Quick Reads
हायपेशिया, इतिहासातली कदाचित पहिली हुतात्मा विज्ञाननायिका
विज्ञानायिका सदर
"There are many things unite us than divide us"
हे मी नाही म्हणलंय. मी माझ्या जनरेशनला शोभेल असं टिपिकल, ट्रॅशी वाक्य "Divided by अमुक तमुक and united by तमुक अमुक" बोलले असते. पण हे ती बोललीय. आणि आत्ता नाही, खुप खुप वर्षापुर्वी. म्हणजे मुळातच ती जन्मली इ.स ३५० ते ३७० च्या आसपास कधीतरी. तिच्या जन्माबद्दलच सावळा गोंधळै.
ज्यांच्या पोटी जन्मली तो एक गणितज्ञ होता. Theon of Alexandria. आणि ती म्हणजे थिअॉनचे गुण पुरेपुर गुणसुत्रांमध्ये घेऊन जन्मलेली हायपेशिया अॉफ अलेक्झांड्रिया. नुसतेच गणितज्ञ नव्हते ते. तत्त्ववेत्ते आणि खगोलशास्त्रज्ञही होते. ते गुण तिच्यात उतरले नसते तर आश्चर्यच होतं. त्याकाळच्या रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या इजिप्तमधील अलेक्झांड्रिया मध्ये रहायची ती. अलेक्झांड्रिया अलेक्झांडरने स्वतःच्या नावानं बनवलेलं शहर. फक्त स्थापत्य कलेचा नमुना म्हणुनच नव्हे तर बुद्धिमत्तेचं शहर म्हणूनही ओळखलं जावं अशी या शहरालाही इच्छा असावी. हायपेशियानं हे सिद्धही केलं. अलेक्झांड्रियामधील 'निओ-प्लॅटॉनिक' विचारांची एक प्रमुख विचारवंत होती ती. निओ-प्लटॉनिक म्हणजे तिच्या ७-८ शतकं आधीचा ग्रीक तत्ववेत्ता प्लेटोच्या विचारांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करणारा बुद्धिजीवी वर्ग होता.
हायपेशिआ तिच्या काळाच्या कितीतरी पुढची स्री होती. एक लोकप्रिय सार्वजनिक वक्ता म्हणून विलक्षण नावाजलेली. याबद्दलचं सगळं श्रेय हे तिच्या वडिलांना जातं. तिच्या वडिलांनी, थिऑननी आपल्या मुलीवर तत्कालीन स्त्रियांसाठी ठरलेल्या पारंपारिक बंधनांचा ठेका घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि ग्रीक परंपरेत मुलगा वाढवावा तसं तिला वाढवलं. तिला स्वतःचा व्यापार शिकवला. गणिताचं ज्ञान दिलं आणि शिकण्यासाठी सतत प्रोत्साहित केलं.
त्या काळी सर्व वर्गातील ग्रीक स्त्रिया एकाच प्रकारच्या कामावर व्यस्त होत्या, मुख्यत: कुटुंबातील घरगुती गरजा पूर्ण करणं, लहान मुलांची काळजी घेणं, आजार वगैरे बघणं आणि स्वयंपाक करणं. हे आजही होतचं की. आजही जगातल्या अनेक स्त्रिया या चुल न् मुल याच संकल्पनेत अडकुन आहेत. म्हणुनच हायपेशियाला मी काळच्या पुढची स्त्री म्हणते. कारण एकीकडे स्त्रिया घरात व्यस्त होत्या तेव्हा दुसरीकडे, हायपेशिया अलेक्झांड्रियाच्या विद्यापीठातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक आयुष्य जगत होती; आणि शिक्षण ही तेव्हा फक्त पुरुषी मक्तेदारी होती. तिच्या वडिलांनी तिला पोहणं, घोड्यावर स्वार होणं आणि शारीरिक तंदुरुस्त राहण्यास शिकवलं आणि हायपेशियानं देखील हे धडे निश्चयानं गिरवले. तिच्या बालपणाबद्दल फारसं काही माहित नाही, कारण बहुतेक गोष्टी त्या कालच्या कट्टर ख्रिस्ती धर्मातिरेक्यानी गायब केल्या कारण अर्थातच ते तिचा तिरस्कार करत होते आणि त्यांना तिचा वारसा तिथंच संपवायचा होता.
माणसाला स्वतःला पुर्णतः माणुस म्हणून विकसित व्हायचं असेल तर यावर सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रवास. बहुधा हे थिओनला खुप आधीच पटलं होतं थिओनने हायपेशियाला प्रवासाला जाण्याबद्दल सुचवलं. त्याप्रमाणेच ती कलाकार आणि तत्त्ववेत्तांच्या शहरात, अथेन्समध्ये फिरत असताना तिनं एका शाळेत गणिताचं शिक्षण सुरू केलं. अलेक्झांड्रिया आणि अथेन्स शैक्षणिक केंद्र म्हणून लोकप्रियतेच्या दृष्टीने एक नामवंत केंद्र होती. तिला तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून अलेक्झांड्रियामध्ये शिकवण्याची संधी मिळाली, जी तिनं स्वीकारली. जगाच्या कानाकोपऱ्यातून इजिप्तला शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना तिनं तत्त्वज्ञान आणि गणिताची व्याख्यानं देण्यास सुरुवात केली.
मात्र त्याचवेळी तिला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. लोकप्रिय तत्त्वज्ञानी इसिडोर यांच्याशी तिचं लग्न झाल्याच्या अफवांनी जोर धरला. एखादी स्त्री जेव्हा व्यवस्थेत उतरते तेव्हा तिला हरवण्यासाठी शक्यतो खाजगी आयुष्यावर वार केले जातात. हे अगदी पुर्वीपासुनच सुरु आहे. खरंतर हायपेशिया ही आजन्म अविवाहितच होती.
तिनं अगदी हुशारीने त्या अफवांना पुर्णतः दुर्लक्षित केलं आणि तिच्या शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित केलं. ती निओ-प्लेटॉनिक पंथाची विचारक होती हे आधी नमूद केलं आहे. प्लेटोच्या तत्वज्ञानानुसार, भौतिक जग हे कल्पनेतील जगाची फक्त एक प्रतिकृती असतं, त्यामुळं आत्मिक व मानसिक जगाला या पंथात वरचं स्थान होतं. जशी भौतिक जगाची व्याख्या भौतिकविज्ञान करतं, तसं या संकल्पनात्मक जगाची व्यक्त भाषा म्हणजे गणित! त्यामुळं या पंथातील विचारक गणितात पांडित्य राखत, तीच गोष्ट तिच्यासाठीही खरी होती. डायओफॅन्टस अॅरिथमेटिका ही तिची शिक्षणाची पद्धती. तिनं त्या पद्धतींच्या मुळाशी लक्ष केंद्रित केलं. तिनं गणिताबरोबरच प्लेटो आणि अरिस्टॉटलच्या तत्वज्ञानावर व्याख्यानं देखील दिली आणि तिचा विद्यार्थी वर्ग वाढतच गेला. त्यापैकी काही ख्रिस्तीसुद्धा होते, ज्यांनी प्लेटोच्या तत्वज्ञानाचा विरोध केला, परंतु ते दुर्लक्षित करत तिच्या व्याख्यानांचा तिच्या विद्यार्थ्यांवर खोलवर परिणाम झाला.
शिकवण्याबरोबरच, हायपेशीयानं तिचं स्वतंत्र संशोधन केले आणि काहींमध्ये तिच्या वडिलांनी तिला सहकार्य केलं.
तिच्या कामांची नेमकी संख्या अद्याप समजू शकली नाही, कारण त्यातली बहुतेक जाळून टाकली गेली होती, परंतु मौखिक परंपरा ही एक सामर्थ्यवान गोष्ट आहे आणि त्याद्वारे हे ज्ञात आहे की तिनं प्राचीन तत्त्वज्ञानाच्या पुनर्रुजीवनामध्ये अतुलनीय योगदान दिलं, ज्याचा नंतर-नंतर उल्लेख केला गेला आणि आजही होतो. तिच्या काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नावांनी तिचं बरंच संशोधन जपून ठेवलं. त्यात ‘अपोलोनिअसचे कोनिक्स’ सिद्धांत आणि टोलेमीचा ‘अल्माजेस्ट’ हा ग्रंथ संपादित करून त्याच्या प्रवचनाचा समावेश आहे. तिच्या 'नवीन तात्विक श्रद्धा' या संग्रहात सौर यंत्रणेतील तारे आणि ग्रहांच्या स्थानांबद्दलही बोलले गेले. त्यांनी तिच्या वडिलांच्या कार्यांबद्दलचे स्वतःचं विश्लेषणही नोंदवलं आणि ती कागदपत्रं विद्यापीठात शिकवण्यासाठी वापरली. तिचे प्रख्यात अनुयायी आणि उत्सुक विद्यार्थ्यांपैकी एक सायनेसीयस ऑफ सिरीन होता. हायपेशियाच्या जीवनाविषयी आणि तिच्या कार्यांबद्दलची बहुतेक माहिती त्यांच्या दोघांच्या देवाणघेवाण झालेल्या पत्रांमधून मिळते. त्या पत्रात नमूद केलेल्या इतर तथ्यांमुळे हायपेशियाला अॅस्ट्रोलेब आणि प्लेनस्फीअरचा शोध लावण्याचं श्रेय दिलं जातं. दोन्ही उपकरणं त्यांच्या वेळेच्या अगोदरची होती आणि ताऱ्यांच्या हालचाली आणि पाण्याचं ऊर्धपातन मोजण्यासाठी वापरली जात होती.
टोलेमीच्या ‘अल्माजेस्ट’ मधील विश्वाच्या रचनेची कल्पना
हायपेशियाच्या अभ्यासातील विशेष रुचीचं क्षेत्र बरंच मोठं आणि प्रभावी आहे. तिनं गणित, खगोलशास्त्र (त्याच्या निरीक्षणासंबंधी पैलूंसह), भूमिती (त्या काळातील प्रगत भूमिती) आणि बीजगणित (त्याच्या काळासाठी कठीण बीजगणित) यावर लेखन केलं, व्याख्यानं दिली. खरंतर हा तिच्या वडिलांचा वारसा होता आणि हा वारसा इतका प्रभावशाली होता की अलेक्झांड्रियाने अथेन्सला शिक्षण आणि संस्कृतीचा रत्न म्हणून पराभूत केलं.
प्रत्येक काळातच उच्च-नीच वगैरे समज असतातच आणि ते अत्यंत प्रभावीपणे काम करत असतात. त्या काळीही उच्चभ्रू वर्गांसह समाजातील शक्तिशाली राजे, बहुतेक ग्रीक लोक ख्रिश्चन धर्माचे पालन करत आणि त्यावरच विश्वास ठेवत. हायपेशियासारख्या नव-प्लेटोनिस्टांनी मूर्तिपूजक धर्माचं अनुसरण केलं, जे ख्रिश्चन धर्माच्या थेट विरोधात होतं, ज्यामुळं त्या दोन विचारसरणींच्या अनुयायांमध्ये बरेच संघर्ष झाले. ख्रिश्चनांचा असा विश्वास होता की मूर्तिपूजक तरुण पिढ्यांची मानसिकता आणि धर्मावरचा विश्वास नष्ट करणार आहेत आणि यामुळे त्यांच्यात हाइपेशियाप्रती द्वेष निर्माण झाला कारण तिचा प्रभाव आधीपासूनच त्यांना खटकत होता.
सिरिल, रोमन साम्राज्याचा एक शक्तिशाली सरदार आणि प्रख्यात ख्रिश्चन संत होता, त्यानं इजिप्तचा ताबा आपल्या हातात घेतला आणि हायपेशियाविरूद्ध कट रचण्यास सुरुवात केली. तिच्या मूर्तिपूजेच्या विश्वासाबद्दलच्या अफवांना आमंत्रण दिलं आणि तिला ‘सैतानी’ म्हणून घोषित केलं गेलं. सैतानाची पुजा करते, विधी करत असल्याचा आणि काळ्या जादूचा अभ्यास केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला. यामुळं सर्वत्र अराजक पसरलं आणि जेव्हा ती तिच्या व्याख्यानमालेनंतर रथावरुन परत येत होती, तेव्हा कट्टरपंथी ख्रिस्ती जमावानं तिच्यावर हल्ला केला. तिला रथातून निर्दयतेनं खेचलं गेलं आणि नग्न करून तिला एका धार्मिक स्थळी नेऊन दगडांनी ठेचून तिला मारून टाकण्यात आलं. बुद्धिमत्तेला नेहमीप्रमाणेच अफवांना बळी पडलेल्या जमावानं संपवलं. हे तेव्हाही होतं आणि आजही होतच आहे. काही गोष्टींमध्ये बदल अजुनही होताना दिसत नाही.
हायपेशियाचा खुन करण्याच्या या क्रूर कृत्यानंतर तिची पुस्तकं आणि विवादास्पद मूर्तिपूजे संबंधित सर्व साहित्य नष्ट करण्यात आलं. ही परंपरा तर आपल्याकडं अगदी तुकाराम महाराजांपासुन सुरु आहे आणि आजही अर्बन नक्षल वगैरे म्हणत सुरुच आहे. अलेक्झांड्रिया हे शहर, जे पहिल्यांदा मुक्त विचारांचे केंद्र म्हणून ओळखलं जात असे, तेच शहर हे तत्त्वज्ञ आणि मूर्तिपूजकांसाठी एक जिवंत नरक बनलं. भितीने अनेकांनी हे शहर सोडलं.
हुशार,बुद्धिमान, स्वतंत्र व वेगळे विचार असणाऱ्यांची भिती बाळगुन त्यांना संपवण्याची प्रथा आपण कसोसीनं पाळताना दिसतोय आणि अशाच काहीशा कट्टरपंथी हिंसेनं इतिहासातील कदाचित सुरुवातीच्या निवडक काहींमधल्या विज्ञाननायिकेचा जीव घेतला.