Quick Reads

एमीजचे वारे: ‘स्ट्रेंजर थिंग्ज’

‘स्ट्रेंजर थिंग्ज’

Credit : Netflix

लेखात ‘स्ट्रेंजर थिंग्ज’च्या तिन्ही सीझनचे स्पॉयलर्स असू शकतात. 

 

आपल्या सभोवताली पाहिल्यास समकालीन माध्यमं आणि समाजमाध्यमं ही स्मरणरंजनात मग्न असल्याचं दिसतं. ज्याचं कारण लोकसंख्येतील मोठा टक्का व्यापणाऱ्या वर्गाला आपल्या तरुणाईतील किंवा बालपणातील रम्य दिवस आठवण्यात दडलेलं आहे. आपल्याकडील बरीचशी जनता ही वयाच्या पंचविशीत ते पस्तिशीत आहे. या पिढीने मोठं होत असताना नव्वदीचं दशक जवळून पाहिलं. ज्यामुळे भारतीय संदर्भांत नव्वदीच्या दशकातील स्मरणरंजन घडताना दिसतं. तर, अमेरिकन संदर्भांत तिथला मोठा जनसमुदाय हा वयाच्या पस्तिशी ते पंचेचाळीशीत असल्याने तिथे ऐंशीच्या दशकाचं स्मरणरंजन घडत असल्याचं पहायला मिळतं. मग हीच गोष्ट तिथल्या चित्रपट-मालिकांमध्ये प्रतिबिंबित होणं काहीसं स्वाभाविक होतं. 

त्यातूनच नव्याने तयार होणाऱ्या बऱ्याचशा चित्रपट-मालिकांमध्ये भूतकाळातील लोकप्रिय कलाकृतींमधील दृश्यशैलीचे संदर्भ येणं, अनेकदा त्या काळातील कथनशैलीचे ठराविक गुणधर्म वापरले जाणं ह्या गोष्टी सुरु झाल्या. २०११ मध्ये आलेल्या जे. जे. अब्राम्स दिग्दर्शित ‘सुपर ८’मध्ये किंवा २०१६ च्या जेफ निकोल्स दिग्दर्शित ‘मिडनाईट स्पेशल’मध्ये हे घडलं होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी चित्रपटांपेक्षा अधिक मोठ्या स्तरावर करून त्यांना अधिक लोकप्रिय करण्याचं श्रेय मात्र निर्विवादपणे ‘नेटफ्लिक्स’वरील ‘स्ट्रेंजर थिंग्ज’कडे जातं. ‘स्ट्रेंजर थिंग्स’ मालिकेनं केवळ हे ओमाजेस, इस्टर एग्स दाखवले नाहीत तर त्यापलीकडे जाऊन ते स्वतःच समकालीन पॉप कल्चरचे भाग झाले आहेत. इतकी ही मालिका आज महत्वाची झाली आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्ज’मध्ये मुख्यत्वे ऐंशीचं दशक गाजवणाऱ्या जॉर्ज लुकास, स्टीव्हन स्पीलबर्ग, स्टीव्हन किंग, इत्यादींच्या कामाला ओमाज (मानवंदना) दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. एखाद्या छोट्याशा गावात, जगापासून अगदी अलिप्तपणे घडणारं कथानक, प्रौढ पात्रांचं बाजूला पडणं आणि लहान मुलांचं कथानकाच्या केंद्रस्थानी असणं, इत्यादी स्पीलबर्गच्या चित्रपटांतील वैशिष्ट्यंही डफर ब्रदर्सनी ह्या मालिकेत एकत्र केली आहेत. 

‘स्ट्रेंजर थिंग्ज’चा नवीन सीझन आला की, त्यात आलेले पॉप कल्चरमधील संदर्भांच्या नवीन लिस्ट पहायला मिळतात. यापूर्वीच्या सीझनमधील स्पीलबर्गच्या ‘इ. टी.’चा (एक्स्ट्रा टेरेस्टेरियल) संदर्भ, नंतर आलेले ‘स्टार वॉर्स’पासून ते ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’पर्यंतचे संदर्भ एव्हाना सर्वांच्या परिचयाचे आहेतच. यावेळी तर थेट सिनेमागृहात सुरु असलेल्या रॉबर्ट झेमेकिसच्या ‘बॅक टू द फ्युचर’पासून ते ‘द टर्मिनेटर’, ‘डाय हार्ड’पर्यंत अनेक थेट संदर्भ येतात. यापलीकडे जात गाणी, गेम्सचे अगणित संदर्भ येतात ते वेगळेच. 

पण कथेत हे ओमाजेस पेरताना स्ट्रेंजर थिंग्ज त्याच्याही पलीकडे कशी जाते हे पाहणं जास्त महत्वाचं आहे.    

 

 

कथेत, पहिल्या सीझनच्या घटनांमध्ये, अमेरिकेतील हॉकिन्समधील राष्ट्रीय प्रयोगशाळेतील प्रयोगांमधून समांतर विश्वाशी जोडलं जाणारं एक प्रवेशद्वार निर्माण होतं. त्या प्रवेशद्वारातून समांतर विश्वातील एक राक्षस आपल्या जगात येतो आणि विल बायर्स ह्या मुलाला घेऊन जातो. मग विलला शोधणारे त्याचे मित्र माइक, डस्टिन आणि लुकास ही बारा-तेरा वर्षांची मुलं कथेच्या केंद्रस्थानी येतात. सोबतच विलची आई जॉयस, मोठा भाऊ जोनाथन, त्याची मैत्रीण नॅन्सी आणि तिचा प्रियकर स्टीव्ह, तसेच हॉकिन्स पोलिस दलातील मुख्य अधिकारी जिम हॉफर ही पात्रंदेखील इथे येतात. एकीकडे ह्या सर्वांनी मिळून विलचा शोध घेणं सुरु असतं, तर दुसरीकडे अमानवी शक्ती असलेली इलेव्हन ऊर्फ एल ही मुलगी राष्ट्रीय प्रयोगशाळेतून फरार झालेली असते. ती विलच्या मित्रांच्या संपर्कात येते नि तिच्या मदतीने राक्षसी शक्तींचा नायनाट करण्याच्या रुपात कथानक पुढे जातं. 

पुढे जाऊन दुसऱ्या सीझनमध्ये एलने हे प्रवेशद्वार बंदही केलं. पण तरी तिसऱ्या सीजनमध्ये त्यांनी अनेक नवीन गोष्टी आणून कथा पुढे चालू ठेवली आहे. इथली समस्या आणि राक्षसांशी केलेली लढाई तशी आधीच्या सीझनमध्ये दिसली त्याच स्वरुपाची असली तरी दुष्ट रशियन हे समीकरण नव्याने सामील झालेलं आहे. तिसऱ्या सीझनमध्ये रशियन सरकार आणि शास्त्रज्ञ हे प्रवेशद्वार पुन्हा उघडण्याचे प्रयत्न करत असतात. त्यामुळे ह्यावेळी जॉयस (विलची आई) केवळ मुलाचा शोध घेत नाहीये तर रशियन लोकांच्या रहस्याची उकल करून त्यांना हरवण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टीव्ह, डस्टिन ह्याना नव्याने जॉईन झालेली रॉबिन आणि इतरही मुलांच्या स्वतःच्या लॉजिक्स आणि क्लुप्त्यांच्या निमित्ताने रशियन लोकांनी समोर उभ्या केलेल्या समस्यांचा सामना केला जातो. तसं हे प्रकरण बरंचसं कॅरिकेचरिश झालं आहे. जे साधारणतः अमेरिकन माध्यमांमध्ये रशिया आणि रशियन लोकांकडे ज्या प्रकारे पाहिलं जातं त्या व्यक्तिरेखांच्या दुष्ट आणि वेळोवेळी हास्यास्पद अशा साच्यांना पुढे नेणारं आहे.

अर्थात खलपात्रांनी दुष्ट असण्यात काहीच गैर नसलं तरी, अगदी लहान अमेरिकन मुलंही इथल्या दुष्ट पात्रांचा पराभव करतात हे समीकरण काहीसं हास्यास्पदरीत्या पुढे नेलं जातं. हे मालिकेतील रहस्य, साहस आणि भय या तीन प्रकारांच्या काहीसं विरुद्ध जाणारं आहे. तरीही शेवटी, हे सगळं रंजक ठरणारं आहे. शिवाय, आधीच्या दोन्ही सीझनमध्ये केलेल्याच गोष्टी करून शो यशस्वी करण्याचा ‘ट्राइड अँड टेस्टेड’ फॉर्म्युला ‘नेटफ्लिक्स’ने पुन्हा वापरून दाखवला आहे. इतकं असूनही मालिकेच्या या सीझनने एमीमध्ये ‘बेस्ट ड्रामा सिरीज’ श्रेणीत जागा मिळवली आहे, ह्यामध्ये त्यांचं कथेच्या ठराविक वळणांच्या, ओमाजेसच्या पुढे जाणं हा एक खूप मोठा निर्णायक भाग आहे.  

 

 

आधीच्या सीजन्समध्ये स्ट्रेंजर थिंग्जने मुलांचं वय, त्या वयाप्रमाणे त्यांचं वागणं, त्याबद्दलचे पॉप कल्चरमध्ये वापरले जाणारे क्लिशे ह्या सगळ्याच गोष्टींना अड्रेस केलं होतं. तिसऱ्या सीजनमध्ये त्यांच्यात मोठे होताना होत जाणारे बदल हा महत्वाचा भाग येतो. ह्या सीजनला डेमोगॉर्गन आणि माइंड स्लेयर सारख्या काल्पनिक राक्षसांना हरवणाऱ्या मित्रांच्या गॅंगचं पौगंडावस्थेत पदार्पण झालेलं आहे. आता ते मौजमस्ती करण्यात, मुलींना इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नांत जास्त मग्न असतात. मालिका दर सीझनगणिक एक एक वर्ष पुढे जात असल्याने तर हे घडतंच, त्यामुळे एव्हाना मालिकेत आलेला मैत्री आणि प्रेमाचा मुद्दा इथे आणखी पुढे नेला जातो. आधीच्या दोन्ही सीझन्समध्ये रहस्याची उकल करताना जशा जोड्या पडल्या होत्या तसंच इथेही घडतं. यावेळी लहान मुला-मुलींतील हेव्यादाव्यांतून मुलं एकीकडे नि मुली एकीकडे अशा जोड्या पडतात. एकीकडे सगळी मुलं, तर दुसरीकडे एल आणि मॅक्स या मुली. त्यातून पौगंडावस्थेतील मुलांचं भावविश्व हाताळलं जातं. तर, मोठ्यांमध्येही नातेसंबंधाच्या समस्या दिसतात. नॅन्सी आणि जोनाथन नुकतेच नोकरी करू लागले आहेत. ज्यात नॅन्सीला पुरुषांचं वर्चस्व असलेल्या कामाच्या ठिकाणी सहन कराव्या लागणाऱ्या समस्या दिसतात. 

एकंदर तिसऱ्या सीझनमध्ये स्त्री-पुरुषांतील नातेसंबंध आणि कुमारवयीन पात्रांमध्ये घडलेले बदल हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. इथे मालिका एकीकडे टॉक्सिक वर्कप्लेस हाताळते, आणि दुसरीकडे हॉफरसारख्या महत्त्वाच्या पात्राचा प्रवास हळूहळू टॉक्सिक मॅस्क्युलिनीटीचं दर्शन घडवते. (याबाबतचा एक चांगला व्हिडिओ एसे इथे पाहता येईल.) मुलीच्या निवडीच्या अधिकाराबद्दल बोलते. ८० च्या दशकात मुलींसाठी आजइतकं मोकळं वातावरण नव्हतं. पण तरी त्याच्याशी झगडणारी पात्रं ह्यात दिसतात. म्हणूनच म्हटलं होतं की स्ट्रेंजर थिंग्ज केवळ ओमाजेस, सुपर नॅचरल थ्रिलर ह्या तद्दन प्रकाराच्याही पुढे जात एका काळाची, त्या काळातील कुमारवयीन (हायस्कूल टीनेज जॉन्रच्या गोष्टी वापरत) मनाचा धांडोळा घेत पुढे जाते. म्हणुनच गेली तीन वर्ष आणि तीनही सीजन ती आपली प्रसिद्धी टिकवण्यासोबतच एमी पुरस्कार सोहळ्यातही नावलौकिक मिळवत आहे.  

 

पॉप कल्चर डिटेक्टिव्हचा व्हिडिओ एसे