Quick Reads

सिनेमा: बिगीन अगेन

स्पॉटलाईट सदर

Credit : Cinema Again

स्पॉयलर्स अहेड

 

सदर लेखात उल्लेख केलेल्या ‘वन्स’ चित्रपटावरील लेख

 

चित्रपटाला सुरुवात होते. आपण एका बारमध्ये आहोत, जिथे बहुधा ‘ओपन माइक नाईट’ सुरु असावी. व्यासपीठावर असलेल्या व्यक्तीने नुकतंच गाणं संपवलं असावं. मात्र, जाण्यापूर्वी तो त्याच्या एका मैत्रिणीला, ग्रेटाला (किएरा नाइटली) समोर येऊन तिने लिहिलेलं गाणं गाण्याचा आग्रह धरतो. सुरुवातीला नकार देणारी ‘ती’ समोर येते, ‘एखाद्या शहरात कधी कुणाच्या मनात एकाकी पडल्याची भावना निर्माण झाली असेल तर हे गाणं तुमच्यासाठी आहे’, असं म्हणत गायला सुरुवात करते. गाणं आहे, ‘अ स्टेप यू कॅन्ट टेक बॅक’. 

प्रेक्षकाला कसलीही पूर्वकल्पना न देता थेट पात्राच्या विश्वात, त्याच्या अंतरंगात प्रवेश मिळवून देत ते पात्र गात असलेलं गाणं शक्य तितक्या साध्या सोप्या पद्धतीने चित्रित करत समोर आणणं ही दिग्दर्शक जॉन कार्नीची खासियत आहे. त्याच्या ‘वन्स’ची (२००७) सुरुवात अशीच होते, ‘बिगीन अगेन’देखील (२०१३) असाच सुरु होतो, नि त्यानंतर आलेला ‘सिंग स्ट्रीट’देखील (२०१५). आताही इथे ग्रेटा तिच्या गाण्यात रस नसलेल्या, आपापल्या मद्याच्या प्याल्यात आणि गप्पांमध्ये हरवलेल्या समोर बसलेल्या लोकांकडे पाहत राहते, नि गात राहते. कॅमेरा तिच्याभोवती रेंगाळत राहतो. 

 

 

गाणं संपतं तेव्हा समोर एक व्यक्ती तिच्याकडे पाहून हसत असते. त्या व्यक्तीच्या डोळ्यात एक विस्मयचकित भाव असतो. कॅमेरा त्या व्यक्तीवर रेंगाळत असताना ‘ड्राउनिंग पूल’ गाणं ऐकू येऊ लागतं. त्या दिवसाच्या सुरुवातीला काय घडलं इथून पुढील दृश्याला सुरुवात होते.

चित्रपटाला सुरुवात होऊन केवळ चार मिनिटं झालेली असताना कार्नीच्या चित्रपटातील (या लेखत्रयीच्या निमित्ताने आपण विचारात घेत असलेल्या तिन्ही चित्रपटांमधील) महत्त्वाच्या संकल्पना आपल्यासमोर मांडल्या जातात. त्यातील पहिली म्हणजे संगीत, आणि दुसरी म्हणजे शक्याशक्यता आणि त्यापाठोपाठ येणारे (अशक्यप्राय) योगायोग. ग्रेटा गाते इतकं सोडल्यास अजून आपल्याला तिच्याबाबत काही माहिती नाही. इथे शक्याशक्यतेचा नि योगायोगाचा भाग समोर येतो. कारण, अशातच आपण तिला मागे सोडून या नव्याने समोर आलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रवेश करतो. त्याला गादीवर लोळताना, नंतर झोपेतून उठताच लगेच दारू पीत असताना पाहतो. काहीतरी तर कारण असेल ना, ज्यामुळे आपण किमान दोन तीन मिनिटं समोर दिसलेली व्यक्ती मागे सोडून दहा सेकंदांची ओळख असलेल्या व्यक्तीच्या आयुष्याकडे वळतोय.

तर आपल्याला त्या दिवसभरात कळतं की ही व्यक्ती म्हणजे डॅन मलिगन (मार्क रफेलो). डॅन निरनिराळ्या अज्ञात, हौशी संगीतकाराचा शोध घेत त्यांच्या गाण्यांचे अल्बम्स बनवण्यास एकेकाळी प्रसिद्ध असलेला निर्माता आहे. डॅन काळाच्या ओघात अपयशी ठरला आहे, आणि दारूच्या नशेत बुडाला आहे. इतका की खुद्द त्याने स्थापन केलेल्या रेकॉर्ड कंपनीतही त्याची पत खालावली आहे. सॉल (मॉस डेफ) हा त्याचा जुना सहकारीदेखील त्याची किंमत करेनासा झाला आहे. या दिवसभरात आपण डॅनचं अपयश; त्याचा आणि त्याच्या पत्नीचा, मिरीयमचा झालेला घटस्फोट (कॅथरीन कीनर) आणि अगदी त्याच्या मुलीच्या, व्हायोलेटच्या (हैली साइनफील्ड) दृष्टीनेही त्याला नसलेली किंमत दिसते.

दरम्यान त्याच दिवशी तो स्वतःची कंपनी सोडतो. यातूनच दिवसभर निरनिराळ्या पातळ्यांवर अपयश आणि निंदानालस्ती अनुभवल्यानंतर पुन्हा दारू पीत असताना तो या बारमध्ये येऊन पोचतो. आयुष्याकडून कसलीच अपेक्षा नसताना ग्रेटाचा आवाज आणि तिचे शब्द त्याच्या कानांवर पडतात. सुरुवातीला आपण अगदी काहीच कल्पना नसताना तिला गाताना पाहत असतो. आता आपल्याला तेव्हा तिच्याइतक्याच अनोळखी असलेल्या व्यक्तीविषयी, तिच्या आयुष्याविषयी काही माहिती मिळालेली असते. आपण त्याच्या दृष्टिकोनातून तिचं गाणं नव्याने अनुभवू लागतो. ती केवळ गिटारच्या संगीतावर गात असलेल्या या गाण्यात डॅन स्वतःच्या कल्पनेची भर घालू लागतो. इतर कुठलंही वाद्य वाजवण्यासाठी कुणीच नसताना त्याच्या कल्पनेत ती पियानो, व्हायोलिन ते अगदी ड्रमपर्यंत सगळी वाद्यं जिवंत होऊन वाजू लागतात. त्याला असलेली संगीताची जाण, आणि त्याच्या संगीतावरील प्रेमाचा हा सर्वोच्च बिंदू मानता येईल.

डॅनला ग्रेटाच्या गाण्यांच्या अल्बमची निर्मिती करण्यात रस असल्याचं तो तिला कळवतो. त्याचा दारूच्या नशेत गर्क अवतार पाहून तिला त्याच्यावर विश्वात बसत नाही. मात्र, काही मिनिटानंतर ती स्वतः त्याच्याशी बोलायला लागते. तो तिला आपल्या अपयशाची कथा तिला सांगतो. त्याला मिळालेल्या संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुसरस्काराच्या ट्रॉफीज दोन बीयर्ससाठी गहाण ठेवल्याचे किस्से सांगतो. असं असलं तरी त्याला संगीताविषयी अतोनात प्रेम आहे, आणि संगीतच त्यांना जोडणारा दुवा आहे. लेखक-दिग्दर्शक जॉन कार्नीच्या चित्रपटांत अशक्यप्राय योगायोग ही संकल्पना संगीताच्या साथीने येते.

ग्रेटाची उद्या घरी, युनायटेड किंगडमला परतायचं असल्याचं ती सांगते. तरी तिच्या संगीताच्या प्रेमात असलेला डॅन तिने उद्या त्याच्याशी संपर्क साधण्याच्या बोलीवर तिचा निरोप घेतो. इथे तो केवळ स्वतःच्या कारकिर्दीच्या पुनरुज्जीवनाचा उद्देश त्याच्या मनात नसल्याचं स्पष्ट होईल इतपत माहिती त्याच्यासोबत घालवलेल्या एका दिवसातून आपल्याला मिळालेली असते. आणि इथे तर आपण राजीनामा दिलेला असूनही तो सॉलने तिचा अल्बम बनवावा यावर ठाम असतो. प्रेक्षक म्हणून त्याच्याविषयी बऱ्यापैकी माहिती आपल्याला मिळालेली असली तरी ग्रेटाबाबत आपण अजूनही जवळपास पूर्णता अनभिज्ञ आहोत. आता तिची पूर्वकथा कळण्याची वेळ आलेली असते. 

ग्रेटाचं तिच्या प्रियकराशी, डेव्हशी असलेलं नातं एव्हाना संपुष्टात आलेलं असतं. मग जॉन कार्नी पुन्हा नाविन्यपूर्ण पद्धतीने आपल्याला तिच्या भूतकाळात प्रवेश मिळवून देतो. ग्रेटा ते दोघं एकत्र असताना चित्रित केलेला व्हिडिओ पाहत असल्याचं दृश्य सुरु असतं. ती पाहत असलेल्या व्हिडिओमधून थेट तिच्या आयुष्यातील ते जोडपं एकत्र असतानाच्या दिवसांत प्रवेश केला जातो. त्यावेळी डेव्हची सांगीतिक क्षेत्रातील कारकीर्द सुरु होत असताना काही गाणी रेकॉर्ड करण्यासाठी हे जोडपं न्यू यॉर्कला आलेलं असतं. दोघेही गीतकार-संगीतकार असतात. मात्र, ग्रेटा ना अजून त्याच्याइतकी लोकप्रिय असते, ना तिला कुणा कंपनीने तिच्यापुढे रेकॉर्ड बनवण्याचा प्रस्ताव मांडलेला असतो. पण, ही गोष्ट दोघांनाही खटकत नसते. ते एकत्र असतात ही गोष्ट त्यांच्याकरिता पुरेशी असते. ते दोघे एकत्र असतात, एकमेकांच्या सहवासात एकमेकांसाठी गीतं लिहीत असतात, इतकं पुरेसं असतं. तिनं तर ‘लॉस्ट स्टार्स’ हे गीतही त्याला क्रिसमसची भेट म्हणून लिहिलेलं असतं! ती दोघं एकमेकांसाठी मानसिक, भावनिक पातळीवर एक योग्य जोडीदार म्हणून काम करत असतात. 

दरम्यान तो लॉस अँजेलिसच्या एका टूरवरून परतल्यानंतर त्याने तिच्याकरिता एक गाणं लिहिल्याचं तो तिला कळवतो. गाणं असतं ‘अ हायर प्लेस’. ते गाणं ऐकत असतानाच तिला रडू कोसळतं, नि ती त्याच्या कानाखाली लगावते. ते गाणं त्याने तिच्यासाठी लिहिलेलं नसतं, त्याचे इतर कुणासोबत तरी संबंध असल्याचं तिला केवळ त्या गाण्यावरून कळतं. तोही ते मान्य करतो. ‘संगीत’ या त्यांना जोडून ठेवणाऱ्या दुव्याची ताकद इथे कळते. इतका काळ एकत्र राहून एकमेकांच्या सहवासात, अनेकदा एकमेकांसाठी गाणी लिहिलेली असताना त्यांच्यातील कुणा एकाने दुसऱ्या कुणासाठी लिहिलेलं गाणं ओळखू येणं हा त्यांच्या प्रेमातील अडथळा ठरतो. मात्र, हीच गोष्ट त्यांच्या प्रेमाची साक्षही देते. एखाद्याने समोरच्याला किती पुरेपूर ओळखावं? ग्रेटाला ते गाणं तिच्यासाठी नव्हतं हे कळावं इतकं आरपार?!

त्याच रात्री ती त्यांच्या न्यू यॉर्कमधील वास्तव्य असललेल्या घरातून बाहेर पडून काही काळापूर्वी तिला अकस्मातपणे भेटलेल्या जुन्या मित्राकडे, स्टीव्हकडे (जेम्स कॉर्डन) येते. तो ‘ओपन माइक नाईट’साठी बारमध्ये जाणार असतो. तो तिलाही सोबत घेऊन येतो. पुढे काय होणार आपल्याला माहीत असतं : ती येते, स्टीव्हच्या आग्रहावरून गाते आणि डॅन तिच्यापुढे अल्बम बनवण्याचा प्रस्ताव ठेवतो. मधली दृश्यं याआधीच दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून दाखवून झालेली असताना कार्नीला आता त्या रात्री काय घडलं याकडे पुन्हा वळायची गरज पडत नाही. तो दुसऱ्या दिवसाकडे वळतो खरा. पण, मधल्या काळात तो स्थळकाळाशी कशा रीतीने आणि किती कल्पकतेनं खेळतो हे आपल्या लक्षात आलेलं असतं. कुणातरी पात्रावर (किंवा त्या पात्राच्या हातातील एखाद्या गोष्टीवर) कॅमेरा रेंगाळत राहतो, आपल्याला पुढे जाऊन येणाऱ्या दृश्यातील आवाज ऐकू येऊ लागतात आणि पुढच्या दृश्याला सुरुवात होते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, आपल्याला कसलीही पूर्वकल्पना न देता तो थेट सदर पात्रांच्या आयुष्यात घेऊन जातो.

याखेरीज कार्नीच्या चित्रपटात प्रदीर्घ दृश्यं/वन टेक (किंवा किमान तसा आभास) हमखास आणि मुबलक प्रमाणात आढळतात. समोर घडत असणाऱ्या सांगीतिक घडामोडी इतक्या सुरेख, आणि जिवंत भासणाऱ्या असतात की त्यांत खंड पडू देण्याइतकी क्रूरता या संगीतवेड्या दिग्दर्शकाच्या अंगी नक्कीच नसणार. त्यामुळेच त्याच्या चित्रपटांमध्ये अशी अनेक प्रदीर्घ दृश्यं आढळतात. या दृश्यांच्या निमित्ताने तो आपल्या अभिनेत्यांच्या हालचाली टिपत राहतो. त्यांना पडदाभर वावरू देतो, गाऊ, हसू, रडू देतो. त्यांना हवा असणारा अवकाश मिळवून देतो. या दृश्यांमुळे त्याच्या चित्रपटांमध्ये एक उपजत सहज सुंदरता निर्माण होते.

दुसऱ्या दिवशी डॅन आणि ग्रेटा त्याच्या पूर्वाश्रमीचा व्यावसायिक भागीदाराकडे, सॉलकडे तिच्या अल्बमसाठीचा प्रस्ताव घेऊन जातात. तो डेमोची मागणी करतो. आता त्यांच्यावर डेमो बनवण्याची वेळ येते. पण, कसलीही साधनसंपत्ती हाती नसताना डेमो रेकॉर्ड कसा करणार? डॅनला एक भन्नाट कल्पना सुचते. बंद स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यापेक्षा थेट बाहेर, रस्त्यांवर गाणी रेकॉर्ड करायची. शहराचा अर्क त्यांत उतरू द्यायचा. त्यांना जिवंतपणा बहाल करायचा. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा कार्नी संगीताकडे कुठल्या नजरेनं पाहतो हे लक्षात येतं. तो संगीताला रोमँटिसाईज करतो का, तर हो, नक्कीच. पण, तशीही संगीत ही रोमँटिसाईज करावीशी गोष्ट आहेच की! ती अकस्मातपणे, अगदी अनपेक्षितरीत्या माणसांना जोडते. केवळ कार्नीच्या विश्वातच असं नाही, पण एकूणच आपल्या आयुष्यातही. चित्रपट आणि संगीत या माध्यमांमुळे लोक अशक्यप्रायरीत्या जोडले जातात यावर माझा कार्नीइतकाच विश्वास आहे. त्याच्या या संगीताकडे, माणसांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात एक उपजत साधेपणा, एक प्रकारची तरलता आहे. आणि जेव्हा कार्नी हे घटक, या संकल्पना पडद्यावर जिवंत करू पाहतो तेव्हा त्याला कसलीच बंधनं राहत नाहीत. तो त्याची पात्रं, त्यांच्या आयुष्यातील संगीत हा घटक, ती गात/गुणगुणत असलेली गीतं, ती अनुभवत असलेले क्षण या सर्वच गोष्टींना जिवंतपणा बहाल करतो. त्याच्या पात्रांप्रमाणेच आपण केवळ गाणी ऐकत नाही, तर ती अनुभवतो.

साहजिकच त्याच्या चित्रपटातील गीताचं लेखनदेखील कथानकाच्या, पात्रांच्या आणि त्यांच्या मनःस्थितीच्या दृष्टीने अगदी अचूक असतं. इथे ‘अ स्टेप यू कॅन्ट टेक बॅक’चा संदर्भ आपल्याला कळाल्यानंतर त्या गाण्याचं महत्त्व आणि त्याची समर्पकता अधिक वाढते. ते गाणारी ग्रेटा, ते ऐकून भारावून जाणारा डॅन आणि तिला गाण्याचा आग्रह करणारा स्टीव्ह हे तिघेही आयुष्यात एकाकी पडलेले असतात, हा संदर्भ त्या गाण्याला अधिक सुंदर बनवतो. ‘अ स्टेप यू कॅन्ट टेक बॅक’ आणि मग ‘लॉस्ट स्टार्स’ हे प्रेम गीत, आणि या दोन्हींच्या दोन निराळ्या आवृत्त्या चित्रपटाच्या कथानकाच्या ओघात येतात. ‘टेल मी इफ यू वाना गो होम’मध्ये आपल्या प्रियकराशी संवाद साधू पाहते (किंवा तसा एक शेवटचा प्रयत्न करताना दिसते). या गाण्यात ती न्यू यॉर्कला आपलं घर मानत नसल्याचा आधीचा संदर्भ असतो, तिच्यासाठी घर म्हणजे युके. डॅनसोबत घालवलेल्या दिवसानंतर ग्रेटा ‘लाइक अ फूल’ हे गीत तात्काळ रेकॉर्ड करते. त्यानिमित्ताने आपल्या प्रेमभंगाचं आणि डेव्हवर इतक्या समर्पितपणे प्रेम करण्याच्या तिच्या एक प्रकारच्या चुकीचं शाब्दिक, सांगीतिक रूप उभं करते. पुन्हा एकदा संगीत आणि शब्द हे कार्नीच्या विश्वातील महत्त्वाचे घटक इथे त्यांच्या सर्वोच्च बिंदूवर असतात.

डॅन, ग्रेटा, स्टीव्ह आणि इतर काही लोक एकत्र येऊन गाणी रेकॉर्ड करतात. डॅन आणि त्याच्या पत्नीचं नातं, त्याचं त्याच्या मुलीशी असलेलं नातं अधिक सविस्तरपणे समोर येतं. डॅन, ग्रेटा आणि त्याची मुलगी व्हायोलेट एक संपूर्ण दिवस एकत्र घालवतात. त्या रात्री डॅन आणि ग्रेटा जवळपास रात्रभर बोलत, शहरात फिरत राहतात. संगीत त्यांना जोडणारा दुवा असला, त्यांच्या एकमेकांकडे एकमेकांच्या नुसत्या अस्तित्त्वानं भारावून जाण्याचे क्षण समोर दिसत असले तरी कार्नीला त्यांना कुठल्याही तऱ्हेच्या नात्याच्या बंधनात अडकवावंसं वाटत नाही. आपल्यालाही त्याची गरज वाटत नाही. त्या पात्रांना तर ती वाटत नसतेच.

हा प्रेमाकडे अपारंपरिकरीत्या पाहण्याचा विशिष्ट असा दृष्टिकोन म्हणजे लेखक-दिग्दर्शक जॉन कार्नीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. संगीत आणि योगायोगानं माणसं जोडली जातात. पण, कार्नी त्यांच्या भविष्याचा निकाल लावत नाही. तो त्या पात्रांना एक प्रकारच्या आशावादी वळणावर आणून सोडतो. त्याच्या चित्रपटांत पारंपरिक पद्धतीनं प्रेमकथा घडणार, आणि शेवटी जोडपं एकत्र येणार असं घडत नाही. तो केवळ आपल्याला पात्रांच्या स्वभावाची, भूतकाळाची कल्पना येईल इथपासून कथा सांगायला सुरुवात करतो, नि एका नितांतसुंदर वळणावर येऊन थांबतो. तो त्यांच्या प्राक्तनात ढवळाढवळ करत नाही.

“वह अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन उसे इक खूबसूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा” - हे त्याच्या रूढ अर्थाने शेवटचा अट्टाहास न धरण्याच्या प्रवृत्तीला अचूकपणे लागू पडतं.

त्यामुळे रात्रभर न्यू यॉर्कभर फिरत असताना कानांमध्ये इयर आणि हेडफोन्स घालून, स्प्लिटर वापरत (दोन हेड/इयरफोन्स एकत्र करत, एकाच यंत्रावरून दोन लोक गाणी एकच गाणं एकाच वेळी ऐकू शकतील असं यंत्र) गाणी ऐकतात तेव्हा तिथे केवळ संगीत आणि त्याने जोडल्या गेलेल्या, ते ऐकणाऱ्या दोन व्यक्ती संगीताचा उपभोग घेत असतात. त्यांना कथानकाला विशिष्ट दिशेने घेऊन जायचं नसतं. त्यांना काही म्हणजे काहीच करायचं नसतं. ती एकमेकांच्या प्लेलिस्टमधील फ्रँक सिनात्राचं ‘लक बी अ लेडी’, स्टीवी वंडरचं ‘फॉर वन्स इन माय लाइफ’ नि ‘कॅसाब्लान्का’मधील डुली विल्सनचं ‘अॅज टाइम गोज बाय’’ अशी गाणी ऐकत असतात. हे सारं भयंकर ओल्ड स्कूल आहे का, तर आहे. ग्रेटा म्हणते त्याप्रमाणे क्लिशेड आहे का, तर तेही आहे. पण, ते ज्या नजाकतीनं, नि अलवारपणे समोर मांडलं आहे, ते इथे पहावंसं आहे. 

‘वन्स’ आणि ‘बिगीन अगेन’कडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट आहे की जॉन कार्नी प्रेमाच्या अपारंपरिक कथा असलेल्या सांगीतिका बनवतो. ‘बिगीन अगेन’ म्हणजे त्याच्या याच शैलीचं एक नितांतसुंदर, दुष्ट लागेलसं रूप आहे. ते आवर्जून पहावंसं आहे, हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही.