Quick Reads

रशियन क्रांतीतील अनमोल हिरा : बाबुश्किन

७ नोव्हेंबर – रशियन क्रांतीदिन विशेष

Credit : इंडी जर्नल

कोण बाबुश्किन असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. हे नाव आपल्यापैकी बर्‍याच जणांनी कदाचित पहिल्यांदा ऐकलं असेल. लेनिन आणि रशियन क्रांती जगभर माहीत आहे. पण बाबुश्किन माहीत असण्याचे कारण नाही. हा तरुण लेनिन सोबत काम करायचा. लेनिन त्याला 'जनतेचा नायक' म्हणायचे. तो क्रांतिकारक विचारांनी प्रेरित होऊन चळवळीत उतरला होता. १९१७ साली रशियात हजारो कामगार क्रांतीसाठी सज्ज झाले होते. खांद्याला खांदा लावून लढत होते. शोषणसत्तेला हादरे देत होते. त्यातीलच एक होता बाबुश्किन. 

बाबुश्किनची पार्श्वभूमी 

१५ जानेवारी १८७३ साली बोलोग्दा प्रांतात एका गरीब शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. पूर्ण नाव इवान वसील्येविच बाबुश्कीन. लहानपणीच वडील वारल्यामुळे त्याच्या कुटुंबाला अत्यंत दारिद्र्यात कष्टमय जीवन जगावे लागत होते. दहा वर्षांचा असताना तो एका छोट्या दुकानात काम करू लागला. दुकानदार फार निर्दयीपणे वागायचा. चौदाव्या वर्षापर्यंत तो ग्रामीण भागात वाढला. भयानक दारिद्रय व मरणयातनांना कंटाळून तो क्रोन्सताद शहरात पोहोचला. ते एक बंदर होते. तिथे जहाजनिर्मितीचा कारखाना व अन्य छोटे उद्योग होते. मासिक पाच रूबल्स (रशियन चलन) या वेतनावर तो एका कारखान्यात शिकाऊ कामगार म्हणून लागला. बाबुश्किनने एका ठिकाणी नोंदविले आहे की, “तुटपुंज्या पगाराची ती नोकरी टिकवून ठेवणे एवढेच माझे उद्दिष्ट बनले होते. धार्मिक अंधविश्वास, श्रीमंत बनण्याचा हव्यास, सुखी होण्याच्या कल्पनांनी माझे डोके व्यापलेले होते. मी रात्रंदिवस त्याच्याच विचार करीत असे.”

रशियातील शासकवर्ग अधिकच प्रतिगामी बनला होता. सामान्य जनतेवरील अत्याचार वाढत चालले होते. क्रांतिकारकांची धरपकड सुरू झाली होती. पोलिसयंत्रणा क्रूर बनली होती. क्रांतिकारी गटसुद्धा मोठ्या आवेशाने मैदानात उतरले होते. या गदारोळाची बाबुश्किनला काही खबर नव्हती. तो त्याच्याच दुनियेत मश्गुल होता. त्याला वाटायचे, आसपास जे घडत आहे ते पूर्वापार आहे. भूक, गरीबी, महागाई असेच चालत आले आहे. यापुढेही असेच चालत राहणार आहे. आपल्या नशिबाचे भोग, ते भोगलेच पाहिजे. जे नियतीने ठरवून दिले आहे त्याला कोण बदलणार. तो एका संकुचित जगात वावरत होता.

 

Russian Tsarist Regime Hunger and Famine

 

नव्या विचारांचा प्रभाव 

बाबुश्किन हळूहळू एक कुशल कामगार बनला. क्रोन्सताद शहरात त्याने सहा वर्ष वास्तव्य केले. या काळात त्याने 'बेकायदेशीर' गुप्तपत्रक किंवा पोस्टर पाहिले नव्हते. काही कामगारांकडून त्याला कळले की अशी पुस्तके व मासिके असतात. ती बाळगणे व वाचणे कायद्याने गुन्हा आहे. कारण त्यात झारशाहीविरूध्द विचार असतात. त्याच्या कारखान्यात एक वयस्कर कामगार होता. तो अशिक्षित व दारूडा होता. तो सतत व्होडका प्यायचा. जीवनातील दुःख विसरायचा प्रयत्न करायचा. तो सतत बडबड करीत असायचा. भांडवलदारांच्या पिळवणुकीविरूद्ध रागाने खदखदत असायचा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अमानुष वागणुकीबद्दल घृणा व्यक्त करायचा. 

बाबुश्किनच्या कोवळ्या मनावर त्या कामगाराच्या बोलण्याचा खोलवर परिणाम झाला. धर्मगुरूबद्दल तो कामगार म्हणायचा, “धर्मगुरू-पुजारी सगळे लबाड लोक आहेत. हे सामान्य जनांना लुटतात. लोकांच्या श्रध्दांचा फायदा घेतात. देव वगैरे सर्व झूठ आहे. हे थोतांड लोकांना फसविण्यासाठी बनविण्यात आले आहे.” कारखान्यातील मॅनेजर्सबद्दल म्हणायचा, “जरा विचार करा, आपलं रक्त शोषणाऱ्या या मॅनेजर्सची काय गरज आहे. आपल्या श्रमाची लूट करण्यासाठी सतत आपल्या डोक्यावर बसण्याशिवाय ते करतात तरी काय?” हे ऐकून बाबुश्किनच्या अंतर्मनात चलबिचल सुरू झाली. त्याला कळले की पिटर्सबर्ग शहरात जास्त मजूरी मिळते. त्याने पिटर्सबर्गला जाण्याचा निर्णय घेतला.

पिटर्सबर्गजवळ एका कारखान्यात त्याला ‘पिसवर्क’चे काम मिळाले. हे नवीन काम अवघड होते. ठरलेले काम ठरलेल्या वेळेत करावे लागे. या कामातील शिस्त त्याला आत्मसात करावी लागली. ठरलेले काम न झाल्यास पगारकपात होत असे. कामगारांची हाडे पार पिळवटून निघत. लघवीला किंवा शौचाला जाणेही जमत नसे. तशीच कळ काढून काम करावे लागे. वरिष्ठ कामगारांकडून संपाविषयी काही बातम्या कळल्या. ‘नरोदन्या बोल्या’ (जनतेची इच्छा) या संघटनेबद्दल कळले. ती संघटना ‘बेकायदेशीर’ पत्रकं वाटत असे. दडपशाही करणार्‍या अधिकार्‍यांबद्दल त्याला अतिशय तिरस्कार वाटत असे. तो अंगमेहनतीच्या रगाड्यात अडकला होता. सलग दोन-तीन दिवस सुद्धा कामावर असायचा. एकदा तर त्याने सलग साठ तास काम केले. फक्त जेवतांना काम थांबत असे. जणू दुष्टचक्रात तो अडकला होता. तो इतका दमायचा की एकदा घरी परतताना चालता-चालता विजेच्या खांबाला धडकला. त्याने एके ठिकाणी नोंदविले की, “अमानुष कामामुळे कामगारांचे मेंदू थकून जायचे. त्यामुळे  आसपासच्या घटनांचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नसे. सगळे रात्रंदिवस जणू घाण्याला जुंपलेले असायचे.”  त्याने खोलीवर डझनभर पुस्तके जमविली. पण वाचायला वेळच मिळत नसे.

 

कॉ. लेनिनसोबत भेट

एकदा रविवारी सुट्टी मिळाली. बाबुश्किन निवांत होता. नव्यानेच मैत्री झालेल्या कोत्स्या या तरूण कामगारांने त्याला एक पत्रक दिले. 'नरोदन्या वोल्या' या संघटनेने ते काढले होते. त्यात झारशाहीवर टीका करण्यात आली होती. पहिल्यांदाच त्याच्या हातात ‘बेकायदेशीर’ पत्रक पडले होते. त्याने ते वाचले. पण तो खूप घाबरला. या फंदात अडकून त्याचे जीवन उध्वस्त तर होणार नाही ना? त्याच्या मनाची घालमेल झाली. त्याचा स्वतःशीच संघर्ष चालला होता. मनात विचारांचे काहूर माजले होते. पण त्याला मनोमन पटले की पत्रकात जे लिहिलंय ते खरंच आहे. पत्रकात कामगारांना जे आवाहन करण्यात आलं होतं. खरं म्हणजे पत्रकातील सर्व मुद्दे त्याला समजले सुध्दा नव्हते. पण त्यानंतर त्याच्यात अंतर्बाह्य बदल सुरू झाले. त्याने एके ठिकाणी लिहिले की “मी सरकारचा कट्टर विरोधक बनलो. ठरवून टाकले की ध्येयासाठी सर्वस्व झोकून द्यायचे. अगदी जीव द्यावा लागला तरी डगमगायचं नाही.” 

भुरकट दाढी असलेल्या एका वयस्कर अनुभवी कामगाराकडून त्याला काही चांगली पुस्तके मिळाली. बाबुश्किन व कोत्स्या चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन मिळविण्यासाठी त्या भुरकट दाढीवाल्या कामगाराच्या घरी जाऊ लागले. तिथेच कॉ. लेनिन यांच्याशी पहिली भेट झाली. १८९३ चा तो काळ होता. लेनिन भूमिगत होते. ते 'पेत्रोविच' या गुप्त नावाने वावरायचे. नेवस्काया जस्तावा जिल्यातील कामगारांच्या संपर्कात ते होते. तिथे संघटना बांधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कॉ. लेनिनशी बोलताना बाबुश्किन संकोचून गेला होता. स्वतःच्या अज्ञानामुळे तो खजील झाला. त्या चर्चेत त्याला बऱ्याच नव्या गोष्टी कळल्या. मार्क्सवादाशी परिचय झाला. लेनिनने जीवनाकडे बघण्याची जणू नवी दृष्टीच दिली. त्यांच्या विचारांची बाबुश्किनवर छाप पडली. या क्रांतिकारी बुद्धिजीवीबद्दल त्याच्या मनात अपार आदर निर्माण झाला. 

नव्या विचारांनी सज्ज होऊन मैदानात

स्मोलेंस्कायात कॉ. नदेज्या क्रूप्स्काया कामगारांचे भूमिगत अभ्यासवर्ग चालवायच्या. रशियन क्रांतिकारक ठिकठिकाणी असे भूमिगत अभ्यासवर्ग चालवत असत. क्रूप्स्काया क्रांतिकारी बुद्धीजीवी होत्या. कामगारांना जागृत करणाच्या कामात त्या गुंतल्या होत्या. बाबुश्किन त्या अभ्यासवर्गात जाऊ लागला. त्याशिवाय लेनिनच्या अभ्यासवर्गाला सुध्दा तो जात असे. काही काळानंतर नदेज्दा व लेनिन यांचा विवाह झाला. कामगारांना संघटीत करण्याच्या कामात त्या जोडप्याने झोकून दिले होते. लेनिन कार्ल मार्क्सचा 'भांडवल' ग्रंथातील विचार समजावून सांगत. तत्कालिन समाजव्यवस्था बदलण्याबाबत कार्यक्रम मांडत. सिद्धांत आणि व्यवहार यांचा मेळ कसा घालावा याबाबत मार्गदर्शन करत. भुरकट दाढीवाल्या कामगाराच्या घरी हे अभ्यासवर्ग चालत असत. त्यात वर्गसंघर्षाची चर्चा होत असे. पिटर्सबर्ग कामगार चळवळीचे एक कार्यकर्ते पी. ए. मोरोजोव यांच्याशी बाबुश्किनची तिथे भेट झाली. स्वतःला त्यांच्यासारखं घडविण्याचा विचार तो करू लागला. परंतु त्यांची दारू पिण्याची सवय त्याला खटकली. त्याला वाटायचं, ‘वर्ग जागृत समाजवाद्याने दारू पिऊ नये. क्रांतिकारकांचं व्यक्तिमत्व आदर्श असावं.’ अभ्यासातील त्याची गोडी व व्यासंग वाढत चालला होता. भुरकट दाढीवाल्या कामगाराच्या घरी एक ग्रंथालय होतं. पण रविवारची सुट्टी अचानक रद्द होत असे. त्यामुळे पुस्तकं वाचण्यासाठी वेळ मिळत नसे.

नव्याने सुरू झालेल्या एका अभ्यासवर्गात बाबुश्किन सामील झाला. या सायंकालीन पाठशाळा कामगारांना साक्षर करण्याच्या नावाखाली चालविल्या जात. पोलिसांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी असे करावे लागे. इथल्या चर्चेमुळे कामगारांना नवी दृष्टी मिळत असे. त्यांच्या राजकीय जाणिवा विकसित होत असत. या अभ्यासवर्गांना वेगवेगळे क्रांतिकारक गुप्तपणे येत असत. कामगारांचे जीवन अनुभवण्याची व त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची संधी त्यांना इथे मिळत असे. जे कामगार आधीच कुठल्यातरी कामगार संघटनेत सामील झालेले असत, ते कार्यकर्ते शोधण्यासाठी या पाठशाळांना हजेरी लावत. पोलिसांचे खबरे व गुप्तहेरसुध्दा पाठशाळेत  येऊन बसत. त्यामुळे सगळी चर्चा 'संप', 'झार', 'जनविरोधी सरकार', 'मोर्चा' इ. शब्द टाळून केली जाई. सर्व वैचारिक आदान-प्रदान सांकेतिक भाषेत चालत असे. भाषा, व्याकरण, शुध्दलेखन शिकवितांना चाणाक्षपणे कामगारांच्या जाणिवांचा विकास केला जाई. 

 

क्रांतिकारक दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व

एका पाठशाळेत व्याकरण समजावून घेताना बाबुश्किनने 'संप होणार आहे' असे वाक्य फळ्यावर लिहिले. शिक्षिका लिदीया निचोविच त्याच्या जवळ जाऊन हळूच म्हणाल्या, “जर तुला क्रांतिकारक बनायचं असेल तर तसे दाखविण्याचा प्रयत्न करू नकोस की तू क्रांतिकारक आहेस. दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्त्व आहे.” हे ऐकून बाबुश्किन खजील झाला. त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. तशी चूक पुन्हा कधीही न करण्याचा निश्चय त्याने केला. बी. ए. शेल्गुनोव हा कामगार क्रांतिकारी बुध्दिजीवींच्या संपर्कात असायचा. त्याच्या पुढाकाराने बाबुश्किनच्या वस्तीत एक नवा अभ्यासवर्ग सुरू झाला. त्याची सुरूवात 'राजकीय अर्थशास्त्र' या विषयाने झाली. हा विषय शिकवायला स्वतः लेनिन आले होते. पुढे नेवा नदीजवळ जंगलात चालणाऱ्या अभ्यासवर्गाला सुध्दा लेनिन येत असत. बाबुश्किनचे सर्व कामगार मित्र तेथे जमायचे.

१८९४ साली क्रिसमसच्या काळात सेम्यानिकोव कारखान्यात पगार रोखण्यात आला. कामगारांनी वैतागून आंदोलन केले. मालकाने स्वतःला दिवाळखोर घोषित केले. काहीही कारणं सांगून सुटका करून घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. खरं तर त्याने भरगोस नफा कमविला होता. कामगारांच्या घामाच्या कमाईवर डल्ला मारण्याचा त्याचा इरादा होता. पोलिस सुध्दा त्याचीच बाजू घेऊ लागले. कामगार भडकले. त्यांनी कारखान्यात तोडफोड सुरू केली. बऱ्याच कामगारांना अटक झाली. लेनिन त्या भागातच होते. संध्याकाळच्या वेळी ते बाबुश्किनच्या खोलीवर आले. त्यांनी रात्री तिथेच मुक्काम केला. त्यांनी कामगारांना उद्देशून एक पत्रक लिहिले. त्याकाळी पत्रकं छापणं फार कटकटीचं आणि वेळखाऊ काम होतं. त्यामुळे ते हातानेच तयार करायचं ठरलं. लेनिन यांनी रात्रभर जागून आठ-दहा हस्तलिखित प्रति तयार केल्या. पत्रक वाटण्याची जबाबदारी अर्थातच बाबुश्किनकडे आली. कारखान्यात पत्रकं वाटण्याची ती त्याची पहिलीच वेळ होती. त्याच्यावर दडपण आलं होतं. पण त्याने कामगिरी उत्तमपणे पार पडली. कामगार पत्रक वाचून पुढच्या कामगाराकडे देऊन टाकायचे. अशाप्रकारे अल्पावधीतच शेकडो कामगारांनी ती पत्रके वाचली. पहिलीच कामगिरी यशस्वी झाल्याने बाबुश्किनला फार आनंद झाला. त्याचा उत्साह वाढला.

त्याच्या दृष्टीने अत्यंत व्यग्रतेचा व सखोल चिंतनातून स्वतःला विकसित करण्याचा तो काळ होता. कारखान्यातील नेहमीचं काम आटोपून तो प्रत्येक मिनिटाचं नियोजन करायचा. प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करण्यासाठी तो धडपडत असायचा. मध्यरात्री झोपणं, पहाटे चार वाजता उठणं, रविवारचा साक्षरता वर्ग, गुप्त अभ्यासवर्ग, क्रांतिकारक कार्यकर्त्यांशी नियमित संपर्क ठेवणं, भूमिगत क्रांतिकारकांना भेटणं, अशा अनेक कामात तो पूर्ण गढून गेलेला असायचा. अभ्यासवर्गामुळे त्याचा वैचारिक पाया पक्का बनत गेला. तो वेगवेगळ्या कारखान्यात जायचा. कामगारांचे प्रश्न समजावून घ्यायचा. माहिती जमा करायचा. कामगारांना मार्गदर्शन करायचा. स्वतंत्रपणे काम करण्याचं तंत्र त्यानं आत्मसात केलं. स्वबळावर काम करण्याचं कौशल्य त्याच्यात विकसित झालं. थोडक्यात, कामगार वर्गाला तो नेतृत्व देऊ लागला. 

कारखान्यातील अत्यंत बोजड काम करून तो पुरता दमून जायचा. घरी आल्यावर पुस्तकं वाचण्याचं त्राण उरत नसे. तशा परिस्थितीतही मेणबत्तीच्या प्रकाशात तो वाचत बसे. तो पूर्ण झपाटून गेला होता. कामगारांच्या वस्तीत अनेक समस्या असायच्या. पाणी पुरेसे आणि वेळेवर मिळत नसे. सगळीकडे गोंगाट असे. त्याच्या कळकट-मळकट खोलीत एका बारदान्याखाली तो पुस्तकं लपवून ठेवत असे. ती त्याला प्राणाहून प्रिय वाटत. या क्रांतिकारक पुस्तकांमुळेच त्याच्या जीवनाला नवी उभारी मिळाली होती. वर्गसंघर्षाच्या ज्ञानाने आणि क्रांतिकारी तत्त्वज्ञानाने त्याच्या जगण्यातील आनंद द्विगुणित झाला होता. कारखान्यात जादा कामाची सक्ती कामगारांच्या वैचारिक विकासाला बाधक ठरते हे त्याच्या लक्षात आले. त्याने त्याविरूध्द प्रचार सुरू केला.

 

क्रांतिकारी राजकारणाशिवाय मुक्ती शक्य नाही

बाबुश्किनची राजकीय जाणीव वाढत चालली होती. समाजव्यवस्थेत मूलभूत परिवर्तन करण्याची गरज त्याला पटली. त्याच्या शब्दातच सांगायचे तर, “जीवनाच्या खऱ्या रूपाचे दर्शन झाल्याने व जीवन बदलण्याचे तत्त्वज्ञान कळल्याने माझे जीवन अर्थपूर्ण बनले, परिवर्तनाच्या लढ्याचे सौंदर्य मला कळू लागले.” त्याच्या हालअपेष्टा आता केवळ त्याच्या एकट्याच्या नव्हत्या. समस्त कामगार वर्गाच्या वेदनांशी त्याची नाळ जोडली गेली होती. कोत्स्यासह तो कापड गिरणीतील कामगारांमध्ये जाऊ लागला. कामगारांचे जनावरासारखे जीवन व दुर्गंधमय वातावरणाने त्यांचा राग अनावर होई. कामगारांच्या श्रमावर धनवंत बनणाऱ्या भांडवलदारांचा त्यांना तिरस्कार वाटे. कामगारांचे अज्ञान व बेफिकीर वृत्तीची चीड येत असे. अज्ञानामुळेच कामगारांना या मरणयातना भोगाव्या लागत आहेत. बाबुश्किनच्या मनात विचार चमकला, ‘या अंधाराला प्रकाशकिरणांची गरज आहे.’ तो या विचाराने बेचैन झाला की, ‘माणसं इतक्या नरकयातना का सोसतात?’ 

त्याचा बऱ्याच जणांशी वाद व्हायचा. दयनीय परिस्थितीशी जुळवून घेतलेले लोक म्हणायचे, ‘हे असेच चालत आले आहे, ते असेच चालू राहणार आहे.’ परिवर्तनाच्या चळवळीला विरोध करणाऱ्या भांडवलदारांच्या बगलबच्च्यांना तो सडेतोड उत्तर देऊ शकत नसे. वादविवादांमध्ये निरूत्तर होत असे. परंतु निराश न होता प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा तो प्रयत्न करीत असे. ज्ञान वाढविण्यासाठी धडपडत असे. परिवर्तनाची विचारधारा व राजकारण समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असे. त्याच्या लक्षात आले की केवळ शोषण व दडपशाही विरूध्द नाही तर शोषितवर्गाच्या अज्ञानाविरूध्द सुध्दा लढलं पाहिजे. पिळणाऱ्या व्यवस्थेविरूध्द समस्त शोषितांनी राजकीयदृष्ट्या जागृत झाल्याशिवाय परिस्थिती बदलता येणार नाही, या मताला तो पोहोचला. 

 

क्रांतीचा खरा मार्ग कोणता ?

‘बेकायदेशीर’ पुस्तकं आणि पत्रकं मिळविण्याच्या प्रयत्नात तो ‘जनतेची इच्छा’ (नरोदनीक) या संघटनेच्या संपर्कात आला. झार राजाचा महाल बाँबने उडविणे किंवा झार तसेच इतर अधिकाऱ्यांच्या हत्या करण्याची योजना नरोदनीक आखायचे. शोषण करणारी व्यवस्था नष्ट करण्याच्या या योजना बाबुश्किनला दिवास्वप्न वाटायच्या. नरोदनीकांबद्दल त्याचा भ्रमनिरास झाला. कारण नरोदनीक कामगारांना संघटीत करीत नसत. जनतेची क्रांतिकारी चळवळ संघटीत करण्याची योजना त्यांच्याकडे नसे. पूर्णपणे साहसवादावर त्यांचा विश्वास होता. ते केवळ घातपाती कारवायांमध्ये गुंतले होते. नरोदनीक शेतकऱ्यांना रशियन क्रांतीचा मुख्य कणा मानत. शेतकऱ्यांच्या कम्युनला (सामुदायिक जीवन) ते समाजवादाचा मूलभूत पाया मानत. झारशाहीला संपविण्यासाठी त्यांचा केवळ घातपाती कारवायांवर भर होता. बाबुश्किनला मात्र सामुदायिक सशस्त्र संघर्षाची गरज जाणवत होती. म्हणजे केवळ मूठभरांनी नाही तर समस्त जनतेने शस्त्र उचलण्याची आवश्यकता आहे, हे त्याला पटले होते.

सामाजिक जनवादी कार्यकर्ते म्हणजे तत्कालिन क्रांतिकारी रशियन क्रांतीमध्ये कामगारवर्गाला प्रमुख क्रांतिकारी शक्तीच्या रूपात बघत असत. क्रांतिकारी जनचळवळी मार्फत हे लोक रशियन क्रांतिचा विचार मांडत असत. कामगारवर्गाला स्वतः पुढाकार घेऊन व शेतकरी तसेच समस्त कष्टकरी वर्गाला सोबत घेऊन झारशाही व भांडवलशाही संपविण्याची ऐतिहासिक कामगिरी पार पाडावी लागेल, अशी त्यांची मांडणी होती. शेतकरी व समस्त शोषित जनतेचे राजकीय नेतृत्व करण्याची क्षमता कामगारवर्गात आहे असे त्यांचे मत होते. त्यांचे नेते लेनिन मांडायचे की, ‘वर्गसंघर्षाच्या माध्यमातून शासनयंत्रणा नष्ट करून कामगारवर्ग स्वतःसह समस्त कष्टकरी वर्गाची पिळवणुकीतून मुक्तता करेल.’ बाबुश्किनला हे पटले होते. त्यामुळे नरोदनीकांशी संबंध तोडून तो सामाजिक जनवादी क्रांतिकारकांमध्ये सामील झाला होता.

 

क्रांतिकारकांचा दृढनिश्चय

कारखाने, पाठशाळा, बाजार व क्लब अशा सर्व ठिकाणी गुप्तहेरांचे जाळे विणलेले असे. शेकडो लोकांना अटक व्हायची. पित्यासमान असणाऱ्या त्या भुरकट दाढीवाल्या कामगाराच्या अटकेमुळे बाबुश्किन फार खिन्न झाला. अटक होशील, आयुष्य उध्वस्त होईल अशी भीती काही लोक त्याला दाखवायचे. परंतु तो डगमगला नाही. पुढे जिवलग मित्र कोत्स्याला सुध्दा अटक झाली. तेव्हा बाबुश्किनचा उत्साह जरा मंदावला. त्याच्या वेगवान हालचालींना धक्का बसला. पण या पडझडीतून तो लवकरच सावरला. पिछेहाटीच्या या काळात क्रांतिकारी अभ्यासवर्गात मात्र खंड पडला नाही. बऱ्यावाईट अनुभवामुळे त्याचा कणखरपणा वाढला. एका क्रांतिकारकाचा दृढनिश्चय त्याच्यात आकार घेत होता. त्या काळातील त्याच्या मानसिक अवस्थेबद्दल त्याने लिहिले, “जर कोणी अटक झाला तर मी माझे काम का थांबवावे? त्यांच्या चौकशी आणि दडपशाहीला मी तोंड देईन. दमनयंत्रणेचा पोलादी निश्चयाने सामना करीन. पण मी हे करू शकेन का? नक्कीच! मी खंबीर झालेच पाहिजे. हेच तर मला दाखवून द्यायचे आहे की मी माझी तत्त्वे, माझे ध्येय कधीच सोडणार नाही. मग अटकेला का घाबरायचे? 

एफए नावाचा एक क्रांतिकारक होता. त्याला वारंवार अटक होत असे. त्याने बाबुश्किनला क्रांतीची गाणी शिकविली होती. ती गाणी गुणगुणत एफए स्वतःच्या कामात गढलेला असे. संकटाच्या आणि एकाकीपणाच्या काळात बाबुश्किन सुद्धा ती गाणी गुणगुणत उत्साह व उमेद टिकवून ठेवायचा. ती गाणीच त्याचं मनोबल वाढवायची. 

 

कामगारांचा हीरो बाबुश्किन

जादा कामाविरूद्ध कामगारांचा लढा यशस्वी ठरला. बाबुश्किनच्या सततच्या प्रयत्नामुळे व कामगारांच्या चिवट संघर्षामुळे हे यश मिळाले. कामगार बाबुश्किनवर फार खूष झाले. असंख्य कामगार त्याला ओळखू लागले. कामगार नेता म्हणून त्याच्याकडे उमेदीने बघू लागले. प्रश्न व अडचणी घेऊन त्याच्याकडे येऊ लागले. तो सर्वांना तत्परतने मदत करीत असे. अडचणी सोडवत असे. त्यांना मार्गदर्शन करीत असे. त्यांच्या सुखदुःखात सामील होत असे. अशाप्रकारे तो कामगारांचा हिरो बनला.

प्रत्येक रविवारी सहकाऱ्यांसह तो नेवा नदीच्या किनारी अभ्यासवर्ग चालवू लागला. कामगारांमध्ये पुस्तकं आणि पत्रकं वाटायचं काम नियमित चालू होतं. नवे अभ्यासवर्ग सुरू करण्याच्या योजना आखल्या जात होत्या. पिटर्सबर्ग येथे कामगारांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. नेव्स्की गेट जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून दोन कामगारांसह बाबुश्किन स्वतः उपस्थित राहिला. वर्ग जागृत आणि राजकीय दृष्ट्या सजग कामगार तिथे जमले होते. वयाने व अनुभवाने मोठ्या असलेल्या कामगारांपुढे बाबुश्किन दबून जायचा. अशा सभेला उपस्थित राहण्याचा व भाषण करण्याचा त्याचा तो पहिलाच प्रसंग होता.

 

सिध्दांत व व्यवहार यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न

१८९५ सालापर्यंत अनेक कामगार मंडळे निर्माण झाली होती. प्रत्येक मंडळाचे स्वतंत्र अभ्यासवर्ग चालत. जर्मनी व स्वित्झर्लंड येथील हद्दपारी भोगून लेनिन परत आले होते. त्यांच्या सुचनेनुसार कामगार मंडळांना एकत्रित करून 'मुक्तिसंग्राम संघटना' बनविण्यात आली. वेगवेगळ्या ट्रेडयुनियनशी संबंध प्रस्थापित करणे, त्यांना राजकीय नेतृत्व देणे, सर्वसामान्य कामगारांच्या दैनंदिन लढ्यांना व्यापक राजकीय चळवळीशी जोडणे इ. जबाबदाऱ्या या नव्या संघटनेने पार पाडायच्या हे ठरले. 

या नव्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकण्यास बाबुश्किन सुरूवातीला तयार नव्हता. या नव्या कामामुळे अभ्यासवर्ग बंद पडतील, राजकीय शिक्षण व ज्ञानार्जनात खंड पडेल अशी शंका त्याला वाटायची. लेनिनने  त्याचे शंकानिरसन केले. त्यांनी बाबुश्किनला समजावले की आपण चर्चा, वाचन व अभ्यास हे चळवळ उभी करण्यासाठीच तर करत असतो. मग नव्या संघटनेच्या कामात सहभाग का नको? बाबुश्किनला हे पटले. त्याने नवी जबाबदारी शिरावर घेऊन कामात झोकून दिले.

'मुक्तिसंग्राम संघटना' रशियातील पहिली कामगार संघटना, जिने समाजवादाला कामगार चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट ठरविले. सभासदांमार्फत संघटनेला कामगारवर्गाची खडानखडा माहिती मिळत असे. बाबुश्किनसारखे बरेच कामगार घडत होते. ते सगळीकडची माहिती आणायचे. त्याआधारे पत्रकं आणि छोट्या पुस्तिका छापल्या जात. १८९५ च्या हिवाळ्यात लेनिन यांनी धॉर्नटन कापड गिरणीतल्या कामगारांना उद्देशून एक पत्रक लिहिले. दीर्घ लढ्यातून तेथील कामगारांनी विजय मिळवला होता. अनुभवाअंती बाबुश्किनला हे पटले होते की अभ्यास व आंदोलन या गोष्टींना चळवळीत समान महत्त्व आहे. सिध्दांताशिवाय व्यवहाराला दिशा मिळणार नाही आणि व्यवहाराशिवाय सिद्धांत पुस्तकी व वांझोटा राहील. सिध्दांत व व्यवहार या दोन्हींचा मेळ घालणे आवश्यक असते. 

पत्रकं आणि पुस्तकांमुळे कामगारांमध्ये जागृती वाढत होती. संघटनेने स्वतःचा 'बेकायदेशीर' छापखाना उभारला. 'राबोचये देलो' (कामगारांचे हित) हे वर्तमानपत्र काढायचे ठरले. पहिल्या अंकाचा मजकूर तयार करण्यात आला. तेवढ्यात पिटर्सबर्गमध्ये मोठ्या प्रमाणात अटकसत्र सुरू झाले. लेनिन यांना सुध्दा अटक झाली. वर्तमानपत्राचं काम ठप्प झालं. पहिला अंक निघू शकला नाही. अटकसत्राच्या विरूध्द बाबुश्किनने सहकार्‍यांच्या मदतीने एक पत्रक मात्र काढले. समाजवादी क्रांतिकारक कोण आहेत, याबद्दल पत्रकात विवेचन करण्यात आले होते. तत्कालिन सरकार ज्यांना गुन्हेगार ठरवतेय ते खरंतर कष्टकऱ्यांना शोषणव्यवस्थेच्या जोखडातून सोडविण्यासाठी झटणारे लोक आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी सज्ज झालेले क्रांतिकारक आहेत. हा मुद्दा पत्रकात ठासून मांडण्यात आला होता.

 

 

बाबुश्किनला अटक

वरिष्ठ नेत्यांच्या अटकेमुळे सर्व जबाबदारी बाबुश्किनवर येऊन पडली होती. अभ्यासवर्ग चालविणं, ठिकठिकाणच्या कामगार मंडळांना मार्गदर्शन करणं, अशी सर्व कामं बाबुश्किनला करावी लागत होती. कधी-कधी त्याला वाटायचं, नेतृत्व आणि मार्गदर्शन देण्याची पुरेशी कुवत त्याच्यात नाही. पण समोर आलेली जबाबदारी पेलणे भाग होते. तो परिस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असे. त्याच्यात नेतृत्व देण्याची क्षमता विकसित होऊ लागली होती. संघटनेत नसलेल्या कामगारांची मानसिकता समजावून घेण्याचा सुद्धा तो आटोकाट प्रयत्न करायचा. पिटर्सबर्गचे क्रांतिकारक कार्यकर्ते त्या भागावर नजर ठेवून होते. ते बाबुश्किनला मदत करीत. परंतु दैनंदिन कामातील अडचणी सोडविणं, पत्रकं लिहिणं इत्यादी कामं बाबुश्किनला स्वतः करावी लागत. पोलिसांची दडपशाही प्रचंड वाढली होती. 

बाबुश्किनने लिहिलेल्या ‘आपलं जीवन व त्यांचं जीवन: कामगारांनी काय जाणलं पाहिजे?’, ‘कामगारांनी कशासाठी लढलं पाहिजे?’ या पत्रकांनी कामगारांमध्ये नवं चैतन्य निर्माण केलं. त्याने पत्रकं व पोस्टरची जणू एक लाटच आणली. अनेक पत्रकं जिकडे-तिकडे दिसू लागली. कारखान्यात असलेल्या संघटकांपर्यंत तो अत्यंत कौशल्याने पत्रकं पोहचवित असे. मग ती हातोहात सर्व कामगारांपर्यंत पोहोचत असत. त्याच दरम्यान १८९६ सालात रात्रीच्या वेळी त्याच्या घरावर पोलिसांची धाड पडली. त्या ठिकाणी आक्षेपार्ह साहित्य मिळालं नाही. केवळ संशयाच्या आधारे त्याच्यावर कारवाई झाली. पोलिसांनी सुडबुद्धीने त्याला या प्रकरणात गोवलं. त्याला तुरूंगात डांबण्यात आलं. तेरा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला.

 

बाबुश्किनची हद्दपारी

१८९७ सालच्या मार्च महिन्यात बाबुश्किनची सुटका झाली. पोलिसांनी त्याचा धसका घेतला होता. तो पुन्हा कारवाया सुरू करेल म्हणून त्याला हद्दपार करण्यात आलं. पिटर्सबर्गच्या दक्षिणेला येकातरीनोस्लाव या प्रदेशात त्याची रवानगी करण्यात आली. तिथे एका ज्यू कामगाराकडे त्याने खोली भाड्याने घेतली. स्थानिक पोलिसस्टेशनला त्याला हजेरी लावावी लागे. पोलिस त्याच्यावर सतत लक्ष ठेवून असत. रोज पहाटे उठून कामाच्या शोधात तो कारखान्यांच्या गेटवर जात असे. तिथे बेरोजगारांची गर्दी असे. सात महिन्यानंतर एका पोलाद कारखान्यात काम मिळाले. एका फोरमनने 'स्टील फायलिंग' चे काम शिकाऊ उमेदवार म्हणून त्याला दिले. जवळपास दोन वर्ष काम न केल्यामुळे हाताचा कणखरपणा कमी झाला होता. तो अक्षरशः मेटाकुटीला येत असे. शेवटी वैतागून त्या इटालियन फोरमनने त्याला कामावरून काढून टाकले. बाबुश्किन उदास मनाने घरी परतला. त्याला वाटले धातू उद्योगात काम करण्याची त्याची क्षमताच संपली. काही दिवस लोखंडाच्या सळ्या वाकवून त्याने पंजा व मनगटाची शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला. नंतर कंटाळून तो प्रयत्न सोडून दिला.

पिटर्सबर्गवरून हद्दपार झालेल्या काही ओळखीच्या कामगारांशी त्याची भेट झाली. पुढे बरीच धडपड केल्यावर ‘ब्रियान्सक वर्क्स’ या कारखान्यात त्याला काम मिळाले. काम तसे अवघड होते. ते करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करीत असे. कारखान्याचे व्यवस्थापक व निरीक्षक सतत कामगारांच्या डोक्यावर उभे असत. जास्तीत जास्त काम काढून घेण्यासाठी ते दबाव आणत. दिलेले काम वेळेत पूर्ण न झाल्यास कामगारांना दंड होत असे. दंडाची रक्कम पगारातून कापली जाई. याबाबत एकदा त्याचे फोरमनशी भांडण झालं. शेवटी त्याला हे काम सुध्दा सोडावे लागलं. 

दरम्यान इथे त्याने रविवारचा अभ्यासवर्ग सुरू केला होता. पण तो नियमित चालत नसे. कामगारांना रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामावर बोलावले जाई. काम सुटल्याने त्याच्याकडे मोकळा वेळ होता. त्या वेळेत तो ड्राफ्ट्समन व ड्रॉईंगच्या क्लासला जाऊ लागला. पण तिथला शिक्षणाचा दर्जा चांगला नसल्याने त्याने ते अर्ध्यातच सोडून दिले. नवे काम शिकण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. कामगारवर्गाच्या समस्या, चळवळ व समाजवाद इ. विषयांवर सहकाऱ्यांशी चर्चा होत असे. त्या भागात चळवळ कमकुवत होती. सहा-सात महिन्यांच्या वास्तव्यात त्याला तिथे केवळ एक पत्रक बघायला मिळालं. 

कारखान्यांची परिस्थिती व कामगारांच्या ज्वलंत समस्यांची माहिती गोळा करण्याचे अभ्यासवर्गात ठरले. या कामासाठी तीन सदस्यांची समिती बनविण्यात आली. नवी संघटनासुध्दा स्थापन करण्यात आली. तिथे कामगार चळवळीचा पाया रोवण्यात आला. या कामात बाबुश्किनचा पुढाकार होता. नित्यनवी पत्रकं निघू लागली. कामगारांच्या बैठका होऊ लागल्या. कामगारांमध्ये लढण्याची उर्मी निर्माण होऊ लागली. पोलिस सावध झाले. गुप्तहेरांची नजर रोखली गेली. कामगारांमध्ये कोण जागृती करीत आहे याचा ते शोध घेऊ लागले.

 

अडचणींवर मात करणे हा स्वभाव बनला

पोलिसांना चकविण्यासाठी खोलीची लाईट चालू ठेवून बाबुश्किन मागच्या दाराने बाहेर पडायचा. त्यावेळी मध्यरात्र उलटून गेलेली असायची. कुठे भिंतीवर चिटकवून, कुठे अंगणात ठेवून, कुठे गेटवर तारेला लटकवून, कुठे झाडाच्या ढोलीत लपवून, तर कुठे मित्राच्या खांद्यावर उभा राहून उंचावरील तावदानातून कारखान्याच्या आत पत्रके टाकून पहाटेच्या वेळी तो खोलीवर परतायचा. त्या-त्या ठिकाणचे संघटक ती पत्रकं सर्व कामगारांमध्ये वाटून टाकत. दुसर्‍या दिवशी हातोहाती ती पोहोचलेली असत. याचा चांगला परिणाम जाणवू लागला. कामगारांसाठी दवाखाना सुरू करण्याची मागणी कोमेन्स्कोये कारखान्यातील पत्रकात करण्यात आली होती. तिथल्या व्यवस्थापनाला दवाखाना सुरू करणे भाग पडले. सतत निघणाऱ्या पत्रकांमुळे कामगारांमधील शिथीलता दूर होऊ लागली. त्यांचा आत्मविश्वास वाढू लागला. वर्गीय एकीच्या ताकदीचा प्रत्यय त्यांना येऊ लागला. 

कामगारांच्या अभ्यासवर्गात मार्गदर्शन करण्यासाठी बाबुश्किनला जावे लागत असे. सतत नवी पत्रकं काढण्याचा तगादाही त्याच्यावर असे. लांबवर असलेल्या काऊदाकी गावात अभ्यासवर्ग घेण्यासाठी तो जात असे. तिथून परतायला मध्यरात्र होई. जिथल्या कामगारांनी कोणतेच पत्रक कधी पाहिले नव्हते, अशा भागात सुध्दा बाबुश्किनच्या प्रयत्नामुळे पत्रकं निघू लागली. पत्रकाचा मजकूर तयार करण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. यामुळे त्याचं व्यक्तिमत्त्व आणखी विकसित झालं. समोर आलेल्या परिस्थितीला भिडणं, अडचणींवर मात करणं आता त्याचा स्वभाव बनला होता.

 

कामगारांचा क्रांतिकारक कम्युनिस्ट पक्ष 

१८९८ मध्ये मुक्तिसंग्राम संघटनेच्या विभिन्न शहरातील प्रमुख सदस्यांना एकत्र आणून ‘रशियन सामाजिक जनवादी कामगार पार्टी’ (कामगारांचा क्रांतिकारक कम्युनिस्ट पक्ष) बनविण्यात आली. बाबुश्किनने त्याच्या भागात पार्टीची येकातेरीनोस्लाव कमेटी बनवली. दरम्यान पार्टी कमेटीचा एक सभासद पोलिसांच्या भितीमुळे मागे सरकला. न डगमगता बाबुश्किनने वाटचाल चालूच ठेवली. पुढे काही नवे सभासद मिळाले. त्यामुळे पार्टी कमेटी चांगल्याप्रकारे काम करू लागली. लढ्यातील चढउतार पचविण्याची सवय त्याला झाली होती. चांगल्या पगाराच्या अपेक्षेने पार्टीचे दोन सभासद आस्ट्रेलियाला निघाले. तेव्हा बाबुश्किनला फार वाईट वाटले. त्याच्या मनात विचार आला, कामगार चळवळीपेक्षा यांना स्वतःची चामडी वाचविण्याची जास्त काळजी आहे.

१८९८ च्या हिवाळ्यात कामाचा व्याप चांगलाच वाढला. ठिकठिकाणी आंदोलनं होऊ लागली. या धावपळीत वाचन व अभ्यासासाठी वेळ मिळत नसल्याने बाबुश्किन अस्वस्थ व्हायचा. कमेटीच्या एका वयस्कर सभासदाला अटक झाली. दूरवरच्या शहरातील क्रांतिकारकांशी या सभासदाचा संपर्क होता. त्याच्या मार्फत प्रचारसाहित्य, आर्थिक मदत व अभ्यासवर्गाचे शिक्षक येत असत. या अटकेनंतर शहरातील लोकांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी बाबुश्किनवर येऊन पडली. १८९९ च्या उन्हाळ्यात निझनेद प्रेवस्कीच्या कामगारांनी बाबुश्किनशी संपर्क साधला. तिथे अनेक दैनंदिन समस्या होत्या. कामगारांना लिहिता-वाचता येत नव्हतं. त्यांनी वर्णन केलेल्या घटनांच्या आधारे बाबुश्किन पत्रक तयार करीत असे. पत्रक वाटण्याचं आणि कामगार संघटना बनविण्याचं प्रशिक्षण कामगारांना देत असे. बाबुश्किनच्या मार्गदर्शनात त्या कामगारांनी ‘सुरूवात’ नावाची संघटना बनवली. 

या भागात अनेक कामगार दारूडे होते. बाबुश्किनच्या प्रयत्नांमुळे बऱ्याच जणांनी दारू सोडली. काही कामगारांनी दारू पिणं कमी केलं. १८९९ च्या हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात कामगार कपात सुरू झाली. त्या विरोधात एक नवी संघटना मैदानात उतरली. त्या संघटनेच्या लोकांनी भांडवलशाही उत्पादन पद्धतीचं अंतरंग समजून न घेता अनेक मागण्या करण्यास सुरूवात केली. उदा. फ्रांस-रशियन कंपनीने स्वतःच्या उत्पादन क्षमतेचा पुरेपूर उपयोग करावा, सरकारने कारखान्यांचा माल खरेदी करावा. बाबुश्किनने त्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला की भांडवलशाही समाजातील उत्पादन क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्यास कुचकामी ठरते. काही कामगारांचा असा गैरसमज झाला की बाबुश्किन भांडवलदारांचे छुपे समर्थन करीत आहे. सरतेशेवटी पार्टी कमेटीने एक पत्रक काढले. त्यात असे मांडले की कामगार कपात अजिबात करू नये. फार तर कामाच्या वेळेत जास्तीत-जास्त दोन तासांची कपात करावी. ज्यामुळे प्रत्येकाला काम मिळत राहील. अशाप्रकारे कोणत्याच कामगारावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार नाही. कामगार प्रतिनिधींच्या सुचना व्यवस्थापनाने स्विकारल्या. ही मागणी करण्यामागे हेतू असा होता की उत्पादनाला उठाव मिळाल्यावर कामगार दहा तासांऐवजी आठ तासांच्या कार्यदिवसाचा आग्रह धरतील. पुढे काही दिवसांनी असेच घडले.

 

पत्रकाच्या माध्यमातून जागृती 

बाबुश्किन या भागात क्रांतिकारी बुद्धिजीवींचा सतत शोध घेत होता. त्याला ठिकठिकाणी अभ्यासवर्ग सुरू करायचे होते. त्यासाठी क्रांतिकारक शिक्षकांची गरज होती. येकातेरीनोस्लावमध्ये पत्रकं वाटणारे सुरूवातीला चार-पाच जणच होते. बाबुश्किनच्या प्रयत्नांमुळे ही संख्या वाढली. जवळपास पंचवीस ते तीस नवे कार्यकर्ते मिळाले. पत्रकं वाटणारी ही टीम एका तासात सगळ्या शहरात पत्रकं वाटून घरी परतत असे. भिंतीच्या खोबणीत, विजेच्या खांबाच्या चौकटीत, चौकातील टपरीच्या आढ्यात पत्रकं लपवून ते पसार होत. त्या-त्या  भागातील कामगार ती पत्रकं घेऊन आपापल्या कारखान्यातील कामगारांपर्यंत पोहोचवित असत. बाबुश्किनने पत्रक वाटप करणाऱ्या टीमला उत्तम प्रशिक्षण दिलं होतं. दोन वर्षांच्या कालावधीत एकही साथी पोलिसांच्या तावडीत सापडला नाही.

१ मे कामगार दिनाची हजारो पत्रकं छापून अर्ध्या रात्रीत सगळीकडे पोहोचली. छापखान्यात स्वतः बसून बाबुश्किनने खिळे जुळविले. दुसऱ्या एका साथीदाराने रोलर फिरवला. तिसऱ्या साथीदाराने कागद फिरवला. अशाप्रकारे पत्रकांची छपाई त्यांनी स्वतःच केली. अत्यंत गुप्तता पाळून बाबुश्किन सर्व काम करीत असे. खंबीर व अविचल लोकांनाच अशा गुप्त कामात लावण्याचा त्याचा कटाक्ष असे. बऱ्याचडा नदी पार करीत असतांना, नाव वल्हवताना मिटींग आटोपली जाई. १९०० सालच्या जानेवारी महिन्यात ‘दक्षिणेकडचे मजूर’ या नावाचे वृत्तपत्र निघाले. त्या वृत्तपत्राचे वितरण करण्याच्या कामात बाबुश्किनचा पुढाकार होता. बाबुश्किनवर आता पोलिसांची नजर रोखली गेली होती. एकदा अचानक त्याच्या खोलीची झडती घेण्यात आली. पण आक्षेपार्ह असे काहीच न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आले. १९०० सालाच्या मध्यात त्याच्या हद्दपारीची मुदत संपली. तो पिटर्सबर्गला परतला. 

 

इस्क्राचा बातमीदार आणि क्रांतिकारक बुद्धीवंत

लेनिन काही वर्ष हद्दपार होते. त्या काळात त्यांनी राजकीय वृत्तपत्र 'इस्क्रा' (ठिणगी) विदेशातून प्रकाशित करण्याची योजना आखली होती. परत आल्यावर ते पेस्कोव या गावी राहत होते. त्याच काळात म्हणजे १९०० सालच्या उन्हाळ्यात बाबुश्किन त्यांचा शोध घेत होता. त्यांच्याशी संपर्क कसा साधावा या विचारात तो होता. त्याला लेनिनची बहिण भेटली. तिच्याकडून लेनिनचा ठावठिकाणा कळला. तो तडक तिथे पोहोचला. भेटून दोघांना खूप आनंद झाला. नंतर अनेकदा ते भेटले. इस्क्राचा पहिला अंक काढण्याची तयारी झाली होती. रशियात ठिकठिकाणी असलेल्या क्रांतिकारकांना ‘इस्क्रा’ एका सुत्रात आणेल. वर्गजागृत कामगारांना नवी दिशा देईल, असा लेनिन यांचा विचार होता. त्यांना बाबुश्किनच्या मदतीची गरज होती. अगदी योग्य वेळी माग काढत तो त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. नवी जबाबदारी पार पाडण्यासाठी तो सज्ज झाला. इस्क्राचा तो पहिला बातमीदार आणि वितरक बनला.

१९०० सालच्या डिसेंबर महिन्यात इस्क्राचा पहिला अंक प्रकाशित झाला. विदेशात प्रकाशित होऊन ते गुप्त मार्गाने संपूर्ण रशियात पोहोचत असे. बाबुश्किनने इस्क्रासाठी अनेक बातम्या, वृत्तांत व लेख लिहिले. ओरोखोवा जुयेवा येथील पोलाद कामगारांच्या आरोग्याच्या समस्या, इवानोवा-वोजनेसेन्स्क मधील शोषण व दमनाच्या बातम्या, शुयाच्या कापडगिरणीतील महिला कामगारांची दुरावस्था, वोगोरोस्क कारखान्याने कामगारांना दिलेल्या घरांची दयनीय अवस्था, मोरोजोव कारखान्यातील अमानुष कार्यपद्धती, अशा अनेक बातम्या बाबुश्किनने पाठविल्या. वर्षभर त्या विविध अंकात प्रकाशित झाल्या.

कॉ. एक्सेलरॉड यांना पाठविलेल्या पत्रात लेनिन यांनी बाबुश्किनचा उल्लेख खास मित्र असा केला आहे. बाबुश्किनने लिहिलेला इवानोवो वोज्नेसेन्स्क येथील १ मे कामगार दिनाचा वृत्तांत तर लेनिन यांना फारच आवडला. बाबुश्किन सतत वेगवेगळ्या शहरांमध्ये जात असे. तेथील कामगार परिस्थितीचा गाढा अभ्यास तो करीत असे. शेकडो कामगारांशी त्याचा संपर्क होता. इस्क्रासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या बातमीदारांमध्ये त्याची गणती होऊ लागली होती.

 

भांडवली विचारवंतांना सडेतोड उत्तर

भांडवलदारांचे वृत्तपत्र ‘रशियन वेल्थ’ मध्ये दादोनोव यांनी लेख लिहिला. त्यात कामगारांवर टीका करण्यात आली होती. त्याला सडेतोड उत्तर देणारा लेख बाबुश्किनने लिहीला. त्याने कामगारांची बाजू अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने मांडली. ऑक्टोबर १९०१ साली इस्क्राच्या अंकात हा लेख छापून आला. दादोनोवने लेखात कामगारांना दारूडे, नशेबाज, अडाणी व असंस्कृत म्हटले होते. लेनिनने बाबुश्किनला निरोप पाठविला. भांडवली विचारवंताच्या त्या लेखाला उत्तर देण्याची सूचना केली. बाबुश्किन लेखणी घेऊन मैदानात उतरला. भांडवलदारांनी टाकलेल्या तुकड्यावर उड्या मारणाऱ्या दादोनोवला त्याने चारीमुंड्या चीत केले. त्याने सोदाहरण पटवून दिले की भांडवदार स्वतः दारूमध्ये बुडालेले असतात. ते कामगारांच्या श्रमावर जगतात व मजा मारतात. त्याने समस्त भांडवलदार वर्गाला कटघऱ्यात उभे केले. त्याने मांडले की भांडवलदारांमुळेच कामगार अज्ञान व निराशेच्या खाईत लोटले जातात. त्यातून ते दारूच्या आहारी जातात. दादोनोवच्या लेखात कामगारांनी आधुनिक कपडे घालण्यावर आक्षेप होता. बाबुश्किनने लिहिले की कष्टकऱ्यांनी कमीत कमी गरजांवर जगावे. भांडवलदारांचे भांडवल वाढविण्यासाठी जिवंत राहावे असे निर्लज्ज शासकवर्गाला वाटते. वर हे तुमच्या नशिबातच होते असे सांगून तो कष्टकऱ्यांना नियतीच्या 'न्यायचक्रात' अडकवतो. ‘कष्टकऱ्यांनी अल्पसमाधानी असावे’ दादोनोवच्या या मुद्यावर तो तुटून पडला. त्याने दादोनोवोच्या लेखात मांडलेल्या मुद्यांच्या चिंधड्या उडवल्या.

 

पार्टीचा खंदा कार्यकर्ता

बाबुश्किन जिकडे जाई तिकडे पार्टीच्या कामात स्वतःला झोकून देत असे. ‘इस्क्रा’ केवळ विचारांच्या प्रसाराचा मंच नव्हता तर ते नियतकालिक संघटकाची भूमिका देखील पार पाडत होते. मॉस्कोत असताना कॉ. एन. इ. बॉमन यांच्यासोबत इस्क्राभोवती सामाजिक-जनवादी कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी बाबुश्किन झटला. हे काम करत असताना तो एकातेरीनोस्लावला पोहोचला. १९०१ च्या डिसेंबर महिन्यात त्याला अटक झाली. तुरूंगात डांबण्यात आले. आत अडकल्याने राजकीय काम थांबले. तो अस्वस्थ झाला. संधी मिळताच १९०२ च्या उन्हाळ्यात सहकाऱ्यांसह तुरूंगाच्या खिडकीचे गज कापून तो पसार झाला. तेथून तो पिटर्सबर्गला पोहोचला. कार्यकर्त्यांना संघटीत करणं, राजकीयदृष्ट्या जागृत करणं या कामात तो आता तरबेज बनला होता. 

त्याच्या खिलाडू वृत्तीवर आणि कार्यपद्धतीवर लेनिन फार खूश असायचे. पिटर्सबर्ग संघटना समितीचे सदस्य वी. पी. क्रूस्नूखा यांना डिसेंबर १९०२ ला अटक झाली. तेव्हा लेनिन यांनी येलेना जत्सोवाला पत्र लिहून त्या समितीवर बाबुश्किनची नेमणूक करण्याची सूचना केली. येलेनाने माणसे कमी असल्याबद्दल कळविले. १६ जानेवारी १९०३ ला लेनिन यांनी येलेनाला कळविले की जोपर्यंत त्यांच्याकडे बोग्दान (बाबुश्किनचे भूमिगत अवस्थेतील गुप्त नाव) आहे, तो पर्यंत माणसं कमी असल्याची तक्रार करण्याला अर्थ नाही. यावरून हे लक्षात येतं की पार्टीमध्ये बाबुश्किन किती महत्त्वाची भूमिका बजावीत होता.

 

संधीसाधू अर्थवाद्यांशी लढा

रशियात ठिकठिकाणी कामगारांचे लढे सुरू झाले होते. पगारवाढीसाठी नव्हे तर भांडवलशाहीच्या उच्चाटनासाठी कामगार रस्त्यावर उतरू लागले होते. सामाजिक-जनवादी (क्रांतिकारी) पार्टीच्या कमिट्या या लढ्यांचे नेतृत्त्व करीत होत्या. याच काळात काही लोक क्रांतिकारी मार्गापासून भरकटत होते. कामगारांना अर्थवादी, सुधारणावादी व संधीसाधू लढ्यांमध्ये अडकवण्याचा ते प्रयत्न करत होते. हे लोक म्हणायचे की ‘कामगारांनी राजकारणाच्या भानगडीत पडू नये. त्यांनी केवळ नोकरी, पगार, कामातील सोयी-सुविधा एवढ्यासाठीच हालचाली कराव्यात.’ थोडक्यात स्वतःला फक्त आर्थिक मागण्यांच्या चौकटीत बंदिस्त करावे. लेनिन यांनी १९०३ च्या जानेवारी महिन्यात बाबुश्किनला पत्र लिहिले. क्रांतीच्या ध्येयापासून दूर जाणाऱ्या व अर्थवादाच्या पळवाटा शोधणाऱ्या विचारांविरूद्धच्या लढ्यास प्राधान्य देण्याचे त्यांनी सुचिविले. बाबुश्किनने लेनिन यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन केले. 

 

लंडन प्रवास  

दडपशाहीमुळे रशियात पार्टी अधिवेशन घेणं शक्य नव्हतं. १९०३ साली रशियन सामाजिक जनवादी पार्टीचं दुसरं अधिवेशन लंडनला आयोजित करण्यात आलं. त्यावेळी लेनिन उत्तरेकडे लांबच्या वरखोलेन्स्क प्रांतात होते. तिथून ते अधिवेशनासाठी पोहोचणार होते. लंडनला जाऊन अधिवेशन काळात लेनिन यांना भेटण्याचे बाबुश्किनने ठरविले. रशियन सीमा गुप्तपणे पार करून त्याने इंग्लंडमध्ये प्रवेश मिळविला. त्यासाठी वेषांतर करावे लागले. मजल-दर-मजल करीत तो चालला होता. एकदा तर पोलिसांनी त्याला पकडलेच असते पण तो थोडक्यात वाचला. वाटेत त्याने अनेक ठिकाणी मुक्काम केला. बरेचदा उपाशी झोपावे लागले. कसा तरी तो एकदाचा अधिशनाच्या गुप्त ठिकाणी पोहोचला. तेथील सहकाऱ्यांनी त्याची एके ठिकाणी मुक्कामाची सोय केली. ते एक कम्युन होते. अधिवेशनाला आलेल्या प्रतिनिधींची मुक्कामाची सोय तेथे करण्यात आली होती. 

अधिवेशनाच्या कामातून मोकळीक मिळाल्यावर लेनिन त्याला भेटले. दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली. धकाधकीच्या जीवनात अशा भेटीचे प्रसंग विरळच. बाबुश्कीनबद्दल लेनिनला फार आत्मियता वाटे. बाबुश्कीन सुद्धा त्यांच्याशी मनमोकळं बोलत असे. त्याच्या जीवनात अनेक चढउतार आले होते. वेगवेगळ्या अनुभवातून तो तावून सुलाखून निघाला होता. सततच्या संघर्षमय जीवनाने त्याच्या हातापायांना घट्टे पडले होते. पण त्याचे हृदय अतिशय कोमल व बुद्धी तल्लख बनली होती. कामगार क्रांती हेच त्याच्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट बनलं होतं. लेनिन यांनी सुद्धा शोषितांबद्दल असणाऱ्या अतिव प्रेमातून अत्यंत चिकाटीने चळवळ बांधली होती. मानवमुक्तीच्या लढ्यातील हे दोन सहप्रवासी रात्री उशिरापर्यंत मनमोकळं बोलत बसले. 

बाबुश्किनाचा ज्या कम्युनमध्ये मुक्काम होता, तेथे पुस्तकं व वर्तमानपत्रं विस्कटून पडली होती. कचरा साचलं होता. अस्तव्यस्त पडलेले सामान बघून त्याला वाईट वाटलं. नीटनेटका रहाण्याची त्याला सवय होती. प्रत्येक वस्तू जपून वापरण्याची व जागच्याजागी ठेवण्याची काळजी तो घ्यायचा. जनतेने दिलेल्या मदतीवर चळवळ चालते, म्हणून प्रत्येक वस्तू जपून वापरली पाहिजे असे त्याला वाटे. तो कम्युन स्वच्छतेच्या कामाला लागला. सगळी खोली नीट झाडून व आवरून ठेवली. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू पडले होते. चळवळीच्या संघर्षात सतत जनतेसोबत राहून व क्रांतिकारी विचारांची कास धरून त्याने स्वतःला उन्नत केले होते. कॉमरेड  कृप्स्कायाच्या शब्दात सांगायचे तर, “तो साधाभोळा, अडाणी कामगार राहिला नव्हता तर एक क्रांतिकारी बुद्धिवंत व कष्टकऱ्यांचा नेता बनला होता.”

 

 

पुन्हा एकदा हद्दपारी

बाबुश्किन लवकरच लंडनवरुन रशियात परतला. पण पिटर्सबर्गमध्ये तो जास्त काळ काम करू शकला नाही. अटक करून त्याला तुरूंगात टाकण्यात आलं. नंतर दुरवरच्या इरकुत्स प्रांतात निर्वासित करण्यात आलं. हद्दपारीच्या या काळात सुद्धा त्याने तिकडच्या कामगारांना व शेतकऱ्यांना संघटीत करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. लंडन येथील अधिवेशनात पुढील कार्यक्रम, धोरण व डावपेचविषयक निर्णय घेण्यात आले होते. त्या अधिवेशनात अर्थवादी-सुधारणावादी विचारांचा पराजय झाला. क्रांतिकारी वर्गसंघर्षाच्या कार्यनितीचा विजय झाला. पार्टीअंतर्गत संघर्षामुळे पार्टीत मात्र दोन गट पडले. एक गट बोल्शेविकांचा तर दुसरा मेन्शेविकांचा. 

बोल्शेविकांनी क्रांतिकारी संघर्ष व कामगारवर्गाच्या निरंतर लढ्याचा विचार लावून धरला तर मेन्शेविक आर्थिक संघर्षाच्या मुद्याला चिकटून राहिले. रशियन भाषेत बोल्शेविक म्हणजे बहुसंख्य तर मेन्शेविक म्हणजे अल्पसंख्य. त्या युगाचे नेमके सत्य व जनतेच्या इच्छेचे मर्म पकडण्यात बोल्शेविक यशस्वी ठरले. स्वाभाविकपणे बहुमतातील बोल्शेविकांनी अधिवेशनावर छाप पाडली व पार्टीचे सुकाणू स्वतःकडे घेतले.

 

क्रांतीसाठी सर्व समर्पित 

बाबुश्किनने बोल्शेविक विचारांची कास धरली. त्याला निर्वासीत करण्यात आलेल्या प्रदेशात तो बोल्शेविक मताचा प्रचार करू लागला. त्याने मेन्शेविकांच्या संधीसाधू विचारांविरूद्ध संघर्ष चालविला. या काळात रशिया व जपानमध्ये युद्ध सुरू झाले होते. रशियात ठिकठिकाणी संप-लढे चालूच होते. आर्थिक मागण्यांसाठी केलेले कामगारांचे संप राजकीय लढ्यांमध्ये परिवर्तीत होत होते. ९ जानेवारी १९०५ रोजी झारच्या महालावर शांततापूर्वक निदर्शने करणाऱ्या कामगारांवर पोलिसांनी अमानुष गोळीबार केला. त्यात शेकडो कामगार ठार झाले. ‘रक्तरंजित रविवार’ या नावाने ती घटना इतिहासात नोंद झाली आहे. आता संपूर्ण रशियाचा कामगार लढ्यात उतरला होता. ठिकठिकाणी सशस्त्र प्रतिकार होऊ लागला होता. १९०५ साली मास्कोमधील कामगारांनी सशस्त्र बंड केलं. कामगार वर्ग क्रांतीचा अग्रदूत बनू लागला.

क्रांतिकारकांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरू लागलं होतं. बाबुश्किन मास्कोला जाऊन कामगारांच्या लढ्यात भाग घेऊ इच्छित होता. पण हद्दपारीमुळे ते शक्य नव्हतं. बंडातील कामगारांकडे शस्त्रांची कमतरता होती. त्यांना आणखी शस्त्रांची गरज होती. बाबुश्किन व त्याचे सहकारी शस्त्रे जमविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यासाठी ते ठिकठिकाणी फिरत होते. पोलिसांना याचा सुगावा लागला. त्यांनी बाबुश्किनचा पाठलाग सुरू केला. झारच्या क्रांतिविरोधी (अँटीबोल्शेविक) विशेष पोलिस पथकाने त्यांना एकेठिकाणी गाठले. तो निर्जन भाग होता. सशस्त्र पोलिस दस्त्याने त्यांना सगळीकडून घेरले होते. त्यांना अटक करण्यात आली. 

पोलिसांच्या डोक्यात क्रूर योजना होती. आरोपींना कोर्टापुढे हजर न करता तात्काळ ‘न्याय’ द्यायचा त्यांनी ठरविले होते. सर्वांना एका रांगेत उभे करून धडाधड गोळ्या घालण्यात आल्या. ३१ जानेवारी १९०५ ची ही घटना. तिथे काही अंतरावर रेल्वे कामगार काम करत होते. त्यांनी हे हे पाहिले. ते धावून आल्याने पोलिस पळून गेले. त्या रेल्वेकामगारांमुळे पोलिसांचं भ्याड कृत्य सर्वांना कळलं. कामगारवर्गावर शोककळा पसरली. रशियन कामगारांचा लाडका, पार्टीचा खंदा कार्यकर्ता, शोषणमुक्त समाजाचं स्वप्न पाहणारा बाबुश्किन सहकाऱ्यांसह शहीद झाला होता. 

लेनिनने त्याच्याबद्दल नोंदविलं आहे, “क्रांतीच्या लढ्यात अनेक जननेते उदयास आले. बाबुश्किन सारखे अनोखे लोक. ज्यांनी संपूर्ण जीवन कामगार वर्गाच्या मुक्तीसाठी समर्पित केले. असे लोक जे सर्वहारा जनतेमध्ये खंबीरपणे आणि स्थिरपणे कार्य करत राहिले. क्रांतिकारी लढा संघटित करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. ज्यांनी निरंकुश झारशाहीविरुद्ध सशस्त्र लोकांच्या संघर्षाचे नेतृत्व केले. अशा लोकांशिवाय, रशियन लोक नेहमीच गुलाम राहिले असते. या लोकांमुळे प्रकारच्या शोषणातून मुक्ती मिळाली. बाबुश्कीनचे जीवन प्रेरणादायी आहे. त्याने आदर्श उभा केला की वर्ग-जाणीव कामगाराने कसे जगले पाहिजे आणि कार्य केले पाहिजे.”