India

नांदेड: धार्मिक मिरवणुकीला परवानगी नाकारल्यानं शीख तरुण आणि पोलिसांमध्ये संघर्ष

गेल्या ३०० वर्षांपासून हल्ला मोहल्ला, हल्लाबोल या धार्मिक कार्यक्रमाची परंपरा आहे.

Credit : Sources

नांदेड: महाराष्ट्रात व नांदेडमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या वतीने कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही असा आदेश काढला गेलेला आहे. मात्र या आदेशाची पायमल्ली करत नांदेड शहरात शीख समुदायाच्या हल्लामोहल्ला मिरवणुकीतील काही तरुणांनी परवानगी का नाकारली म्हणून पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. या प्रकरणानंतर तणावाचे वातावरण निर्माण झालं असून हल्लेखोरांची धरपकड सुरु आहे व वजिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शिख समाजात होळी या सणाला मोठे महत्व आहे. त्यानिमित्त शिख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्लामोहल्लाची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्यात आले आहे.

 

 

३०० वर्षाची हल्ला-मोहल्लाची परंपरा

शीख धर्मियांची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नांदेड येथील सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी हल्ला मोहल्ला हल्लामोहल्ला हा कार्यक्रम घेण्यात येतो. गेल्या ३०० वर्षांपासून हल्ला मोहल्ला, हल्लाबोल या धार्मिक कार्यक्रमाची परंपरा आहे. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी हल्ला-मोहल्ला, हल्लाबोल कार्यक्रमासाठी देशविदेशातून शीख भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी २५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनचे आदेश दिलेले आहेत.

आदेशाची पायमल्ली, पोलीस कर्मचाऱ्यावर हल्लाविनापरवानगी हल्लामोहल्लाची मिरवणूक काढून काही संतप्त शिख तरुणांनी चक्क पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक केली ज्यात सहा पोलिस जखमी झाले आहेत. एवढेच नाही तर पोलीस अधीक्षकांच्या शासकिय गाडीसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यांनाही लक्ष करण्यात आलं. पोलिस विभागाकडून आता या तरुणांचा शोध सुरु असून, सध्या वजीराबाद परिसरात तणावाचे वातावरण बनले आहे. हा प्रकार सायंकाळी सहाच्या सुमारास गुरुद्वारा परिसरात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सोमवारी (ता. २९) मिरवणूक होळीनिमित्त काढण्यात आली. परंतु जिल्हा प्रशासनाने त्यांनी मिरवणूक काढू नये, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने काळ कठीण आहे. त्यामुळे शीख समाजाने प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली होती. परंतु गुरुद्वाराच्या वतीने परवानगी नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवत हल्लाबोलची मिरवणूक काढली. एवढेच नाही तर संतप्त शीख युवकांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेड्स तोडून टाकले, हातात नंग्या तलवारी घेऊन निदर्शनं केली. शेवटी पोलिस प्रशासनाकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता चक्क त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला. यात पोलीस आयुक्तांचे अंगरक्षक दिनेश पांडे, अजय यादव यांच्यासह सहा ते सात पोलिस गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात स्वत: एसपी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले या हल्ल्यात बचावले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डाॅ विपीन यांनीही भेट दिली. हल्लेखोरांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यावर हल्ला करण्यासोबतच वाहनांची प्रचंड नासधुस केली. अनेक गाड्यांच्या टायरमधील हवा सोडली, काचा फोडल्या. या प्रकरणात सध्या कुठलाही गुन्हा दाखल नसून या भागात तणावाचे वातावरण बनले आहे. पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले.

यावर हुजूर साहिब गुरुद्वारातर्फे इंडी जर्नलशी बोलताना तिथले एक कर्मचारी नवज्योतसिंग म्हणाले की काही तरुण भावनेच्या भरात वाहत गेले. "आमची ही खूप जुनी परंपरा आहे. ही मिरवणूक गुरुद्वारा परिसर आणि शहरातला काही परिसर फिरून पुन्हा येते. आम्ही मागच्या वर्षी ही मिरवणूक काढली नाही व सहकार्य केलं, मात्र यावर्षी गुरुद्वाराच्या बाहेर मिरवणूक आणण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं काही तरुण परंपरा मोडत असल्याच्या कारणानं भडकले आणि हा गदारोळ झाला, तरीही गुरुद्वारा समितीकडून आणि आयोजकांकडून लगेच यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न झाले. आम्ही आता सर्वांना शांत केलं आहे आणि परिस्थिती निवळली आहे. माध्यमांनीही संयमानं वार्तांकन करून आम्हाला सहकार्य करावं."