India

अनेक मिस कॉलनंतर खडसेंचा नंबर पोर्ट, भाजपचं नेटवर्क सोडून राष्ट्रवादीचं कनेक्शन

भाजपला उत्तर महाराष्ट्रात मोठं खिंडार

Credit : The Week

पुणे: गेली ३ वर्षे आज-उद्या करता करता अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

जयंत पाटील याबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, "एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला मिळाली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील."

"एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला, खडसे यांच्या रुपाने एक अभ्यासू नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. मागील काही वर्षांपासून भाजपमध्ये खडसे साहेबांवर अन्याय होत होता. त्याला आता वाचा फुटली आहे. अनेकांना आता विश्वास बसू लागला आहे की भाजप राज्याचा, देशाचा विकास करू शकत नाही. अनेक माजी-आजी आमदार, नेते आमच्या संपर्कात आहेत. ते राष्ट्रवादी पक्षांमध्ये येण्यास इच्छुक आहेत. योग्य वेळी नावे जाहीर केली जातील. त्यांचे पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात न होता दिवसाढवळ्या होतील," असा टोला पाटील यांनी भाजपला लगावला. 

 

खडसेंच्या पदरात कृषीमंत्री पद?

खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "जर ते महाविकास आघाडीत सामील झाले तर त्यांचे स्वागत आहे". खडसे हे राज्यातील ओबीसींचा मोठा चेहरा मानला जातो. खडसेंना महाविकास आघाडीच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कृषीमंत्रीपद मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

 

भाजपमध्ये खडसेंची मुस्कटदाबी 

एकनाथ खडसे हे भाजपमधील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, २०१४ साली भाजप सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना बसविले. त्यामुळे खडसे नाराज झाले. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातील सर्वात महत्त्वाचे महसूल खाते देत क्रमांक दोनचे स्थान दिले. मात्र, त्यानंतरही खडसे मुख्यमंत्र्यांना शह देत राहिले. अखेर खडसेंची काही प्रकरणे बाहेर 'काढण्यात' आली. जून २०१६ मध्ये त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आठ-दहा खात्यांचा राजीनामा द्यावा लागला.भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी लावली मात्र, त्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली झोटिंग समिती व तिचा अहवाल निरर्थक असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात नागपूरात सांगितले. त्यामुळे खडसेंच्या बाबतीत भाजप बिलकूल मवाळ नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. एकीकडे खडसेंना डावलले गेले तर काँग्रेसमधून एनडीएत सामील झालेल्या नारायण राणेंना मानाचे पान देण्यात आले.

विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची मुलगी रोहिणीला तिकीट दिलं गेलं परंतु, तरी ती पराभूत झाली. त्याचवेळी खडसे यांची सून रक्षा खडसे यांनी लोकसभेची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढविली आणि जिंकल्या. या सर्व पार्श्वभूमीवर खडसे अस्वस्थ होते. त्यांनी याबाबतची आपली भूमिका, नाराजी वेळोवेळी वृत्तवाहिन्यांवर प्रगट केली होती. त्यामुळे खडसे भाजपवर नाराज आहेत हे स्पष्टपणे जाणवत होते. परंतु, भाजपाचा महाराष्ट्रातील बहुजन नेता म्हणून खडसेंची ओळख होती, त्यामुळे पक्ष सोडण्याबाबत ते कितपत विचार करतील याबाबत अनेक शंका होत्या. रक्षा खडसे भाजपा सोडतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

भाजपमधून पहिली आऊटगोइंग

जळगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या एकसष्ठी निमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवारांसह खडसेंनी व्यासपीठावर हजेरी लावली होती. यावेळी खडसे-पवारांनी याबाबत भाष्य केले होते. राजकारणात कोणीच कोणाचं कायमचे शत्रू आणि मित्र नसते असे सांगत खडसेंच्या प्रवेशाचे संकेत पवारांनी दिले होते. एनडीएच्या काळात सत्तेत घेण्यासाठी खडसेंकडून पक्षनेतृत्त्वावर दबाव टाकण्याचेही असफल प्रयत्न करण्यात आले होते. एकनाथ खडसेंना आपलेही पक्षाने पुनर्वसन करावे अशी इच्छा होती. मात्र, फडणवीस यांनी त्यांच्याबाबतचा निर्णय न्यायालयावर सोपवून आपली सुटका करून घेतली होती. त्यामुळेच कमालीचे अस्वस्थ असलेले खडसे खरोखरच ४० वर्षापासूनचा भाजप पक्ष सोडणार का याची फक्त चर्चाच होती. परंतु, आज खडसेंनी भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा देऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. भाजपमध्ये मागील काही वर्षांपासून आतापर्यंत फक्त इनकमिंगचं होत होतं. परंतु, खडसें यांच्या रूपाने भाजपमधून मोठं नेतृत्व आऊटगोइंग करत आहे. 

 

खडसेंच्या प्रवेशावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद होण्याची शक्यता?

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे निश्चित झाले आहे. एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत. उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडसेंच्या प्रवेशावरून अस्वस्थता आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा संघर्ष उभा राहू शकतो.

"आतापर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसोबत काम करत होतो. आमच्यात कधीही टोकाचा संघर्ष नव्हता. पण एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यास संघर्ष अटळ आहे," अशी प्रतिक्रिया एका शिवसेनेच्या स्थानिक आमदाराने मागे वृत्तवाहिन्यांशी बोलतांना दिली होती. 

"जळगावमध्ये शिवसेना आणि खडसे यांच्यात कायम वाद होतात. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी खडसेंचा मतदारसंघ मुक्ताईनगरमध्ये प्रचारसभा घेतली होती." उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व आणि खडसे एकमेकांचे कायम विरोधक राहिले आहेत. शिवसेनेचे जळगावचे नेते माजी आमदार सुरेश जैन हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक समजले जातात.

 

शिवसेना आणि एकनाथ खडसे यांच्या संबंधात तणाव का?

शिवसेना आणि भाजप दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. एकनाथ खडसे साधारण चार दशकांपासून भाजपमध्ये सक्रीय आहेत. एक लोकनेता आणि भाजपचा बहुजन चेहरा अशी खडसेंची ओळख आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ सालच्या घटस्थापनेच्या काही दिवस आधी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप-शिवसेना युती तुटल्याची घोषणा केली होती. पत्रकार परिषदेत २५ वर्षांची भाजप आणि शिवसेनेची मैत्री संपुष्टात आल्याचे खडसेंनी जाहीर केले होते. 

२०१४ विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या घटस्फोटाचे कारण शिवसेनेच्या अवास्तव मागण्या असल्याचे सांगितले. शिवसेना आणि एकनाथ खडसेंमधले अंतर यामुळे आणखी वाढत गेले. उत्तर महाराष्ट्रात भाजपचे प्रबळ नेते म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख आहे. पण शिवसेना आणि भाजपची युती असूनही स्थानिक पातळीवर मात्र खडसे आणि सेनेच्या नेत्यांमध्ये उघड वैर होते. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी युती असूनही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुक्ताईनगरमध्ये प्रचारासाठी मदत करणार नसल्याची जाहीर भूमिका घेतली होती.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनीही भाजपला अनेकदा उघड आव्हान दिले आहे. शिवसेनेला मदत करण्याची वेळ येते तेव्हा एकनाथ खडसे फारकत घेतात असा आरोपही त्यांनी केला होता. परंतु, आता खडसेंच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने हा वाद भाजप- शिवसेना राहतो की शिवसेना- राष्ट्रवादी होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

एका बाजूला सत्ता टिकवण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक नेत्यांची नाराजी वेळीच दूर करण्याचे आव्हान अशा दोन्ही पातळ्यांवर शिवसेनेला संघटनात्मक काम करावे लागणार आहे.