Americas

ऐन कोरोनाच्या संकटात गटांगळ्या खात चाललेली महासत्ता- भाग १

कोरोनाच्या निमित्तानं अमेरिकेचा आणि भांडवलशाहीचा खरा चेहरा समोर येत आहे‌.

Credit : NPR

तुमच्या हातात हा लेख पडेपर्यंत जगभरात कोरोना विषाणूनं जवळपास १ लाख ८० हजार जीव घेतलेले आहेत. यापैकी तब्बल ४५ हजारांहून अधिक लोक कोरोनामुळे एकट्या अमेरिकेत मरण पावलेले आहेत. चीनमधून पसरलेल्या या विषाणूनं युरोपातील इटली, स्पेनमध्ये हाहाकार माजवल्यानंतर आता अमेरिकेत धुमाकूळ घातलेला आहे. कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा या दोन्ही कसोटींवर अमेरिकेनं चीन आणि स्पेनसह इतर सर्व देशांना केव्हाच मागे टाकलेलं आहे. हे संपूर्ण जगापुढेच आ वासून उभं राहिलेलं महाकाय संकट असलं तरी याचा सर्वाधिक फटका हा आत्तापर्यंत तरी महासत्ता आणि जागतिक भांडवलशाहीचं केंद्र म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेलाच बसलेला आहे, ही अतिशय गंभीर आणि तितकीच लक्षवेधी गोष्ट आहे. तर अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला हतबल करणाऱ्या या करोनासंकटाची पार्श्र्वभूमी, त्याची सध्याची स्थिती आणि कारणमीमांसा तसेच यातून बाहेर पडू न शकण्याची या महासत्तेची भांडवली हतबलता, या सगळ्यांवर आपण इंडी जर्नलच्या या लेखमालेतून चर्चा करूयात. हा या लेखमालेतील पहिला लेख..

रोज हजारोंच्या संख्येनं लोकांना होणारी कोरोनाची लागण तर शेकडोंच्या संख्येनं रोजचे मृत्यू ही अमेरिकेसाठी जितकी गंभीर बाब आहे तेवढीच गंभीर किंबहुना त्याहून गंभीर बाब म्हणजे रोजच्या रोज अमेरिकन अर्थव्यवस्थेला पडत चाललेलं भगदाड. यामुळे आजतागायत जगाला दुरून साजरी दिसत असलेली अमेरिकन अर्थव्यवस्था रोजच्या रोज उघडी पडत चाललेली आहे. ही हतबलता 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' चा नारा देत निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावरही आता स्पष्ट दिसतेय. एरवी अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मजबूतीवर दावा सांगणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनामुळे पुरते बावचळले असून रोज विरोधाभासी आणि तेवढीच हास्यास्पद विधानं करण्यात मग्न आहेत.

उदाहरणादाखल कोरोनावर मागच्या काही दिवसांत ट्रम्प यांनी केलेली मोजकी विधानं पाहू. जानेवारी महिन्यात जेव्हा अमेरिकेत लागण सुरू झाली, तेव्हा ते म्हणाले होते की कोरोना वगैरे काही नसून हा चीनचा प्रपोगंडा आहे. अमेरिकन लोकांना कोरोनाची लागण होऊच शकत नाही. त्यामुळे याला गंभीरपणे घेण्याची अजिबात गरज नाही. काही दिवसांनी कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यावर ट्रम्प यांनी अनिच्छेनेच का होईना, पण मान्य केलं की कोरोनाची लागण अमेरिकेत होत आहे, पण घाबरण्याची काही गरज नाही, कारण कोरोना हा त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त एक कॉमन फ्लू म्हणजे साधा ताप आहे. यादरम्यान ट्रम्प यांनी मोठा गाजावाजा करत भारत दौराही केला. करोनाची साथ काही आटोक्यात येण्याची चिन्हं दिसत नाहीयेत हे कळाल्यावर ट्रम्प यांनी सरतेशेवटी अमेरिकेत लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदी जाहीर केली.

गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे रोज व्हईट हाऊस मधून अमेरिकन जनतेला संबोधत असतात तसेच पत्रकार परिषदही घेत असतात. या पत्रकार परिषदा म्हणजे एक प्रकारची सर्कस झालेली असून, यात ते कधी टाळेबंदीचं क्रेडिट स्वतःकडे घेत माझ्यामुळे हजारो अमेरिकन जीव वाचल्याचा दावा करतात, तर दुसर्‍याच दिवशी टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे मोठं नुकसान होत असून टाळेबंदी उठवणार असल्याचं म्हणतात. आज ते सर्व आर्थिक व्यवहार आणि उद्योगधंदे पुन्हा सुरू करण्याचा सर्वाधिकार राष्ट्राध्यक्ष या नात्यानं मला एकट्यालाच असल्याचं जाहीर करतात तर उद्या म्हणतात की त्या-त्या राज्याच्या गव्हर्नरांनी आपाआपल्या अधिकारक्षेत्रात तो निर्णय घ्यावा. एका वाक्यात ते लॉकडॉऊनमुळेच लोकांचे जीव वाचत असल्याचे म्हणतात तर दुसऱ्याच वाक्यात लॉकडाऊन विरोधात कडव्या अतिउजव्या समूहांनी काही राज्यांमध्ये चालवलेल्या विरोध प्रदर्शन आणि गोंधळाला समर्थन देतात. 

 

 

अशा अटीतटीच्या गंभीर प्रसंगी ट्रम्प यांच्या सुरू असलेल्या या गोलमाल कारभाराला नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचीही पार्श्वभूमी आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे बारा वाजलेले असताना २०१६ साली अमेरिकन जनतेला 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' हे दाखवलेलं स्वप्न आता आपण पुन्हा विकू शकत नाही, याची जाणीव डोनाल्ड ट्रम्प यांना झालेली आहे. त्यामुळे अशा आणीबाणीच्या स्थितीत जमेल तितका गोंधळ निर्माण करून आपल्या पारंपारिक अति-उजव्या विचारसरणीच्या मतदाराला सोबत घेणं तसेच विरोधकांचं येन केन प्रकारे खच्चीकरण करणं, हा उपलब्ध असलेला एकमेव मार्ग अवलंबायला ट्रम्प यांनी सुरुवात केलेली आहे. यासाठी अतिशय धोकादायक अशा अति-उजव्या विचारसरणीच्या भांडवली वृत्तींकडून पसरवल्या जाणाऱ्या छद्म विज्ञानाचा आसरा ट्रम्प यांनी घेतलेला आहे आणि या छद्म विज्ञानाच्या बळावर करोनाविषयी चित्रविचित्र दावे आणि अपप्रचार करताना डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मविश्वास हा करोना विषाणूंचा अभ्यास आणि संशोधन करत असलेल्या त्या त्या विषयातील तज्ञांनाही लाजवेल, असा असतो. उदाहरणादाखल रिचर्ड एप्स्टीन नावाचे उजव्या विचारसरणीचे अमेरिकेतले प्रसिद्ध कायदा तज्ञ आहेत. तर या महाशयांनी सुरुवातीला कोरोना हा कॉमन फ्लू असून काहीच घाबरण्याची गरज नाही. कोरोनामुळे अमेरिकेतील मोजून ५०० माणसं सुद्धा मरणार नाहीत असा 'वैज्ञानिक' दावा केला होता. आज घडीला अमेरिकेत रोज किमान ५०० लोक करोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत!

कुठल्याही प्रकारच्या सरकारी हस्तक्षेपाला कडाडून विरोध करणारे हे उजवे विचारवंत कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचं प्रांजळ मत आजही बाळगून आहेत! American Council on Science and Health (ACSH) नावाची अशीच एक संस्था आहे जी अशाच धोकादायक कडवट अति उजव्या विचारसरणीचं राजकारण आणि भांडवली जगाला अनुकूल असं छद्म विज्ञान, खरं विज्ञान म्हणून प्रसवत असते‌. या संस्थांनी अशा बिकट परिस्थितीतही कोरोनाविषयी अपप्रचार आणि विविध कन्स्पिरॅसी थिअरीज विज्ञान म्हणून खपवल्या आहेत. लॉकडाऊन उठवण्याची भाषा करणारे डोनाल्ड ट्रम्प तसेच या लॉकडाऊन विरोधात झुंडीने रस्त्यात उतरलेली अमेरिकेतील अति उजव्या विचारसरणीची लोकं याच विज्ञानाला आधार मानून आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. हवामान बदल नावाची काही गोष्टच अस्तित्वात नाही, किंवा ग्लोबल वॉर्मिंग साठी काही माणूस जबाबदार नाही, अशा कॉन्स्पिरसी थिअरीजला जन्म देणारं विज्ञान हे याच अती-उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या पॉप्युलिस्ट नेत्यांकडून मुख्य प्रवाहात आणलं जातंय, त्याचं क्रेडिडटही ACSH सारख्या 'विज्ञाना'चा प्रसार करणाऱ्या संस्थेला जातं. 

टाळेबंदीसारख्या अभूतपूर्व गोष्टीमुळे दैनंदिन मानवी जीवन विस्कळीत होणं, हे सहाजिकच आहे. कोरोनाचं संकट वरचेवर गहिरं होत जातंय. रोजच्या रोज मृतांच्या संख्येत वाढच होतेय. तसेच नजीकच्या भविष्यात यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. अशा परिस्थितीत लोकांमधील भय आणखीनच वाढत असून, असं वातावरण अती-उजव्या विचारसरणीच्या कन्स्पिरॅसी थिअरीजला जन्म देण्यासाठी फारच अनुकूल असं आहे. लोकांच्या मनातील याच भीतीचा फायदा उठवून उजव्या विचारसरणीकडून अवैज्ञानिक भांडवली प्रपोगंडा रेटण्याचा अमानवी प्रयत्न होताना दिसत आहे. अमेरिकेतील गन लॉबी, रिपब्लिकन पक्ष आणि अब्जाधीश उद्योजकांच्या पाठिंब्यावर सुरू असलेल्या या लॉकडाऊन विरोधातील प्रदर्शनांकडे याचंच एक उदाहरण म्हणून पाहता येईल. अमेरिकन लिबर्टीचं स्वप्न दाखवून लॉकडाऊन विरोधातील ही भांडवली लॉबी सामान्य लोकांना अक्षरशः मृत्यूच्या दारात ढकलत आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jamie Lee Curtis Taete (@jamieleecurtistaete) on

 

मिशिगन, केंटकी, टेक्सास यांसारख्या पारंपरिक उजव्या राज्यात झालेल्या लॉकडाऊन विरोधातील प्रदर्शनानंतर तिथल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये अचानक वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अमेरिकाला फक्त करोना विरोधातच नाही तर या अति-उजव्या प्रपोगंडाविरुद्ध सुद्धा तितक्याच त्वेषानं आणि निर्धारानं लढावं लागणार असल्याचं चित्र आहे. हा भयानक अति-उजवा प्रपोगंडा रेटण्यासाठी या भांडवलदारांना आणि त्यांचंच प्यादं असलेल्या राष्ट्रध्यक्षाला फॉक्स न्यूज सारख्या अशाच अति-उजव्या विचारसरणीच्या माध्यमांची मदत होत आहे. कोरोनामुळे अगोदरच संभ्रमात असलेल्या लोकांना अजून संभ्रमात टाकून निर्माण होणाऱ्या गोंधळाचा राजकीय फायदा उचलत पुन्हा निवडून येणं आणि अमेरिकेतील या 'आहे रे' वर्गाला खुश ठेवणं, या एकाच अजेंड्यावर डोनाल्ड ट्रम्प सध्या काम करताना दिसत आहेत.

उदाहरणादाखल करोनावर ठोस वैद्यकीय उपचार अजूनही शोधला न गेल्यामुळे लॉकडाऊनला काही अर्थ नाही, लॉकडाऊनमुळे फक्त लोकांचं आजचं मरण उद्यावर ढकलण्यात येत आहे, असा युक्तिवाद या लोकांकडून केला जात आहे. हा युक्तिवाद वरकरणी जेवढा अमानवी वाटतो तेवढाच अतार्किकही आहे. या युक्तिवादातला पहिला भाग म्हणजेच करोनावर अजून इलाज सापडलेला नाही हे खरं असलं तरी अर्धवट आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना थांबणार नसला तरी त्याच्या प्रसाराचा वेग मंदावतो. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना तेवढा वेळ मिळतो तसेच करोनावर संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांनाही पुढील इलाज शोधण्यासाठी जास्तीचा वेळ मिळतो. डोनाल्ड ट्रम्प किंवा अति-उजव्या विचारसरणीच्या भांडवली लॉबीच्या दबावामुळे व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने ही टाळेबंदी जर पुरेशा तयारी आधीच तात्काळ उठवली तर होणारे मृत्यू आणि त्यामुळे उडणारा हाहाकार याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. 

यातला या लेखापुरता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्थव्यवस्थेचा. या उजव्या भांडवली विचारधारेकडून केला जाणारा आणखी एक प्रपोगंडा तो हा की ही टाळेबंदी जर लवकर उठवली नाही तर कोरोनापेक्षा अधिक लोक बेरोजगारी आणि उपासमारीनं मरतील. प्रत्यक्षात या उजव्या विचारसरणीच्या भांडवलदारांना टाळेबंदीत काम न मिळाल्यामुळे सामान्य लोकांच्या होत असलेल्या परवडीबद्दल काही एक चिंता नसून तर त्याचं खरं दुखणं हे टाळेबंदीमुळे भांडवलदारांचे ठप्प पडलेले आर्थिक व्यवहार आणि रोजचं होणारं नुकसान हे आहे. त्यामुळे लोकांच्या जीवांपेक्षा नफेखोरीला प्राधान्य देणाऱ्या या भांडवली व्यवस्थेत अशा आणीबाणीच्या प्रसंगीसुद्धा अत्यावश्यक असणारे मास्क, व्हेंटिलेटर्स व करोनापासून बचावासाठी इतर सुरक्षा साधनांचं युद्ध स्तरावरील उत्पादन रखडलं जाण्यात आपल्याला आश्चर्य किंवा संतापही वाटत नाही.

ताळेबंदी जर वाढवली तर अर्थव्यवस्था खड्ड्यात जाईल आणि त्याचा फटका गरिबांना जास्त बसेल, त्यामुळे टाळेबंदी हा खरं तर रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार आहे, असा जो युक्तिवाद उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून केला जात आहे, त्यात वरकरणी तथ्य वाटत असलं तरी प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. त्यावर या लेखमालेत आपण त्या अनुषंगाने चर्चा करूच. पॉल क्रुगमन या नोबेल विजेत्या अर्थशास्त्रज्ञानेही ही टाळेबंदी उठवण्याचा हा अति-उजव्या विचारसरणीचा दावा कसा अर्थशास्त्राला धरून नाही, हे वेळोवेळी त्यांच्या न्यूयॉर्क टाईम्स मधील कॉलममधून दाखवून दिलेलं आहे. करोनामुळे रोजगार गमावलेल्या कामगारांची संख्या अमेरिकेत प्रचंड प्रमाणात वाढली असून इतर देशांप्रमाणेच आम्हालाही बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, यासाठीची मागणी आता तिकडे जोर पकडत आहे.

मात्र करोनाच्या संकटावर तत्कालीन उपाय म्हणून अमेरिकन सरकारकडून जे पॅकेज जाहीर करण्यात आलं, त्यातला मोठा वाटा हा मोठ्या उद्योगपतींचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी म्हणून देण्यात आलेला आहे. भांडवली सोशल व्यवस्था आणि नवउदारमतवाद याच्याशी समाज म्हणून आपण इतके एकरूप झालेलो आहोत की उजव्या भांडवलदारांनी अशा कठीण प्रसंगी आपल्या आलिशान बंगल्यात क्वारंटाईन होत सुखासीन आयुष्य जगत राहणं तर कामगारांची परिस्थितीमुळे बेरोजगार होत रोजच्या जेवणासाठी सुद्धा परवड होणं, यातला विरोधाभासही आपल्याला दिसेनासा होतो. जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेतील हजारोंच्या संख्येने जीव वाचविणाऱ्या डॉक्टरांना आम्हाला किमान उपचारादरम्यान संसर्गापासून बचावासाठी सुरक्षा साधनं पुरवा म्हणून सरकारकडे नाही तर लोकांकडे अपील करावं लागतं.

जागतिक आणीबाणी बनलेली ही करोनाची समस्या नेमकी डोकं वर काढत असताना या देशाचा मानसिक संतुलन हरवलेला राष्ट्राध्यक्ष जागतिक आरोग्य संघटनेचं फंडिंग बालिश कारणं देत रोखून धरतो. अर्थात जागतिक आरोग्य संघटना ही वरचेवर चीनधार्जिणी बनत चालली असून करोनाचा प्रसार वाढण्यामागे चीनने केलेल्या चुका झाकण्याचा प्रयत्न या संघटनेकडून झाला, असा आरोप करण्यात तथ्यही असेल, तरी पण मग नोव्हेंबर दरम्यानच करोनाचं संकट हे जागतिक बनू शकतं आणि त्यावर तातडीने पावलं उचलली जावीत, अशा सूचना याच जागतिक आरोग्य संघटनेकडून अमेरिकेला देण्यात आल्या होत्या, ज्याकडे ट्रम्प यांनी सरसकट दुर्लक्ष केलं. आफ्रिकेतील मागास देश करोना महामारीतून वाचण्यासाठी पूर्णतः जागतिक आरोग्य संघटने सारख्याच संस्थांवर अवलंबून असताना अशा अटीतटीच्या वेळी व्यापार युद्धाचं कारण पुढे करत फंडींग रोखणं, हे कामगारांच्या श्रमावर आणि शोषणावर उभी असलेली भांडवलशाही नेमकी गरज पडते तेव्हा 'नाही रे' वर्गाकडे पाठ फिरवत किती अमानवी बनू शकते याचंच द्योतक आहे. कोरोनाच्या निमित्तानं का होईना अमेरिकेचा पर्यायानं मुक्त बाजार व्यवस्था आणि भांडवलशाहीचा हा मुखवटा फाटून खरा चेहरा समोर येत आहे‌. 

 

क्रमश: