India

मुलाखत: यांच्या प्रयत्नाने हिंदीमध्येही मराठीतला 'ळ' तसाच वापरावा लागणार

नुकतेच केंद्र सरकारच्या हिंदी विभागाने 'ळ'च्या वापराबाबतचे परिपत्रक रेल्वे, बँकांसह सर्व सरकारी कार्यालयांना पाठविले आहे.

Credit : इंडी जर्नल

नुकतेच केंद्र सरकारच्या हिंदी विभागाने 'ळ'च्या वापराबाबतचे परिपत्रक रेल्वे, बँकांसह सर्व सरकारी कार्यालयांना पाठविले आहे. यापुढे हिंदीत 'लोणावळा', बेळगांव, धुळे, जळगांव, 'बाळासाहेब' असे शब्द लिहिता येतील. 'ळ' चा ल' करणे सूचनांचा भंग करणारे ठरणारं आहे.

हिंदीमध्ये 'ळ' ऐवजी 'ल'चा वापर करणे चुकीचे ग्राह्य धरले जाणार आहे. भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांनी केंद्र सरकारकडे वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या विषयी त्यांच्याशी इंडीजर्नलने केलेली बातचीत. 

प्रश्न: 'ळ' या शब्दांचा वापर हिंदी मध्ये आवश्यक रित्या करावा, असे का वाटले? 

प्रकाश निर्मळ: मी स्वतः एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून कामाला आहे. त्यामुळे कार्यालयाचा पत्रव्यवहार होतांना माझे आडनाव 'निर्मळ' ऐवजी 'निर्मल' असे लिहून यायचे. त्याचबरोबर हिंदी बातम्यांचे चॅनेल्स अथवा इतर काही वाचतांना तिलक, बालासाहेब, पर्ली,वर्ली असे ऐकताना त्रास होत असे. मी बऱ्याच चॅनल ना लिहिले, प्रसारण मंत्र्यांना लिहिले.  पण उपयोग झाला नाही. इंग्रजीत 'छ'चा उच्चार नाही, पण लिहितानाच सारखा लिहीत नाही, 'chh' असा लिहतो, 'तर मग 'ळ' का 'ल' सारखा लिहावा?' असे मला वाटू लागले आणि तिथून ही 'ळ' मोहीम सुरू झाली. 

हिंदीमध्ये 'ळ'चा वापर करण्यात यावा, यासाठी मी राष्ट्रपती, पंतप्रधान व राज्यपाल कार्यालय; तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाचा राजभाषा विभाग, उच्च शिक्षण मंत्रालयाचा हिंदी विभाग, प्रसारण मंत्रालय यांना वारंवार पत्र लिहिले. पहिल्यांदा नकारात्मक प्रतिक्रिया मिळत गेल्या. परंतु, मी 'हाती घ्याल ते तडीस न्या' या उक्तीप्रमाणे काम करत राहिलो. हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेला याचा आनंद आहे. 

प्रश्न: 'ळ' हा शब्द याआधी हिंदीमध्ये होता का? असेल तर त्याचे काही पुरावे तुम्ही हिंदी भाषा विभागाला दिले का ? 

प्रकाश निर्मळ: संस्कृत भाषेतून हिंदीचा उगम झाला आहे, त्यात 'ळ' आहे हे मी पुराव्यांसह पटवून दिले. जे भाषिक प्रवाह हिंदीला येऊन मिळतात त्यातील राजस्थानी, हरयानवी, गढवाली, कुमाउणी, नेमाडी या हिंदीच्या लोकभाषा मध्ये 'ळ' आहे. ज्या भाषा भगिनींचे नेतृत्व हिंदी करते त्यातील चार दक्षिणी भाषा, तीन पश्चिमी भाषा आणि दक्षिण पूर्वेतील ओडिया भाषा अशा एकूण १४ भाषांत 'ळ' असूनही त्या वर्णाची उपेक्षा हिन्दीने करणे चुकीचे आहे हे मी सांगितले. 

हिंदी ही उच्चार प्रधान भाषा आहे. तसेच, ती राजभाषा म्हणून सर्वसमावेशक असणे ही हिंदीची गरज आहे. शिवाय व्याकरणाच्या विशेष नामाच्या नियमानुसार, नावाचे भाषांतर होवू शकत नाही. उर्दूने पहाडी लोकांच्या उच्चारणाबाबत दाखवलेल्या नकारात्मक भूमिकेतून 'ळ' आणि 'ण' उर्दूतून आणि 'ळ' खड़ी बोलीतून नाहीसे झाले असले तरी अखिल भारतीय हिंदी म्हणजे केवळ 'खडी बोली' हिंदी नव्हे. हे सर्व पुरावे, तसेच पत्रव्यवहार मी संबधित विभागाशी करत राहिले आणि त्याचा पाठपुरावा पण करत गेलो. 

 

प्रश्न: हिंदी विभागाची 'ळ' विषयीची नकारात्मकता तुम्हांला काम करतांना जाणवली का? 

प्रकाश निर्मळ: हो, जाणवला. त्याचबरोबर काही नकारात्मक अनुभवही आले. परंतु, काही अधिकाऱ्यांच्या सकारात्मकतेमुळे हा निर्णय झाला असे म्हणायला हरकत नाही. मला आश्चर्यचा धक्का तेंव्हा बसला जेंव्हा हिंदीत 'ळ' वर्णासाठीच्या तरतूदीची  माहिती आमच्याकडे  नाही असे गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने सांगितले! त्यानंतर त्यांनी हा विषय उच्च शिक्षण विभागाकडे वर्ग केला. त्यांनी हिंदी भाषा लेखनात अशा प्रकारची तरतूद केली असल्याचे स्पष्टीकरण दिले. लोणावळा, 'बाळासाहेब', श्रवण बेळगोळ, बेळगाव', 'मल्याळम', तमिळ या शब्दांचे नामांतर करणे जनभावनेला ठेच पोचवणारे आहे. आता 'ळ'चा हिंदीतील उच्चार हा प्रादेशिक राजभाषांचा विजय आहे, असे मला वाटते. 

प्रश्न: जर 'ळ' वापरला गेला नाही तर या संदर्भात राजभाषा विभागाने काही तरतुदी केल्या आहेत का?

प्रकाश निर्मळ: हिन्दी निदेशालयाने 'ळ' अक्षर हिंदीच्या परिवर्धित वर्णावलीत स्वीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे तो ऐतिहासिक आहे. यापुढे रेल्वे, बँका, तसेच सर्व केंद्र सरकारी कार्यालयांना स्थानिक नावात बदल करता येणार नाही. 'ळ' ऐवजी 'ल' लिहिणे सूचनांचा भंग ठरेल. 'ळ'चा 'ल' केलेला आढळला तर केंद्र सरकारच्या हिंदी आणि राजभाषा विभागाकडे तक्रार करता येईल.