Americas

मेक्सिकोतील ग्लायफोसेटबंदी हटवण्यासाठी मॉन्सेन्टोला अमेरिकन सरकारनं छुपी मदत केल्याचं उघड

खासगी कंपन्यांच्या सांगण्यावरूनच अमेरिकेनं त्यांचं शेतीविषयक परकीय व्यापाराचं धोरणं बदलल्याचा धक्कादायक खुलासा यातून समोर आलाय.

Credit : PBS

मॉन्सेन्टो आणि खासगी ॲग्रोकेमिकल कंपन्यांची संघटना असलेल्या क्रॉपलाईफ अमेरिका व अमेरिकन सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमधील गुप्त पत्रव्यवहार उघड झालाय. सेंटर फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी या संस्थेनं माहितीच्या अधिकारातून हा पत्रव्यवहार उघड केला असून या पत्रव्यवहाराची पडताळणी केल्यानंतर द गार्डियन या वृत्तपत्रानं मेक्सिकोतील ग्लायफोसेट बंदी उठवण्यासागील खरे सूत्रधार समोर आणले आहेत. खासगी कंपन्यांच्या सांगण्यावरूनच अमेरिकेनं त्यांचं शेतीविषयक परकीय व्यापाराचं धोरणं बदलल्याचा धक्कादायक खुलासा यातून समोर आलाय.

मॉन्सेन्टोच्या 'राऊंडअप' या तणनाशकातील ग्लायफोसेट हा घटक कॅन्सरसाठी कारणीभूत असल्याचं कारण देत मेक्सिकोनं या तणनाशकावर बंदी घातली होती. ही बंदी उठवण्यासाठी मॉन्सेन्टोचे मालक बेयर यांनी अमेरिकन सरकारमधील पदाधिकाऱ्यांना कामाला लावल्याचं या कागदपत्रांमधून स्पष्ट होतंय. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज मॅन्युएल लोपेझ यांनी २०२४ पर्यंत मेक्सिकोतील ग्लायफोसेटचा वापर शून्यावर आणण्याची महत्वकांक्षा व्यक्त केली होती. ग्लायफोसेटच्या अतिवापरामुळे मेक्सिकोची अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असल्याचं कारण देत तिथल्या सरकारनं हा निर्णय घेतला.

बेयर यांची मॉन्सेन्टो कंपनी ग्लायफोसेट तणनाशकाची जगातील सर्वात मोठी उत्पादक असून या तणनाशकांची निर्यात मेक्सिकोला मोठ्या प्रमाणावर होते. "मेक्सिकोतील बंदीच्या या निर्णयानंतर आपल्या कंपनीला मोठा फटका बसणार असल्याचं लक्षात आल्यानंतर बेयर यांनी ही बंदी उठवण्यासाठी मेक्सिकन सरकारवर दबाव पाडायला अमेरिकेला भाग पाडलं," असा निष्कर्ष या गुप्त पत्रव्यवहारांची पडताळणी केल्यानंतर गार्डियन या वृत्तपत्रानं काढलाय. २०१९ सालीही थायलंडनं ग्लायफोसेटवर घातलेली बंदी उठवण्यासाठी असाच दबाव अमेरिकेकडून तिथल्या सरकारवर पाडण्यात आला होता. अर्जेंटिना, श्रीलंकेसारख्या गरीब राष्ट्रांनी घातलेली ग्लायसोफेटवरील बंदीही अशाच पद्धतीनं रद्द करण्यास तिथल्या सरकारांना भाग पाडलं गेलं होतं. २०१५ साली युरोपियन युनियनच्या संसदेत ग्लायसोफेटचा वापर हळूहळू कमी करत जाण्यासंबंधी ठराव पास करण्यात आला होता. मॉन्सेन्टो आणि बेयर यांच्या दबावानंतरंच हा ठराव नंतर मागे घेण्यात आला.

मॉन्सेन्टो कंपनीच्या या कर्करोग पसरवणाऱ्या ग्लायफोसेटयुक्त तणनाशकांची मेक्सिकोला होणारी निर्यात अशीच कायम राहावी यासाठी बेयर यांनी अमेरिका - मेक्सिको - कॅनडामधील त्रिपक्षीय व्यापार कराराच्या United States - Mexico - Canada Agreement (USMCA) तरतूदही बदलण्यात आल्याचं समोर आलंय. "अमेरिकन कोर्पोरेशन्सच्या फायद्यासाठी हे विषारी तणनाशक खरेदी करण्यासाठी मेक्सिकोसारख्या गरीब राष्ट्रांवर दबाव पाडला जात असून ही गोष्ट अमेरिकाच पुरस्कार करत असलेल्या 'खुल्या व्यापार धोरणा' विरोधात आहे," अशी टीका या खुलाश्यानंतर सेंटर फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटीच्या नॅथन डोनली यांनी केली. 

जागतिक आरोग्य संघटनेसारख्या संस्थांनी देखील वेळोवेळी या तणनाशकांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्येविषयी वेळोवेळी चेतावणी दिली आहे. १९९६ साली जी एम वाणांचं पीक सुरू झाल्यानंतर ग्लायफोसेटयुक्त तणनाशकांच्या वापरात विक्रमी वाढ झाली. मॉन्सेन्टो बेयर यांचं राऊंडअप हे जगातील सर्वाधिक खपाचं तणनाशक असून या तणनाशकातील ग्लायफोसेटमुळं कर्करोगाची लागण तसंच आरोग्याच्या इतर गंभीर समस्या उद्भवतात. तरीही हे तणनाशक सुरक्षित असल्याच्या खोट्या वैज्ञानिक संशोधनांनीही मॉन्सेन्टोनं लॉबींगचा भाग म्हणून प्रोत्साहन तसंच आर्थिक सहाय्य केल्याचं वेळोवेळी समोर आलंय. मागच्या वर्षीच मॉन्सेन्टोचं तणनाशक वापरल्यानं कर्करोग झाल्याच्या अशिलाच्या खटल्यावर निकाल देताना अमेरिकेतील न्यायालयानं मॉन्सेन्टोला तब्बल ११ बिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला होता. या तणनाशकांच्या वापरामुळं कर्करोगासारखे गंभीर विकार बळाकावतात हे अमेरिकेच्या न्यायालयात सिद्ध झाल्यानंतरही ही विषारी तणनाशकं गरीब देशांवर थोपवण्यासाठी अमेरिकेचं सरकार प्रयत्नशील असल्याचं आज अधिकृतरित्या सिद्ध झालंय.

भारतातही या तणनाशक वापरावर बंदी असली तरी आपल्या देशातील शेतकरी राऊंडअप या तणनाशकाचा सर्रास वापर करतात, हे उघड गुपित आहे. आरोग्याच्या गंभीर समस्यांबरोबरंच याच्या अतिवापरामुळे शेतजमिनीची सुपिकताही धोक्यात येत असल्याचे वैज्ञानिक पुरावे आहेत. मात्र, तणनाशकांवरील मॉन्सेन्टोची एकाधिकारशाही आणि दुसरे परवडणारे पर्याय नसल्याकारणानं भारतातही शेतकरी या ग्लायफोसेटयुक्त घातक तणनाशकांचाच वापर करत आलेले आहेत. कर्करोग पसरवणाऱ्या या तणनाशकांची विक्री तशीच कायम ठेवून नफा कमावण्यासाठी मॉन्सेन्टोसारख्या कॉर्पोरेशन्सना अमेरिकन सरकार मदत असल्याच्या शंकेवर गार्डियननं शिक्कामोर्तब केलंय.