India
महाराष्ट्राची ग्रामीण आरोग्य यंत्रणाच ऑक्सिजनवर; प्रशासन हतबल
परिस्थिती अशीच कायम राहिल्यास ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्युसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता.
वाढती रुग्णसंख्या आणि पर्याप्त आरोग्य सुविधेच्या अभावामुळे आता आरोग्य यंत्रणाच ऑक्सिजनवर आली आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्युसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण केंद्राअभावी ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांवर उपचार मिळत नसल्याने दिवसागणिक मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरांसह ग्रामीण भागालाही मोठा विळखा घातला आहे. लक्षणांकडे केले जाणारे दुर्लक्ष आणि काळजी न घेण्याच्या प्रकारांनी संसर्गाची तीव्रता वाढत आहे. यातील अनेकजण आजार अंगावर काढत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे. शहरांतील कोरोनाग्रस्तांची चर्चा होताना दिसते, मात्र ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थिती चिंताजनक होत आहे.
"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचे संक्रमण अतिशय जलद होत आहे. ग्रामीण भागात खबरदारीच्या अभावामुळे संसर्ग वाढत आहे. संवेदनशीलपणे आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शन सूचनांचा अवलंब केल्यास हे संकट टाळता येणार आहे. भिऊ नका, पुढे या अन् वेळीच उपचार घ्या. गोंधळून न जाता कोरोनाची लक्षणे समजून घेणे महत्त्वाचे आहे," असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
गतवर्षापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्गाने आपले हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. मात्र, गतवर्षी एखाद्या गावात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यास जिल्हा आरोग्य यंत्रणा त्या गावात दाखल होऊन त्या रूग्णाला रूग्णालयात दाखल केले जात होते. त्या रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविले जात होते. तसेच निर्जंतुतीकरणही केले जात होते.
प्रशासन हतबल तर नागरिकांची बेफिकिरी
यंदा कोरोनाचा पीक पिरियड सुरू असताना ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या रूग्णांकडे कोणीही फिरकत नसल्याचे चित्र आहे. याचे उदाहरण म्हणजे सहा दिवसांपूर्वी अंबड तालुक्यातील सोनकपिंपळगाव येथील एक व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. मात्र, मागील सहा दिवसांपासून या रूग्णाकडे किंवा त्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीकडे आरोग्य यंत्रणेचा एकही कर्मचारी फिरकला नाही. तसेच तो रूग्ण रूग्णालयात दाखल झाला आहे का? त्या रूग्णाने उपचार घेतले आहेत का? त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची कोरोना चाचणी केली आहे का? याची साधी विचापूस ही आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला या रूग्णासंदर्भात माहिती नव्हती. तसेच, परभणी जिल्ह्यातील कान्हेगाव येथे एकाच दिवशी ४३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. परंतु, ना प्रशासन हलले ना गावपातळीवरील यंत्रणा. सकारात्मक अहवाल आलेले नागरीक बिनबोभाट फिरत होते. तरीही ना प्रशासनाकडून विचारपूस होत होती ना गावच्या टास्क फोर्स कडून.
त्यामुळे आरोग्यमंत्री ग्रामीण राजेश टोपे यांच्या जिल्ह्यातील भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे. परिणामी ग्रामीण भागातील कोरोना रूग्ण वाऱ्यावर असल्याने कोरोना संसर्गाचा प्रसार होत असून रूग्ण संख्येत वाढ आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केवळ लाॅकडाउन करून भागणार नाही, तर प्रत्येक कोरोनाबाधित रूग्णांवर उपचारासह त्याच्यावर देखरेख ठेवणेही तेवढेच महत्वाचं आहे. यामुळे होणारा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.
काही गावातुन पालक अधिकारी गायब
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. यासंदर्भात, जिल्हा प्रशासनाने आदेश काढले. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी सरपंच या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. त्यातच नेमणूक करण्यात आलेले तलाठी, ग्रामसेवक, पालक अधिकारी गावांमध्ये येत नसल्याने गावामध्ये सर्व व्यवसाय चालू आहेत.
प्रशासनाची भूमीका काय ? राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर म्हणाले, "लक्षणे दिसल्यास ताबडतोड आपल्या जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. लक्षणे दिसून आल्यास अंगावर काढू नका, त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. घाबरू नका, जागरूक राहा. योग्य वेळीच उपचार केल्याने कोरोना बरा होतो. सकारत्मक दृष्टिकोन ठेवा. आपणही जागरूक राहा, इतरानंही जागरूक करा. या संकटावर मात करूया."
जालना जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले की, "कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्यानंतर रूग्णांची यादी त्या-त्या भागातील आरोग्य यंत्रणेला पाठविली जाते. त्यामुळे यंत्रणेतील सर्वांना कोरोना रूग्णांची माहिती मिळते. ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांवर उपचारासह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचण्या संदर्भातील त्रूटी पूर्ण करण्याच्या आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत."
परभणी जिल्ह्यातील सोनपेठच्या नायब तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी सांगितले, "प्रत्येक गावात सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय टास्क फोर्स समिती नियुक्त केली आहे. या समितीचे ग्रामसेवक हे सचिव आहेत. त्याचप्रमाणे गावातील, उपसरपंच, पोलीस पाटील, रेशन दुकानदार, अंगणवाडी सेविका , आशा कार्यकर्ती आरोग्य सेविका, मुख्याध्यापक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सर्व ग्रामपंचायत सदस्य हे या समितीचे सदस्य आहेत. प्रत्येक गावासाठी एक पालक अधिकारी (तलाठी / कृषी सहाय्यक / ग्रामसेवक) नियुक्त केलेला आहे. कोणीही पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्यास, त्यांना तात्काळ सीसीसी केंद्र ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे ऍडमिट करून त्यावर इलाज करण्यात येत आहे."