India

शेतकऱ्यांच्या संकटात आणखी वाढ; अवकाळी पाऊस, गारपिटीमुळं पिकांचं नुकसान

अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्याला पुन्हा एकदा झोडपून काढलं

Credit : Namdev Bhamare

पुणे: अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्याला पुन्हा एकदा झोडपून काढलं. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसह आंबा, केळी आणि फळबागांचं देखील मोठं नुकसान झालं. अवकाळी पावसानं शेतकरी हवालदिल झाला आहे. जे पिकलं होतं, त्याची पुन्हा एकदा माती झाली. हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसाने झोडपून काढलं. अचानक कोसळलेल्या या पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं.

येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागात गारपीटीची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. मनमाड, पंढरपूर, सांगलीमध्ये वादळीवार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसानं शेतकरी आणि व्यापार्‍यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. येत्या शुक्रवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाकडून दिला होता.  

मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसंच क्षेत्र कमी होईल. १९ तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि २० तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल, असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, गोंदिया जिल्ह्यांत बुधवारी वादळी पाऊस झाला. वादळी पावसाची ही परिस्थिती शुक्रवारपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. तर, औरंगाबादमधील खुलताबाद तालुक्यात सायंकाळी गारपीट झाली.

 

मराठवाड्याला फटका

जालना जिल्ह्यातील बदनापूर,परतूर आणि जाफराबाद तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फटका बसला. गहू जमिनीवर आडवा झाला. कांदा मातीमोल झाला. आंब्याचा मोहोर जमिनीवर गळून पडला. अवघ्या काही दिवसांत या पिकांची सोंगणी आणि मळणी होऊन शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडणार होते. पण गारपिटीमुळे सारं काही उध्वस्त झालंय. याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

 

पश्चिम महाराष्ट्रात नुकसान

कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा परिसरात मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय.

 

सर्वेक्षणाची मागणी

शासनानं तातडीनं पिकाचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. पावसामुळे संत्रा, मोसंबी व भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस सतत सुरू राहिला तर पिकांचं १०० टक्के नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

 

पुढचे दोन दिवस पावसाचे

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढचे दोन दिवस विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचे असल्याच्या इशारा देण्यात आला आहे. १७ तारखेला नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, १८ तारखेला वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे.

 

नागपुरात १८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

गेल्या २४ तासांमध्ये नागपुरात १८.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी आर्द्रता ८४ टक्के होती, तर सायंकाळी ६० टक्के दर्शवण्यात आली. दिवसा हवेत गारवा होता. सायंकाळच्या वातावरणात मात्र थंडीची तीव्रता अधिक जाणवली नाही.