India

शेती विधेयकांविरोधात शेतकऱ्यांची राज्यात आक्रमक आंदोलनं

अखिल भारतीय किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यात अनेक ठिकाणी विधेयकाची होळी.

Credit : Indie Journal

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी आज (शुक्रवारी) देशभरासह महाराष्ट्रातही 'भारत बंद' आंदोलन झालं.

भारत बंदच्या आवाहनाला महाराष्ट्रातील अकोले (अहमदनगर), यवतमाळ, धुळे-नंदुरबार, बीडसह, गंगाखेड, परभणीतही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध ठिकाणी आंदोलन करत भारत बंदला पाठिंबा दर्शविला. आंदोलकांनी ठिकठिकाणी केंद्र सरकारविरोधात रॅली काढत "मोदी सरकार मुर्दाबाद" शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. 

 

 

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले (जि. अहमदनगर) येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनाची भूमिका मांडताना अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले म्हणाले, "केंद्राने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना हमीभाव नाकारणारी, बाजार समित्यांचे अस्तित्व पुसणारी व शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारी प्रक्रिया पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राची ही भूमिका शेती, माती व शेतकऱ्यांशी द्रोह करणारी आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा  किसान सभेच्यावतीने धिक्कार असून शेतकरी संघटनांच्या देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने या विधेयकांविरोधात आज देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे." 

"ठाणे, पालघर, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी रस्ता रोकोचे जोरदार आंदोलन झाले व या चार जिल्ह्यांतील आंदोलकांचीच संख्या ३० हजारांहून अधिक होती. पालघर जिल्ह्यात चारोटी, ता. डहाणू, आणि बोईसर फाटा, ता. पालघर या दोन्ही ठिकाणी मुंबई-बडोदा-जयपूर-दिल्लीचा राष्ट्रीय महामार्ग १० हजार शेतकऱ्यांनी रोखून धरला होता," असा दावा नवले यांनी केला.  

 

कृषी विधेयकाच्या जीआरची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बंदच्या हाकेला प्रतिसाद देत जालन्याचे शेतकरी रस्त्यावर आले. मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नळणी राजूर रोडवर पिंपळगाव बारव चोफुलीवर आंदोलन करण्यात आलं. नवीन कृषी विधेयकाच्या जीआरची होळी करण्यात आली. मोदी सरकारचे करायचं काय, खाली मुडके वर पाय, शेतकरी विरोधी कृषी विधयक रद्द झालेच पाहिजे, भाजप सरकार हाय हाय, केंद्र सरकारचे करायचं काय, 'खाली मुंडके वर पाय', अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाशकातील दिंडोरीतही आंदोलन केलं. सरकारचा पुतळा जमिनीत गाडून कृषी विधेयकाचा निषेध दर्शवण्यात आला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार या आंदोलकांनी केला.

 

 

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या या बंदला काँग्रेस पक्षाने पूर्ण समर्थन दर्शवलं आहे. “शेतकरी संपूर्ण देशाचं पोट भरतात, पण मोदी सरकार शेतकऱ्यांच्या शेतीवर हल्ला चढवत आहे,” अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केली व पुढे म्हटले, “काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी भारत बंदमध्ये शेतकऱ्यांसोबत उभे आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आंदोलन आणि विरोध प्रदर्शनात सहभागी होतील. त्यानंतर २८ सप्टेंबरला प्रत्येक राज्याच्या राज्यपालांना याबाबत एक पत्र पाठवण्यात येईल,” असं ट्वीटही रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे. 

दरम्यान, केंद्राने मंजूर केलेल्या या विधेयकावर अद्यापही शहर व जिल्ह्यातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलने होत असून शासनापर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहचविण्यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सोबतच सामाजिक माध्यमांद्वारे सद्यस्थितीत आंदोलनांचा विषय अग्रस्थानी आहे.कृषी विधेयकांविरोधात आज शेतकरी संघटनांकडून भारत बंद होत असले तरीही, कृषी विषयक विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाली असली तरी त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी अद्याप बाकी आहे.