Quick Reads
जग्गा जासूस: बसूचा अ-वास्तववाद
स्पॉटलाईट सदर
आपल्याकडे चित्रपट आणि संगीत या दोन्ही गोष्टींचा घनिष्ठ संबंध असताना सांगीतिका हा प्रकार मात्र आपल्याकडे अगदीच क्वचितपणे पहायला मिळतो. परिणामी अनेकदा चित्रपटातील संगीत आणि गाणी म्हणजे केवळ पलायनवादी भूमिका घेणाऱ्या चित्रपटांकरिता गरजेचे असलेचे घटक म्हणून समोर येतात. त्यामुळे आपल्याकडे गाण्यांच्या माध्यमातून कथानक पुढे नेण्याचा सांगीतिका नामक प्रकार कधी त्याच्या सर्वोच्च शिखरावर पोचला असं म्हणताच येत नाही. याउलट अलीकडे तर गाणी ही लोकप्रिय कलाकृतीमध्ये लोकांच्या समाधानासाठी, किंवा व्यावसायिक कारणांसाठी अशा कथाबाह्य घटकांपायी अधिक येतात, ना की कथनाचं माध्यम म्हणून. मुळातच अनेक चित्रपटकर्त्यांना हा धोका पत्करावा वाटत नाही, तर जे पत्करतात त्यांचं अपयश (मग ते कलात्मक असो वा आर्थिक) आधीच दुर्मिळ असणाऱ्या या प्रकाराकरिता अधिक हानीकारक ठरतं.
यापलीकडे जात प्रेक्षकाने अशा प्रयोगांकडे चुकीच्या किंवा एका विशिष्ट प्रकारच्या दृष्टिकोनातून पाहणंदेखील आपल्याकडील मुळातच दुर्मिळ अशा सांगीतिकांवर अन्यायकारक ठरतं. ‘जग्गा जासूस’ हा चित्रपटही अशाच काही चित्रपटांमध्ये मोडतो. हे नाव परस्परविरोधी प्रतिक्रियांनी वेढलेलं आहे. हा चित्रपट एकाचवेळी त्याच्या प्रेमात पडायला लावणारा, आणि त्यातील दोष अस्तित्त्वात नसते तर तो किती प्रभावी होऊ शकला असता या सततच्या जाणिवेमुळे हताश करणारा आहे. तो सर्वांना सहजासहजी आवडेल, किंवा पूर्णतः आवडेल असा नक्कीच नाही. सदर चित्रपट त्याने निर्माण केलेल्या विश्वाकडे कुठलेही पूर्वग्रह मनात न बाळगता, आपल्या विश्वाचे नियम त्यावर न लादता पहावा लागेल. (आनंद एल. रायच्या ‘झीरो’प्रमाणे.) त्यासाठी बसूच्या अशक्यप्राय कल्पनांच्या अधीन व्हावं लागेल.
इस्पितळात वाढलेला चिमुकला (अनाथ) जग्गा तोतरेपणामुळे त्रस्त आहे. त्याचं अडखळत बोलणं त्याच्या आनंदाच्या आड येणारं आहे. अशात इस्पितळात दाखल झालेला बागची (सास्वत चटर्जी) हा विक्षिप्त पेशंट त्याच्या संपर्कात येतो. (बसूची कल्पनाशक्ती आता बहरायला लागणार असते.) बागचीला बॅड-लक बागची म्हणून ओळखलं जातं. अपघात आणि बागची हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरले जाणंच काय ते बाकी असतं. हा बागची जग्गाला एक नामी युक्ती सुचवतो. मेंदूचा डावा भाग चिकित्सक विचारासाठी बनलेला आहे, तर उजवा भाग सर्जनशील विचारांसाठी असं म्हणत तो जग्गाला गात असल्याच्या थाटात संवाद साधायला शिकवतो. बागचीची कल्पना काम करते, नि सुरात गाऊ लागला की जग्गा न अडखळता संवाद साधू शकतो. ही बापलेकाची विचित्र जोडी शोभून दिसणारी असते.
खरंतर या निवडक प्रसंगांतच ‘जग्गा जासूस’च्या वैचित्र्यपूर्ण, तरीही रंजक विश्वाचं मूळ एकवटलेलं आहे. बसू सदर चित्रपट बनवताना अनेक देशी-विदेशी चित्रपटांकडून, त्यांच्या केंद्राशी असलेल्या आत्म्याकडून प्रेरणा घेतो. खोटं कशाला बोला, पण काही एक वेळा उचलेगिरीही करतो. (शिक्षकाच्या प्रेयसीच्या मृत्यूच्या उकलीचं प्रकरण सरळसरळ ‘मंक’ या अमेरिकन मालिकेतून घेतलेलं आहे.) असं असलं तरी शेवटी तो हे सगळं त्याच्या नितांतसुंदर विश्वात पाहणाऱ्याला थक्क करेलशा कलात्मकतेनं एकत्र आणतो. जॅकस डेमी दिग्दर्शित ‘द अम्ब्रेलाज ऑफ शेबर्ग’ (१९६४) म्हणजे सदर चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘संपूर्ण चित्रपट गाण्यांच्या चालीवर मांडणे’ या कल्पनेमागील थेट प्रेरणा आहे. आता ‘द अम्ब्रेलाज…’मध्ये ही कल्पना कुठलंही स्पष्टीकरण न देता राबवली होती. पण, बसू त्यामागे एक (वैचित्र्यपूर्ण) कारण देतो, थोडक्यात तो चित्रपटाचं विश्व उभं करताना काहीतरी प्रयत्न करताना दिसतो.
आता हे झालं ‘जग्गा जासूस’ला त्याचं सांगीतिक स्वरूप कसं प्राप्त होतं याबाबत. त्याची जासूसी अजून बाकी असते. लवकरच बागचीला कामानिमित्त दूर जावं लागणार असल्याने जग्गाची रवानगी वसतिगृहामध्ये होते. ज्यानंतर त्याचा आणि बागचीचा संबंध येतो तो केवळ दरवर्षी याच्या वाढदिवशी पोचेल अशा पद्धतीने बागची पाठवत असलेल्या व्हिडिओ टेप्सच्या माध्यमातून. एके वर्षी अशी टेप येत नाही, आणि जग्गाचं बागचीचा शोध घेण्याचं अविरत काम सुरु होतं.
सदर चित्रपट या मूलभूत संकल्पनेभोवती फिरत असताना तीन वेगळ्या टप्प्यांमध्ये विभागला जातो. लेखक-दिग्दर्शक बसूच्याच शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास तो पटकथेच्या स्वरुपाच्या पातळीवर काही प्रयोग करू पाहत होता. ज्यामुळे तीन प्रकरणं, आणि तिन्ही प्रकरणांना स्वतंत्र सुरुवात, मध्य नि शेवट अशी रचना त्याने केली होती. असं करत असताना काही वेगवेगळ्या मोहिमांच्या माध्यमातून जग्गाची वाटचाल होते. ही तिन्ही प्रकरणं जोडली जातात ती श्रुती सेनगुप्ता (कतरिना कैफ) ही जग्गाची साथीदार, शोध पत्रकार काही मुलांना त्याची गोष्ट सांगत असल्याच्या माध्यमातून.
वसतिगृहातील (संभाव्य) खुनाच्या प्रकरणाचा मागोवा घेण्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्ह्याची उकल करण्याच्या प्रयत्नांपर्यंत सगळ्या गोष्टी इथे घडतात. याखेरीज बागचीचा शोध घेण्याचं उपकथानकही सुरु राहतं. दरम्यान हे सारं करत असताना बसू कमालीचा महत्त्वाकांक्षी होतो. जग्गाची लांबी वाढण्यापासून ते त्याच्या कथानकाचा विस्तार होत जाणं सगळं काही जग्गाच्या अतिशयोक्तीपूर्ण विश्वाहूनही अधिक अतिशयोक्तीपूर्ण बनत जातो.
अतिशयोक्ती या चित्रपटाच्या नसानसांत भिनलेली आहे. पण, तिला जोड म्हणून पोरकटपणाही इथं अस्तित्त्वात आहे. असं म्हणू शकतो की हा बसूचा अ-वास्तववाद आहे. तो नेहमीच्या पलायनवादी भूमिकेहून निराळा आहे, तो वास्तवाच्या अगदी विरुद्ध असा आहे. त्यामुळे बसू हे विश्व जितक्या स्वप्नवत भूमिकेनं साकारतो आहे, त्याकडे तितक्याच स्वप्नवत नजरेनं पहायला हवं. अविश्वाचा त्याग करण्याची कधी नव्हे तितकी गरज इथे आहे.
अर्थात या अविश्वसनीयतेतही एक सुंदरता आहे. बसू ज्या पद्धतीने कल्पनाविस्तार करतो त्यात चित्रपट या माध्यमावरील विश्वास दडलेला आहे. त्याचा परिणाम म्हणजे तो आणि छायाचित्रकार रवी वर्मन मिळून चित्रपटातील एकूण एका दृश्यचौकटीत रंगांची उधळण करतात. वर्मन तर पुढे जाऊन ‘मिशन मंगल’ नामक अशक्यप्राय चित्रपटातही कितीतरी प्रभावीपणे दृश्यं टिपताना दिसतो. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी चित्रपटातील त्याचं छायाचित्रण देखणं होतं यात काही नवल नाही. एखाद्या क्लोज-अप/एक्स्ट्रीम क्लोज-अपपासून ते साउथ आफ्रिकेतील निसर्गसौंदर्य टिपणाऱ्या दृश्यांपर्यंत सगळीकडेच हे दिसतं.
इथे अमिताभ भट्टाचार्य आणि अनुराग बसू चित्रपटाचे तालबद्ध संवाद लिहितात. ज्यात एक उपजत खट्याळपणा आहे. इथे यमक जुळवण्यातही पात्रांनी उभ्या जागी गाणी लिहिली असा आविर्भाव आहे. उदाहरण म्हणून चित्रपटातील कुठल्याही गाण्याकडे, कुठल्याही प्रसंगाकडे पाहता येईल. अर्थात चित्रपटाची नायिका मात्र या सांगीतिक खटाटोपात अज्जिबात शोभत नाही.
‘जग्गा जासूस’ म्हणजे जमून आलेल्या आणि फसलेल्या अशा दोन्ही तऱ्हेच्या गोष्टींचं मिश्रण आहे. अशावेळी हटकून विकास बहलचा ‘शानदार’ (२०१५) आठवतो. तोही प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि त्या महत्त्वाकांक्षेपायी काही प्रमाणात फसलेला चित्रपट. तो ‘जग्गा जासूस’च्या धर्तीवरील नसला तरी एका वेगळ्या सांगीतिक प्रयोगच होता. त्यातील गाणीही अमिताभ भट्टाचार्यने लिहिली होती हा खचितच योगायोग नाही. बहलच्या ‘सुपर ३०’मध्येही अशीच हटकून फिल्मी आणि सांगीतिक दृश्यं आहेत, हाही काही योगायोग नसावा. बसू, बहल यांसारख्या लोकांनी पत्करलेले धोके, पाहिलेली स्वप्नंच या चित्रपट प्रकारासाठी गरजेची आहेत.
किंवा राजकुमार हिरानीदेखील कथनाची अशीच तंत्रं वापरताना दिसतो. त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटांकडे पाहिल्यास ते एक प्रकारे सांगीतिकाच आहेत असं म्हणता येतं. ‘मुन्ना भाई एमबीबीएस’मधील ‘एम बोले तो’ किंवा ‘अपुन जैसे टपोरी को…’ ही गाणी चित्रपटातील पात्रांनी जणू उत्स्फूर्तपणे गायली आहेत अशी, सांगीतिकेत शोभतील अशीच तर आहेत.
अर्थात हिरानी याबाबत अधिक यशस्वी ठरलेला आहे. ज्यामागे एक कारण असंही असू शकेल की ती त्याच्या कथनात अगदी सहजतेनं आलेले घटक आहेत. त्याच्या कथनाच्या तंत्रात एक विलक्षण सहजता, नैसर्गिकपणा (किंवा किमान तसा आभास) आहे. जे सांगीतिकांमध्ये महत्त्वाचं ठरतं. याउलट बसू किंवा इतर लोक या प्रकारात काहीतरी प्रयोग करताना धडपताना दिसतात. त्यांचं धडपडणंही नक्कीच दखलपात्र आहे, कारण त्यात त्यांच्या महत्त्वाकांक्षा, धोके पत्करण्याची तयारी दिसते.
‘जग्गा जासूस’चा पुढचा भाग येण्याच्या शक्यता त्याच्या प्रदर्शनानंतर लागलीच संपल्या होत्या. सीक्वेल नाही, पण किमान या मूळ चित्रपटाला तरी त्याचं हक्काचं असं प्रेम मिळायला हवं असं राहून राहून वाटतं. त्याकरिताच हा लेखप्रपंच.