमोर असलेल्या गाडीत बसतो नि तिथून निघतो. 

 

‘कुछ तो बात रही होगी, कुछ तो हुआ होगा’. 

त्यामुळेच सबॅस्टियन मिया काम करत असलेल्या कॅफेमध्ये येऊन पोचतो. बाहेर पडल्यानंतर ती त्याला ‘कॅसाब्लान्का’मध्ये हम्प्री बोगार्ट आणि इन्ग्रिड बर्गमन ज्या खिडकीतून बाहेर पाहत असतात ती खिडकी दाखवते. चित्रपटातील कला दिग्दर्शनातील सूक्ष्मता इथे पदोपदी दिसून येते. सुरुवातीला तिच्या रूममध्ये दिसलेलं इन्ग्रिडचं चित्र. आता त्या चित्रात हम्प्री आलेला असतो. तिच्या आयुष्याप्रमाणेच. दोघेही निवांतपणे भटकत, बोलत असताना मिया त्याला तिने अभिनेत्री बनायचा निर्णय का घेतला हे सांगते. पुढे अचानकच ती ‘आय हेट जॅझ’ म्हणाल्याने सबॅस्टियन आपलं मत आणि जॅझप्रेम तिला पटवून देण्यासाठी जॅझ ऐकवायला नेतो, तिथे जॅझबाबत उत्स्फूर्तपणे बोलत राहतो. आधीच्या कुठल्यातरी दृश्यात दिसलेल्या एका चित्रपटगृहामध्ये सुरु असलेल्या चित्रपटाचा संदर्भ इथे येतो. सबॅस्टियन तिला तोच चित्रपट, ‘रेबेल विदाऊट अ कॉज’ पहायला येणार का विचारतो. ती हो म्हणते. ही केवळ एका प्रकरणाची सुरुवात असते. मंजिले अभी और भी हैं… 

lala1

वर लिहिलेलं प्रकरण साधारणतः ‘ला ला लँड’चा एक तृतीयांशी भाग व्यापून आहे. चित्रपटाच्या संपूर्ण कथानकाचा, त्यातील मध्यवर्ती पात्रांचा विचार केल्यास ती अनेक अंगांनी पारंपरिक - एकमेकांशी अजिबातच न पटणाऱ्या दोन व्यक्ती ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन व्यक्ती - अशा तऱ्हेचा प्रवास असलेली पात्रं भासू शकतात. काही अंशी ती तशी आहेतही. मात्र, त्यापलीकडे जाऊन जेव्हा ही पात्रं आणि त्यांचं विश्व आपण लक्षात घेतो, तेव्हा ही पात्रं इतर अनेक रटाळ हॉलिवुडी प्रेमकथांहून वेगळी का आहेत, याची कारणं लक्षात येऊ शकतात. 

 

२/३ 

खरंतर इथेच ‘ला ला लँड’ पारंपरिक प्रेमकथांमधील घटक वापरून मुळातच त्यातील प्रेम या मध्यवर्ती संकल्पनेचा पुनर्विचार करताना दिसतो. इथे नायक आणि नायिका दोघांनाही समान महत्त्व आहे. कुठल्याही नात्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा, तिचीही काहीतरी बाजू असेल याचा विचार न करता खटके कसे उडू शकतात, ही अगदीच मूलभूत गोष्ट त्याच्या कथनाच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसून येते. मियाच्या दृष्टिकोनातून सुरु असलेलं प्रकरण जेव्हा सबॅस्टियनने तिला धक्का मारून निघून जाण्यात संपतं, तेव्हा तिच्याप्रमाणेच आपल्याही मनात - हा असा का वागतोय? - असा प्रश्न साहजिकच उद्भवतो. मियाला जरी याचं उत्तर मिळणार नसलं तरी लेखक-दिग्दर्शक शझेल आपल्याला सबॅस्टियनचा दृष्टिकोन कळेल असं पाहतो. कुठल्याही इतर जोडप्याप्रमाणे ‘योगायोग’ आणि ‘गैरसमज’ या दोन शब्दांवर त्यांच्या नात्याचा डोलारा उभा राहतो. ती दोघं ट्रॅफिकमध्ये एकामागे एक अशी असणं हा रोजच्या जीवनात कुणासोबतही घडू शकेल असा भाग झाला. दिवसभर फिरून रात्री नेमकी ती तो काम करत असलेल्या रेस्टॉरंटजवळून जात असणं, त्याने नेमकं त्यावेळी नकळतपणे ‘सिटी ऑफ स्टार्स’ वाजवत असणं, आणि तिनं ते ऐकून आत जाणं हा योगायोग आणि ‘त्या’ विशिष्ट क्षणाचा आविष्कार झाला. तर पुढे जाऊन एक महिन्यानं त्यांचं पुन्हा समोरासमोर येणं, हा विलक्षण योगायोग झाला. शक्याशक्यतेचा नियम आणि गैरसमजातून सुरु झालेलं नकारात्मक घटनांचं चक्र पुन्हा त्याच गोष्टींच्या निमित्ताने एका सकारात्मक गोष्टीची सुरुवात करणारं ठरतं. 

दरम्यान या सगळ्या गोष्टींमध्ये चित्रपटकर्त्यांचं यश कुठे दडलेलं आहे, तर ते या सगळ्या कथानकाच्या तपशिलांमध्ये. प्रत्येक दृश्यचौकट केवळ सुंदर आणि नेटकी बनण्यापलीकडे जाऊन तिच्यात समाविष्ट असलेल्या प्रत्येक घटकाचा, ऐकू येणाऱ्या प्रत्येक संवादाचा आणि घडणाऱ्या प्रत्येक दृश्याचा पुढे जाऊन कुठेतरी संदर्भ येईल अशी उत्प्रेरकं पेरून ठेवण्यात या परिपूर्ण अशा चित्रपटाच्या निर्मितीचं यश दडलेलं आहे. उदाहरणार्थ, मियाचं गाडी कुठे पार्क केलीय हे विसरणं जसं त्या पहिल्या दिवशी त्यांच्या भेटीमागील एक महत्त्वाचं कारण ठरतं, तसंच नंतर महिन्याभराने पार्टीत भेटल्यानंतर तेव्हाही हीच सवय ‘व्हॉट अ वेस्ट ऑफ अ लव्हली नाईट!’ म्हणत त्यांच्यातील अल्लड नात्याचं दर्शन घडवणारी ठरते. यापलीकडे जाऊन अशी किती उत्प्रेरकं चित्रपटभर पेरलेली याची गणतीच न केलेली बरी. 

पुढे जाऊन दोघांच्या स्वप्नवत भासणाऱ्या नात्याची जेव्हा सुरुवात होते, तेव्हा ती दृश्यं अशाच स्वप्नवत भासणाऱ्या, काहीशा जादुई वास्तववादाच्या (मॅजिकल रिअॅलिजम) थाटात समोर उभी केली जातात. आता ही स्वप्नवत परिपूर्णता कुठून येते, तर त्या दोघांच्या एकत्र असण्यातून. दोघेही एकमेकांना पुरेपूर जाणतात. दोघांच्या सविस्तर अशा पहिल्याच संभाषणाचा भाग त्यांच्या स्वतःच्या भविष्याविषयीच्या, स्वतःच्या स्वप्नांविषयीच्या बोलण्याने व्यापलेला असतो. तिथेच मिया सबॅस्टियनला ती स्वतः लिहीत असल्याबाबत सांगते. आणि तिथेच तो तिला स्वतःच एक एकपात्री नाटक लिहून त्यामध्ये अभिनय करण्याविषयीचा सल्ला देतो. दोघांच्या नात्याला अजून सुरुवातही झालेली नसताना ते एकमेकांना का परिपूर्ण करतात हे दिसून येऊ लागतं. सबॅस्टियन तिला त्याला स्वतःचा ‘जॅझ क्लब’ उघडायचा असल्याच्या आकांक्षेविषयी कळवतो. त्याच्या त्याविषयी असलेल्या उत्कट प्रेमाविषयी सांगतो. दोघेही तिथून बाहेर पडतात तेव्हा समोरच्याच्या आपल्या आयुष्यातील नुसत्या कल्पनेच्या अस्तित्त्वाने भारावून गेलेले असतात. मिया तर तिला बॉयफ्रेंड असल्याचंही विसरून जाते. ‘रेबेल विदाउट अ कॉज’ पाहून जेव्हा ते ‘ग्रिफिथ ऑब्जर्व्हेटरी’ला भेट देतात तेव्हा हे स्वप्न वास्तवात बेमालूमपणे मिसळलं जातं. (एमा स्टोननं असंच एक दृश्य असलेल्या वुडी अॅलनच्या ‘मॅजिक इन मूनलाइट’मध्येही (२०१४) अभिनय केलाय, हा आणखी एक योगयोग.) सगळे खाचखळगे पार करत दोघांच्या स्वप्नवत भासणाऱ्या नात्याची सुरुवात होते. 

lala2

प्रेमकथांबाबत ‘ती दोघं एकमेकांच्या आयुष्याला पूर्णत्वास नेतात’ असं अनेकदा म्हणता येतं. अनेकदा हे पूर्णत्व अगदी वरवर पाहता दिसणारं असतं. इथे मात्र हे पूर्णत्व अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर दिसून येतं. सबॅस्टियनने प्रोत्साहन दिल्यानंतर मिया खरोखर एक एकपात्री प्रयोग लिहिते. दरम्यानच्या काळात सबॅस्टियनचा जुना मित्र, कीथ (जॉन लेजंड) त्याला त्याच्या बँडमध्ये पियानोवादक म्हणून समाविष्ट करतो. दोघांचीही स्वप्नं पूर्ण होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतात. मिया अभिनेत्री बनणार असते, तर सबॅस्टियनला कीथच्या बँडमध्ये राहून मिळालेल्या पैशातून तो स्वतःचा क्लब सुरु करणार असतो. 

वास्तव आणि स्वप्नवत वास्तव या इथल्या इतर दोन महत्त्वाच्या संकल्पना. ही दोघंही एकमेकांना भेटण्यापूर्वी आपापल्या वास्तवानं हतबल झालेली असतात. सबॅस्टियनच्या तत्त्वांपायी त्याच्या नोकऱ्या सुटत असतात, नि आपल्यावर कुठलीही जबाबदारी नसल्याने त्याला ते विशेष खटकतही नसतं. मात्र, तो आपली स्वप्नं पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशीलदेखील नसतो. परिस्थितीला दोष देण्यात धन्यता मानताना दिसतो. दुसरीकडे, मिया ग्रेगसोबत (फिन विटरॉक) नात्यात असली, तरीही तो मानसिक, भावनिक पातळीवर तिचा सार्थ जोडीदार ठरू शकत नाही. तो त्याच्याच विश्वात मग्न असल्याचं तो ज्या काही मोजक्या दृश्यांमध्ये दिसतो त्यांत स्पष्टपणे दिसून येतं. मग, इथे येतो स्वप्नवत वास्तवाचा भाग. असं वास्तव ज्यात मिया आणि सबॅस्टियन केवळ एकत्रच येत नाहीत, तर एकमेकांसाठी नको तितके परिपूर्ण जोडीदार ठरतात. 

lala3

अर्थात सगळं काही सुरळीत सुरु असताना समस्या निर्माण होणं कथेच्या आलेखाच्या दृष्टीने गरजेचं असतं. इथे उद्भवणारी समस्या ही त्या दोघांचं नातं ज्या एकमेकांना वैचारिक, भावनिक, मानसिक पातळीवर साथ देण्याच्या विचारावर उभारलेलं असतं, त्याच विचारामुळे उद्भवते. मियाच्या प्रयोगाची तयारी सुरु असली तरी सबॅस्टियन बँडमध्ये राहून आलेल्या स्थैर्याचा विचार करत असतो. ज्यामुळे त्याचा स्वतःच्या जॅझ क्लबचा विचार मागे पडतो. तिला हे कळाल्यानंतर साहजिकच तिला हे पटत नाही. तो उडवाउडवीची कारणं देत, कुणीच त्या क्लबमध्ये येणार नाही म्हणतो. त्यानंतर मिया जे म्हणते तो खरा त्यांच्या नात्याचा पाया असतो. ती म्हणजे, “People will want to go to it because you're passionate about it and people love what other people are passionate about. You remind people of what they've forgotten.” आणि याच - त्यांना ज्याविषयी उत्कट प्रेम वाटत आहे, त्या गोष्टीत एकमेकांना साथ देण्याच्या एक प्रकारच्या अलिखित तत्त्वावर त्यांचं नातं उभं राहिलेलं असतं. आणि हे शक्य होत नाही, तेव्हा त्या दोघांच्या एकमेकांपासून दूर जाण्यास सुरुवात होते. त्यात बँडच्या काही कामापायी सबॅस्टियन मियाच्या एकपात्री प्रयोगाला वेळेत पोचू शकत नाही. आधी घडून आलेल्या शाब्दिक चकमकीचं आणि दुराव्याचं रूपांतर शब्दशः नातं तुटण्यात होतं, आणि ती लॉस अँजेलिस सोडून आपल्या आई-वडिलांच्या घरी परतते. 

 

३/३ 

एव्हाना चित्रपटाचा दोन तृतीयांश भाग संपलेला असतो. यापुढे घडणाऱ्या गोष्टी मात्र अधिक अपारंपरिक स्वरूपाच्या मानता येतील. त्यानिमित्ताने चित्रपट प्रेम या संकल्पनेअंतर्गत येणाऱ्या एका महत्त्वाच्या मुद्याचा पुनर्विचार करतो. तो म्हणजे केवळ कधीकाळी प्रेम होतं, म्हणून आजही ते आहे असं मानत नातं ताणण्यात काही अर्थ आहे का? अगदी त्या नात्यात असलेल्या दोघांचेही विचार सद्यस्थितीत पटत नसतील तरीही? अर्थात नातं तुटलं असलं, दोघांचे एकमेकांशी असलेले संबंध संपुष्टात आले तरीही कधीकाळी समोरच्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलेली भावना, तिने आपल्यावर टाकलेला प्रभाव पूर्णतः संपतो अशातला भाग नाही. कदाचित त्यामुळेच मिया दूर गेली असली तरी सबॅस्टियन तिच्या बोलण्याचा पुनर्विचार करून बँड सोडतो. तर मिया सततचं अपयश आणि त्यात भर घालणारं सबॅस्टियनचं वागणं यामुळे हतबल होऊन आपल्या कोषात जाते. ती एका निश्चल स्थायीभाव असलेल्या स्थितीत प्रवेश करते. 

शेवटाकडील भागातील विचार मुख्यत्वे उगाचच एखादं नातं ताणण्याच्या कृतीची चिकित्सा करणारा आहे. इथे पारंपरिक प्रेमकथेच्या धर्तीवर नायक नायिका एकत्र आणण्याचा प्रयत्न-वजा-अट्टाहास केला जात नाही. ‘वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे इक ख़ूब-सूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा’ म्हणत दोघेही आपलं नातं एका विशिष्ट काळापुरतं मर्यादित होतं, ही गोष्ट मान्य करतात. नायक किंवा नायिकेचा प्रवास आत्मघाताकडे होत नाही. ते दोघेही आपल्या जोडीदाराने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत आपल्या पॅशनवर, करियरवर लक्ष केंद्रित करतात. मिया आणि सबॅस्टियन एकत्रित नसतानाही एकमेकांच्या विचारांनी किती आणि कसे प्रभावित होतात, हे दिसणं म्हणजे त्यांच्यातील भावस्पर्शी नात्याची, त्यांच्या यशाची खरी पावती.

कथानक पाच वर्षं पुढे सरकतं तेव्हा मिया नावाजलेली अभिनेत्री बनलेली असते. डेव्हिडशी (टॉम एव्हरेट स्कॉट) लग्न करते. एके रात्री दोघं एका चित्रपटाच्या प्रीमियरकरिता बाहेर पडलेले असताना आपला विचार बदलून जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये जातात. तिथून बाहेर पडताना एका जॅझ क्लबजवळ रेंगाळतात. क्लबमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यावर आत शिरत असताना मियाला सबॅस्टियनच्या क्लबच्या नावासाठी तिच्या मनात होतं तेच ‘सेब्स’ असा उल्लेख असलेलं डिझाइन समोरच्या भिंतीवर दिसतं. 

अखेर सबॅस्टियननेही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत स्वतःचा जॅझ क्लब सुरु केलाय. त्यांचं नातं संपुष्टात आलं असलं तरी कधीकाळी त्यांनी एकमेकांना दिलेला सल्ला, एकमेकांच्या भविष्याविषयी एकत्रितपणे केलेले विचार अजूनही तसेच आहेत. भलेही ते एकत्र नसले तरीही कधीकाळी एकत्र घालवलेल्या त्या क्षणांचा पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली नाही. सदर चित्रपटाचा शेवट सुखांत आहे की नाही अशा अर्थाच्या चर्चा नंतर सुरु होत्या किंबहुना अजूनही आहेत. माझ्या मते तरी, चित्रपटाच्या शेवटी त्या दोघांनी एकेमकांकडे पाहून केलेलं स्मित म्हणजे त्याच्या सुखांत असण्याची खूण मानता येईल. ओढूनताणून अजूनही आमचं एकमेकांवर प्रेम आहे, असं स्वतःलाच भासवण्यापेक्षा त्या नात्यातून बाहेर पडणं कधीही अधिक न्याय्य आणि योग्य ठरतं. आणि त्यामुळेच प्रेमकथेच्या माध्यमातून प्रेमभावनेच्या सर्व अंगांचा, आणि मुख्य म्हणजे सदर नात्यात असलेल्या दोन्ही व्यक्तींचा विचार करणारा ‘ला ला लँड’ हा एक नितांतसुंदर असा आद्य सांगीतिक चित्रपट ठरतो.