India
कोरोनाव्हायरससमोर वृत्तपत्र बेजार, जगाला न्याय देणारा पत्रकार बेरोजगार
कोरोनाच्या संकटासमोर वर्त्तपत्र व्यवसाय अडचणीत
कोरोना विषाणूचा संसर्ग व सोबत वाढत जाणाऱ्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे, तसाच मराठी माध्यमांनाही बसला आहे. वृत्तपत्रांचे छापील अंक वितरण करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अंक प्रिंट करायचाही म्हटला तर अजिबात जाहिराती नाहीत, त्यामुळे वृत्तपत्र व्यवसाय संकटात सापडला आहे. मात्र याचा सर्वात मोठा फटका वृत्तपत्र माध्यमकर्मीना सोसावा लागत आहे.
देशातील रोजगार प्रमाण फेब्रुवारी महिन्यात ४० टक्के होतं, ते एप्रिल महिन्यात घसरून २३.५ टक्क्यांवर आलं. गेल्या काही आठवड्यांच्या आकडेवारीवरून यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. देशातील १४ कोटी नागरिकांनी लॉकडाउनच्या कालावधीत रोजगार गमवावा लागण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या कालावधीत आणखी वाढ झाल्यास रोजगाराची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागात नागरिकांनी रोजगार गमावला आहे. बहुतांश स्टार्टअप कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. देशातील २ हजार ८०० आयटी कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या 'नॅसकॉम'नेही मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीचे संकेत दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही वृत्तपत्र मालकांनी असे धोरण आखले आहे की, ५५ वर्षांपुढील कोणत्याही कर्मचाऱ्याला पे रोलवर ठेवायचे नाही. सेवानिवृत्तीचे वय ५५ ठेवायचे. त्यामुळे ज्येष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मराठी वृत्तपत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक वृत्तपत्रांनी मार्च महिन्याचे वेतन कपात करून दिले. एप्रिल महिन्याचे वेतन होईल की नाही अशी भीती आहे. त्यात अनेक वृत्तपत्रानी टप्याटप्याने ४० टक्के कॉस्ट कटिंग करण्याचा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहेत. तसे भावनिक आवाहनाचे मेल आपल्या नोकरांना त्यांनी पाठवले आहेत. इतरांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांवरच आर्थिक विवंचनेची कुऱ्हाड कोसळली आहे. पत्रकारांच्या विविध संस्था आहेत मात्र त्यांचे पदाधिकारी आणि माध्यम मालकांचे साटंलोटं असल्याप्रमाणे तेही या प्रश्नावर मूग गिळून गप्प आहेत.
वृत्तपत्रसृष्टीचा इतिहास पावणे दोनशे वर्षांचा आहे. ६ जानेवारी १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी `दर्पण` हे पहिले मराठी वृत्तपत्र छापले. आज देशभरात सुमारे एक लाख छापील पेपर (दैनिक, साप्ताहीक, पाक्षिके आदी) निघतात. मराठीत मोठी म्हणावी अशी २६ दैनिकं आहेत. २२ भाषांतून सुमारे २५ कोटी लोकांपर्यंत हे माध्यम पोहचते. आजवरच्या इतिहासात प्रथमच तब्बल दीड-दोन महिने छपाई पूर्ण बंद आहे. खरे तर, आजच्या बाजारपेठेतील जीवघेण्या स्पर्धेत काही अंशी सरकारच्या जाहिरातींवर हा लोकशाहिचा चौथा स्तंभ टिकून आहे. पण आता सरकारी धोरणात जाहिराती कमी करण्याचे निर्णय चालू आहेत. त्यामुळे हा चौथा स्तंभ किती काळ विश्वासू राहतो हे पाहणे गरजेचं ठरणार आहे.
देशाच्या स्वातंत्र लढ्यात वृत्तपत्रांचा सिंहाचा वाटा होता. जनमत घडविण्यात आणि त्याचे रुपांतर चळवळीत करण्याचे मोठे काम त्यावेळच्या वर्तमानपत्रांनी केले. स्वातंत्रपूर्व काळातील ते योगदान मोलाचं आहे. स्वातंत्रोत्तर काळात त्यांनी जागल्याची भूमिका घेतली. लोकांना शहाणे करायचे काम केले. आता समाजसेवा जवळपास नव्हे तर १०० टक्के संपली आहे. हा निव्वळ जाहिरातीचा धंदा झाला आहे. समाजसेवेचा मुखवटा घातलेल्या या क्षेत्राचे कोरोनामुळे पुरते वस्त्रहरण झाले. आजवर दिवसाची सुरवातच पेपर वाचल्याशिवाय होत नव्हती. कोरोनामुळे आता पेपर नसला तरी चालते हे लक्षात आले. लोकांची गरज संपली आहे.
या विषयी बोलतांना जेष्ठ पत्रकार मिलिंद वैद्य म्हणाले, "मुद्रित माध्यमांचा अस्तित्वाच्या प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर पत्रकारांनी अवलंबून राहू नये. पत्रकारिता स्वस्त झाली आहे. पूर्वीसारखी पत्रकारिता राहिली नाही. सोशल मीडियामुळे पत्रकारांचे अस्तित्व नगण्य झाले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपली भूमिका तेही एक पत्रकारितेच माध्यम बनलं आहे. त्यामुळे पत्रकारांनी या एकाच मार्गावर अवलंबून न राहता, उत्पन्नाचं पर्यायी माध्यम निवडलं पाहिजे. मुद्रित माध्यमे लयास जाण्यास त्यांच्याच काही चुका कारणीभूत आहेत. जसे की, माध्यमांकडे नागरिक एक आरसा म्हणून पाहत होते. विश्वासार्हतेच्या जोरावर माध्यम चालत होती. जनजागृती आणि उद्दिष्टे जपण्याचे कर्तव्ये माध्यमांनी पार पाडली नाहीत."
ते पुढं म्हणाले, "सेवा देण्याचा उद्देश हा मुख्य हेतू होता पण त्याकडे दुर्लक्ष करत सध्या व्यवसायाभिमुख माध्यमे म्हणून नावारूपास येऊ लागले आहेत. सध्या जाहिरात, इव्हेंट, आणि मार्केटिंग विभागाच्या हातात माध्यमे गेली असून संपादकीय जो की माध्यमाचा मुख्य गाभा होता. त्या संपादकीय विभागाला हळूहळू कमी महत्व देण्यात आले. त्यामुळे नागरिकांची माध्यमांवरील विश्वासार्हता कमी होत गेली."
याविषयी बोलतांना इंग्रजी दैनिकात काम करणाऱ्या एका महिला पत्रकाराने सांगितले, "कोरोनामुळे म्हणता येणार नाही, पण आधीपासूनच काही मुद्रित माध्यमांचं दिवाळं निघाल्यामुळे पत्रकारांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया चालू होती. त्यात कोरोना सारख्या आजारामुळे वृत्तपत्र विक्री बंद झाली. त्यामुळे माध्यमात अचानक बदल करण्यात आले. अगदी बातमीदारांनाही बातम्या वेबसाईटवर थेट अपलोड करण्याचे सांगितले जात आहे. जे तंत्रकुशल नसतील त्यांच्या कामावर आता तरी नाही. परंतु, कोरोनाचे हे संकट संपल्यावर त्यांच्यावर नोकरी सोडण्याचे संकट येणार आहे."
डिजिटल कडे वाटचाल
कागदाच्या किंमती, छपाईचा खर्च, पत्रकारांसह तमाम कर्मचाऱ्यांचे पगारपाणी हे मालकांच्या आवाक्याबाहेर चालले होते. त्यातच आजची पिढी पेपर वाचत नसल्याने पुढे हे माध्यम चालणार नाही हे सर्व मालकांनीही ज्ञात आहे. डिजीटल विश्वाकडे सारे जग धावते आहे. जीवनशैली झपाट्याने बदलते आहे. विश्वासार्हता हे सर्वात मोठे भांडवल होते ते निवडणुकीच्या काळात पेड बातम्या सुरू झाले तेव्हा लयाला गेले. विश्वासार्हता रसातळाला गेली. पत्रकारांना एक सन्मान होता तो मातीमोल झाला आहे त्यामुळे वृत्तपत्र माध्यमांची एक पत होती ती ढासळत चालली आहे. हे सर्व माध्यमातून सर्रास होत असतांना प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. खरं-खोट्याची पडताळणी जाग्यावर होत आहे. त्याचाही परिणाम वृत्तपत्र माध्यम क्षेत्रांवर झाला. त्याचबरोबर विविध मोठ्या माध्यमांनी डिजिटल क्षेत्राकडे वाटचाल करत वेबसाईटस वर भर दिला आहे.
विविध माध्यमांत काम करणाऱ्या तरुण पत्रकारांनीही याविषयी बोलतांना सांगितले, "सध्या माध्यमांत काम दाखवा नाही तर घरी बसण्याची तयारी ठेवा, असे सरंजामी पद्धतीचे धोरण अवलंबले आहे. पत्रकारितेत करिअर करून पाहणाऱ्या नवपत्रकारांना पत्रकारितेतील बारकावे शिकण्याबरोबरच नोकरी टिकविण्याचे आवाहन आहे. डिजीटल गोष्टींवर पकड असल्यामुळे कामावरून कमी करण्याची शक्यता कमी असल्याने हे तेवढं दिलासादायक आहे."
पानाची संख्या कमी होणार
सूत्रांच्या माहितीनुसार, जाहिरातीचा एकूण बिझनेस पाहता, साखळी वृत्तपत्रे आपल्या पानाची संख्या कमी करणार आहेत. मुख्य अंक ८ पाने आणि पूलआऊट चार पाने राहील. जिथे होम आवृत्ती आहे, तिथे मुख्य अंक १० पाने राहील. पूर्वी प्रत्येक जिल्हयाला चार पाने पूलआऊट असायचे. आता दोन आणि तीन जिल्हे मिळून चार पाने पूलआऊट असणार आहेत. त्याचा परिणाम कर्मचारी कपातीवर होणार आहे.
याबाबत पत्रकार नरेंद्र जगताप म्हणाले, "ग्रामीण भागातल्या पत्रकारांना आणखीही याची झळ पोहचली नाही. ग्रामीण पत्रकार हा जास्त 'ऑन फिल्ड' असतो. त्यामुळे त्याला कामावरून कमी करण्याची शक्यता खूप कमी आहे. ग्रामीण भागातल्या पत्रकारांना या कोरोनामुळे डिजिटल माध्यमांची ओळख जवळून झाली. फक्त पाने कमी झाल्यामुळे पत्रकारितेला म्हणावा तसा वाव मिळणार नाही. अगदी गावपातळीवरील ते देशपातळीवरील बातम्यांचे संकलन ग्रामीण पत्रकारांना या माध्यमातून करता आले."
मराठीतील एका बड्या दैनिकाने आपल्या कर्मचाऱ्यांना लिहलेल्या 'भावनिक ईमेल' चा सारांश
कोरोना विषाणूने आपले सर्वांचे जगच बदलून टाकले आहे. त्याचा परिणाम जीवनाशी निगडित सर्व क्षेत्रांवर झाल्यामुळे पावलापावलावर आव्हान निर्माण झाले. आपले आरोग्य धोक्यात आले, सामाजिक संबंधावर मर्यादा आल्या. आपल्या अर्थकारणास खीळ बसली अशा सगळ्या आघाड्यांवर त्याने आपल्याला घेरले आहे. त्याचा परिणाम आपल्यावर झाला. जाहिरातीद्वारे मिळणारे उत्पन्न ठप्प झाले, वितरणाचे आकडे एकदम खाली आले. उत्पन्नाचे साधन असलेल्या इव्हेंट विभागाचे काम थांबले. व्यवसायाच्या सर्व स्रोतांवर अतिशय वाईट परिणाम झाला आहे.
एका अर्थाने संकटाच्या ढगांनी गर्दी केली असे दिसते, पण या परिस्थितीवर मात करण्याची जिगरबाज वृत्ती आपल्याकडे आहे. अशावेळी दोन पावले मागे घेणे हे हितावह असते आणि हे अनुभवातूनच आलेले असते. या अनुभवाच्या जोरावरच आपण परिस्थितीत बदल घडवू शकतो. कोरोनाशी लढा हा दीर्घकालीन असणार आहे हे लक्षात घेऊनच आपल्या सर्वांच्या नोकरीचे संरक्षण करण्यासाठी म्हणजे रोजगार टिकविण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पॅकेजची पुनर्रचना करणे हे सद्य:परिस्थितीत आवश्यक नव्हे तर अपरिहार्य बनले आहे.
प्रत्येकाची नोकरी ही टिकली पाहिजे हे लक्षात घेऊन त्यानुसार वार्षिक पॅकेजची पुनर्रचना करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. आमची प्राथमिक चिंता ही आपले आणि आपल्या कुटुंबाचे कल्याण आहे आणि म्हणूनच, ‘‘पुढे जाण्यासाठी कधीकधी आपल्याला काही पावले मागेही घ्यावी लागतात’’ असे सांगून, कोविड-१९ परिस्थितीनंतर आपण सर्वांनी प्रगती सुरूच ठेवली पाहिजे यासाठी हे नाईलाजाने उचललेले आवश्यक पाऊल आहे. व्यवस्थापन आपल्या कामाबद्दल किती अभिमान बाळगते हे सांगण्याची गरज नाही ते आपण वेळोवेळी अनुभवले. सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी आपल्या समजूतदारपणाचे आणि समर्थनाचे मी मनापासून कौतुक करतो. मला विश्वास आहे की, आपण हे आव्हानही नक्कीच पेलू व यशस्वीरीत्या पुढे जाऊ.