Quick Reads
२०२०ची डायरी: खेळांच्या जगात घडलेल्या महत्त्वाच्या घटना
क्रीडाजगतातील यावर्षीच्या उल्लेखनीय अशा १० घटनांचा इंडी जर्नलनं घेतलेला हा थोडक्यात आढावा.
२०२० हे वर्ष कोरोनामुळे क्रीडाजगतासाठीही प्रचंड उलथापालथीचं ठरलं. रद्द झालेल्या स्पर्धा/सामने ते प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये भरवले गेलेले सामने अशा अनेक कधीच न झालेल्या गोष्टी यावेळी पाहायला मिळाल्या. कोबी ब्रायंट, मॅराडोनासारख्या दिग्गज खेळाडूंचं दुर्दैवी निधनंही याच वर्षी झालं. तर धोनीसारख्या लोकप्रिय क्रिकेटपटूंनं अचानक निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर आणि शेतकरी आंदोलनासारख्या राजकीय आणि सामाजिक चळवळींचे पडसाद क्रीडाजगतावरही पडताना दिसले. क्रीडाजगतातील यावर्षीच्या उल्लेखनीय अशा १० घटनांचा इंडी जर्नलनं घेतलेला हा थोडक्यात आढावा.
१) कोबी ब्रायंट
जगप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा २६ जानेवारी रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. आपल्या २० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत तब्बल ५ एनबीए चॅम्पियनशिप जिंकणारा कोबी ब्रायंट बास्केटबॉलच्या सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत गणला जायचा. आपल्या बास्केटबॉल कौशल्याच्या जोरावर त्याने लॉस एंजेलिस क्लबला अमेरिकन बास्केटबॉलमध्ये सर्वात आघाडीचा क्लब म्हणून स्थान मिळवून दिलं. या दुर्दैवी अपघातात ४१ वर्षीय कोबी ब्रायंटसोबतंच त्याची १४ वर्षांची मुलगी गिआना आणि इतर १३ जणांचाही मृत्यू झाला. काही लोकांच्या मते मायकल जॉर्डन नंतर कोबी हा सर्वात प्रभावशाली बास्केटबॉलपटू होता. बास्केटबॉलमधील या ऐतिहासिक यशाबरोबरच २००३ च्या बलात्कार प्रकरणाचा काळा चाप्टरदेखील कोबीच्या लीगसीचा भाग ठरला.
२) टोकियो ऑलिम्पिक
Olympic.org
जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव समजली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा यावर्षी टोकियोमध्ये भरणार होती. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेचं आयोजन यावर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये करण्यात आलं होतं. मात्र, कोरोनामुळे यावर्षीची ही स्पर्धा रद्द करून पुढच्या वर्षी भरवण्यात येणार असल्याची घोषणा २४ मार्च २०२० रोजी ऑलिम्पिक समितीकडून करण्यात आली. ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होण्याची १२४ वर्षांच्या ऑलम्पिकच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असून ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाच आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांच्या चर्चेनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. याआधीसुद्धा १९४० मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद जपानकडे होतं. मात्र, त्यावेळेस चीनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे हे यजमानपद जपानकडून काढून स्पर्धा दुसरीकडे हलवण्यात आली होती. पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ साली २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान ही स्पर्धा आता भरवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी अजूनही आटोक्यात न आलेली कोरोनाची परिस्थिती बघता ही तारिख आणखी पुढे ढकलण्याची वेळ ऑलिम्पिक समितीवर येऊ शकते.
३) प्रेक्षकांशिवाय खेळलेल्या गेलेल्या स्पर्धा
यावर्षी खेळल्या गेलेल्या सर्व खेळांवर कोरोनाचं सावट राहिलं. याचीच परिणीती म्हणून यावर्षीचे अनेक सामने प्रेक्षकांविना रिकाम्या मैदानात खेळवले गेले. कोरोनाच्या परिस्थितीमुळे यावर्षीची आयपीएलसुद्धा दुबईला रिकाम्या स्टेडियम्समध्ये भरवण्यात आली. चाहत्यांना यावर्षीच्या जवळपास सर्वच सामन्यांचा आनंद टीव्हीवरुनंच घेण्यात समाधान मानावं लागल़ं. सेल्फ क्वारंटाईनचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून खेळण्याचा खेळाडूंचा अनुभवही अभूतपूर्व असा होता. परदेश दौऱ्यावर जाताना खेळाडूंना क्वांटईनचे नियम पाळूनंच खेळणं बंधनकारक होतं. कोरोनाचं सावाट असूनही दुबईत भरवली गेलेली यावर्षीची आयपीएल स्पर्धा या काटोकोर नियमपद्धतीमुळेच कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय पार पडली.
४) क्रीडा जगतातील ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर चळवळीचे पडसाद
CGTN.com
जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या हत्येनंतर अमेरिकेत आणि नंतर जगभरात वंशद्वेषाविरूद्ध उसळलेल्या ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर या आंदोलनाचे पडसाद क्रीडाक्षेत्रावरही यावर्षी उमटले. या निमित्तानं क्रीडा क्षेत्रातील वंशद्वेषावरही चर्चा झाल्या. बास्केटबॉल, फूटबॉल, टेनिस, क्रिकेट, हॉकी अशा अनेक खेळातील संघांनी आणि खेळाडूंनी अनेक वेळा मैदानातच प्रतिकात्मकरित्या वंशद्वेषाविरूद्धच्या या चळवळीला आपला उघड पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेसह जगभरातील अश्वेतवर्णींना सामना करावा लागत असलेल्या वंशद्वेषाचा नायनाट करण्यासाठी क्रीडाजगत एकत्र येताना दिसल़ं. वंशद्वेष आणि आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या नागरिकांविरुद्ध पोलिस अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून अनेक सामने रद्द करण्यात आले. ८ डिसेंबर २०२० रोजी चॅम्पियन्स लीगचा पॅरिस सेंट जर्मन विरूद्ध इस्तानबूल बसाकशेर मधील सामना पंचांनी सामन्यादरम्यानच वर्णद्वेषी शेरा मारल्यानं सामनाच रद्द करण्याचा निर्णय दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमतानी घेतला. खेळामधील वर्णद्वेष नष्ट करून क्रीडाक्षेत्र सर्व वर्ण आणि वंशाच्या खेळाडूंसाठीच तितकंच समावेशिक करण्याच्या उद्देशानं पावलं उचलण्याची इच्छाशक्ती अनेक खेळाडूंनी मैदानात वेळोवेळी दाखवून दिली.
५) धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
भारताचा आघाडीचा फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने १६ वर्षाच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. टी ट्वेंटी, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा तो जगातला पहिला कर्णधार ठरला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली तब्बल २८ वर्षांनी भारतात भरलेला विश्ववचषक जिंकला होता. श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात नाबाद ९४ धावांची खेळी करून धोनी मॅन ऑफ द मॅच ठरला होता. मुंबई, दिल्ली आणि बेंगलोर सारख्या मोठ्या शहरांचीच मक्तेदारी राहिलेल्या भारतीय संघात स्थान मिळवून झारखंडसारख्या मागास राज्यातून आलेला धोनी सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. अटीतटीच्या सामन्यात शांत वृत्तीनं खेळून सामना जिंकून देण्याच्या त्याच्या क्षमतेने त्याने क्रिकेट जगतात 'कॅप्टन कूल' आणि 'सर्वोत्तम फिनीशर' अशी ओळख मिळवली. राष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी धोनी चेन्नई कडून आयपीएल खेळतच राहणार आहे. चेन्नईला आयपीएलचे ३ विजेतेपद मिळवून देण्यातही कर्णधार धोनीचा महत्त्वाचा वाटा होता.६) महिला टी - २० चॅलेंज
महिला क्रिकेटची आयपीएल समजल्या जाणाऱ्या वूमन्स टी 20 चॅलेंज स्पर्धेचे यावर्षीचं हे तिसरं वर्ष होतं. आयपीएल सुपरनोव्ही, आयपीएल ट्रेलब्लेझर्स आणि आयपीएल व्हेलॉसिटी या तीन संघमध्ये ही स्पर्धा भरवण्यात येते. अंतिम सामन्यात स्मृती मंधनाच्या नेतृत्वाखालील आयपीएल ट्रेलब्लेझर्सनं हरमनप्रीत कौरच्या आयपीएल सुपरनोव्हावर १६ धावांनी मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्मृति मंधानानं अंतिम सामन्यात ४९ चेंडूत ६८ धावांची खेळी करत प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला आधी ही स्पर्धा मे महिन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती. कोरोनामुळे ती ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान दुबईतील शारजा मैदानात पार पडली. महिलांची आयपीएल स्पर्धा भरवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असून याच्याच भाग म्हणून मागच्या तीन वर्षांपासून ही स्पर्धा भरवण्यात येते. भारतासह इतर अनेक स्टार खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला.
७) नदालचं फ्रेंच ओपनमधील विक्रमी १३ वं जेतेपद
स्पेनच्या राफेल नदालनं यावर्षी रोलंड गॅरोसच्या विक्रमी १३ व्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं. एकाच मेजर स्पर्धेचं १३ वेळेस विजेतेपद पटकवणारा नदाल हा पहिलाच खेळाडू ठरला. फ्रेंच ओपनच्या या विजेतेपदासोबतंच नदालनं स्वित्झरलॅन्डच्या फेडररच्या २० ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपदांची बरोबरी केली. क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट म्हणवल्या जाणाऱ्या नदालनं या कोर्टवर आपल्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत फक्त २ सामने हरले आहेत. ३४ वर्षीय नदालला रॉजर फेडररचा सर्वाधिक २० ग्रॅन्ड स्लॅम जिंकण्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे. गेल्या १५ वर्षांपासून पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत नदाल, फेडरर आणि जोकोविच या तिघांचीच मक्तेदारी राहिलेली आहे. यावर्षीच्या फ्रेंच ओपन विजेतेपदानंतर राफेल नदाल सर्वकालीन सर्वोत्तम पुरूष खेळाडूंच्या यादीत आघाडीवर पोहोचला आहे.८) मॅराडोना
अर्जंटिनाचा फूटबॉलपटू दिआगो मॅराडोना यांचा वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. १९८६ सालचा मॅक्सिकोतील विश्वचषक मॅराडोनानं अक्षरशः एकट्याच्या बळावर जिंकून दिला होता. याचं विश्वचषकात त्याने इंग्लंडविरूद्ध हाताने केलेला गोल 'हॅन्ड ऑफ गॉड' म्हणून फूटबॉलच्या इतिहासात अजरामर झाला. याच सामन्यात त्याने इंग्लंडच्या ७ खेळाडूंना चकवत केलेला दुसरा गोल फूटबॉल विश्वचषकातील सर्वोत्तम गोल म्हणून गणला जातो. या संपूर्ण विश्वचषकात असामान्य गुणवत्ता आणि वैयक्तिक कौशल्याचं प्रदर्शन करत बेल्जियमविरूध्दचा उपांत्य सामना आणि पश्चिम जर्मनीविरूद्धचा अंतिम सामना त्यानं अर्जंटिनाला एकट्याच्या बळावर जिंकून दिला. अतिशय सामान्य म्हणून गणल्या जाणाऱ्या इटलीच्या नापोली क्लबकडून खेळताना त्याने दोन सिरीज - ए चषक जिंकून दिले. उत्तरार्धात ड्रग्सच्या विळाख्यात अडकल्यामुळे नंतर त्याची कारकीर्द लयाला गेली असली तर आपल्या भरीच्या दिवसातील मॅराडोना हा पेलेपेक्षा उत्कृष्ट फूटबॉलपटू होता, अशी फूटबॉलपंडितांनी त्याला दिलेली वंदना मॅराडोनाच्या फूटबॉल कौशल्याची साक्ष आहे.
९) शेतकरी आंदोलनात खेळाडूंचा सहभाग
The New Indian Express
भाजपशासीत केंद्र सरकारनं आणलेल्या ३ शेतकरी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पंजाब आणि हरियाणातील अनेक खेळाडूही यावर्षी उतरलेले दिसले. पद्मश्री आणि अर्जुन खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित कुस्तीपट्टू करतार सिंग यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात सरकारनं पोलीस बळाच्या केलेल्या वापरला विरोध म्हणून पुरस्कार वापसीची घोषणा केली. बास्केटबॉलपटू सज्जन सिंग आणि हॉकीमधील भारताचा आघाडीचा खेळाडू राजबीर सिंग यांनीसुद्धा शेतकऱ्यांविरोधातील सरकारी मुजोराला विरोध करत अर्जुन पुरस्कार वापसीचा निर्णय घेतला. केंद्रसरकारच्या शेतकरी विरोधातील कायद्यांचा निषेध म्हणून पंजाब, हरियाणासह देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीत ठाण मांडून सरकारला धारेवर धरलंय. या शेतकऱ्यांसोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत,असा स्पष्ट संदेश देत खंबीर राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय देशभरातील खेळाडूंकडून घेण्यात आला. या शेतकरी आंदोलनाला कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उघड पाठिंबा देताना भाजप सरकारच्या जाचक धोरणांना स्पष्ट विरोध करत आपल्या सामाजिक आणि राजकीय कटिबद्धतेचा ठसा उमटवला.
१०) ३६ ऑल आऊट
आपल्या ऑस्ट्रेलिया दोऱ्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्याच्या दुसऱ्या डावात ३६ धावांवर ऑल आऊट होण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढवली. कसोटीच्या इतिहासातील भारतीय क्रिकेट संघाची हा सर्वात खराब कामगिरी ठरली. गुलाबी चेंडूनं खेळवण्यात आलेल्या या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं खरंतर पहिल्या डावात आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या डावात हेजलवूड आणि कमिन्सच्या धारदार गोलंदाजीसमोर भारताचा डाव ३६ धावांवर गुंडाळला गेला. ही कामगिरी इतकी लज्जास्पद होती की भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्येचा टप्पा ओलांडता आला नाही. याआधी १९७४ साली इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्समध्ये भरवल्या गेलेल्या सामन्यात फक्त ४२ धावांवर भारताचा संघ गुंडाळला गेला होता. यावेळी भारतानं यावरही मात करून ३६ धावांवर सर्वबाद हा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मानिमित्त या कसोटीनंतर भारतात परतण्याचा निर्णय कर्णधार कोहलीने घेतला. त्यामुळे उर्वरित सामन्यासाठी भारताचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेनं सांभाळलं. या दौऱ्यातील कसोटी मालिकेआधी ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं २-१, तर ३ टी - २० सामन्यांची मालिका भारातानं २-१ अशी जिंकली होती.