Quick Reads
धोनी: मिडल क्लासचा शेवटचा हिरो
सध्याच्या भारतीय संघातील धोनी वगळता एक मिडलक्लास भारतीय तरुण म्हणून मी स्वत:ला कोणाशीच तसा रिलेट करू शकत नाही.
धोनी लोअर मिडल ऑर्डरला बॅटिंगला येतो. इथं बॅट्समनसमोर दोनच शक्यता असतात. एकतर पिच बॅटिंगसाठी सोप्पीये. त्यामुळे टॉप आॅर्डरनेच पहिली ३५-४० ओव्हर्स खेळून काढलीयेत. त्यामुळे धोनीला वगैरे साहजिक सेट व्हायला टाईम नसतो. या परिस्थितीत टॉप ऑर्डर बॅट्समनने सुरुवातीला सेट व्हायला वेळ घेऊन नंतरच्या ओव्हर्समध्ये स्ट्राईक रेट वाढवलेला असतो. त्यातही या टॉप ऑर्डर बॅट्समनसाठी चांगला स्ट्राइक रेट म्हणजे १००. या केस मध्ये टॉप ऑर्डर बॅट्समन यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. एवढ्यात आल्या आल्या मॅच मध्ये दहाच ओवर शिल्लक असल्याने धोनीला मारण्याशिवाय पर्याय नसतो आणि अशा वेळी सक्सेस रेट सहाजिकच कमी असेल.
दुसऱ्या केसमध्ये पिच आणि कंडीशन्स बॉलिंगसाठी चांगली असल्यामुळे टॉप ऑर्डर बॅट्समन लवकर आऊट झालेत. त्यामुळे धोनी हा पहिल्या पंधरा ओव्हर मध्येच बॅटिंगसाठी उतरलाय. कंडिशन्स अनुकूल नाहीत, आपल्या खाली आता कोणी बॅट्समन नाही आणि आपण सीनियर खेळाडू याचं भान ठेवत धोनीला पुन्हा वेळ घेत स्लो खेळणंच भाग असतं. अशावेळी शॉट मारताना आउट होण्याची मुभा ही इतर कोण्या बॅट्समनला असते तशी धोनीला नसते. यात तक्रार करण्यासारखं काही नाही कारण की तोच त्याचा रोल आहे आणि तो त्यांनं स्वतःहून उचललेला आहे. पण सांगायचा मुद्दा हा कि या केसमध्येही धोनीचा सक्सेस रेट सहाजिकच कमी असेल.
धोनीवर सध्या टीका होत आहे. ते सहाजिकच आहे आणि त्यात काही चुकीचंही नाही. पण ती टीका करताना जो आकडेवारीचा संदर्भ दिला जातोय तो मुळात चुकीचा आहे. धोनी ज्या सहा, सात नंबरवर बॅटिंग करत आलेला आहे तिथल्या स्ट्राईट रेट आणि अव्हरेजची तुलना ही टॉप ऑर्डर बॅट्समनच्या स्ट्राइक रेट आणि अव्हरेजशी होऊ शकत नाही. याचं कारण मी वरती दिलेलंच आहे. आता सध्याच्या धोनीची तुलना त्याच्या पूर्वीच्या स्ट्राइक रेट आणि अव्हरेजशी होते. मागच्या १५ वर्षात त्यांनं स्वतःचाच स्टैंडर्ड एवढा वर करून ठेवलाय की त्या तुलनेत तो सध्याच्या स्थितीला अपयशीच ठरेल. पण सध्याही त्याचं विकेट कीपिंग आणि इतर योगदान बाजूला ठेवून फक्त बॅट्समन म्हणून त्याचा विचार केला तरी त्याची रिप्लेसमेंट अजून आपल्याला सापडलेली नाहीये.
वन डे मध्ये दहा हजार पेक्षा जास्त रन्स करूनही धोनीच्या फक्त दहा सेंचुरी आहेत. रन्स आणि सेंचुरीचं हे विचित्र प्रमाण याअगोदर आणि यानंतरही कधी दिसण्याची शक्यता नाही. प्रथमदर्शी हास्यास्पद वाटेल पण हा माझ्यासाठी नजरेत राहणारा रेकॉर्ड आहे. त्यातही त्याची ही मोजकी शतकं सुरुवातीच्या काळातील आहेत जेव्हा गांगुलींनं त्याला प्लेयर म्हणून वर आणण्यासाठी टॉप ऑर्डरला पाठवायला सुरुवात केलेली. कोणत्याही खेळाडूला बॅट्समन म्हणून नाव कमवायचं असेल, पुढे यायचं असेल तर टॉप ऑर्डरला खेळायला मिळणं ही त्याची गरज असते. धोनीनं कालांतरानं स्वतःहून टीमसाठी स्वतःची ही गरज संपवली. चांगला बॅट्समन जसाजसा टीममध्ये जम बसवू लागतो तसातसा जास्त योगदान देता यावं म्हणून टॉप ऑर्डरकडे सरकत जातो. धोनीनं स्वतः कॅप्टन झाल्यावर स्वतःसोबत नेमकं उलट केलं.
रोहित शर्मासुद्धा कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात फार खालीच खेळायचा त्यामुळे त्याला संघातून आत बाहेरही व्हावं लागायचं. आज रोहित शर्मा, विराट कोहली जेवढी हवा करतात तेवढीच हवा धोनीनं तो सुरुवातीला तीन किंवा चार नंबरवर बॅटिंग करत असताना केलेली. कालांतरानं टीम कॉम्बिनेशन नीट बसावं म्हणून तो वरचेवर खाली सरकत गेला आणि मग टीमच्या भल्यासाठी तिथेच स्थिरावला. त्यामुळं टॉप आॅर्डर बॅट्समनच्या आकडेवारी सोबत त्याची तुलना करणं गैरलागू आहे. काही लोक ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या ही दोघं धोनीचं काम करू शकतील असं म्हणतात. पण यातली मेख अशी की खाली बॅटिंगला येऊन शॉट मारताना पंत किंवा पांड्या आऊट झाले तर त्यांना बोलणारं कोणी नाही पण धोनीच्या बाबतीत असं होत नाही. आणि खाली बॅटिंगला आलोय तरी मी फ्रीली बॅटिंग करू शकत नाही याची जाणीव त्याला सुद्धा आहे. मुळात तेच त्याचं काम आहे.
त्यामुळे विराट सोबत खेळत असेल तेव्हा त्याला जास्त स्ट्राइक देणं. तो गेला की केदारला, त्यानंतरही खेळताना पांड्यालाच जास्त स्ट्राइक देणं ही जास्त उपयोगी पडणारी गोष्ट आहे हे त्याला माहीत असतं. सोबतचे खेळणारे सगळे बॅट्समन आऊट झाले आणि टेल एंडर्स बॅटिंगला आले तेव्हाच धोनी स्वतःकडे स्ट्राइक घ्यायला सुरुवात करतो हे आपण कित्येक वेळेस पाहिलेलं आहे. त्यामुळे एकाच इनिंगमध्ये पांड्याने केलेल्या ५० धावा आणि धोनीने केलेल्या ५० धावा यांच्या उपयुक्ततेमध्ये कमालीचा फरक आहे. निव्वळ सरळसोट आकडेवारीत गुंतलेल्या आपल्यासारख्या लोकांना हे कळत नसलं तरी विराट कोहलीला आणि टीम मॅनेजमेंटला याची जाणीव आहे म्हणून धोनी अजूनही संघात आहेत. पूर्वपुण्याई वगैरे असलं काहीही कारण प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना विशेषत: वर्ल्डकपमध्ये तर चालत नाही.
सातत्याने सात नंबरला बॅटिंगला येऊन दहा हजार धावा करणं हा रेकॉर्ड पुढे जाऊन कोणी मोडू शकेल असं मला वाटत नाही. क्रिकेटमधली उपयुक्तता ही आकडेवारीच्या आधारे जज केली जाऊ शकत नाही. त्यामुळे विराट कोहलीचे दहा हजार रन्स आणि धोनीचे दहा हजार रन्स यामध्ये फरक आहे. मुळात विकेट किपरनं इतर बॅट्समनसारखं जबाबदारीनं बॅटिंग करणं हे अपेक्षित नसतं. सर्वोत्तम विकेट किपर बॅट्समन म्हणवला जाणारा गिलख्रिस्टसुद्धा ओपनिंगला यायचा आणि त्याच्या हिशोबाने खेळायचा. विकेट कीपर असूनही एवढ्या जबाबदारीनं बॅटिंग करणं, तंत्रशुद्ध फलंदाजी नसताना भात्यात केवळ लिमिटेड शॉट्स असताना देखील १०,००० रन्स काढणं आणि एवढी वर्ष टीमच्या हिशोबाने सात नंबर वर येऊनही तो जो काही करत आलाय आणि आताही करतोय हे माझ्या दृष्टीने तरी निव्वळ मिरॅकल आहे. कोणी कितीही काही म्हणू देत he is still best in the business.
बाकी या सगळ्या गोष्टी सोडून त्याची विकेट किपिंग, कॅप्टन्सी, दबाव सहन करण्याची क्षमता, खेळाडूंना मार्गदर्शन करणं याबाबत धोनीला रिटायर हो म्हणणाऱ्यांचही दुमत नसेल. पण तो फक्त बॅट्समन म्हणूनही एवढ्या वर्षांच्या पुण्याईवर नव्हे तर सध्याच्या त्याच्या परफॉर्मन्सवरूनच टीमचा अविभाज्य भाग आहे. काहीजण धोनीनं कॅप्टन असताना वय आणि फिटनेसच्या नावाखाली सेहवाग सचिनसारख्या खेळाडूंना बाजूला काढलं आणि आता स्वतः नवीन खेळाडूंची जागा अडवून बसलाय असं म्हणतायेत. मला जेवढं मर्यादित क्रिकेट कळतं त्यावरून विराट कोहली नंतर सध्याच्या टीम मधला धोनी सर्वात फिट प्लेयर आहे. आणि त्यावरही विश्वास नसेल तर सचिन सेहवागच्या काळात नसलेल्या यो यो टेस्ट मध्येही सध्याचा धोनीसुद्धा आरामात पास होतोय.
काहीजण सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कप मधील धोनीच्या संथ खेळीचं उदाहरण देत आहेत. वर्ल्ड कप मधल्या आतापर्यंतच्या सगळ्या मॅचेस बघितल्या तर कोणतीच टीम विकेट हातात असतानादेखील शेवटच्या दहा ओव्हर मध्ये १०० वगैरे रन्स काढू शकलेली नाही. त्यामुळे पहिल्या पंचवीस षटकामध्ये बिनबाद दीडशे धावा केल्यानंतरही शेवटी साडे तीनशे पर्यंत पोहोचणं आतापर्यंत तरी कोणालाच शक्य झालेलं नाही. इथे पिच आणि बॉल जुना झाल्यानंतर बॅटवर हळू येतोय त्यामुळे शेवटच्या ओव्हर्समध्ये शॉट्स खेळणं हे सुरुवातीला शॉट्स खेळण्याएवढं सोपं नाही. आणि शेवटी वेगाने धावा काढणं हे धोनी करू शकत नाहीये तर या परिस्थितीत ते कोणीच करू शकणार नाही, एवढा माझा माझ्या क्रिकेटच्या ज्ञानावर विश्र्वास आहे. क्रिकेटमधलं काही खेळाडूंचं महत्व हे आकडेवारी जस्टीफाय करू शकत नाही. धोनी आणि त्याचा खेळ हे त्याचं तंतोतंत उदाहरण आहे. त्यामुळे विनाकारण आकडेवारीचे गैरलागू संदर्भ देऊन धोनीला मोडीत काढू नका. त्याची वेळ येईल तेव्हा तो रिटायर होईलच सध्यातरी तो जगातला त्या जागेवरचा सर्वोत्तम खेळाडू आहे.
कामगिरी व्यतिरिक्त धोनीबद्दल इमोशनल बायस आणि प्रेम असण्याची माझ्या आणि माझ्या अगोदरच्या पिढीची काही वैयक्तिक कारणं आहे. सध्याच्या भारतीय संघातील धोनी वगळता एक मिडलक्लास भारतीय तरुण म्हणून मी स्वत:ला कोणाशीच तसा रिलेट करू शकत नाही. अर्थात हे सगळे आपल्याच देशाचे प्लेअर आहेत हे माहितीये पण त्यांच्यावर ठरवलं तरी असं प्रेम करू शकत नाहीत जसं धोनी किंवा त्याच्या अगोदरच्या खेळाडूंवर करायचो. उदाहरणादाखल विराट कोहली आणि त्याची अलमोस्ट परफेक्ट बॉडी बघितल्यानंतर काही केलं तरी माझ्यासारख्या मिडल क्लास पोराला तो आपल्यातला वाटत नाही. उदाहरणादाखल विराट कोहली तेच पाणी पीत नाही जे आपण पितो, तेच जेवण खात नाही जे आपण खातोय याची कल्पना असताना त्याच्याशी रिलेट करणं म्हणजे मराठवाड्यातून पुण्यात आलेल्या पोरानं मुळच्या पुण्यातल्या पोरीवर बळजबरीनं एकतर्फी प्रेम करण्यासारखं आहे.
अर्थात भारतात क्रिकेट पहिल्यापासून लोकप्रिय होतंच. या लोकप्रियतेला इनकॅश करूनच त्याचं कमर्शियलायझेशन झालं. क्रिकेटमध्ये ढिगानं पैसा आला. पर्यायानं सर्वात वरच्या स्तराला देशाकडून क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंकडंही चिक्कार पैसा आला. सहाजिकच मिडल क्लास किंवा अगदीच गरिबीतून आलेली पोरं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागल्यावर त्यांची लाईफ स्टाईलच बदलू लागली. हळूहळू ती प्लेयर आपल्यासारखी दिसू लागणं बंद झाली. अर्थात खेळाडूंकडे प्रचंड पैसा आला, त्यांची लाईफ स्टाईल प्रचंड सुधारली याचा काही मला सोस नाही. उलट कोणतरी आपल्यासारखाच मेहनतीनं, हुशारीनं अचानक नशीब पालटल्यागत मिडल क्लास मधुन बाहेर पडतोय याचा आनंदच आहे. पण म्हणून दहा वर्षांपूर्वी जराफार आपल्यासारख्याच दिसणार्या विराट कोहलीला जसं रिलेट करायचो तसं आत्ताच्या दाढी कायम कोरलेल्या, आपल्यासारखं पाणी न पिणाऱ्या, आपल्याला अगदीच अनोळखी असणाऱ्या असणारी लाईफस्टाईल जगणाऱ्या कोहलीशी रिलेट करणं माझ्यासारख्या पोरांना अवघड आहे. इथे विराट कोहलीला मी प्रातिनिधिक उदाहरण म्हणून वापरतोय त्यामुळे गैरसमज वगैरे करून घ्यायचं काही कारण नाही. आपल्यासारखीच येडीगबाळ दिसणारे खेळाडू ते आत्ताची एकदम टोनड् बॉडी आणि प्रचंड श्रीमंत लाईफस्टाईल चेहऱ्यावर दिसणारे खेळाडू हे ट्रांजिशन पचवणारा धोनी हा शेवटचा खेळाडू आहे.
अर्थात धोनीसुद्धा कमालीचा फिट खेळाडू आहे. किंबहुना त्यामुळेच तो सध्याच्या संघात अजून टिकून आहे. पण त्याची फिटनेस ही महागड्या जिममधून नव्हे तर खेळून आलेली आहे हे आपल्याला माहित असतं. स्वतः धोनीनंच सांगितल्याप्रमाणे जिममध्ये जायला त्यांनं २०१५ नंतर सुरुवात केली. तेही संघातील इतर खेळाडूंच्या फिटनेसशी बरोबरी राखण्यासाठी. कितीही पैसा हातात आल्यानंतरही सध्याच्या खेळाडूंसारखी इलीट लाईफस्टाईल आणि अभिव्यक्ती आत्मसात करताना धोनी एवढा कम्फर्टेबल नसतो, हे पाहून मनाला जरा बरं वाटतं. अर्थात यशस्वी झाल्यावर पैसा कोणाला चुकत नाही पण आजही मध्येच एखाद्या मॅच मध्ये नको असलेली पांढरी दाढी घेऊन धोनी मैदानावर आला की जुनं प्रेम दाटून येतं. आयपीएल, त्यातून आलेला भरमसाठ पैसा यांनी क्रिकेट बरच बदललं हे सगळ्यांसमोरच आहे. त्याबद्दल लगेच कॉन्स्पिरसी थेअरी वगैरे आखण्याची इथे तरी काही गरज नाही. खेळाडूंकडं पैसा आला ही चांगलीच गोष्ट आहे.
पण वाढत्या कमर्शियलायझेशन सोबत इतर बदलत गेलेल्या गोष्टींमुळे माझ्यासारख्या व्यक्तीची क्रिकेटबद्दलची रिलेटिबिलिटी कमी कमी होत गेली हे खरंच कुठेतरी बोचणारं आहे. उदाहरणादाखल फिटनेसचं वाढतं महत्त्व, खेळाडूंची बदलत गेलेली लाईफस्टाइल याचा परिपाक म्हणून यो यो टेस्ट आली. रमेश पवार नावाचा एक प्लेयर होता ऑफ स्पिनर. इथे आता मला पॉलिटिकली करेक्ट व्हायची इच्छा नाही. दिसायला जाड्याभरड्या आणि करकरीत काळा. चांगली आॅफ स्पिन बॉलिंग करायचा टप्पा धरून ट्रेडिशनल ओल्ड स्कूल. आजच्या काळात असता तर भारताकडून खेळायचं स्वप्नही पाहू शकला नसता. यो यो ने क्रिकेटमधल्या रॉ टॅलेंटचं मातेरं केलं. आता हे विषयापासून भरकटण्यासारखं झालं तरी सांगायचा मुद्दा हा की काय खावं, काय खाऊ नये, फिटनेस आणि डायट कॉन्शसनेसच्या इलीट सर्कलमधला धोनी हा शेवटचा ओल्ड स्कूल प्लेयर आहे. ज्याच्याशी तुम्ही आम्ही आपण सगळेच आपल्यातलाच एक प्लेयर, आपला हिरो म्हणून रिलेट करू शकतो.
क्रिकेटचं कमर्शियलायझेशन वाढत गेलं तसंतसं एक वेगळाच विरोधाभास समोर येऊ लागला. सध्याचे खेळाडू क्रिकेटच्या मैदानातशिवायही विविध ब्रँड्स, त्यांचे सोशल मिडिया हँडल इत्यादी गोष्टींमधून आपल्यासमोर येत असतात. याच वेळेस मात्र खेळाडूंभोवती असलेलं इलिटीसिझ्मचं वयलही वाढत जातंय. क्रिकेटच्या कमर्शियलायझेशनची सुरुवात सचिनच्या नव्वदीतल्या स्टारडमपासूनच झाली होती. पण या व्यवसायीकरणानं आता एक वर्तुळ पूर्ण केलंय. मॅच संपल्यावर जिंकून देणाऱ्या खेळाडूंना खांद्यावर उचलून धरण्यासाठी हजारोंनी मैदानात धावत येणारे फॅन्स ते खेळाडूंच्या सोशल मीडिया हॅन्डलवरच्या लाखोंनी येणाऱ्या कमेंट्स इथपर्यंतच्या प्रवासात क्रिकेट बरचं बदललं आहे. सामान्य प्रेक्षकांना आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची अॅक्सॅसिबिलिटीही जवळपास नसल्यात जमा आहे. आजची पिढी वेगळी आहे आणि आजचं क्रिकेटही कालच्यापेक्षा वेगळं आहे.
त्यामुळे तुलना करण्याचा इथे उद्देश नाही पण काही प्रसंगांचा दाखला देण्याची इच्छा होते. दोन वर्षांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विमानातून प्रवास करत असताना एका सहप्रवाशाने फोटोसाठी गळ घातली असता ही दोघं त्याच्यावर चिडल्याची बातमी वाचली होती. दुसऱ्या बाजूला सचिन तेंडुलकर काही वर्षांपूर्वी हॉटेल लॉबीमधून बाहेर पडत असताना एका भावनिक झालेल्या मेल फॅनने त्याला किस केलं. घाबरलेला सचिन तिथून जसतसा निघून गेला पण तो कोणालाही एका शब्दाने रागवून वगैरे बोलला नव्हता. राहुल द्रविड एकदा विदेश दौरा आटपून घरी आला होता. एक फिमेल फॅन राहुल द्रविडला भेटायचंय म्हणून त्याच्या घरी आली. द्रविडच्या आईवडिलांनी तिला घरात घेतलं द्रविडला झोपेतून उठवलं आणि तिला स्वाक्षरी द्यायला लावली. आजकालच्या क्रिकेटपटूंच्याबाबतीत असं होईल किंबहुना कोणता फॅन क्रिकेटरच्या घरात जाऊ शकेल अशी स्वप्नातही कल्पना करणार नाही. घरात आल्यानंतर त्या फॅननं आता द्रविडशीच लग्न करणार म्हणून तमाशा घातला ही गोष्ट वेगळी. पण तोही प्रसंग द्रविड आणि त्याच्या घरच्यांनी ग्रेसफुलीच हँडल केलेला. माझ्यासाठी धोनी हा सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील भारतीय मिडल क्लास मॉडेस्टीचं शेवटचं प्रतीक आहे. मला आठवतंय एकदा भारत-श्रीलंका मॅचमध्ये प्रेक्षकांनी बाटल्या वगैरे मैदानावर फेकल्यामुळे मॅच थांबली होती. मॅच संपल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये यावर धोनीला प्रश्न विचारल्यानंतर त्यानं दिलेलं उत्तर हे त्या मिडल क्लास मॉडेस्टीचं आदर्श उदाहरण ठरावं. तो म्हणालेला की लोक अतिशयोक्तीनं आमच्यावर प्रेम करतात जे कदाचित आम्ही डिझर्व्हसुद्धा करत नसू, तर अतिशयोक्तीनं ते नाराज होऊन आमच्यावर चिडले तर मी तक्रार करण्यात काही अर्थ नाही.
क्रिकेटचं वाढतं व्यवसायीकरण लोकप्रिय खेळाडूंच्या सार्वजनिकच नव्हे तर वैयक्तिक आयुष्याचाही पुरेपूर वापर करून घेतं. आपल्याला खेळाडूंच्या आयुष्यात घडणारे प्रसंग दिसतात ते बरेचदा घडवून आणलेली इव्हेंट वाटतात. परवाच्या वर्ल्ड कप मॅच नंतर प्रेक्षकांमधील एका म्हाताऱ्या आजीला जाऊन विराट कोहली आणि रोहित शर्मा भेटले. लहानपणापासून क्रिकेटवर प्रेम करत आलेल्या माझ्यासारख्या माणसांना अशा घटना म्हणजे प्री प्लॅनड् पब्लिसिटी इव्हेंट वाटत राहतात. सहप्रवाशांवर चिडणारा, प्रतिप्रश्न करणाऱ्या पत्रकाराला उलट उत्तर देणारा कोहली नेमक्या प्रेक्षकांमधल्या आजीला हुडकून त्यांचा आशीर्वाद घ्यायला जातो हे जरा विसंगतच वाटतं. स्टार स्पोर्ट्स वाहिनीही भावनिकता आणि न्यूज व्हॅल्यू जनरेट करण्यासाठी मॅचभर त्या आजींनाच दाखवत राहिली. खेळाडूंचा मैदानावरीलच नव्हे तर मैदानाबाहेरील वावरही कमर्शियालाइज झाला आहे. हेच कारण आहे की स्टार स्पोर्ट्स वगळता खेळाडूंना बाहेर कोणत्याही मीडियाशी बोलण्यासाठी पाबंदी आहे. आपल्या आवडता खेळाडूंचं आवडतं जेवण, आवडतं ठिकाण इतकच काय त्यांच्या प्रेयसीही आपल्याला स्टार स्पोर्ट्स कडूनच कळतात. अर्थात यात काही विशेष वाईट नाही पण एवढं सगळ्याच गोष्टींचं व्यवसायीकरण होऊ लागल्यावर खेळाडू आणि चाहत्यांमध्ये जे नैसर्गिक नातं होतं ते हळूहळू कृत्रिम बनत चाललंय. अर्थात सध्याचा खेळाडू म्हणून धोनीला ही या सगळ्यामध्ये सहभागी व्हावंच लागतं. पण त्यात तो एवढा कम्फर्टेबल नाही हे बघणाऱ्याला जाणवतंच. माझ्यासाठी आजही धोनी हा तोच आहे जो मॅन ऑफ द मॅच मध्ये बाईक जिंकल्यावर तिच्यावर ग्राउंडवर ट्रिपल सीट चक्कर मारायचा, ज्याच्या तोंडावर खड्डे खड्डे होते, जो रोज चार ग्लास दूध प्यायचा, त्यावेळी छोट्या शहरांमध्ये तेरेनाम बघून प्रभाव पडलेल्या तरुणांसारखे ज्याचे लांब केस होते.
कालांतरानं क्रिकेटपासून दुरावलेले बरेच जणं सहज बोलताना म्हणतात की सचिन रिटायर झाल्यानंतर मी क्रिकेट बघायचं सोडलं. हेच काहीजणांच्या बाबतीत सेहवाग असतो तर काहीजणांसाठी गांगोली, द्रविडची रिटायरमेंट. ही सगळी तुमच्या-आमच्यासारख्या मिडल क्लास मॉडेस्टीची प्रतिकं आणि खऱ्या अर्थाने रिप्रेझेंटेशन होती. जी यशस्वी झाल्यावरही बहुतांशी दिसायला, वागायला आपल्यासारखीच मध्यमवर्गीयच वाटायची. त्यामुळे भारतीय क्रिकेटपासून वाढत गेलेलं तुटलेपण हे कोण्या एका प्लेयरच्या रिटायर होण्यामुळे नव्हे तर सामान्य माणसाची खेळाडूंबद्दलची रिलेटिबिलिटी कमी कमी होत जात क्रिकेटचं व्यवसायीकरण वाढल्यामुळे आलेलं आहे. माझ्यासाठी तरी भारतीय क्रिकेटशी सहज भावनेनं रिलेट होण्यासाठीचा धोनी हा शेवटचा धागा आहे. सध्याच्या भारतीय क्रिकेट खेळाडूंपेक्षा वेस्टइंडीज, पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत प्रेक्षक आणि क्रिकेटवर प्रेम करणारा माणूस म्हणून मला जास्त कनेक्ट करता येतं. वेस्टइंडीजच्या खेळाडूंचं विकेट घेतल्यानंतरचं सेलिब्रेशन हे ठरवून घडवून आणलेला इव्हेंट वाटत नाही. शेल्डन कॉट्रेलचा विकेट घेतल्यानंतरचा सल्यूट मला आजही तेवढाच निरागस वाटतो जेवढा सुरुवातीचा धोनी होता. भारतीय क्रिकेटमध्ये आलेला प्रचंड पैसा, आयपीएल इत्यादी गोष्टींमुळे भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटचा दर्जा, खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा, एक्सपोजर प्रचंड वाढलं. ही चांगलीच गोष्ट आहे. पण फर्स्ट क्लास क्रिकेटचा काही एक्सपोजर, सुविधा, मुबलक मिळणाऱ्या संधी नसतानादेखील १९ वर्षाचा पाकिस्तानी बॉलर जेव्हा भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या बॅट्समनला तंगवतो ते पाहिल्यावर निव्वळ सुख होतं. क्रिकेट अजूनही आपल्यासाठीच आहे असं वाटत राहतं.
भारतीय क्रिकेट संघ हा आता दोन दशकांपूर्वीच्या ऑस्ट्रेलियन संघासारखा झालाय. डॉमिनेटिंग. क्रिकेटमधला एवढा पैसा, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा एवढं सगळं असल्यावर भारतानं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवल्याचं आता तेवढं कौतुक वाटत नाही जेवढं पंधरा वर्षांपूर्वी भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवल्यावर वाटलेलं. अर्थात इथं कोण्या एका व्यक्तीला टार्गेट करण्याचा वगैरे काही हेतू नाहीये. सांगण्याचा मुद्दा एवढाच की क्रिकेट आता फार बदललंय. क्रिकेट खेळणाऱ्या आणि क्रिकेट पाहणाऱ्यांमधलं नातं आता आधी होतं तसं सेंद्रिय राहिलेलं नाही. आपल्या आवडत्या खेळाडूंची मैदानावरील किंवा मैदानाबाहेरीलही अभिव्यक्ती आता आपली अभिव्यक्ती राहिलेली नाही. छोट्या शहरातून येणं, महागड्या प्रशिक्षणाखालील ओल्ड स्कूल ऑर्थोडॉक्स तंत्रशुद्धता फलंदाजीत नसणं ही सगळी फक्त धोनीची नव्हे तर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या भारतातील नाहीरे वर्गातील पोरांच्या अस्मितेची प्रतीकं आहेत. मला माहितीये दहा वर्षांनी आत्ताची बरीच लोकं धोनी रिटायर झाल्यानंतर मी क्रिकेट बघणं सोडून दिलं, असं म्हणत असतील. तूर्तास धोनीनं सिक्स मारून सध्याची वर्ल्डकप फायनल जिंकून द्यावी आणि माझ्यासारख्यांना नॉस्टॅल्जिक करावं अशी आशा आहे. तो ते नाही करू शकला तरी काही फरक पडत नाही. माझ्यासाठी आणि माझ्या पिढीच्या कित्येक पोरांसाठी धोनी हा क्रिकेट हा आपला खेळ आहे, या सहज भावनेतील शेवटचा दुवा आहे.