Quick Reads
विज्ञाननायिका: भावाच्या खांद्याला खांदा लावून संशोधन करणारी सोफी ब्राहे
बहिण-भावाची संशोधक जोडी कदाचित ही पहिलीच असावी.
अकरावीचा अभ्यासक्रम सध्या बदलला आहे. नविन अभ्यासक्रमानुसार बारावीतला GRAVITATION हा धडा आता अकरावीला आला आहे. तसंच दहावीच्या अभ्यासक्रमातही या आधीच या धड्याचा समावेश केला आहे जेव्हा बारावी आणि दहावीचे पाठ वाचले तेव्हा त्यातली बरीचशी माहिती मला आधीच ज्ञात होती, पण यंदा जेव्हा अकरावीचा नविन धडा वाचला तेव्हा काही नावं मला नविनच दिसली. नेमक्या कुणीकुणी planetary motion चा म्हणजे ग्रहांच्या गतींचा अभ्यास केलाय हे पाहण्यासाठी खोलात जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा समोर आख्खी साखळीच आली. त्यातलं एक नाव आपण आधीच पाहिलं आहे. हायपेशिया. आणि दुसरं नाव म्हणजे टायको ब्राहे. टायकोचं नाव अकरावीच्या पुस्तकात होतंच पण गुगलने आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणजे टायकोला मदत करणारी त्याची बहिण सोफी ब्राहे. आजच्या लेखाची सेलीब्रेटी. मागच्या लेखातच मी म्हणलं होतं की जेव्हा महान व्यक्ती वगैरे प्रकाशात येतात तेव्हा जरासं घरात डोकावुन बघावंसं वाटतं, नेमकी किती लोक या मोठ्या झाडाच्या सावलीत झाकोळुन गेली आहेत. मला टायकोच्या मागुन डोकावणारी सोफी दिसली.
सोफीचं नावं खरंतर सोफिया ब्राहे, जिला सोफिया थॉट म्हणून देखील ओळखले जाते. सोफी एक डॅनिश हॉर्टीकल्चर, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र आणि मेडीसीनची विद्यार्थिनी होती. एवढ्या सगळ्या गोष्टी ती शिकली तरी तिची मुळ ओळख ही तिच्या भावाला, टायको ब्राहेला खगोलशास्त्रीय निरीक्षणास मदत करणारी लाडकी बहिण म्हणुनच आहे. सोफी ही घरातलं शेंडेफळ, दहा मुलांपैकी सर्वात लहान. तिचा जन्म नूडस्टर्प येथे झाला होता. तिच्या जन्माचा गोंधळच आहे. म्हणजे कोण म्हाणतंय २४ ऑगस्ट तर कोण म्हणतंय २२ सप्टेंबर. ओट्ट ब्र्हे हे तिचे वडील. रिग्रिड किंवा डेन्मार्कच्या राजाचा सल्लागार. तिचा भाऊ म्हणजे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे, तिच्यापेक्षा १० वर्षांनी मोठा आणि सर्वात मोठा भाऊ होता.
आजवर आपण नवरा-बायको, बाप-लेक यांच्या एकत्र काम करणाऱ्या, संशोधन करणाऱ्या जोड्या पाहिल्यात पण बहिण-भावाची संशोधक जोडी कदाचित ही पहिलीच असावी. सोफी ही अतिशय हुशार मुलगी होती. घरातलं शेंडेफळ असल्याकारणानं प्रत्येक गोष्टीत लुडबुड लुडबुड करायचीच. पण तिची लुडबुड तिच्या मोठ्या भावाला, टायकोला त्रासदायक नव्हती. दहा वर्षाचा फरक असुनही त्या दोघांचं सुत चांगलं जमलेलं. जेव्हा ती १७ वर्षांची होती, तेव्हा तिने आपल्या २७ वर्षाच्या भावाला त्याच्या खगोलशास्त्रीय निरीक्षणामध्ये मदत करायला सुरुवात केली. १५७३चा काळ असावा तो. तिने या निरीक्षणासाठी टायकोला मध्ये मदत करण्यास सुरवात केली आणि ते ग्रहांच्या गतिविषयकच्या आधुनिक कार्याची भविष्यवाणी करणार होते.
त्याकाळी प्रसिद्ध असणाऱ्या एका डॅनिश ह्वीन बेटावर त्याची वेधशाळा उरानिएनबर्ग होती. टायकोबरौबर सोफीही वारंवार वेधशाळेला भेट देत असे. ब्राहे कुटुंब हे सामान्यतः देवधर्म आणि तत्कालीन सामाजिक नियमांना महत्व देणारं होतं. त्याकाळात खगोलशास्त्रावर काही बोलणं हे देखील समाजविरोधी मानलं जाई. अशावेळी आपल्या बहिणीला समाजापासुन कोणतीही झळ पोहचू नये असं वाटणं अगदी सहाजिक होतं.वडिल भावाच्या काळजीनं टायकोला वाटे की आपल्या धाकटीनं लांब रहावं या सगळ्यापासुन. त्यानं सोफीला लिहिलेल्या एका पत्रात लिहलंही होतं की सोफीनं आता फलोत्पादन आणि रसायनशास्त्र शिकावं. आणि त्यानं तसं प्रशिक्षणही दिले होते. त्याने तिला खगोलशास्त्र अभ्यासू नकोस असं सांगायला तो विसरला नाही. लाडाकोडात वाढली असल्यानं कदाचित सोफी भयंकर हट्टी प्रकरण होतं. तिला खगोलशास्त्रात दिवसेंदिवस जास्तच रस येत होता. भावानं शिकवायला नकार दिल्यावर शांत बसणार तर नव्हतीच. तिच्या हट्टानं तिला एकलव्य व्हायला भाग पाडलं. जर्मन भाषेतली अनेक पुस्तकं शिकुन,वाचुन तिने स्वत:च खगोलशास्त्र शिकलं, ती फक्त जर्मन भाषेची पुस्तके शिकलीच नाही तर आणि स्वत: पैसे जमवुन लॅटिन पुस्तकांचे भाषांतर केले जेणेकरुन ती तिचा अभ्यास करू शकेल.
सुरुवातीला समाजाच्या भितीनं नको म्हणणाऱ्या टायकोला तिच्या या जिद्दीचा भयंकर अभिमान होता.खगोलशास्त्राला घरातुन विरोध होता म्हणून शिकू नको म्हाणणारा टायको बहिणीच्या पाठीशी आता ठाम उभा राहिला. कदाचित कडव्या विरोधानं त्यांच्यातलं बहिणभावाचं आणि सहसंशोधकाचं नातं अधिक दृढ केलं असं म्हाणु शकतो. सोफीने टायकोला मदत केली त्या कार्यास आता ग्रह आणि सौर मंडळाच्या आधुनिक कक्षा अंदाजांचा आधार म्हणून पाहिले जाते. वेधशाळेमध्ये टायको आणि सोफिया यांनी काळाशी संबंधित ग्रहांच्या स्थानांची (आजपर्यंत दुर्बिणीच्या शोधापूर्वी) सर्वात अचूक मोजमाप गोळा केली. भावाला मदत करत असतानाच दुसरीकडे, स्वत: निरीक्षणे पार पाडण्यातही सोफीनं रस घेतला. होती. टायको आणि त्याचे सहाय्यक, ज्यात सोफीचाही समावेश होता, त्यांनी केवळ ग्रहांच्या स्थानांऐवजी ग्रहांच्या कक्षाही पाहिली. ब्राहे भावंडांनी केलेला एक अविस्मरणीय शोध म्हणजे एक नवीन तारा, जो टायकोच्या सुपरनोवा म्हणून ओळखला जातो. सुपरनोव्हाचे अधिकृत वैज्ञानिक नाव एसएन १५७२ आहे. टायकोचा सुपरनोव्हा हा एक विवादास्पद शोध होता ज्यामुळे लोकांचा धर्मावरचा विश्वास गोंधळात पडला होता कारण पृथ्वी विश्वाच्या मध्यभागी नाही हे दर्शवणारा हा पहिला पुरावा होता. आणि आजही आपण टायकोचा हा शोध कधीच कुठे उल्लेखत नाही. सोफीसोबत टायकोलाही अडगळीत टाकलंय.हे खुपच वाईट आहे.
सगळ्याच गोष्टी कुटुंबाचं न ऐकुन चालत नाही. लग्न त्यापैकीच एक. वयाच्या तेहतिसाव्या वर्षी ओट्टो थॉटशी तिचं लग्न झालं. १५७६ मध्ये लग्न झालं आणि १५८० मध्ये टैग थॉट नावाचा एक गोंडस मुलगाही झाला. सुखी म्हणतात तसा संसारही सुरु झाला आणि परत पदरी दुःखचं. २३ मार्च १५८८ रोजी त्याचा मृत्यूही झाला. यानंतर ती जराशी खचलीही होती. तिच्या पतीच्या निधनानंतर, सोफीने आपल्या मुलाला १८ वर्षे पुर्ण होईपर्यंत आपल्या नवऱ्याची इस्टेट चालवत एरिक्सल्ममधील आपली मालमत्ता अगदी व्यवस्थित सांभाळली. पण हे सगळं करत असताना तिचं खगोलशास्त्राकडे मन अजिबातच लागेना. अशावेळी टायकोनं दिलेलं प्रशिक्षण कामी आलं.ती रसायनशास्त्र आणि औषधोपचार याकडे आपला रोख वळवला. सोबतच बागायतीशास्त्र देखील शिकली. तिने एरिक्सॉल्ममध्ये तयार केलेली गार्डन्स हे खुपच प्रसिद्ध झाले. सोफीला रसायनशास्त्र आणि औषध अभ्यासात विशेष रस वाटू लागला. अनेक वर्षे तिने यामध्येच काम केलं. एक महत्त्वाची गोष्ट तिच्या संशोधनातुन समोर आणली तिने. विषाचे छोट्या प्रमाणात डोस हे मजबूत औषधे म्हणून काम करू शकतात.
२१ जुलै १५८७ रोजी, डेनमार्कचा राजा फ्रेडरिक दुसरा यांनी आताच्या स्वीडनमधील एक फार्मच्या सोफिया ब्राहे या शीर्षकाला हस्तांतरित केलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. ते तिचं यश समजता येतं.यानिमित्तानं जेव्हा ती युरेनियबॉर्ग येथे गेली तेव्हा सोफीची एरिक लँग नावाच्या माणसाबरोबर भेट झाली. १५९० मध्ये, सोफीने युरेनियबर्गला जवळपास १३ भेटी दिल्या आणि एरिकमध्ये गुंतुन गेली. एरिकने आपले बहुतेक पैसे प्रयोगांसाठी वापरले, म्हणून त्यांचे लग्न काही वर्षे उशीराच झाले. कारण त्याला कर्जबाजारी व्हायचं नव्हतं.त्यासाठी त्याला आता मेहनतीची गरज होती. आपल्या कामासाठी तो जर्मनीला गेला. टायकोनं या जोडप्याच्या विरहाच्या काळात 'युरेनिया टायटानी' ही कविता लिहिली होती.शेवटपर्यंत टायकोचं बहिणीवरचं प्रेम कमी झालं नाही. शेवटी एसेनफर्डमध्ये लग्न केले. परिस्थिती अजुनही चांगली नव्हतीच. अत्यंत गरीबीत ते एसेनफर्ड या शहरात काही काळ राहिले.
टायको तिचा कितीही प्रिय असला तरी तिच्या इतर कुटुंबियांवर तिचा बऱ्यापैकी रागच होता. तो राग हा तिचा विज्ञान अभ्यास न स्वीकारल्यामुळे होता. तिने हे आपल्या बहिणीला, मार्गेथला पत्रातुन सांगितलेही होती. १६०८ पर्यंत, एरिक प्रागमध्ये राहिला आणि तेथेच परत एकदा सोफीच्या वाट्याला एकटेपण आलं.१६१३ मध्ये एरिकचा मृत्यू झाला. यावेळपर्यंत मात्र सोफीची परिस्थिती थोडीशी सुधारली होती. तिने स्थानिक चर्च, इवेटोफ्टा कीरकाच्या जीर्णोद्धारासाठी वैयक्तिकरित्या अर्थसहाय्य दिले. आणि तेथेच एरिकला दफन केले. एरिकच्या जाण्यानं सोफीला एकटेपणा नकोसा वाटायला लागला. ती कायमस्वरुपी डेन्मार्कमध्ये परतली. आणि हेलसिंगरमध्ये स्थायिक झाली. तिने शेवटची वर्षे डॅनिश कुटुंबांची वंशावळी लिहिताना घालविली, १६२६ मध्ये प्रथम मोठी आवृत्ती प्रकाशितही केली. तिचे है कार्य अद्याप डॅनिश खानदानीच्या इतिहासासाठी एक प्रमुख स्त्रोत मानले जाते.
वयोमानानं आणि एकटेपणानं सोफी पुरती थकली होती. अशातच १६४३ मध्ये हेलसिंगर येथे तिचे निधन झाले आणि थॉट कुटुंबासमवेतच तिचंही दफन करण्यात आलं. तिचं रसायनशास्त्रातलं, औषधशास्त्रातलं योगदान आजही जग मान्य करतं. मी मात्र जेव्हा जेव्हा वर्गातग्रॅव्हिटेशन शिकवेन तेव्हा तेव्हा ग्रहांच्या गतीच्या अभ्यासात टायकोसोबतच सोफीचंही नाव अभिमानानं घेईन...तिला सावलीतुन बाहेर काढेन.