Quick Reads

विज्ञाननायिका: आईन्स्टाईनच्या प्रसिद्धीमागं झाकोळलेली मिलेव्हा मारिच

विज्ञाननायिकांची ओळख करून देणारं सदर.

Credit : File

कुणा फार मोठ्या, महान, प्रसिद्ध वगैरे लोकांच्या कथा ऐकल्या-वाचल्या की आधी त्यांच्या घरी जाऊन बघावं वाटतं. घरच्यांना विचारावंसं वाटतं की खरंच लोक म्हणतात तसे हे आहेत का हो महान वगैरे?

रामायण या महाकाव्यातला राम एकपत्नी, एकवचनी, एकबाणी, सत्यवादी वगैरे आदर्श म्हणुन गौरवला जाताना सीतेला जाऊन विचारावंस वाटतं, "बाई गं, अग्नीपरिक्षा देताना जळाली असतीस तर? कसं गं वाटलेलं जेव्हा डोहाळे पुरवतो म्हणून वनात सोडलेलं तुला आणि पुजेला तुझी मुर्ती बनवून शेजारच्या पाटावर ठेवल्याचं ऐकलंस तू तेव्हा?"खरंतर या कथा वगैरे म्हणून देऊत सोडून, पण खरोखरच महानतेच्या पार्श्वभूमीला कुठंतरी उभ्या असणाऱ्या लोकांना झाकोळून टाकते ती महानता. या एवढ्या एकाच कारणासाठी मला अल्बुला म्हणजेच अल्बर्ट आईनस्टाईनला धारेवर धरावसं वाटतं. का ते ऐकाच.

मिलेव्हा मारिच, अल्बुची पहिली बायको आणि त्याआधी प्रेयसी. खरंतर तिची ही 'कुणाची तरी बायको' अशी ओळख बिलकुलच करुन द्यावीशी वाटत नाही, कारण ती जात्याच हुशार आणि बुद्धिमान होती. पण तिला सगळ्यांनीच कुठल्या तरी कोपऱ्यात दडवून टाकलं. ही तिची कथा.

१९ डिसेंबर १८७५ रोजी सर्बियामध्ये जन्मलेली मिलेव्हा ही तीन भावंडातली एक होती. वडिल सैन्यात होते, पणा तिच्या जन्मानंतर तिच्या वडिलांनी आपली लष्करी कारकीर्द संपविली आणि रूमा आणि नंतर झगरेब येथे राजाच्या दरबारात नोकरी केली. शाळासुद्धा तिची टिपिकलच होती. मुलींचीच फक्त. पण लवकरच तिनं शाळा बदलली आणि  रॉयल सर्बियन व्याकरण शाळेत प्रवेश केला. मुळातच हुशार असणाऱ्या लेकीसाठी तिच्या वडिलांनी मॅरेला झगरेबच्या सर्व पुरुष असलेल्या रॉयल क्लासिकल हायस्कूलमध्ये खासगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणीसाठी विशेष परवानगी मिळविली. आता खऱ्या अर्थानं तिचं शिक्षण सुरु झालं.एखादा विषय आपल्याला तेव्हाच आवडतो जेव्हा शिक्षक बेस्ट असतात.

मिली गणितात भयंकर हुशार झाली कारण तिचे गणितातील शिक्षक व्लादिमीर. त्याकाळी गणित शिकण्यासाठी प्रवेश परिक्षा द्यावी लागे. तिनं प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि दहावीत प्रवेश केला. त्याचवेळी तिला फिजिक्सचंही वेड लागलेलं. हे विषय सहसा मुली घेत नसंत पण ही तर मिलेव्हा होती. फिजिक्ससाठी परत एकदा तिने विशेष परवानगी घेतली आणि ती पासही झाली. इथलं शिक्षण पुर्ण झाल्यावर तिनं मोर्चा वळवला तो स्वित्झर्लंडकडे. १८९६ चं वर्ष. तिनं झुरिकमध्ये पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.  भौतिकशास्त्र आणि गणिताचं शिक्षण घेण्यासाठी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तिच्या सहा विद्यार्थ्यांच्या गटातील ती एकमेव महिला आणि त्या विभागात प्रवेश करणारी पाचवी महिला होती. महिलांच्या प्रवेशावरील निर्बंध दूर करण्यासाठी तिला विलक्षण कौशल्य आले.हे तेच कॉलेज जिथं आईनस्टाईन शिकत होता आणि काळही तोच होता तो.

ती आणि आइनस्टाईन लवकरच लवकरच जिवलग मित्र बनले. ऑक्टोबरमध्ये मिलेव्हा हायडलबर्ग विद्यापीठात हिवाळ्याच्या सत्रात तिच्या अभ्यासक्रमासाठी गेली होती आणि ऑडिटर म्हणून भौतिकशास्त्र आणि गणिताच्या व्याख्यानांना हजर होती. सुरुवातीला मिलेव्हाने तिच्या अभ्यासक्रमात चांगलं काम केलं. ती दूर असताना मिलेव्हानं आइन्स्टाइनशी पत्रव्यवहार करण्यास सुरवात केली. त्याने तिला 'डॉली' असं टोपणनाव दिलं आणि तिला लवकरच परत यायला उद्युक्त केलं. त्यांची या काळातली पत्रं हा अफाट खजिना आहे, प्रेमाचा आणि विज्ञानाचा. एप्रिल मध्ये ती पुन्हा झ्युरिक पॉलिटेक्निकमध्ये सामील झाली, जिथं तिच्या अभ्यासामध्ये पुढील अभ्यासक्रमांचा समावेश होता, भिन्नता आणि अविभाज्य कॅल्क्यूलस, वर्णनात्मक आणि प्रोजेक्टिक भूमिती, यांत्रिकी, सैद्धांतिक भौतिकशास्त्र, उपयोजित भौतिकशास्त्र, प्रयोगात्मक भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र.

ती तिच्या गटातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा एक वर्ष पुढं १८९९ मध्ये इंटरमीजीएट डिप्लोमा परीक्षेत बसली.  तिच्या ग्रेड एव्हरेज ५.० out of १० होते. त्या वर्षी परीक्षा घेतलेल्या सहा विद्यार्थ्यांपैकी पाचवं स्थान तिनं मिळविलं. आईन्स्टाईन मागील वर्षीच्या उमेदवारांमध्ये ५.७ च्या सरासरीनं पहिला आला होता. भौतिकशास्त्रातील मिलिव्हाचा ग्रेड ५ हा आईन्साटाईनसारखाच होता. ती परत आल्यानंतर त्यांची मैत्री नात्यात बदलली. हे नातं मिलेव्हाच्या पालकांनी स्वीकारलं, तर आइन्स्टाईनच्या आई-वडिलांनी त्यांच्या नात्यास अगदी कडा विरोध केला.  त्याच्या आईचं म्हणनं होतं की मिलेव्हा त्याच्यापेक्षा कित्येक वर्ष मोठी आणि वेगळ्या धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर वाढलेली आहे. पर प्यार को कौन रोक पाया है? 

आइन्स्टाईनसोबतचं तिचं नातं वाढत असताना मिलिव्हाला तिच्या अभ्यासामध्ये संघर्ष करावा लागला. तिचं लक्षच लागत नव्हतं. अशातच ती तिची अंतिम परीक्षा नापास झाली. आईन्स्टाईन त्या वर्षी पदवीधर झाला आणि कामालाही लागला.  झ्युरिकला राहून, मिलीनं लॅबमध्ये काम केलं आणि तिच्या चाचण्या पुन्हा घेण्याची तयारी केली. पण पुन्हा तिचे प्रयत्न अपयशी ठरले. परत परत हेच रिझल्ट्स येतायत याबद्दल ती निराशच होती आणि तशातच तिला आढळले की ती गर्भवती आहे. अल्बर्टचं बाळ होतं तिच्या पोटात. ती घरी गेली, तिच्या आईकडे. इकडे अल्बर्ट त्याच्या  शोधकामात अत्यंत बिझी होता. ती सतत पत्रं पाठवत होती. आणि तो फार तुटक उत्तरं देत होता. आपल्या कुटुंबासमवेत राहून, मिलिव्हानं त्यांची मुलगी लायझरला जन्म दिला.

आईन्स्टाईनकडून गर्भवती राहिल्यावर तिची शैक्षणिक कारकीर्द बिघडली.  जेव्हा तिला तिसरा महिना सुरु होता तेव्हा तिनं डिप्लोमा परीक्षेच्या तयारीचा पुन्हा प्रारंभ केला, परंतु हा प्रयत्नही अयशस्वी झाला. भौतिकशास्त्र प्राध्यापक हेनरिक वेबर यांच्या देखरेखीखाली पीएचडी प्रबंध होण्याची अपेक्षा असल्यानं तिनं पदविका प्रबंधातलं काम बंद केलं. १९०३ मध्ये मिलेव्हा आणि आइन्स्टाईन यांनी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे लग्न केलं, जिथं आईन्स्टाईनला फेडरल कार्यालयात नोकरी मिळाली. १९०४ मध्ये त्यांचा पहिला मुलगा हांस अल्बर्टचा जन्म झाला. १९०९ पर्यंत आइनस्टाइन कुटुंब बर्न इथं वास्तव्य करत होतं. १९१० मध्ये त्यांचा दुसरा मुलगा एडवर्डचा जन्म झाला. १९११ मध्ये ते प्रागला गेले, जिथं आईन्स्टाईन चार्ल्स विद्यापीठात शिक्षक म्हणुन काम करत होता. एका वर्षा नंतर झ्युरिकला परतले, कारण आईन्स्टाईननं त्याच्या अल्मा माटर, म्हणजे स्वतः शिकलेल्या विद्यापीठात प्राध्यापक पद स्वीकारले होते.

जुलै १९१३ मध्ये मॅक्स प्लँक आणि वॉल्थर नर्नस्ट यांनी आइनस्टाइनला बर्लिन येथे येण्यास सांगितलं, अल्बर्टनं ते मान्य केलं, मात्र मिलेव्हाला जायचं नव्हतं. तिथुनच ठिणगी पडली असावी. त्या दरम्यान अल्बर्टची पहिली थेअरी पब्लिश झालेली आणि दुसरी थेअरी मार्गावरच होती. सगळ्यात मोठा वादाचा मुद्दा हा होता, की अल्बर्टच्या संशोधन कार्यात मिलेव्हाचं योगदान आहे किंवा नाही. आता हे आपण सध्या ठरवू शकत नसलो, तरी अल्बर्टच्या पत्रांमध्ये मिलेव्हाच्या सजेशन्सबद्दल उल्लेख आढळतो. १९०५ मध्ये आलेल्या थेअरीत तिनं बरीच मदत केल्याचं अल्बर्ट मान्य करतो. त्यांचा मुलगा हांस म्हणतो तसं लग्नानंतर तिच्या महत्वकांक्षा मात्र कमी झाल्या होत्या हे नक्की.

आईन्स्टाईनच्या सुरुवातीच्या काही कामांची सह-लेखिका म्हणून मिलेव्हाचं नाव घेतलं जातं. तसेच मिलिव्हाने तिच्या मित्राला एकदा सांगितलेलं की, "आम्ही काही महत्त्वाचं काम पूर्ण करतोय, जे माझ्या पतीला जगप्रसिद्ध करेल!”  मिलेव्हाला लिहिलेल्या पत्रांमध्ये आइन्स्टाईन त्यांच्या अभ्यासाचा संदर्भ देताना दिसतो. अनेक वैज्ञानिक अनेक उलट सुलट गोष्टी सांगतात मात्र आपण पुरावा फक्त आईन्स्टाईनचाच खरा मानला पाहिजे.

त्यासाठी त्याच्या पत्राचा एक तुकडा पाहुयात,"तू माझ्यासाठी पवित्र मंदिर आहेस आणि तिथं कोणीही प्रवेश करू शकणार नाही; मला हे देखील माहित आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतेस आणि मला चांगल्या प्रकारे समजतेस. मी तुला खात्री देतो की इथल्या कोणालाही कशाची भीती वाटत नाही किंवा आपल्याबद्दल वाईट काही बोलायचं नाही. मला तेव्हा खूप आनंद होईल आणि मला अभिमान वाटेल जेव्हा आपण दोघांनी मिळून सापेक्ष गतीवरील आपलं कार्य यशस्वी निष्कर्षापर्यंत पोहोचवलेलं असेल! जेव्हा जेव्हा मी इतर लोकांकडे पाहतो, तेव्हा मला खरोखरच कळतं की आपण काय आहोत! " (२७ मार्च १९०१) या एवढ्यावरच अल्बर्ट थांबला नाही, तर त्यानं त्याच्या नोबल बक्षिसाचा वाटादेखील मिलेव्हाला घटस्फोटानंतरही दिला आणि तिचं योगदान मान्य केलं. अशी ही एक हुशार, बुद्धिमान  गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कायमच कोपऱ्यात राहिली. विद्यापीठ प्रवेशासाठी जसा तिने संघर्ष केला तेवढा संघर्ष तिने वैज्ञानिक महत्वाकांक्षा मिळवताना केला नाही ही खंत आहे. तरिही ती कायम मनात राहते. ४ ऑगस्ट १९४८ ला वयाच्या ७२व्या वर्षी ती कायमची विसावली.