India

काँगो तापाच्या साथीनं गुजरात-महाराष्ट्र सीमाभागात प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा

महाराष्ट्रातील पालघर जिल्हा प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Credit : www.afternoonvoice.com

कोरोनाच्या महामारीत अनेकजण व्हायरल फ्लू, डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा सामना करत आहेत. आता काँगो तापाने लोकांची चिंता वाढवली आहे. कोरोना संकटाचा तडाखा सुरू असतानाच 'क्रिमीयन काँगो हॅमोरेजीक फीवर'(सीसीएचएफ) हे आणखी एक संकट डोक्यावर घोंघावत आहे. 'काँगो फिवर' म्हणूनही ओळखल्या जाणा-या या आजाराने जनावरे बेजार आहेत. 

गुजरातमधील बोताड आणि कच्छ जिल्ह्यांत त्याचा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळला आहे. हा आजार गुजरात मधून महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता असल्याने पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. गुजरात-महाराष्ट्राच्या सीमा जोडलेल्या असल्याने अधिक काळजी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात या आजारांचा पहिला रुग्ण आढळला असून, हा आजार जास्त पसरू नये, यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आदेश अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. पालघर जिल्हा प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची माहामारी डोळ्यासमोर ठेवता मास विक्रेते आणि पशूपालक यांच्यासाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. गुजरातच्या काही जिल्ह्यामध्ये अनेकांना तापची समस्या उद्भवत आहे. गुजरात सीमेला लागून असल्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये माहामारी पसरण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

 

काँगो ताप म्हणजे काय? 

काँगो ताप म्हणजे क्रायमियन कांगो हेमरेजिक फीवर असतो.(CCHF) यापासून बचाव करणं गरजेचं आहे. कारण या आजारावर कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध झालेलं नाही. साधारणपणे कोरोनाची सुरूवातीची लक्षणं जशी असतात. तशीच या आजाराची लक्षणं असतात.

महाराष्ट्रातील पालघर जिल्हा गुजरातमधील वलसाड जिल्ह्याच्याजवळ आहे. अशा स्थितीत पालघर प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे. परिपत्रकद्वारे हा आजार कसा पसरतो याबाबत माहिती दिली आहे. वेळेवर उपचार न घेतल्यास मृत्यूचाही सामना या आजारामुळे करावा लागू शकतो.

 

हा आजार कसा पसरतो?

कांगो ताप एक व्हायरल आजार आहे. एका विशिष्ट किड्याद्वारे एका प्राण्यातून इतर प्राण्यांमध्ये पसरतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वेळेवर या आजाराच्या प्रसाबाबत माहिती न मिळाल्यास धोका उद्भवू शकतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास ३० टक्के रुग्णांना मृत्यूचा सामना करावा लागतो. या आजारांवर प्राण्यांसाठी किंवा माणसांसाठी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही.

जनावरांपासून मानवाला 'काँगो फिवर'चा प्रादुर्भाव होउ शकतो. उपचार व निदानाअभावी संसर्ग झालेल्या व्यक्तींपैकी ३० टक्क्यापर्यंत मृत्यू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पशुसंवर्धन विभागाच्या पश्चिम विभागीय रोग निदान प्रयोगशाळेने 'अलर्ट' राहण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. हा आजार 'झुनोटीक' स्वरूपाचा म्हणजेच जनावरांपासून मानवाला होणारा रोग आहे. याचा प्रादुर्भाव यापूर्वी काँगो, दक्षिण अफ्रीका, चीन, हंगेरी, इराण या देशात झाल्याचा इतिहास आहे. 'नॅरो व्हायरस' विषाणूमुळे होत असून, हा विषाणू मुख्येत्वकरून हायलोम्मा या जातीच्या गोचिडाद्वारे एका जनावरांपासून दुस-या जनावराला व बाधित जनावरांपासून मानवांमध्ये संक्रमित होतो. या रोगाची गाई, म्हशी, शेळ्या मेंढ्या या पाळीव जनावरांसह शहामृग पक्ष्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. अशीच बाधित जनावरे, पक्षी या विषाणूचा वाहक म्हणून कार्यरत राहतात. अशा वाहक जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांचे मालक, संपर्कातील व्यक्ती, खाटीक, पशुचिकीत्सक, कर्मचारी इत्यादींना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते.

 

काँगो तापाची लक्षणं 

काँगो तापचा लागण झाल्यानंतर सगळ्यात आधी ताप आणि डोकेदुखी, मासपेंशीमध्ये वेदना व्हायला सुरूवात होते, चक्कर येणं, डोळ्यांची जळजळ होणं, डोळ्यांवर उजेड पडल्यास जास्त वेदना होतात. घसा बसणं, पाठदुखी, कंबरदुखी, तोंडातून किंवा नाकातून रक्त बाहेर येणं. घशात तसेच तोंडातील वरच्या भागात लाल ठिपके दिसतात. आजार बळावल्यास त्वचेखालील रक्तस्त्राव, नाकातून रक्तस्त्राव, लघवीतून रक्तस्त्राव अशी विविध लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांत कावीळ सारखी लक्षणे दिसतात.

 

काय दक्षता घ्यावी?

पशुंचे मास चांगल्याप्रकारे शिजवून खावे, आजारी जनावरांवर उपचार करताना वापरण्यात येणा-या सामुग्रीचे निर्जुतुकीरण करून विल्हेवाट लावावी. पशुवैद्यकांनी हॅण्डग्लोव्हज, मास्क, संरक्षक चष्मा आदीचा वापर करावा. बाजारात विविध ठिकाणाहून जनावरे येतात. व्यावसायिकांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यात यावे, जनावरांची तपासणी करावी, अंगावर गोचिड आढळल्यास त्यांना कळपापासून वेगळे करावे, त्यांच्यावर ताबडतोब प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी, अशाप्रकारे दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.