India
पगार थकवल्यानं ॲपलच्या बंगळुरूजवळील कारखान्यात कामगारांचा उद्रेक
ओव्हरटाईम काम करूनही महिनोमहिने पगार न झाल्यानं व्यवस्थापनावर चिडलेल्या नागरपुरा फॅक्टरीतील या कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण लागलं.
बंगळुरूजवळील 'विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅनुफॅक्चरिंग लिमिटेड' या ॲपलच्या आयफोनचे भाग बनवणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात कामगारांनी तोडफोड केल्याची घटना समोर आलीये. ओव्हरटाईम काम करूनही महिनोमहिने पगार न झाल्यानं व्यवस्थापनावर चिडलेल्या नागरपुरा फॅक्टरीतील या कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण लागलं.
मागच्या चार महिन्यांपासून १२ तासांची शिफ्ट करूनही कंपनीतील कामगारांचा पगार झालेला नाही. चिडलेल्या कामगारांनी मग कंपनीतील फर्निचर आणि इतर वस्तूंची तोडफोड करत आपला संताप यावेळी व्यक्त केला. परिसरातील एका कारलाही त्यांनी आग लावल्याचं वृत्त आहे. यानंतर हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इथल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले. या कंपनीत जवळपास १५००० हजार कामगार असून त्यातील फक्त १४०० कामगार कायमस्वरूपी नियुक्त केले गेलेले आहेत. उरलेल्या सर्व कामगारांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीवर करण्यात आली होती.
'विस्ट्रॉन कॉर्पोरेशन' ही मूळची तैवानमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी असून ॲपलसह इतर अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रांमधील सुट्या भागांचं उत्पादन ही कंपनी करते. मागच्या काही महिन्यांपासून कंपनीकडून दिल्या जात असणाऱ्या वागणुकीवर इथले कामगार नाराज होते. आधी, ८ तासांची एक, अशा पद्धतीनं एकूण ३ शिफ्टमध्ये कंपनीचं कामकाज चालत असे. मात्र, यात बदल करून १२ तासांच्या दोन शिफ्ट व्यवस्थापनाकडून लागू करण्यात आल्या होत्या. त्यासोबतंच या वाढलेल्या ४ तासांच्या कामाचा मोबदला न देता उलट पगारकपातही करण्यात आली होती. त्यात अजून यातल्या बऱ्याच कामगारांचा मागच्या ४ महिन्यांपासून पगारही न झाल्यामुळे या कामगारांमध्ये प्रचंड असंतोष होता. याच असंतोषाचा उद्रेक होऊन शनिवारी कामगारांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
बंगळूरपासून ६० किलोमीटरवर असलेल्या नरसापूरा औद्योगिक परिसरातीतल नव्या प्रकल्पात २९०० कोटींची गुंतवणूक करून १०००० पेंक्षा अधिक नवीन रोजगार निर्माण केले जातील असं आश्वासन कंपनीकडून देण्यात आलं होतं. यामुळे राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी ४३ एकर जमीन कंपनीला सवलतीच्या दरात देण्यात आली होती. मात्र, १०००० रोजगार निर्मितीच्या आश्वासनानंतर प्रत्यक्षात यातल्या बहुतांशा जागांवर कंत्राटी पद्धतीनं कामगारांची नियुक्ती करण्यात आली. या कारखान्यात ॲपलचे स्मार्टफोन्स व इतर बायोटेक यंत्रांची निर्मिती केली जाते. १३-१५ हजारांवर या कंपनीत इंजीनीअर काम करत असतात. तर अकुशल कामगारांना ८ हजार पर्यंत पगार ही कंपनी देत असल्याचं वृत्त आहे.
कर्नाटकचे औद्योगिक मंत्री जगदीश शेट्टर यांनी घटलेल्या या घटनेवर आश्र्चर्य व्यक्त केलं. "मला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विस्ट्रॉनमधील हे कामगार पगार वेळेवर होत नसल्यामुळे नाराज होते. मात्र, राज्य सरकारच्या कामगार मंडळाकडे रीतसर तक्रार न करता या कामगारांनी हिंसेचा मार्ग का पत्कारला हे न समजण्यासारखं आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाकडून हे पगार का थकवण्यात आले याची माहिती घेतली जात आहे," असं ते म्हणाले. दुसऱ्या बाजूला झालेल्या घटनेवर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास विस्ट्रॉन कंपनी प्रसाशनानं नकार दिल्याचं इकॉनॉमिक टाईम्सनं आपल्या वृत्तात म्हटलंय.
द हिंदूच्या वृत्तानुसार, ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसचे बंगळुरूमधील सचिव सत्यानंद यांनी संबंधित घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं की ही हिंसक घटना म्हणजे कंपनीकडून कामगारांचं केल्या जाणाऱ्या शोषणाचा परिणाम असून जगातील सर्वात महागडे आणि नफ्याचा स्मार्टफोन बनवणाऱ्या कामगारांचंच इतक्या वाईट पद्धधतीनं शोषण होत असल्यावर त्यांनी बोट ठेवलं. "कंपनी अशा पद्धतीनं कामगारांचं शोषण करत असताना त्यांच्या मनमानी पद्धतीवर कुठलीच कारवाई न करणारं राज्य सरकारही या प्रकरणात तितकंच दोषी आहे. कामगारांकडून अधिकचं काम करून घेत चार-चार महिने त्यांचा पगार (तोही अतिशय कमी) थकवणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाच्या मुजोरपणाविरोधात राज्य सरकारनं कुठलीच पावलं उचलली नाही," असं ते म्हणाले.
त्यात आता पुन्हा या आंदोलनातील हिंसेवर नियंत्रण मिळवण्याच्या नावाखाली पोलींसाकडून याच कामगारांना दडपलं जाण्याची भीतीही सत्यानंद यांनी यावेळी व्यक्त केली. "कंपनीच्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांचा शोध घेतला जाऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल," असं तिथले पोलीस अधिकारी सीमांत कुमार सिंग यांनी दिलेलं वक्तव्य सत्यानंद यांनी व्यक्त केलेली ही भीती अनाठायी नसल्याचंच द्योतक आहे. आत्तापर्यंत पोलीसांनी हे आंदोलन करणाऱ्या १०० कामगारांना ताब्यात घेतलं असून अजूनही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात येतंय.