Quick Reads

२००३ च्या ऑस्ट्रेलियन संघाला नमवणाऱ्या केनियाच्या असिफ करीमची गोष्ट

'त्या' एका स्पेलमध्ये एकट्या करीमनं कधीही हरू न शकणाऱ्या त्या ऑस्ट्रेलियन टीमचा माज उतरवला होता.

Credit : Dawn

जवळपास जिंकत आलेला कप बलाढ्य ऑस्ट्रेलियानं फायनलमध्ये अक्षरशः इज्जतीचा कचरा करत भारताकडून हिरावून घेतला, हीच २००३ च्या विश्वचषकाची न विसरता येणारी आठवण भारतीयांच्या मनात कायम आहे. मॅच फिक्सिंगचं सावट, खेळाडूंमधील बेबनाव, घसरत चाल्लेला फॉर्म या पार्श्वभूमीवर आफ्रिकेत भरलेल्या या वर्ल्ड कपमध्ये भारत काही विशेष कामगिरी करू शकेल अशी कोणालाच आशा नव्हती. मात्र, सचिननं या पूर्ण विश्वचषकात बॅटिंगचा गाठलेला नवा दर्जा आणि त्याला झहीर, नेहरा, सेहवाग, युवराज यांसारख्या नव्या दमाच्या खेळाडूंकडून मिळालेली साथीच्या जोरावर आपण बघता बघता फायनलपर्यंत पोहचलो. अंतिम सामन्याच्या आधीही जो एकमेव सामना भारत या स्पर्धेत हरला होता तो ऑस्ट्रेलिया विरुद्धचाच होता. फायनलही ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली आणि अपेक्षेप्रमाणं भारत यावेळेसही ऑस्ट्रेलियाला हरवू शकला नाही.

असं म्हणतात की २००३ च्या वर्ल्ड कपमधली ऑस्ट्रेलियाची टीम ही त्या आधी आणि नंतरही पार पडलेल्या कुठल्याही विश्‍वचषक स्पर्धेतली सर्वात तगडी होती. अख्या विश्वचषकात एकही सामना न गमावता दिमाखात ऑस्ट्रेलियानं कप जिंकला. हरूच शकणार नाही असं वाटणाऱ्या या संघाला जवळपास हरवण्याची किमया या स्पर्धेत फक्त एका संघाला करता आली. तो होता केनिया‌. हा सामना शेवटी ऑस्ट्रेलियानं जिंकला असला तरी केनियाच्या असिफ करीम या खेळाडूनं ऑस्ट्रेलियाला जवळपास हरवलं होतं. सामना जिंकलेल्याच संघातील खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सहसा दिला जातो. पण ९ ओव्हरमध्ये ३ विकेट घेत फक्त ७ धावा देणाऱ्या असिफ करीमला संघ हरूनही मॅन ऑफ द मॅचनं गौरवण्यात आलं होतं.

शेवटच्या ओव्हरला चौकार गेल्यामुळे या ७ धावा तरी गेल्या. नाहीतर एका स्टेजला करीमचे स्टॅट होते - ८ ओव्हर, ६ मेडन, २ धावा आणि ३ विकेट. ग्लेन मॅग्राथ नामेबियाविरूद्ध गोलंदाजी करुनही जे स्टॅट कमवू शकणार नाही ती गोष्ट केनियाच्या असिफ करीमनं ऑस्ट्रेलियन बॅटिंग लाईन अपसमोर करून दाखवली‌. ती पण २००३ सालच्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध. आज केनिया क्रिकेटच्या पटलावर अस्तित्वात नसल्यासारखाच आहे. मागच्या कित्येक विश्वचषकांसाठी हा संघ पात्रही ठरू शकलेला नाहीये. इतर आफ्रिकन क्रिकेट संघाप्रमाणचं २००३ नंतर केनिया क्रिकेटची सुरू झालेली वाताहत अजूनही तशीच सुरू आहे. पण त्या एका मॅचमध्ये एकट्या असिफ करीमनं कधीही हरू न शकणाऱ्या त्या ऑस्ट्रेलियन टीमचा माज उतरवला होता. आज असिफ करीमचा वाढदिवस.

पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या केनियानं कशीबशी १७४ पर्यंत मजल मारली‌. पाठलाग करताना नेहमीप्रमाणं गिलख्रिस्टनं वेगात अर्धशतक ठोकून ऑस्ट्रेलियाच्या अजून एका आरामात मिळणाऱ्या विजयाची तरतूद करुन ठेवलेली‌. १०८ वर २ बाद अशा मजबूत अवस्थेत ऑस्ट्रेलियाचा संघ असताना असिफ करीमनं बॉलिंग सुरू केली. त्यानंतर ही मॅच २ वेगवेगळ्या खेळापट्टीवर खेळली जात असल्याचं दिसलं. करीम सोडून दुसरा कोणाताही गोलंदाज बॉलिंग करायला आलं की समोरची टीम ऑस्ट्रेलियासारखंच खेळायची पण करीम असिफ बॉलिंगला आल्यावर ऑस्ट्रेलियाची जर्सी घालून नामेबियाचे बॅट्समन खेळत असल्यासारखं वाटायचं‌. आपल्या स्पेलमध्ये त्यानं रिकी पॉन्टिंग, डॅरेन लेहमन आणि ब्रॅंड हॉगला तर आऊट केलंच पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे समोर येईल त्या संघाला आरामात हरवत जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला उघडं पाडलं. अजूनही असिफ करीमचा हा स्पेल आत्तापर्यंतचा वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोत्तम स्पेशल म्हणून गणला‌ जातो. आपली ८ वी ओव्हर मेडन टाकल्यानंतर आपली टोपी घेऊन फिल्डिंगला जाण्यासाठी करीम अंपायर स्टीव्ह बकनरकडे गेला. तेव्हा बकनरनं त्याला थांबवून मॅच सुरू असतानाच त्याचं कौतुक केलं.

 

 

ऑस्ट्रेलियाला रडवणारा हा एक स्पेल इतकीच करीम असिफची लीगसी नाहीये. आपल्या इतर नोकऱ्या करून क्रिकेटची आवड म्हणून विनामोबदला अशा देशातील खेळाडूंना क्रिकेट खेळावं लागतं. इन्शुरन्स ब्रोकर म्हणून काम करत असिफ करीम आपल्या देशासाठी २३ वर्ष क्रिकेट खेळला. केनियाशिवाय दुसऱ्या कोणत्या देशात जन्माला आला असता तर असिफ करीम कसोटी क्रिकेटही खेळला असता. छोट्या देशातील गरीब क्रिकेट बोर्डाकडून खेळणाऱ्या बऱ्याच चांगल्या खेळाडूंची हीच शोकांतिका राहिलेली आहे. सर्व सुविधा आणि भरभक्कम आर्थिक रसद असणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमला गुडघ्यावर आणण्याचं काम एका आफ्रिकेन देशातील ४० वर्षाचा इशुरन्स ब्रोकर करू शकतो, हे करीमनं त्या एका स्पेलमध्ये दाखवून दिलं. १९९९ च्या विश्वचषकाचानंतर खरं तर वयस्क झालेल्या करीमनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. २००३ चा अफ्रिकेत भरणारा विश्वचषक एका महिन्यावर आलेला असताना ३९ वर्षीय करीमला केनियन क्रिकेट बोर्डानं निवृत्ती मागे घेत संघात खेळण्याची विनंती केली. २३ वर्ष केनियासारख्या संघाकडून कुठल्याही आर्थिक मोबदल्याविना क्रिकेट खेळणाऱ्या करीमनं या वेळेसही केनियाच्या क्रिकेटखातर विश्वचषकात प्रतिनिधित्व केलं. असिफ करीमची ही टीम त्या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलपर्यंत पोहचली. गडगंज श्रीमंत आणि सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या पूर्णवेळ फक्त क्रिकेटंच खेळण्याची लक्झरी उपलब्ध असलेल्या संघाला गुजराणीसाठी दुसरी कामं करावं लागणाऱ्या आफ्रिकेतील गरीब केनियन क्रिकेट बोर्डाचा संघही तितकीच कडवी लढत देऊ शकतो, असा संदेश करीमनं त्या स्पेलमधून जगाला दिला होता. 

क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि कर्मशियलायझेशमुळे आता कोण्या अफ्रिकेतील मागास देशातील असा खेळाडू पुन्हा होणं अवघड आहे. कारण कर्मिशियलायझेनशनंतरचं हे क्रिकेट खेळाडूंकडून नाही तर प्रचंड श्रीमंत आणि ताकदवाना अशा क्रिकेट बोर्डांकडून चालवलं जातं. मात्र, निवृत्तीनंतरही रसातळाला गेलेल्या केनियन क्रिकेटला उभारी देत आणखी एक तरी अशा बलाढ्य संघाचा माज उतरवणारा करीम उभा राहावा यासाठी असिफ क्रिकेट प्रशासक म्हणून अजूनही तितकंच मन लावून काम करत आहेत.