Quick Reads
माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: हायझेनबर्ग
'अंसर्टेनीटी' प्रिन्सिपलचा जनक असलेला 'सर्टन' क्रश
"An expert is someone who knows some of the worst mistakes that can be made in his subject, and how to avoid them.
म्हणजेच एखादा एखाद्या विषयात तज्ञ तेव्हाच ठरतो जेव्हा त्याला त्यात झालेल्या सगळ्यात चुका माहीत असतात आणि त्या कशा टाळायच्या हे ही माहीत असतं.
लॅबमध्ये प्रॅक्टिकल करत होते. मॅडम परफेक्ट झाल्याशिवाय जाऊच द्यायच्या नाहीत. माझे रिडींग्ज येतच नव्हते. बेक्कार वैतागले आणि बसले चिडुन. तेवढयात सकाळी त्यानं बोललेलं हे वाक्य आठवलं. हसु आलं आणि आश्चर्यही वाटलं. सकाळी तर ओपेनहायमर, अल्बर्ट पण होते की सोबत, तरी याचंच वाक्य कसं लक्षात राहिलं?
आणि का!?
प्रॅक्टिकल करून तडक उठले आणि त्याला भेटायला गेले. मला माहित होतं तो लायब्ररीतच असणार ते. गेले धावत पण तिथं तो नव्हता. मग गुगलु दादाकडं नक्कीच असणार म्हणून त्याला भेटले तर हा नमुना तिथंच होता...
५ डिसेंबर १९०१ रोजी वरुर्गबर्ग, जर्मनी, इथल्या माध्यमिक शाळेत शास्त्रीय भाषा शिकवणाऱ्या डॉ. ऑगस्ट हाइझेनबर्ग आणि त्याची पत्नी ऍनी वेक्लेन यांच्या पोटी हा येडोबा जन्मला. गणित आणि फिजिक्स म्हणजे याचा जीव कि प्राण. जेव्हा तो १९२० मध्ये म्यूनिक येथील मॅक्सिमेलियन शाळेत गेला तेव्हा त्याचं लाईफ टोटली चेंज झालं. म्युनिक विद्यापीठामध्ये समरफिल्ड, विएन, प्रिन्सहॅम आणि रोझेनथाल यांसारख्या शिक्षकांच्या वर्गात आमचा लव्ह ट्रैंगल फुलु लागला. मैं,वो और हमारा फिजिक्स. दोन वर्ष कशी कापरासारखी उडाली आणि आमच्या दोघांच्या लाडक्या फिजिक्ससाठी आम्हाला गॉटिंगनला जावं लागलं. तिथं एक छानसा गृपच झाला आमचा. मैक्स बॉर्न, जेम्स फ्रँक आणि डेव्हिड हिल्बर्ट. आधीच १९२२-२३ चा हिवाळा आणि त्यात ते आमचे गुलाबी दिवस.अहाहा! प्रेम अगदी ऊतु जात होतं. फिजिक्समध्ये आणि एकमेकांमध्ये एवढे बुडालो की माझ्या हैजु डार्लिंगने १९२३ मध्ये पीएचडी पण घेतली. त्यानं फिजिक्समध्ये आणि मी त्याच्या प्रेमात. सगळे शिक्षक त्याच्यावर फिदा आणि मी पण. समरफिल्ड सर तर जरा जास्तीच. त्यांचा फेवरीट स्टुडंट होता तो. का असणार नाही? सगळ्यांनी प्रेम करावा असाच होता. उगीच पडले का त्याच्या प्रेमात?
या पीएचडी च्या काळात समरफिल्ड सरांनी त्यांच्या लाडक्या स्टुडंटचं आयुष्य वेगळ्या वळणावर नेऊन ठेवलं.नील्स बोर या महामानवाशी ओळख करून दिली. आणि परत एकदा मेरी जान की गाडी निकल पडी. गॉटिंगेनमधली ही प्रेमाची त्रिकोणी चौकट कोपेनहेगन विद्यापीठातल्या कँपसमध्ये फुलु लागली. समरफिल्ड सरांचा विश्वासा हैजुनं अगदी सार्थ केला. नील्स बोरचं फेमस अॕटोमिक मॉडेल विस्तारित करण्यात हैजु यशस्वीही झाला. जसं जसं तिकडं मॉडेलचा विस्तार होत होता तसं तसं आमच्या प्रेमाचा आलेखही वाढत होता. मी त्याच्या प्रेमात बुडायला लागले आणि तो मॅट्रीक्स मेकॕनिक्समध्ये. मॅट्रीक्स मेकॕनिक्स ही क्वांटम मेकॅनिक्स मधली पहिली आणि पुर्ण संकल्पना सिध्द झाली. इथंही आमचा एक नविन ग्रूप तयार झालेला. मॅक्स बॉर्न आणि पास्कल. हे दोघेही हैजुच्या मॅट्रिक्स मेकॕनिक्सवरती त्याच्यासोबत काम करत होते.
सगळं काही सुरळीत चालु होतं. मी त्याच्या प्रेमात बुडत होते आणि तो नवनवे शोध लावण्यात. व्याख्याता म्हणून नवनविन ठिकाणी जात होता आपले शोध लावत होता. एकापाठोपाठ एक अशी कामं वाढु लागली की त्याला माझ्यासाठीही वेळ मिळेना. रोज पत्रं लिहित होता पण त्यातलं एकही माझ्यासाठी नाही. मला शंका यायला लागली. संशय घेऊ लागले आणि त्याची पत्रं चेक केली तर माझ्या हाती पत्रं पडलं. पॉलीला लिहिलेलं. आता ही कोण? संशयाचा किडा अस्सा जोरात चावला ना मला की बस्स. कुणाचीही पत्रं न वाचणारी मी. त्याचं ते पत्र मात्र चेक केलं. त्यात असं काहीतर सापडेल की मी चांगली भांडेन त्याला. पण कसंच काय? त्यात होतं अंसर्टेनीटी प्रिन्सिपल, अनिश्चिततेचा सिद्धांत. आणि ती पॉली 'ती' नसुन 'तो' होता. महान शास्त्रज्ञ पॉली. वुल्फगँग पॉली. हा काळ होता १९२७ चा. लीपझीग विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागाचा प्रमुख झाला आणि जगभर गाजला. पण त्याचं आणि पॉलीचं अफेअर सुरुच होत. माझा संशय संपला होता हे नक्की हं. कारण आता ते एकमेकांना पत्रं लिहिण्याऐवजी मिळुन रिसर्च पेपर्स लिहु लागले.
१९२९ च्या सुरुवातीला, हैजु आणि पॉलीने सापेक्षतावादी क्वांटम फिल्ड थिअरीचे पहिले दोन पेपर सादर केले. आणि काय आश्चर्य ! १९३२ चं जगप्रसिद्ध नोबेलही पटकावलं. त्याच्या आनंदाला आणि माझ्या प्रेमाला उधाण आलं.खरं सांगू! नोबेलमुळं माझ्या त्याच्यावरच्या प्रेमाला उधाण नाही आलं. याचं कारण वेगळं आहे. त्याला जे नोबेल मिळालं होतं ते त्याबद्दल त्याचं मत होतं की ह्या नोबेलचा हकदार तो एकटाच नसुन त्याचे लाडके दोस्त मॅक्स बॉर्न आणि पास्कलही आहेत. शास्त्रज्ञ म्हणून तो महान होताच पण माणुस म्हणूनही त्यानं आपलं महानपण सिद्ध केलं. मग सांगा बरं कसं येणार नाही माझ्या प्रेमाला उधाण? बहोत नशीबवालों को मिलता है ऐसा प्यार! आणखी एक गोष्ट म्हणजे हे नोबेल यासाठी खास होतं की जेव्हा आख्खं जग क्वांटम थेअरीला विरोध करत होतं तेव्हा हा न डगमडता आपलं काम करत होता. त्याचवेळी हिटलरही राष्ट्राध्यक्ष झालेला आणि त्यानेही हैजु आणि त्याच्या गँगवर बहिष्कार टाकलेला. पण हैजु आपला मुद्दा पटवुन देण्यात माहीर होता. त्याने हिटलरला पत्र लिहिलं आणि गैरसमज दुर केला जो ड्युश फिजिक या चळवळीनं क्वांटम बद्दल पसरवला होता. बहिष्काराचं कारण क्वांटम तर होतंच पण हैजुचं ज्यु असणंही होतं. पण हैजुनं पत्रात सगळंच क्लीअर केलं.
मुडमध्ये असला ना हैजु पियानो वाजवत बसायचा. त्याला शास्त्रीय संगीत आणि पियानोवादनाचा भारी नाद. फिजिक्स नंतरचं त्याचं प्रेम. अशाच एका कार्यक्रमात गेलेला. फिजिक्स ही सवत काय कमी होती म्हणून त्यानं त्या कार्यक्रमातुन मला सवत आणली. एलिझाबेथ शुमाकर. ओप्पुसारखंच माझ्या आयुष्यात एलिझाबेथ नावाचा अणुबाँब टाकुन हैजु जर्मन आण्विक ऊर्जा प्रकल्प संशोधन आणि विकास कामात बुडुन गेला.
दुसऱ्या महायुद्धानं जेव्हा युरोप पेटला होता तेव्हा शास्त्रज्ञ न्यूट्रॉनचं विभाजन करून युरेनियमच्या न्यूक्लियसचे विभाजन करण्याच्या शक्तीचा उपयोग लष्करी उद्दीष्टांसाठी केला जाऊ शकतो किंवा नाही हे शोधण्यात बिझी होते. यात हैजुला दिसुन आलं की हे तत्त्वानुसार शक्य आहे पण याला पैसा हवा आणि वेळही. युद्धही संपुन जाईल तोवर आणि म्हणूनच १९४२ मध्ये या प्रकल्पाला नाझी सरकाराने वगळले होते. गप्प बसेल तो हैजु कसला? माझ्यासारखाच हट्टी. त्यानं सरकारच्या मंजुरीला नागरी प्रशासनाखाली छोट्या परीक्षणाचा एक आराखडा तयार केला. १९४१ मध्ये, हाईझेनबर्ग यांनी परमाणु भौतिकशास्त्रज्ञांचे आंतरराष्ट्रीय समुदाय आण्विक शस्त्रे निर्माण करण्याच्या आणि त्याच्या वापरावर किंवा प्रतिबंध करण्याबाबत आपल्या लाडक्या निल्स बोर यांचे मत मिळवण्याचा प्रयत्नही केला आणि बोहरने सावध वाटचालीचा सल्लाही दिला. कितीही मोठा झाला तरी जुने कंपस वापरायला विसरला नाही तो. तिकडं अमेरिकेत त्याचं दोस्त आणि माझा एक्स ओप्पु, मॅनहॅटन प्रोजेक्ट" मध्ये अणुबॉम्ब तयार करण्याच्या मागं हात धुऊन लागला होता आणि इकडं हेन्सबर्ग शहरात वैज्ञानिक नेतृत्वाखाली जर्मन शास्त्रज्ञही अणुबाँब तयार करत होते.
दोन देशांमध्ये नव्हे तर दोन दोस्तांमध्ये या शर्यतीमुळं दुरावा येईल असा अंदाज लॉस आलामोस येथील भौतिकशास्त्रज्ञांना वाटलं. २३ एप्रिल १९४५ रोजी अमेरिकेच्या अग्रेसर टीमने हायगेर्रॉच येथे हायझेनबर्गच्या टीमच्या प्रयोगशाळेच्या तपासणीस सुरुवात केली तेव्हा फक्त एक लहान चाचणी अणुभट्टी निर्माण झाली होती जी अद्याप गंभीर समस्येत रूपांतरित झाली नव्हती, परंतु मित्र राष्ट्रांना त्यांच्या स्वत: च्या पूर्वाग्रहांमुळे विश्वास ठेवता आला हा एक अणुबॉम्बसाठी हैजुचा पहिला पण अपुरा प्रयत्न होता. खरंतर १ सप्टेंबर १९३९ रोजी युद्ध सुरू झालां आणि काही आठवड्यांनंतर लिपजिग विद्यापीठातील प्राध्यापक असलेला हैजु आणि काही इतर जर्मन भौतिकशास्त्रज्ञांना आण्विक बॉम्बची व्यवहार्यता जाणून घेण्यासाठी हिटलरच्या अध्यादेशाने तयार केलं होतं. पण त्या चाचणीनंतर मे १९४५ मध्ये, युद्धानंतर हायझेनबर्गला ऑपरेशन अलोसस (जिथं आणखी नऊ जर्मन शास्त्रज्ञांनी काम करत होते) अटक केली.
१९४६ मध्ये त्यांना सोडलं गेलं. या प्रकारानं हैजु जरा अपसेट झाला. परत आपल्या आवडत्या शहरात,गॉटिंगेन येथे स्थायिक झाला. जेथे त्यांनी 1958 पर्यंत मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट फॉर फिजिक्समध्ये संचालक म्हणून काम केले आणि १९७० पर्यंत बर्लिनमध्ये मॅक्स प्लॅंक इन्स्टिटयूट ऑफ फिजिक्स आणि अॅस्ट्रोफिऑक्स या संस्थेत काम केले. जगभर व्याख्यानं देत, फिजिक्सचा प्रचार आणि प्रसार करु लागला.
आपल्या कामाशी आणि देशाशी एकनिष्ठ असणाऱ्या हैजुनं मला मात्र दोनवेळा धोका दिला. पहिल्यांदा एलिझाबेथला आणुन, तो पचवला मी पण दुसरा पचवणं शक्य नाही. हैजूनं मूत्रपिंड आणि पित्त मूत्राशयचा कर्करोग नावाची त्यालाही नको असलेली सवत आणली आणि तिच्याच सोबत तो मला आणि एलिझाबेथलाही सोडून १९ फेब्रुवारी १९७६ रोजी निघुन गेला!
त्याचं फेमस प्रिन्सिपल जरी 'अंसर्टेनीटी'चं असलं तरी माझं त्याच्यावर आणि त्याच्या कामावरही खुप प्रेम आहे हे 'निश्चित'हं!
पुढच्या भागात भेटु, निकोला डार्लिंगबरोबरच्या प्रेमप्रकरणात!