Quick Reads

‘गहराइयाँ’: प्रेम आणि अप्रामाणिकतेचे समकालीन चित्र

स्पॉटलाईट सदर

Credit : Indie Journal

एरवी हिंदी चित्रपटांमध्ये आपण प्रेमाकडे फारच सोप्या, सुटसुटीत आणि सात्विक पद्धतीने पाहतो. एकतर प्रेमाच्या वाटेतील सर्व अडथळे बाह्य स्वरूपाचे तरी असतात किंवा मग जोडप्यामध्ये तणाव असेल तर तोही वरवरचा असतो. त्यामुळे एखादे नाते टिकवण्यासाठी, ते फुलवण्यासाठी किती खटाटोप करावे लागतात, हे सहसा समोर येत नाही. प्रेम ही मुळातच क्लिष्ट संकल्पना आहे. आणि प्रेमामध्ये जेव्हा खोटेपणाचा समावेश होतो, तेव्हा या संकल्पनेच्या क्लिष्टतेत अधिकच भर पडते. असे असूनही प्रेमाची क्लिष्टता पुरेशा गंभीरपणे आणि सखोलीने समोर मांडली जात नाही. शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराइयाँ’ मात्र याबाबत ठळक अपवाद मानावा असा आहे. कारण, प्रेम व मानवी स्वभावाचे जटिल स्वरूपच इथे केंद्रस्थानी आहे.

‘गहराइयाँ’ची मध्यवर्ती संकल्पना आणि कथानकाचा पाया हा अगदीच सोप्या व मुलभूत प्रकारचा आहे. आलिशा खन्ना (दीपिका पादुकोण) ही गेली सहा वर्षं करणसोबत (धैर्य कारवां) नात्यात आहे. करण हा त्याचे पुस्तक पूर्ण करण्यात व्यस्त असल्याने घराची जबाबदारी आलिशावर आलेली आहे. तिची महत्त्वाकांक्षा आणि करणचा अक्रियाशील स्वभाव यातील संघर्षामुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होत असतो. मात्र, इथला विसंवाद व तणाव हा केवळ या एका जोडप्यापुरता मर्यादित नाही. आलिशा आणि तिच्या वडिलांमध्येही विसंवाद आहे, आलिशाची चुलत बहीण टिया (अनन्या पांडे) आणि आलिशामध्येही गेल्या काही वर्षांत अंतर निर्माण झालेले आहे. हे तर झाले वर्तमानात. भूतकाळात देखील आलिशाचे आई-वडील आणि टियाचे आई-वडील यांच्यात तणाव निर्माण होऊन त्यांच्या नात्यावर विपरीत परिणाम झाला होता. तणावग्रस्त नातेसंबंध आणि विसंवाद ही इथली एक महत्त्वाची संकल्पना आहे.

आलिशा आणि करणमधील विसंवादाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हे जोडपे टिया व तिचा होणारा पती झैन (सिद्धांत चतुर्वेदी) यांच्यासोबत दोन दिवसांच्या सुटीवर जाते, तेव्हा चित्रपटातील प्रेमाच्या संबंधांत खोटेपणाचा अंतर्भाव होतो. ज्यामागील कारण असते आलिशा आणि झैन यांनी एकमेकांकडे आकर्षित होणे. टियाचा भौतिकवादी स्वभाव, तिच्या आईकडून मिळणारी अपमानजनक वागणूक यामुळे झैन उबगलेला असतो, तर आलिशा प्रत्येक गोष्टीत डोकावणाऱ्या करणच्या नीरसतेला कंटाळलेली असते. अशात या दोघांनाही आपापल्या सहचरापासून तसेच वर्तमानापासून पलायनाचा मार्ग सापडतो तो एकमेकांप्रती वाटणाऱ्या आकर्षणात. त्यांच्यातील प्रेमाचे स्वरूप हे केवळ निंदनीय प्रेमप्रकरणाचे नाही. आलिशा आणि झैनच्या क्लेशकारक भूतकाळाने त्यांच्या मनावर केलेले आघात आणि त्यांच्यात असल्या-नसलेल्या समानता त्यांना जोडत असतात, जवळीक निर्माण करतात. प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे आपापल्या वर्तमान आणि भूतकाळापासून पळ काढण्यासोबत स्वतःच्या भविष्याची सुखद स्वप्नेदेखील पाहत असतात.

 

 

आलिशा आणि झैनमध्ये जवळीक निर्माण होत असतानाचा भाग दिग्दर्शक बत्रा, इन्टिमसी डिरेक्टर डार गई आणि छायाचित्रकार कौशल शाह फारच उत्कृष्टरीत्या उभा करतात. ओफ आणि सवेरा यांची गाणीदेखील यात महत्त्वाचा घटक आहेत. मात्र, प्रेम, आकर्षण आणि जवळीकीचे सुरूवातीचे स्वप्नवत दिवस सरले की प्रेमाची खरी परीक्षा सुरु होते. आलिशा आणि झैन यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांचे वर्तमान व वास्तव, आयुष्यात आर्थिक स्थैर्य व सुबत्तेला असलेले महत्त्व अशा एक ना अनेक गोष्टी त्यांचे नाते आणि त्याच्या भविष्याच्या दृष्टीने लक्षणीय ठरत असतात. आणि प्रेमाच्या नात्याकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहत असतानाच ‘गहराइयाँ’ अधिक प्रभावी बनत जातो.

 

ज़्यादा पास आना है असल में दूर जाना?

प्रेमाच्या संकल्पनेत अनेक विरोधाभास (पॅराडॉक्स) आढळतात. (इथे प्रेम म्हणजे केवळ प्रणय असा अर्थ नाही. यात इतर नातेसंबंधांमधील प्रेमाचाही समावेश होतो.) त्यापैकी एक दोन व्यक्तींमधील अंतराभोवती फिरतो. एकीकडे, दोन व्यक्तींमधील अंतर कमी होत जाणे, त्यांनी आपापली सुखदुःखं एकमेकांसोबत वाटणे हे प्रेमाचे द्योतक मानले जाते. खूप अंतर असेल, तर जवळीक वाढू शकत नाही. पण दुसरीकडे, हे अंतर इतकेही कमी व्हायला नको की त्या नात्यात असलेल्या व्यक्तींची वैयक्तिक ओळखच पुसली जाईल!  शारीरिक, मानसिक, भावनिक जवळीक वाढायला तर हवी, पण ती गरजेपेक्षा वाढू नये, असे हे प्रेमाचे विरोधाभास! थोडक्यात, इर्शाद कामिल एका गाण्यात (ये दूरियाँ – लव्ह आज कल, २०२०) म्हणतो तसं – ज़्यादा पास आना है असल में दूर जाना...

आलिशा आणि झैनमधील अंतर कमी होत असताना त्यांच्या नात्याची गुंतागुंत अधिक वाढते. वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील सीमारेषा जसजशा धूसर होत जातात तसतशा या दोघांच्या स्वत्वाच्या खुणादेखील पुसट होत जातात. साहजिकच आलिशासारख्या स्वाभिमानी, सामर्थ्यवान व स्वतंत्र वृत्तीच्या स्त्रीला तिच्या ओळखीवरील हे आक्रमण मान्य असणे अशक्य असते. प्रेम व एकत्र असण्याची इच्छा पूर्ण झाली तरी त्यापाठोपाठ येणाऱ्या समस्यांचा सामना करणे खरे गरजेचे असते आणि तिथूनच इथल्या नाट्यातील एक महत्त्वाचा भाग साकारतो.

चित्रपट एका प्रेमप्रकरणापुरता मर्यादित न राहता मानवी स्वभाव, प्रेमातील प्रामाणिकता व व्यभिचारातील नैतिकता, स्वओळखीचे महत्त्व, व्यक्तीच्या भूतकाळातील आघातांचे वर्तमानावरील परिणाम अशा अनेक संकल्पना हाताळतो. या सर्व संकल्पना समकालातील नातेसंबंधांचे गुंतागुंतीचे स्वरूप आणि चिंतांचे चित्रण अगदी समर्पकरीत्या करतात. मुख्य म्हणजे दिग्दर्शक बत्रा सदोष पात्रं आणि त्यांच्या तितक्याच सदोष भावभावना व कृत्यांचे चित्रण करायला कचरत नाही. 

 

भूतकाळाची भुतं आणि वर्तमानातील अस्वस्थता 

मानवी आयुष्यातील घटनांचे वर्तुळाकार स्वरूप फारच विलक्षण असते. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांतील परस्परसंबंध अकल्पित मानावासा असू शकतो. अशात ज्या गोष्टींचा, माणसांचा दुस्वास करत असतो, त्याच गोष्टी अनुभवणे वा त्याच व्यक्तीसारखे वागणे अशा एखाद्या दुःस्वप्नाच्या अवस्थेत अडकणे अगदीच अशक्य नसते. ‘गहराइयाँ’मधील अनेक पात्रं अशीच अवस्था अनुभवताना दिसतात.

 

 

‘गहराइयाँ’मधील बहुतांशी पात्रांच्या मानगुटीवर भूतकाळाची भयाण भुतं ठाण मांडून बसलेली आहेत. इथल्या पात्रांचा भूतकाळ चित्रपटातील अनेक नाट्यमय घडामोडींची पूर्वसूचना देतो. तसा हा भूतकाळ आलिशाला सर्वाधिक सतावतो. ती कायम त्यापासून पळ काढण्याचे (असफल) प्रयत्न करताना दिसते. मात्र, लवकरच आयुष्यातील समस्यांचा व भूतकाळाचा धैर्याने सामना न करता त्यापासून दूर जाण्यातील निरर्थकता दिसू लागते. आलिशाने तिच्या वडिलांशी (नसीरुद्दीन शाह) संवाद साधणे टाळल्याने त्यांच्यातील समस्या व तणाव अधिक तीव्र झालेला असतो. आणि असे केल्याने तिचा तोटाच अधिक होतो. कारण, त्याने ना भूतकाळातील घटनांची तीव्रता कमी होते, ना वर्तमानातील अस्वस्थता! अखेरीस नातेसंबंधांमधील तणाव आणि भूतकाळातील समस्यांवरील उपाय हा सुसंवाद हाच आहे, हेच अधोरेखित होते.

 

‘गहराइयाँ’मधील बहुतांशी पात्रांच्या मानगुटीवर भूतकाळाची भयाण भुतं ठाण मांडून बसलेली आहेत.

 

दिग्दर्शक बत्राने यापूर्वी ‘कपूर अँड सन्स’मध्ये (२०१६) डिस्फंक्शनल फॅमिलीभोवती फिरणारे नाट्य हाताळत असताना साधारणतः याच संकल्पनांचा आधार घेतला होता. यावेळीही तो कुटुंबासोबत पात्रांची वैयक्तिक आयुष्यं, स्वओळख आणि आत्मसाक्षात्काराभोवतीचे नाट्य उभे करतो. इथल्या रंगसंगतीतही मध्यवर्ती पात्रांच्या भावनांशी सुसंगत असा ऊबदारपणा आहे. प्रेमाची सुरूवातीची स्वप्नवत अवस्था, नंतरचे तीव्र नाट्य आणि एकूणच बिटरस्वीट घडामोडी अशा सर्व अवस्था दिग्दर्शक बत्रा समान प्रभावीपणे समोर आणतो. (इथल्या प्रेमाच्या गुंतागुंतीच्या स्वरूपामुळे वुडी ॲलनच्या चित्रपटांची आठवण येऊन जाते.)

‘गहराइयाँ’ हे समकालातील अँक्झायटीजचे फारच परिणामकारक चित्रण आहे. प्रेम ही उत्कट भावना आणि तिच्याभोवतीच्या अनेकविध संकल्पनांकडे हा चित्रपट अगदी तरलपणे पाहतो. तो वेळोवेळी अस्वस्थदेखील करतो. उत्कटता, क्लेश आणि अस्वस्थता ते पुन्हा सकारात्मकता आणि आयुष्याच्या जटिल स्वरूपाची स्वीकृती अशा अनेक अवस्था एकाच वेळी अनुभवायच्या असतील तर हा सिनेमा पाहणे आवश्यक आहे. 

(‘गहराइयाँ’ ऍमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.)

 

 

सजेस्टेड रीडिंग: 
Popova, M. (N.A.). The Central Paradox of Love: Esther Perel on reconciling the closeness needed for intimacy with the psychological distance that fuels desire. The Marginalian. 
https://www.themarginalian.org/2016/10/13/mating-in-captivity-esther-perel/