Quick Reads
ट्रॅशी सिनेमा आणि भारतीयांचं ट्रॅशी आसण्याचं गमक
भारतीयांचा ट्रॅशीनेस हा इतका डार्क आहे की त्यातून तो आपल्या रोजच्या कृत्यांमधून व्यवस्थेविषयी प्रतीकात्मक बंड करायला बघतो.
ट्रॅशी (Trashy) सिनेमा ही संकल्पना आपल्याकडे येऊन रूळून आता बराच काळ लोटून गेला आहे. काळाच्या ओघात ट्रॅशी सिनेमे भारतीय सिनेरसिकांनी निव्वळ पचवलेच नाहीत तर त्यांना मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात कायमचं स्थान देऊ केलं, असा दावा करण्याइतपत ट्रॅशी सिनेमाचा इतिहास जाज्वल्य आहे. ट्रॅशी सिनेमांवर लिहायचं कारण म्हणजे या आठवड्यात मिलाप झवेरीचा मरजावा हा सिनेमा रिलीज झालेला आहे. सिनेमा मी पाहिलेला नसला तरी ट्रेलरवरूनच सिनेमा दर्जेदार असल्याची खात्री पटली होती. आज काही ठिकाणी सिनेमाचे रिव्ह्यू वाचल्यानंतर तर यावर शिक्कामोर्तबच झालं. शिवाय सिद्धार्थ मल्होत्रासारखा ताकदीचा अभिनेता ही सिनेमा बघण्यासाठी आणखीच आश्वस्त करणारी बाब आहे. तर हे ट्रॅशी सिनेमे मोठ्या संख्येनं बनवले जातात, पाहिले जातात, जपले जातात, हे उघडच आहे. तरी यांच्या निर्मितीमागची आणि रसग्रहणाची प्रेरणा आणि त्यामागील कार्यकारणभाव समजून घेणं, ही सुद्धा ट्रॅशी सिनेमांइतकीच इंटरेस्टिंग गोष्ट आहे.
ट्रॅशचा मराठीत साधा अर्थ होतो कचरा. भारतीयांचा विशेषत: मराठी माणसाची कचऱ्याविषयीची आवड आणि आपुलकीचा भाव हा फक्त सिनेमांपुरताच मर्यादित नाही. कथा, कादंबऱ्या, कविता, गाणी आणि इतर अनेक कलाप्रकारांमधला हा कचरा आपण रसिक म्हणून निव्वळ वेचलेलाच नाही तर जपूनही ठेवलेला आहे. सिनेमांव्यतिरिक्त या इतर ट्रॅशी कलाकृतींवर आपण या लेखाच्या शेवटच्या भागात येऊ. सध्या सिनेमांवर बोलू. ट्रॅशी सिनेमांवर अमोल उदगीरकरांनी एक अतिशय चांगला लेख लिहिला होता. ट्रॅशी सिनेमा म्हटल्यावर पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो कांती शाहचा गुंडा. गुंडा हा सिनेमा कल्टच आहे आणि यात काही वाद असायचा प्रश्नच नाही. किंबहुना कांती शहाला पर्यायानं गुंडा या सिनेमाला ट्रॅशी सिनेमाचा भारतातील उद्गाता म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पण गुंडा व्यतिरिक्तही इतर अनेक दर्जेदार ट्रॅशी सिनेमे आपल्याकडे बनलेले आहेत आणि अजूनही बनत आहेत. त्यातील मोजक्या सिनेमांचा उल्लेख पुढे या लेखात येतच जाईल. पण मागच्या काही वर्षात ट्रॅशी सिनेमांचा खालावत जाणारा दर्जा (म्हणजेच त्यातला ट्रॅशीनेस कमी होत जाणं) ही चिंतेची बाब आहे. यामागची दोन प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे आजकालच्या चित्रपट समीक्षकांकडून ट्रॅशी सिनेमांचं केलं जाणार खच्चीकरण आणि दुसरं कारण म्हणजे मागच्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये आलेलं सो-कॉल्ड Content Driven फिल्म्सचं खूळ.
ट्रॅशी सिनेमांना चित्रपट समीक्षकांकडून मिळालेली ट्रीटमेंट ही नेहमीच एकांगी आणि ठराविक तुच्छतवादी पठडीतली राहिलेली आहे. (मोजके अपवाद वगळता). उदाहरणादाखल मी मगाशी म्हटल्याप्रमाणं मरजावा नावाचा चांगला ट्रॅशी सिनेमा नुकताच आला आहे. तर सिनेसमीक्षकांनी नेहमीप्रमाणे सिनेमा तद्दन फालतू असून चुकूनही बघू नका, अशा धाटणीची समीक्षा केलली आहे. या समीक्षेत त्यांनी सिनेमाचं लिखाण, दिग्नदर्शन, अभिनय या बाबी अजिबातच convincing नसल्याचं म्हटलंय. पण मूळात सिनेमा ट्रॅशी असण्याची पहिली अटच तो convincing वाटू नये ही आहे, हे कोणीही लक्षात घेताना दिसत नाही. तुम्ही कोणताही कल्ट ट्रॅशी सिनेमा काढून बघा. त्याची कोणतीच बाजू मूळात convincing नसते. किंबहुना तीच ट्रॅशी सिनेमाची पूर्वअट आणि मूळ गाभासुद्धा असतो. कुठल्याच प्रकारचं conviction आणि गांभीर्य नसणं हीच तर ट्रॅशी सिनेमाची खासियत आहे आणि त्यामुळे असे सिनेमे प्रेक्षकांना भावतात. तर अशा सिनेमांची समीक्षा करताना सिनेमामध्ये conviction नाही म्हणून त्याला मोडीत काढणं म्हणजे गाढवापुढे गीता वाचल्यासारखं आहे. ट्रॅशी सिनेमाचं रसग्रहन करायचं असेल तर त्यासाठी ट्रॅशी सिनेमाचं सिनेमॅटिक विश्व, भाषा, एस्थेटिक समजून घ्यायला हवं. जे की सामान्य भारतीय प्रेक्षकाला स्थळ-काळ-वेळेगणिक आयतंच समजलेलं आहे. पण ट्रॅशी कलाविश्वाचा गाभा, त्याच्या निर्मिती आणि रसग्रहणामागील प्रेरणा आणि कार्यकारणभाव नीटसा समजला नसल्याकारणानं बहुतांश समीक्षक अशा सिनेमांना तकलादू म्हणून मोडीत काढताना दिसतात.
सिनेमातील कोणत्याही प्रसंगामध्ये कसलंच conviction आणि गांभीर्य न ठेवता दिग्नदर्शक प्रत्यक्षात त्या प्रसंगाची, कलाकारांची, सिनेमाची, स्वत:ची, सिनेमा बघणाऱ्या प्रेक्षकांची एवढंच काय तर ज्या नैतिक मूल्यांवर सदरील सिनेमा उभा राहिलेला आहे त्या मूल्यांचीच खिल्ली उडवत असतो. त्यामुळे सिनेमा पुरेशा गांभीर्याने बनवण्यात आलेला नाही, ही टीकाच गैरलागू ठरते. ट्रॅशी सिनेमातील एखादा विनोदी सीन असेल तर त्यातला विनोदावर नव्हे तर विनोद किती सुमार विनोदबुद्धीने मांडलेला आहे, यावर प्रेक्षकांनी हसणं अपेक्षित असतं. त्याचप्रमाणे एखादा भावनिक करणारा गंभीर प्रसंग असेल तर त्या प्रसंगातलं conviction किती सुमार आणि विनोदी आहे अशी प्रतिक्रिया प्रेक्षक तो सीन बघून देतात. एरवी जी सिनेमॅटिक मापदंड असतात ती सगळी या ठिकाणी मोडून काढली जातात. प्रत्यक्ष विनोद नाही तर विनोदाच्या सुमारपणावर हसू येतं इतकं त्या विनादाचं टायमिंग, संवादफेक, दर्जा खराब असतो.
हीच गोष्ट भावनिक करणाऱ्या सिनेमातील प्रसंगांची. उदाहरणादाखल साधारणत: जेव्हा चित्रपटातील बलात्काराची दृश्य दाखवली जातात ( बहुतांश वेळा सिनेमात हा बलात्कार पुरूषांकडून स्त्रीयांवर तर कधी कधी प्रेक्षकांवर होतो) तेव्हा बलात्कार करणाऱ्या पुरूषाविषयी राग आणि जिच्यावर तो प्रसंग ओढवला त्या स्त्रीविषयी सहानुभूतीची भावना प्रेक्षकांमध्ये जागी होणं अपेक्षित असतं. पण तुम्ही कुठल्याही ट्रॅशी सिनेमातले बलात्काराचे प्रसंग काढून पाहा. सहानुभूती तर सोडा त्या सीनमधील कॅमेरा वर्क आणि कलाकारांचं conviction बघून प्रेक्षकांमध्ये वेगळ्याच भावना दाटून येतात. ट्रॅशी सिनेमातलं कॅमेरावर्क आणि महिलांचं चित्रण हा तर मोठा इंटरेस्टिंग विषय आहे. पण त्यावर इथं बोलणं या लेखाला आणि सभ्यतेला धरूण राहणार नाही. तर सांगायचा भाग हा की प्रत्यक्षात दिग्दर्शक हा पारंपारिक सिनेमॅटिक लैंग्वेजला छेद देत तुमच्या आमच्या किंबहुना प्रेक्षकांच्या नैतिकतेला आव्हान द्यायचा प्रयत्न करतो.
अशा प्रकाराला इंग्रजीत Hyper-realism असं म्हणतात. ज्याला मराठीत अतिरंजित वास्तववाद म्हणता येईल. तर हा अतिरंजित वास्तववादच सर्व ट्रॅशी सिनेमाच्या निर्मितीचा आणि कार्यकारणभावाचा मूळ गाभा आहे. हाच अतिरंजित वास्तववाद हा उत्तर आधुनिकतेचं अंगभूत वैशिष्ट्य आहे. याचा वापर पॉर्न सिनेमात सर्रास केला जातो. उदाहरणादाखल पॉर्नमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय हा डिलिव्हरी करायला गेल्यावर त्या घरातील महिलेशी सहज संभोग साधतो. त्यात ना कोणतं conviction असतं ना तो संभोग एवढा सहजशक्य कसा काय झाला हा पटवून द्यायचा प्रयत्न. त्यामुळे ते पॉर्न इरॉटिक न वाटता विनोदी वाटू लागतं
ट्रॅशी सिनेमांमधलं conviction हे याचं पॉर्नच्या प्रभावातून आलेलं आहे. आपल्याकडचे ट्रॅशी सिनेमे, त्यातलं महिलांचं चित्रीकरण हे पॉर्नएवढंच किंबहुना पॉर्नपेक्षाही बिभत्स आणि हिणकस आहे. काही ट्रॅशी सिनेमांमध्ये तर दाखवलेल्या बहीण-भाऊ, आई -मुलगा, वडिल-मुलगी या नात्यांमध्ये अतिरंजित पावित्र्याच्या प्रभावाखाली लैंगिक तणाव दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे.
गुंडामध्ये एक सीन आहे ज्यात खलनायक (ज्याचं नाव बुल्ला असं आहे) त्याची बहीण अखेरचा श्वास घेत असते. तेव्हा तो तिला कुशीत घेऊन हा डायलॉग म्हणतो, 'मेरी बहना, लंबू ने तुझे लंबा कर दिया, माचिस की तिली की तरह खंबा कर दिया.' धीरगंभीर प्रसंगांमध्ये अश्या सुमार यमक जुळणाऱ्या संवादांनी हा चित्रपट भरलेला आहे. या चित्रपटाच्या थोरवीला एका लेखात न्याय देणं कोणालाही शक्य नाही. त्यामुळं तूर्तास इतकंच.
खऱ्या आयुष्यात कधीच न घडणाऱ्या गोष्टी ट्रॅशी सिनेमात सहज घडतात आणि त्या गोष्टी घडल्या कशा हे प्रेक्षकाला पटवून देण्याचं कष्टही तो दिग्दर्शक घेत नाही. प्रेक्षकही सिनेमॅटिक अनुभव घेताना त्यातले आतार्किक घटनाक्रम तर्काच्या फूटपट्टी वर मोजण्याचा प्रयत्न करत नाही. पहिल्याच भेटीनंतर नायिका नायकाच्या मागे वेडी झाली आहे हा अनुभव कोणत्याच भारतीय पुरुषाला खऱ्या आयुष्यात ओळखीचा नसतो. पण हा अतिरंजित वास्तववाद प्रत्येक दाक्षिणात्य ट्रॅशी सिनेमात नियम म्हणून दाखवला जातो आणि प्रेक्षक हा सिनेमॅटिक अनुभव सहजभावनेनं पचवतोही. यामागे तेच पिझ्झा बॉयचं लॉजिक आहे. जगाकडे, स्वत:कडे तुसडेपणानं बघण्याची कला भारतीय माणसाने सहजभावनेनं आत्मसात केलेली आहे. यातून पडद्यावरचेच काय पण पडद्याबाहेरीलही विरोधाभास पचवण्याची क्षमता भारतीय लोकं बाळगून आहेत. एक आदर्श भारतीय माणूस दुपारी आवडीने सहकुटुंब सूरज बडजातीयाचा सिनेमा पाहतो तर रात्री झोपताना तेवढ्याच आवडीनं मोबाईलवर Incest पॉर्न पाहतो.
सूरज बडजातीया हे हिंदी ट्रॅशी सिनेमातलं मोठं नाव आहे. त्याचा एक विवाह नावाचा दर्जेदार ट्रॅशी चित्रपट आहे. त्यातली नायिका एका सीनमध्ये नायकाला विचारते, 'क्या आप जल प्राशन करेंगे? पाणी पिणार का असं या शब्दांमध्ये कोणी कितीही संस्कारी असलं तरी विचारत नाही, हे सिनेमा बनवणाऱ्याला आणि बघणाऱ्यालाही माहित असतं. अशाच cringy संवादांनी हा चित्रपट भरलेला आहे. पण बडजातियानं हा चित्रपट बनवून दाखवला आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट सुपर हिट करून दाखवला. लग्नसंस्थेभोवती जे पावित्र्याचं वलय आहे, त्यालाच अतिरंजित करून प्रत्यक्षात सूरज बडजातीयाने विवाह संस्थेचीच खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे ज्या नैतिक मुल्यांवर हा सिनेमा उभा राहिलेला आहे त्याच नैतिक मूल्यांची सिनेमामधूनच खिल्ली उडवणे, हेच कुठल्याही ट्रॅशी सिनेमाचं सार आहे.
आदित्य चोप्राचा असाच एक ट्रॅशी सिनेमा आहे. रब ने बना दी जोडी. या चित्रपटात नायिका मिशी कापून आलेल्या आपल्या नवऱ्याला ओळखत नाही! हा एक मेनस्ट्रीम कमालीचा यशस्वी सिनेमा आहे. अशी कित्येक उदाहरणं देता येतील. कोई मिल गया, रुद्राक्ष, जानी दुश्मन हे काही साय - फाय हिंदी सिनेमे अतिशय दर्जेदार ट्रॅशी आहेत. जानी दुश्मन तर कल्ट क्लासिक बनलेला आहे. त्यातले VFX, चित्रपटातील इतर तांत्रिक अविष्कार, सिनेमॅटोग्राफी, कलाकारांचा अभिनय या सर्वच गोष्टी सिनेरसिकांच्या मनात आजही घर करून आहेत. या चित्रपटातून अभिनयात पदार्पण करणाऱ्या सोनू निगमचं काम तर अभिनय कसा असावा याचा वस्तूपाठ आहे. कालानुरूप वैज्ञानिक प्रगती जशी होत जातेय तसतसं हॉलिवूड हे सायन्स फिक्शन सिनेमांची एक वेगळी उंची गाठत असताना बॉलीवूडही त्याच वेगानं साय फाय सिनेमाचा एक वेगळाच तळ गाठत आहे.
बॉलीवूड मधले बहुतांश मेनस्ट्रीम सिनेमे हे ट्रॅशीच असतात आणि बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा. मागच्या दोन तीन वर्षात कन्टेन्ट ड्रिव्हन फिल्म्सचं एक वेगळंच खूळ बॉलिवूडमध्ये आलेलं आहे. आयुष्मान खुराना, राजकुमार राव, गेला बाजार नवाजुद्दीन सिद्दीकी यांसारखे काही अभिनेते या सिनेमांचा चेहरा आहेत. हे सिनेमे सध्या बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा होत आहेत पण त्यांची तुलना ट्रॅशी सिनेमा आणि ट्रॅशी स्टार्स सोबत होऊ शकत नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कितीही नावाजलेला अभिनेता असला तरी तो बजरंगी भाईजान मध्ये सलमानचा (मुख्य नायकाचा) सहकारी म्हणूनच रोल प्ले करू शकतो. नायक म्हणून नाही. नवीन आशयघन सिनेमा बनवायचा जो ट्रेंड बॉलिवुडमध्ये सध्या आलेला आहे असे ट्रेंड हे येतात आणि जातात. पण बॉलीवूड आणि त्याचं भारतीयत्व हे ट्रॅशी सिनेमांवरच टिकून होतं, आहे आणि राहिल. कितीही आशयघन दर्जेदार गंभीर सिनेमा असला तरी तो एका ठराविक मर्यादेच्या पुढे जाऊन लोकप्रिय होऊ शकत नाही. किंबहुना चांगल्या आशयघन सिनेमात थोडाबहुत ट्रॅशिनेस टाकून यशस्वी होण्याचाही प्रयत्न काहीजण करताना दिसतात. पण याला तेवढं यश येताना दिसत नाही. सलमान खान हा बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार आहे आणि त्याचे सिनेमे आरामात 300 करोड रुपये कमावतात ते या ट्रॅशीनेसच्या जोरावरच. ट्रॅशी सिनेमा बनवणारे लोक आणि तो सिनेमा बघणारा प्रेक्षक हा मूर्ख आहे, असं जर कोणता समीक्षक आकलन करत असेल तर ते आकलनच मूर्खपणाचं ठरेल. सिनेमा बनवणाऱ्याला बनवताना माहित असतं की सिनेमा ट्रॅशी आहे आणि बघणाऱ्याला बघताना माहित असतं की सिनेमा ट्रॅशी आहे. एखादा ट्रॅशी सिनेमा जर नेहमीप्रमाणे प्रचंड लोकप्रिय झाला तर समीक्षकांकडून जे एकसूरी आकलन केलं जातं ते म्हणजे It's so bad that it's good. ट्रॅशी सिनेमा बनवणाऱ्या कलाकारांना समीक्षकांच्या पसंतीस उतरतील, असे दर्जेदार आशयघन सिनेमे बनवता येत नाहीत असं नाही. तर प्रत्यक्षात असे ट्रॅशी सिनेमे बनवणे ही त्या कलाकाराने स्वतःहून हुशारीने केलेली निवड असते.
कमीने, हैदर, उडता पंजाब सारख्या सिनेमांमधून समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या शाहिद कपूरचं धोक्यात आलेलं करियर प्रभूदेवाच्या आर राजकुमार या कमालीच्या ट्रॅशी सिनेमामुळेच पुन्हा उभा राहू शकलं, हे खुद्द शाहिद कपूरही मान्य करतो. सलमान खान तर फक्त आणि फक्त ट्रॅशी सिनेमांच्या बळावरच भारतातला सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून उदयाला आलेला आहे. एकापाठोपाठ फ्लॉप चित्रपटांमुळे सलमानची अभिनेता म्हणून कारकीर्द लयाला जात असताना प्रभूदेवाच्याच वॉन्टेड या अतिशय सुंदर अशा ट्रॅशी सिनेमानं सलमानला निव्वळ एक हिटच नव्हे तर त्याची स्वत:ची अशी एक नवी ओळख मिळवून दिली. त्यानंतर सलमान आजतागायत हाच फॉर्म्युला कायम ठेवत वरचेवर सुमारीची नवनवी शिखरे काबीज करत ट्रॅशी सिनेमांना आपलसं करत आला आहे.
नुकताच सलमानच्या दबंग ३ या चित्रपटाचा ट्रेलर आला असून निव्वळ ट्रेलर आणि गाण्यांवरूनच हा चित्रपट ट्रॅशीनेस आणि सुमारपणाची एक नवीच उंची गाठून विक्रम प्रस्थापित करेल, असा फक्त विश्र्वासच नव्हे तर खात्री दर्दी सिनेरसिकांना पटलेली आहे. काही कलाकार समीक्षकांना खूश ठेवण्यासाठी आणि कलात्मकतेच्या प्रयोगांसाठी गंभीर आशयघन सिनेमांकडे वळतात खरं पण तिथे हात पोळल्यावर मुकाट्याने पुन्हा ट्रॅशी सिनेमांचा आसरा घेतात. कारण बॉलिवूडमध्ये लॉंग टर्म यशस्वी व्हायचं असेल ट्रॅशीनेसला पर्याय नाही, हे सगळ्यांनाच माहित आहे. आणि ही गोष्ट आभिनेत्यांपुरतीच मर्यादीत नाही. बॉलिवूडमध्ये आर्थिकदृष्ट्या यशस्वी झालेले सगळे प्रोड्यूसर्स, डायरेक्टर्स हे ट्रॅशी सिनेमांच्या जोरावरच मोठे झालेले आहेत.
साजिद खान, साजिद नाडियावाला, फराह खान, करण जोहर.. ही यादी न संपणारी आहे. ९० च्या दशकात तर ट्रॅशी सिनेमांनी एक नवी उंची गाठली होती. ती इतकी की ट्रॅशी सिनेमात हातखंडा आसलेल्या त्याकाळच्या दिग्नदर्शकांनी स्क्रिप्टशिवायच पूर्ण सिनेमा बनवूनच नव्हे तर सिनेमे ब्लॉकबास्टर हिट करून दाखवले आहेत. कंटेंट ड्रिव्हन आणि स्क्रिप्ट लिखाणाच्या मागे लागलेल्या आजकालच्या कलाकारांनी या दिग्गजांकडून बरचं काही शिकण्यासारखं आहे. समीक्षक आणि काही ठराविक उच्चभ्रू प्रेक्षकवर्ग नव्याने येत असलेल्या ट्रॅशी सिनेमांना डाऊनमार्केट ठरवण्याचा प्रयत्न करत असले तरी अर्जून कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा यांसारखे नव्या दमाचे कलाकार ट्रॅशी सिनेमाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा आणि वाढवण्याचा अतिशय प्रामाणिक आणि दर्जेदार प्रयत्न करत आहेत, ही निश्र्चितच आश्र्वासन गोष्ट आहे.
आपल्याकडचे सिनेमाचा दर्जा जोखण्याचे जे पारंपारिक मापदंड आहेत ते पाश्मिमात्य धार्जिणे आहेत. हिंदी ट्रॅशी सिनेमाच्या कलात्मकतेचे मापदंड हे नेमके त्याच्या उलटे आहेत. वर म्हटल्याप्रमाणं पारंपारिक चित्रपट समीक्षणात जेवढं conviction जास्त तेवढा चित्रपटाचा दर्जा चांगला. ट्रॅशी सिनेमाबाबत हे नेमकं उलटं आहे. जेवढं conviction कमी तेवढा चित्रपट दर्जेदार. वाणगीदाखल बॉलीवूडच्या गुणवैशिष्ट्याकडं बघता येईल. मेनस्ट्रीम हिंदी चित्रपटात मुख्य भूमिका निभावणाऱ्या नायकाच्या अभिनयात बहुतांश वेळा कुठल्याच प्रकारचं conviction नसतं.
याउलट या चित्रपटात साइड रोल करणारे अभिनेते असतात ते तुलनेनं FTII, NSD बॅकग्राऊंड मधून आलेले पर्यायानं कसदार अभिनयाचं व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन आलेले असतात. कितीही कसदार अभिनय केला तरी मेनस्ट्रीम सिनेमात मुख्य नायकाची भूमिका निभावणाऱ्या सुमार अॅक्टरची जागा ते घेऊ शकत नाही. उदाहरणादाखल विजय राज, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी अशी कितीतरी नावं सांगता येतील. हीच गोष्ट अभिनयाव्यतिरिक्त सिनेमा साठी लागणाऱ्या इतर कौशल्यांची. अर्थात ट्रॅशी सिनेमांची आवड हॉलीवूडमध्येही जोपासली जातेच. तिथेही या सिनेमांचा विशिष्ट असा चाहतावर्ग आहेच. पण ट्रॅशी सिनेमांचं भारतीयांना असलेलं कौतुक आणि अशा सिनेमांना भारतात मिळणारी अधिमान्यता ही तुलनेनं फारच काळाच्या पुढची आहे. सातत्यानं ट्रॅशी सिनेमे बनवून हॉलीवूडमध्ये कोणी सुपरस्टार बनू शकत नाही. पण भारतात ही गोष्ट सहजशक्य आहे. किंबहुना तोच बॉलीवूडचा नैसर्गिक नियम आहे.
सलमान खानने तर आता ट्रॅशीनेसमधील अभिनयाबरोबरच गाणं लिहण्याचे आणि गाण्याचेही नवीन मापदंड उभे केले आहेत. उदाहरणादाखल रेस ३ या चित्रपटातील सलमान खानने लिहिलेलं आणि गायलेलं सेल्फिश हे गाणं ऐकणं म्हणजे ट्रॅशिनेसचा एक भारावून टाकणारा अध्यात्मिक अनुभव आहे. ट्रॅशी चित्रपटांची महिमा इतकी आहे की गंभीर आशयघन चित्रपटांशी नाळ जोडलेल्या कलाकारांनाही ट्रॅशी चित्रपटात काम करण्याचा मोह आवरत नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी सारखा कसलेला अभिनेता बॉलिवूडमध्ये जम बसवल्यानंतरही साजिद खानच्या हाऊसफुल्ल ४ या सिनेमात आयटम सॉंग करतो, ही गोष्ट ट्रॅशी सिनेमाचा आपल्या समाजमनावरील प्रभाव आणि अभिरूचीबाबत पुरेशी बोलकी आहे.
बॉलिवूडमध्ये गुणी अभिनेत्यांची वाणवा नसतानादेखील बॉबी देओल सारखा सुमारतेची सद्दी गाठलेला वयस्क अभिनेतादेखील याच हाऊसफुल ४ आणि रेस ३ सारख्या ट्रॅशी सिनेमांमधून यशस्वी कमबॅक करतो. विशेष म्हणजे या सिनेमातील त्याच्या सोबतची अभिनेत्री ही त्याच्या मुलीच्या वयाची असते. ट्रॅशी सिनेमाच्या अंगभूत गुणांमधून निर्माण होणारे विरोधाभास भारतीय प्रेक्षक एवढ्या सहजतेनं कसा पचवतो, हादेखील मोठा इंटरेस्टिंग विषय आहे. उदाहरणादाखल स्वत: होमोसेक्शुअल असलेल्या करण जोहरच्या कलाकृती या कमालीच्या होमोफोबिक असतात. त्यानं प्रोड्यूस केलेला दोस्ताना या चित्रपटाचं तर सारच होमोफोबिया आहे. शिवाय त्याच्या इतरही चित्रपटांमधून होमोफोबिक जोक्स अधूनमधून केले जातात. होमोसेक्शुअल कलाकारच होमोफोबिक कलाकृती निर्माण करत असल्याचं हे कदाचित जगातील एकमेव उदाहरण असेल.
विशेष म्हणजे करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव धर्मा आहे. आजघडीला ते भारतातील सर्वात यशस्वी प्रोडक्शन हाऊस आहे. धर्मा अधूनमधून 'आशयघन' सिनेमा द्यायचा प्रयत्न करत असलं तरी त्यांचा मूळ भर हा ट्रॅशी सिनेमा बनवण्यावरच आहे. आणि ते साहजिकही आहे. तीच गोष्ट भट कॅम्पेनची. महेश भट यांचं प्रोडक्शन हाऊस भयपटांसाठी ओळखलं जात असलं तरी ते सिनेमे भयपट कमी इरॉटिक जास्त वाटतात. यातून पुन्हा एकदा सिनेमा बनवणारा प्रत्यक्षात सिनेमाची खिल्ली उडवायला बघतो जे पुन्हा ट्रॅशी सिनेमाचंच सार आहे. ट्रॅशी सिनेमांची ही यादी न संपणारी आहे.
कॉमेडियन कनन गिल आणि बिस्वा कल्यान रथ या दोघांचं pretentious movie reviews अशा नावाचं यूट्यूब चैनल आहे. त्यावर त्यांनी काही क्लासिकल कल्ट ट्रॅशी सिनेमांचं रसग्रहण करण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. गुंडा बरोबरच आमिर खानचा तुम मेरे हो, फरदीन खानचा प्रेम अगन, सुनील शेट्टी आणि संजय दत्तचा रुद्राक्ष, सलमान खानचा हम साथ साथ है, शाहरूखचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे यांसारखे काही मोजके कल्ट क्लासिक सिनेमे हे ट्रॅशी सिनेरसिकांसाठी मेजवानी आहेत. ट्रॅशी सिनेमांचं वास्तववादापासून कोसो दूर असणं आणि तर्काला अश्व लावत दाखवलेला अतिरंजितपणा याकडे प्रेक्षकांची अभिरूची आणि कल याला काही विचारवंत उत्तराधुनिकतेचंही लक्षण मानतात. मूळात कलेची निर्मिती (विशेषत: दृकश्राव्य म्हणजेच Audio-visual) कलाकृतीची निर्माती आणि तिचं रसग्रहण हाच एक उच्चभ्रू अभिजातपणा (elitist argument) आहे. त्यामुळे यातील कलेच्या दर्जाची अतिशय हिणकस पातळी गाठणाऱ्या ट्रॅशी सिनेमांना लोकप्रियच नव्हे तर अधिमान्यता मिळवून देऊन सामान्य भारतीय माणूस प्रत्यक्षात या उच्चभ्रू अभिजातपणाविरूद्ध तात्त्विक बंड पुकारत असतो. हा ट्रॅशी सिनेमा बनवणाराही अभिजात कलेचे सर्व मापदंड मोडून काढून वरचेवर सुमार होत जात या एलिटिझ्मचा आपापल्या परीने विरोध करत राहतो.
जगाकडे किंबहुना स्वत:कडेच तुसडेपणाने पाहण्याची एक तिरकस विनोदबुद्धी भारतीयांना उपजत लाभलेली आहे. भारतीय प्रेक्षकामध्ये असलेला हा डार्क हृयूमर तो ज्या सामाजिक-आर्थिक-राजकीय परिप्रेक्षात वाढलाय त्याचीच देण आहे. यातून तो कलेकडे नाही तर जगण्याकडेच एक करमणूकीचं साधन म्हणून पाहू लागतो. यातूनच मग अतिशय थिल्लर अशा ट्रॅशी कलाकृतींशी समरस होत तो एकूणच कलाव्यवहार आणि त्यातल्या एस्थेटिक्सचीच खिल्ली उडवायला बघतो. जीवनाकडे पाहण्याचा भारतीयांचा हा उत्तराधुनिक कटाक्ष फक्त सिनेमांपुरताच मर्यादीत नाही. सगळ्याच कलाप्रकरांमधील ट्रॅशी कलाकृतीनांच भारतीयांनी फक्त लोकप्रियच केलेलं नाही तर डोक्यावरही घेतलेलं आहे. मराठीतही अभिजात म्हणवलं जाणारं प्रचंड लोकप्रिय साहित्यही मुख्यत: ट्रॅशीच आहे. साहित्यातील ही ट्रॅशीनेसची ऐतिहासिक परंपरा मराठीतील नव्या दमाचे तरूण लेखकही मोठ्या प्रामाणिकपणे आणि सर्जनशीलतेने जपत आहे.
भारतीयांच्या ट्रॅशीनेसचं प्रतिबिंब हे त्यांच्या रोजच्या दैनंदिन सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यावरही उमटलेलं आहे. भारतीय मीडिया आणि त्यातला कंटेंट हा मुख्यत: ट्रॅशीच आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियावरही भारतीयांच्या या ट्रॅशीनेसचे पडसाद अतिशय जोरकसपणे उमटलेले दिसतात. अतिशय बीभत्स आणि तकलादू म्हणता येतील अशा यूट्यूबवरच्या व्हिडिओजला भारतीयांनी लाखोंनी हिट्स मिळवून दिलेले आहेत. इतकंच काय तर याच ट्रॅशीनेसच्या जोरावर ढिंचक पूजा, दीपक कलाल, संदीप माहेश्वरीसारखे कित्येक लोक स्टार्स बनले आहेत. याशिवाय टिक टॉक सारख्या अॅपचा आजच्या भारतीय तरुणाईने केलेला अभूतपूर्व वापर हा तर ट्रॅशीनेसला एक नवी उंची गाठून देणारा अनुभव आहे. यातून आपली तरुणाई ट्रॅशीनेसचे अनेक बहुपदरी आयाम उलगडून दाखवण्याचा प्रामाणिक आणि यशस्वी प्रयत्न करताना दिसते.
याला भारतीयांचा इंटरनेटवरील उत्तराधुनिक आविष्कार मानता येईल. सदरील लेख हा ट्रॅशी भारतीय सिनेमा, त्याच्या निर्मितीमागची प्रेरणा आणि कार्यकारणभाव एवढ्यापुरताच मर्यादित असल्याकारणानं भारतीयांच्या ट्रॅशीनेसच्या इतर अविष्काराबांबत इथे चर्चा करणं संयुक्तिक ठरणार नाही. पण जगाकडे बघण्याचा भारतीय म्हणून आपला जो कुत्सित दृष्टिकोन आणि त्यामागे लपलेला डार्क हृयूमर समजून घेणं गरजेचं आहे. भारतीय माणूस त्याच्या आजूबाजूला डोळ्यांदेखत घडणाऱ्या खऱ्या घटनांकडे फिक्शन म्हणून पाहतो. त्यातूनच मग त्यामध्ये अतिरंजितपणा आणत त्यातून स्वतःची करमणूक करायला बघतो. यातून तो एकूणच व्यवस्थेविषयी त्याला आलेल्या नैराश्याला वाट मोकळी करून देतो.
भारतीयांचा ट्रॅशीनेस हा इतका डार्क आहे की त्यातून तो आपल्या रोजच्या कृत्यांमधून व्यवस्थेविषयी प्रतीकात्मक बंड करायला बघतो. यातूनच मग भारतीयांनी आपल्या सभोवतालचं वातावरण हे ट्रॅशीनेसने भारून टाकलेलं आहे. जसं की जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या भारतील लोकांनी लोकशाही पद्धतीनं नरेंद्र मोदींसारख्या माणसाला पंतप्रधान करून दाखवलं, सलमान खानला सर्वात यशस्वी अभिनेता बनवलं, रोहित शेट्टीचे सिनेमे हिट करून दाखवले, कॉमेडियन म्हणून कपिल शर्माला मोठं केलं, चेतन भगतला बेस्ट सेलर आॅथर बनवलं. उपजत थोर डार्क ह्युमरमून प्रत्येक क्षेत्रातील दर्जेदार नव्हे तर ट्रॅशी व्यक्तींनाच वर आणून भारतीय माणूस तो जगत असलेल्या व्यवस्थेच्या फोलपणावर आणि निरर्थकतेवर सातत्यानं बोट ठेवत आलेला आहे. किंबहुना भारतीयांचं कमालीचं ट्रॅशी असणं हे या चीड आणणाऱ्या व्यवस्थेची खिल्ली उडवण्याचंच गमक आहे.