Quick Reads

विज्ञाननायिका: लॉरा बास्सी, भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारी पहिली महिला

लॉरा बास्सी १७११-१७७८

Credit : Bononia University Press

एखाद्या घरात तेरा वर्षाची एक छोटीशी मुलगी आणि काही विद्वान लोक वादविवाद करतायत. ते ही तत्वज्ञान, भौतिकशास्त्र यांसारख्या विषयात. त्यातच ती मुलगी तोडीस तोड मुद्दे मांडतेय. आजच्या या काळात हे चित्र फारच नॉर्मल वाटेल, कारण आज बहुतांश घरात मुलींच्या मतांना विचारात घेतलं जातं. तरीही काही घरांमध्ये स्वतःचे असे ठाम मुद्दे मांडणं हे उद्धटपणाचं लक्षण मानलं जातं. वर जे चित्र सांगितलं आहे ते काही या काळातलं नाही. हे त्या काळातलं आहे ज्या काळात मुलींच्या मतांना काडीमात्र किंमत देणं गरजेचं वाटत नव्हतं. अगदी जगभरात. पण वकील वडिलांच्या पोटी जन्मलेल्या लॉरा मारिया कॅटरिना बास्सी  या पोरीच्या अंगात वडिलांचे गुण उतरणार नाही असं होत नाही ना? कोण होती लॉरा?

ती होती अख्ख्या युरोप खंडात डिग्री घेणारी दुसरी महिला तर फिजिक्समध्ये Phd मिळवणारी पहिली महिला. ३१ आॕक्टोबर १७११ ला इटलीतल्या एका श्रीमंत वकिलाच्या पोटी जन्मलेली हुशार मुलगी. हुशार एवढ्यासाठीच की अगदी लहानपणापासुनच आपल्या वडिलांच्या अभ्यासिकेत वेळ घालवुन सतत काहीतरी वाचत बसणे आणि वडिलांना प्रश्न विचारुन सतत भंडावुन सोडणे हा तिचा छंदच असावा. तिच्या या प्रश्नांसाठीच तिच्या वडिलांनी तिची खाजगी शिकवणी सुरु केली. तिच्या फॅमिली डॉक्टरकडून तिला तत्वज्ञानाचे आणि थोडेफार वैद्यकीय धडे गिरवायला अगदी सात वर्षे वयापासुन सुरुवात केली. 

गायतानो टॅकोनी या तिच्या शिक्षिका. यांनीच लॉराला  खाजगीरित्या शिक्षण दिले. टॕकोनी यांनी लॉराला तत्वज्ञानाबरोबरच थोडा कमी विवादासपण कार्टेशियन पद्धतीचं विज्ञान शिकण्यावर भर देण्याबद्दल आग्रह धरला. पण लॉरा तो लॉरा है बॉस. लॉराला त्यावेळी न्यूटन भुरळ घालत होतं. विषय तसा अवघडच पण जात्याच हुशार आणि मेहनती असणाऱ्या लॉराला न्यूटोनियन विज्ञानात जास्ती मजा यायला लागली. 

याचा परिणाम मात्र उलटा झाला. टॕकोनी आणि लॉरातले संबंध बिघडायले लागले आणि त्या वेगळ्या झाल्या. बरेचसे खाजगी  शिक्षण घेतल्यानंतर लॉराने १७३२ मध्ये, वयाच्या वीसव्या वर्षी पॅलेझो डीएकर्सिओ येथे आपला पहिला प्रबंध सादर केला आणि अशा प्रकारे तिने महाविद्यालयीन शैक्षणिक कारकीर्दीला सुरूवात केली. त्याचवेळी १७३२ मध्येच लॉराला बोलोग्ना विद्यापीठाने सिनेटमध्ये भौतिकशास्त्रच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. त्या वर्षातली ती बोलोग्ना इन्स्टिट्यूटच्या ॲकडमी ऑफ सायन्सेससाठी निवडली गेलेली पहिली महिला देखील होती. 

जवळपास शक्य ती सगळ्याच नवनव्या संधी ती आजमवत होती. पालाझो पब्लिको येथे सार्वजनिकपणे एकोणचाळीस शोंधांचे प्रबंध सादर केल्यानंतर तिला १२ मे १७३२ रोजी तत्त्वज्ञानाची डॉक्टरेट मिळाली आणि अशा प्रकारे लॉरा बस्सी ही तत्वज्ञानातली डॉक्टरेट मिळविणारी जगातील दुसरी महिला बनली. एवढ्यातच खूश होऊन आराम करेल ती लॉरा कसली. पुढच्याच महिन्यात, तिने बोलिग्ना विद्यापीठाची मुख्य इमारत असलेल्या आर्चीगीनासिओ येथे बारा अतिरिक्त प्रबंध सादर केले. एवढा हुशार विद्यार्थी आपल्या हातून विद्यापीठ थोडीच जाऊ देईल. लगेचच तिला विद्यापीठाच्या अध्यापनासाठी येण्यासंबंधी सुचवण्यात आले आणि त्याचवर्षी २ ऑक्टोबर १७३२ रोजी बोलोग्ना विद्यापीठाने बोलसी विद्यापीठाच्या तत्त्वज्ञानामध्ये लॉराला प्राध्यापकत्व प्रदान केले. 

हे सगळं होत असताना, लॉराच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात प्रगती होत असतानाच तिचं वैयक्तिक आयुष्यही बहरत होतं. एक नविन आणि सुंदर असं पान हळुवार उमटत होतं.  १७३८ मध्ये लॉराने ज्युसेप्पे वेरट्टीशी लग्न केले. तो तिचा सहकारीच होता. लग्नानंतर जसं जवळपास सगळ्याचंच आयुष्य बदलतं तसंच लॉराचंही आयुष्य बदलत होतं.बारा मुलं सांभाळणं खायचं काम थोडीच आहे? तिला नियमित कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर्स देणं शक्य नव्हतं. ती घरुनच शिकवु लागली आणि त्यासाठीच्या तिच्या खाजगी उपकरणांची खरेदी करण्यासाठी विद्यापीठाने परवानगी तर दिलीच सोबत पगारही वाढवला. त्यावेळी बोलोग्ना युनिव्हर्सिटीत सर्वाधिक १२,००० डॉलर पगार घेणारी ती एकमेव महिला होती. 

लॉराला प्रामुख्याने न्यूटोनियन फिजिक्समध्ये रस होता आणि २८ वर्षांपासून या विषयावर अभ्यासक्रम शिकवत होती. न्यूटनच्या भौतिकशास्त्र आणि नैसर्गिक तत्त्वज्ञानाविषयीच्या कल्पना इटलीच्या अनेक विद्यापीठांमध्ये सादर करण्यात ती महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक होती.  तिने भौतिकशास्त्राच्या अनेक संकल्पनांसाठी स्वतःचे प्रयोगही केले. न्यूटनियन फिजिक्स आणि फ्रँकलिनियन वीज शिकविण्यासाठी, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात नसणाऱ्या विषयांसाठी लॉराने खासगी धडे दिले. 

आज सर्व माहिती एका क्लिकवर आपल्या हातात हजर असतानाही एक पेपर लिहणं कठिण जातं आणि  तेव्हा कोणतीही माहिती सहजासहजी उपलब्ध नसताना लॉराने तिच्या आयुष्यात तिने जवळपास २२८ संशोधनाचे पेपर लिहिले. त्यापैकी बहुतेक पेपर हे भौतिकशास्त्र आणि हायड्रॉलिक्सवर आहेत. जरी तिने कोणतीही पुस्तके लिहिलेली नाहीत पण तिने तिचे फक्त चार पेपर प्रकाशित केले. तिच्या वैज्ञानिक कामापैंकी बरीचशी कामं अगदीच मर्यादित प्रमाणात शिल्लक राहिली असली तरी  त्या काळच्या व्होल्टेअर, फ्रान्सिस्को अल्गारॉटी, रॉजर बॉस्कोव्हिच, चार्ल्स बोनट, जीन अँन्टोईन नॉलेट, जिआम्बॅटिस्टा बेकारिया, पाओलो फ्रिसि, अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी लिहिलेली माहिती अनेक मासिके आणि न्युजपेपरमधून मिळते. फ्रान्सिस्को अल्गारोटी यांनी तिच्या पदवी समारंभांबद्दल अनेक कविता लिहिल्या.

तो काळ काय किंवा आत्ताचा काळ काय महिलांना सतत  कोणत्या ना कोणत्या कट्टरतेला प्रत्येक स्त्रीला समोर येताना लढावं लागलंय. हायपेशिया यात हुतात्मा झाली. तशी वेळ लॉरावर आली नसली तरी  १७४५ मध्ये, लॅमबर्टीनी यांनी बेनेडिक्टिन म्हणून ओळखले जाणारा २५ अभ्यासकांचा एक अभिजात गट स्थापन केला. त्यात लॉराला समाविष्ट न होण्याबद्दल लॉरावर प्रचंड दबाव आणला गेला. परंतु यावर समाजातुन  संमिश्र प्रतिक्रिया आल्या. आणि शेवटी, बेनेडिक्टने तिला गटातील एकमेव महिला नियुक्त केली. या काळातही लॉराचं संशोधन मागं राहिलं नाही. १७६० च्या दशकात, लॉरा आणि तिचे पती यांनी एकत्र विद्युतनिर्मितीमध्ये प्रयोगात्मक संशोधन केले. हे काम इतकं गाजलं लोक आवर्जुन फक्त  त्या संशोधनाच्या अभ्यासासाठी बोलोग्नामध्ये यायला लागले. १७७२ मध्ये प्रयोगात्मक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक पाओलो बल्बी यांचे अचानक निधन झाले. आणि ती रिक्त जागा भरण्यावरुन लॉराचा विचार सुरु झाला. १७७६ मध्ये वयाच्या ६५व्या वर्षी बोलोग्ना इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसने प्रायोगिक भौतिकशास्त्राच्या खुर्चीवर नियुक्ती केली आणि तिचा नवराच तिचा सहाय्यक होता.

एवढा अखंड कालखंड फक्त आणि फक्त संशोधन,अध्यापन या कामांमध्येच घालवल्यानंतर २० फेब्रुवारी १७७८ रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी लॉरा यांचे निधन झाले. अनेक महिला संशोधकांसारखंच आजही लॉरा आणि लॉराचं संशोधन हे अडगळीतच राहिलं आहे.