Opinion
चवीपुरता अर्नब घ्या, मग उरलेल्या अग्रलेखात डाव्यांनाच झोडपलं की तटस्थतेची 'डावी-उजवी' भेळ तयार
लोकसत्ताच्या 'डावे-उजवे' की 'उजवे डावे' या अग्रलेखावर प्रतिक्रिया
पत्रकार चांगला की वाईट याचं मूल्यमापन त्याच्या वैचारिक बांधिलकीवर नव्हे तर व्यावसायिक नैतिकतेवर केलं जाणं लोकसत्ताचे संपादक गिरोश कुबेरांना महत्वाचं वाटतं. अर्णब गोस्वामीच्या व्हॉट्स अप चॅट्ह उघड झाल्या प्रकरणाच्या निमित्तानं कुबेरांनी आजच्या अग्रलेखात भारतीय पत्रकारितेच्या 'सद्यस्थितीवर' बोट ठेवलंय. पत्रकारांनी स्वतःच्या राजकीय विचारसरणीच्या झापडबंदपणातून बाहेर पडत तटस्थ पत्रकारिता करावी, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यानिमित्तानं दिलाय. जो अगदीच रास्तही आहे.
उजव्या विचारसरणीच्या सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला लागलेल्या अर्णबवर टीकेचा भडीमार करताना त्यांनी पत्रकारानं असं 'उजवं' किंवा 'डावं' न होता फक्त पत्रकारंच कसं असलं पाहिजे यावर जोर दिला. उजव्या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या अमेरिकेतल्या फॉक्स न्यूज व भारतातल्या रिपब्लिक टीव्हीप्रमाणं डावी राजकीय भूमिका घेणाऱ्या माध्यमांनाही झोडपायला ते विसरले नाहीत. 'डावं किंवा उजवं या दोन्हीचा अतिरेक वाईटचं,' असं म्हणत कुबेरांंनी घेतलेली ही तटस्थ भूमिका खरंच तटस्थ आहे काय? उजव्यांबरोबरंच डाव्या पत्रकारांनीही झोडपणाऱ्या कुबेरंना त्यांना 'डावं' वाटत असलेल्या कोणत्या माध्यमसंस्थेनं फॉक्स टीव्ही किंवा रिपब्लिक टीव्ही यांच्या तोडीचा पराक्रम केलाय याचं उदाहरण मात्र देणं गरजेचं वाटलं नाही.
कुबेरांना अपेक्षित असलेली तटस्थ पत्रकरीतेची भूमिका आमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स व वॉशिंग्टन पोस्ट सारखी माध्यमं बजावताना दिसतात. किमान कुबेरांना स्वतः तरी असं वाटतं. अमेरिकन राजकारण आणि माध्यमसंस्थेवरील त्यांनी याआधीही लिहिलेल्या अग्रलेखांमधून अमेरिकन लिबर्टीवर त्यांचं जडलेलं प्रेम उघडंच उत्तू जाताना दिसतं. निर्भीड पत्रकरितेची आपल्याला लागलेली आस व्यक्त करताना कितीतरी वेळेस त्यांनी जेफ बेझोस यांच्या मालकीच्या वॉशिंग्टन पोस्टचा उल्लेख केलाय. भारतानं अमेरिकेचा आदर्श फक्त पत्रकारितेपुरताच नव्हे तर उद्योगशीलतेबाबतही घ्यायला हवा असं सांगताना ॲपल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्टसारख्या सिलिकॉन व्हॅलीतील 'छोटं गॅरेज ते बहुराष्ट्रीय कंपनी' अशा रम्य प्रेरक भांडवली कथांमध्येही ते बरेचदा रमताना दिसतात. यादरम्यान ॲपल आणि ॲमेझॉनचं इतकं मोठं होणं होण्यासाठी भारतासारख्या तिसऱ्या जगातील विकसनशील देशांना या अमेरिकन कोर्पोरेशन्सच्या भांडवली महत्वकांक्षेची कोणती किंमत चुकवावी लागली, हे ही विसरण्याइतपतची तटस्थता अमेरिकन लिबर्टीच्या प्रेमात पडलेल्या कुबेरांनी अंगी बाळगली आहे, असं दिसतं.
अमेरिकन लिबरल मीडियावरील कुबेरांचं हे एकतर्फी प्रेम इथवरंच थांबत नाही. लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेवरती अमेरिकेतील फक्त रिपब्लिकंच नव्हे तर लिबरल समजल्या जाणाऱ्या डेमोक्रेटिक पक्षानंच लादलेल्या वसातहतवादी धोरणांकडे न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्टसारख्या कुबेरांच्या आवडत्या माध्यमांनीही डोळेझाक करण्याचं अवलंबलेलं धोरणं, हा याच तटस्थतेचाच भाग आहे. अमेरिकेतील लिबरल सत्ताधीशांनी इराण, इराक, लिबीया, येमेन, सीरियासारख्या देशांमध्ये शांतता आणि लोकशाही निर्माण व्हावी या उदात्त हेतूपायी केलेल्या बॉम्बिंगचंही मानवी दृष्टीकोनात या लिबरल माध्यमांनी वसताहतवादाचा चष्म्या डोळ्यांवर चढवत केलेलं समर्थनही मग कुबेरांना तिटकंच तटस्थ वाटू लागतं. भांडवलशाही व्यतिरिक्त इतर कुठल्याही समाजवादी राजकीय व्यवस्था राबवणाऱ्या लॅटिन अमेरिका, आफ्रिकेतील देशांचं अमेरिकन माध्यमांनी केलेलं एकतर्फी सोईस्कर वृत्तांकनही कसं मग आपलं त्या त्या जागतिक मुद्द्यांवरचं मत बनवण्यासाठी पुरेसं आहे, याची कुबेरांना झालेली जाणीवही अमेरिकन लिबर्टीवरील त्यांच्या दृढ विश्वासातूनंच येते.
वॉशिंग्टन पोस्टच्या निर्भीड व तटस्थ पत्रकरितेला आदर्श मानताना मग याच वॉशिंग्टन पोस्टनं बोलिव्हिया, चिले, व्हिएतनामसारख्या साम्यवादी राजवटीविरोधात केलेलं असबंध लिखाण आणि सीआयएनं या देशांमधील लोकशाहीवर केलेला हल्लाही कसा बरोबर होता, हे कुबेरांना इथे बसून पटणंही साहजिकच म्हणावं लागेल. सीरियातील केमिकल बॉम्बहल्ला, बोलिव्हियातील राजकीय सत्तांतर, इराकमधील लष्करी मोहीम यांचं वॉशिंग्टन पोस्टनं केलेलं धादांत खोटं वृत्तांकनही मग तटस्थंच असतं. कारण जेफ बेझोसनं तोट्यात बुडत असलेल्या वॉशिंग्टन पोस्टला विकत घेऊन जागतिक पत्रकारितेला अंधारात जाण्यापासून वाचवलं, असा कुबेरंच नव्हे जगभरातील लिबरल तटस्थांचा ठाम विश्वास आहे. मग इराणवर सीआयएनं केलेल्या बॉम्बहल्ल्यात किती निष्पाप नागरिक मारले गेले, याची बातमीही मग इराणमधून न करता पेंटागॉननं केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून करणं, हा अमेरिकन लिबर्टीच्याच याच तटस्थतेचं उदाहरण आहे. कधी या लिबरल मीडियानं अमेरिकन लष्कराच्या कृष्णकृ्त्यांंचं झाकलेलं पाप उघडं करण्याचं काम कोण्या ज्युलियन असांजनं केलंच तर तो याच लिबरल अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू बनून जातो. कारण कुबेर म्हणाले तसं असांजेची पत्रकारीता ही व्यवसायिक नैतिकतेतून नव्हे तर वैचारिक बांधिलकतेतूनच आलेली आहे. म्हणजेच ती तटस्थ नाही.
जगात वाढत चाललेल्या टोकाच्या आर्थिक विषमतेवर चिंता व्यक्त करतानाच या जगाला बिल गेट्सपासून वॉरन बफेसारखी दूरदृष्टीचे बिलीनीर्यसंच वाचवू शकतात, ही त्यांची प्रामाणिक धारणा आहे. त्यामुळे जेफ बेझॉसची मालकी आल्यानंतरही वॉशिंग्टन पोस्टच्या निर्भीड पत्रकारीतेवर तसूभरही फरक पडलेला आता पडलाच असेल तर पत्रकारिता आणखी तटस्थ करण्यासाठीचं, असा जाज्वल्य अग्रलेख ते लिहू शकले. ॲपल कंपनीनं मागच्या काही वर्षांत अतिशय नैतिकतेनं केलेल्या प्रगतीला दिलखुलास दाद देऊ शकले. इलॉन मस्कनं मानवजातीच्या भवितव्याविषयी पाहिलेल्या स्वप्नांवर भाबडा विश्वास ठेऊ शकले.
बाकी जर अर्नब इथल्या 'उजव्या' पत्रकारितेचं प्रतिनिधित्व करत असेल तर मग एखादा तरी डावा पत्रकार कुबेरांनी नवनाशी उघडकीला आणायचा होता ज्यांनं अर्नबच्या दैदिप्यमान कर्तृत्वाची 'उंची' गाठली आहे. नाही देता आलं, तर मग हे असं झालं की उद्योग अर्नबनं केले तरी 'संतुलन' दाखवायला तथाकथित 'डाव्या' पत्रकारांना झोडलंच पाहिजे. आता हाच अर्नबऐवजी एखादा डावा किंवा अल्पसंख्यांक पत्रकार देशाबद्दल असं बोलताना सापडला असता तर काय भूमिका कुबेरांनी लिहिली असती आणि कोण जाणे काय गहजब मजला असता, याची कल्पनाही करवत नाही. तरी, एरवी तिसऱ्या जगातील भारतासारख्या गरीब देशांना आणि इथल्या पत्रकारांना जागतिक घडामोडींचं आलेलं वैश्वीक भान जेफ बेझॉझच्या वॉशिंग्टन पोस्टनंच केलेल्या तटस्थ पत्रकारितेमुळेच आलेलं आहे, याची उपकृत करणारी जाणीव कुबेरांनी आजचा हा 'ना डावा, ना उजवा' असा कमालीचा तटस्थ अग्रलेख लिहून पुन्हा एकदा व्यक्त केलीये इतकंच.