Quick Reads

राहुल सांकृत्यायन: भारतीय जनवादाचे सांस्कृतिक सेनापती

९ एप्रिल १८९३ हा त्यांचा जन्मदिवस.

Credit : फाईल

लोकशाही अधिकारांवर होणारे हल्ले, धर्मांध शक्तींच्या वाढत्या कारवाया आणि भांडवलदारांपुढे नतमस्तक होणारी राज्यसत्ता. अशा आजच्या काळात लेखक विचारवंतांनी काय भूमिका घ्यावी. कालसुसंगत ठरणारी, वैज्ञानिक पाया असलेली, जनहिताची भूमिका कोणती ? एखादी भूमिका घेताना कशाचे भान हवे? लेखक विचारवंतांची बांधिलकी कशाशी हवी? नेमकी भूमिका घ्यावी की मध्यममार्ग अनुसरावा? असा आजचा सगळा गोंधळलेला काळ आहे. अशा साचलेल्या, थिजलेल्या क्षणी सहजपणे आठवतात राहुल सांकृत्यायन. लेखक, इतिहासकार, पुरातत्ववेत्ता, साम्यवादी विचारवंत,प्रवासवर्णनकार, तत्वान्वेषी, बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक व बहुभाषाविद अशा असंख्य उपाध्या त्यांच्या नावाशी जोडल्या गेलेल्या आहेत. पण ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये असली तरी त्यांना वेगळेपण देणार्‍या बाबी दुसर्‍या आहेत. ज्यामुळे ते महान लेखक विचारवंतच नाही तर जनतेचे सांस्कृतिक सेनापती ठरतात.

९ एप्रिल १८९३ हा त्यांचा जन्मदिवस. सत्तर वर्षांचे आयुष्य जगून त्यांनी १४ एप्रिल १९६३ साली या जगाचा निरोप घेतला. आज आपण त्यांचे स्मरण का करायचे? ते २६ भाषांचे जाणकार होते म्हणून? की ज्ञानाच्या अनेक शाखांवर त्यांचे प्रभुत्व होते म्हणून? की ते एक उत्तम पुरातत्ववेत्ता व संशोधक होते म्हणून? नाही, केवळ या कारणांसाठी आज त्यांचे स्मरण करायचे नाही. ही त्यांची वैशिष्ट्ये होतीच पण यात वेगळेपण असे काही नाही. कारण आपल्या देशात विद्वानांची कमी नाही. मग त्यांचे वेगळेपण काय, तर त्यांनी विचार व व्यवहार यांची फारकत होऊ दिली नाही. सार्वजनिक जीवनात एक प्रतिमा व व्यक्तिगत जीवनात मात्र अनेक तडजोडी अशी विसंगती त्यांच्या जगण्यात नव्हती. सिद्धांत व व्यवहार यांच्या कसोटीवर त्यांनी सतत स्वतःचे मुल्यांकन केले. कोणताही दुराग्रह व पुर्वग्रह न बाळगता त्यांनी सतत स्वतःमध्ये बदल केले. सातत्याने स्वतःच्या जाणिवांना उन्नत करीत नेले.त्यांचे आयुष्य अत्यंत प्रयोगशील, अभ्यासू व जीवनसत्याचा शोध घेणारे होते. त्यामुळेच ते आधुनिक भारतात लेखणीच्या माध्यमातून सांस्कृतिक संग्राम चालविणारे अनोखे लेखक ठरतात. हीच बाब त्यांना नायकत्व प्रदान करते. त्यांचा जीवनपट पाहिला तर आपली खात्री पटते की ते अत्यंत प्रवाही व गतिमान जीवन जगले.

राहुल सांकृत्यायन यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या आजमगढ जिल्ह्यातील पंदहा या छोट्याश्या गावात झाला. त्यांचे लहानपणाचे नाव केदारनाथ पांडे होते. रूढी परंपरेत अडकलेल्या समाजाचा त्यांना लहानपणापासूनच तिटकारा वाटत असे. आसपासच्या वातावरणाला कंटाळून ते लहानपणीच घर सोडून पळाले. इकडेतिकडे भटकत असतानाच ते एका साधूंच्या समूहात सामील झाले. त्या साधुंसोबत ते एका मठात राहू लागले. मठात राहिल्याने त्यांना हिंदू धर्म आणखी जवळून अभ्यासता आला. लवकरच या धर्मातील ढोंग व विकृती त्यांच्या लक्षात आली.खरं तर ते त्या मठात महंत झाले होते. त्यांचे ज्ञान व तर्क बुद्धी बघून त्यांना तिथे महापंडित ही उपाधी मिळाली होती. परंतु राहुल सांकृत्यायन यांना अशाप्रकारे लौकिक  मिळविण्याचा मोह नव्हता. ते सत्याच्या शोधात निघालेले होते. जन्माने ब्राम्हण असल्याने व आसपास तेच वातावरण असल्याने त्यांचा पहिला परिचय हिंदू धर्माशी झाला. पण त्याचे अंतरंग कळल्यावर त्यांनी एके ठिकाणी नोंदविले की, “धार्मिक साधू संतांचे हे मठ-आश्रम अनाचाराच्या पाठशाळा आहेत. इथे धर्मप्रसाराच्या नावाखाली केवळ धर्माचा बाजार चालतो. बहुसंख्य लोक इथे स्वार्थासाठी जमले आहेत." 

केदारनाथ पांडे नावाचा हा युवक तेथून बाहेर पडला. आर्य समाजाबद्दल तो ऐकून होता. आर्य समाज रूढी परंपरांवर प्रहार करतो म्हणून तो एक चांगला पर्याय असू शकतो या विचाराने तो आर्य समाजात दाखल झाला. कोणी सांगणारे नव्हते की कोणाच्या अनुभवातून शिकण्याची संधि नव्हती.सगळा ‘ट्रायल एंड एरर’चा मामला होता. आजमाऊन बघा, नाही पटले तर पुढचा शोध घ्या. पण या सर्व उठाठेवीत आयुष्याची दोन पाच वर्षं निघून जायची. ज्ञानाचा प्रचंड व्यासंग असलेला तो तरुण मजलदरमजल करीत पंजाबला पोहोचला. हा बनारसकडून पंजाबकडे झालेला केवळ भौतिक प्रवास नव्हता तर सत्याच्या शोधासाठी टाकलेले ते एक पाऊल होते. आर्य समाजात दाखल झाल्यावर त्यांनी दामोदर साधू हे नाव घेतले. उत्तर भारतात सगळीकडे व कलकत्त्यापर्यंत त्यांनी भ्रमण केले. समाजातील रूढी परंपरांविरूद्ध प्रचार करणे हे त्यांच्या जीवनाचे उदिष्ट बनले होते. समाजाच्या व्यापक संक्रमणाचा तो काळ होता. भारतीय समाज कात होता. 

आर्य समाज सुद्धा वेदांनाच प्रमाण मानतो ही गोष्ट मात्र त्यांना खटकत होती. आर्य समाजाच्या मर्यादा त्यांच्या लक्षात आल्या. सातत्याने चिंतन मनन चालूच होते. असाच बौद्धिक प्रवास करीत ते बुद्ध तत्वाज्ञानाजवळ पोहोचले. हा धर्म समता न्याय व बंधुत्वाच्या तत्वावर आधारलेला आहे. त्यात वैज्ञानिक दृष्टीकोण व बुद्धिप्रामाण्यवादाला वाव आहे. ही गोष्ट त्यांना भावली. बौद्ध धम्माची दिक्षा ग्रहण करून त्यांनी राहुल हे नाव घेतले. सांकृत्य हे त्यांचे गोत्र होते. त्यावरून त्यांचे नाव पडले राहुल सांकृत्यायन. त्यावेळी ते श्रीलंकेत होते.तिथे त्यांनी पाली, प्राकृत व अपभ्रंश इत्यादि भाषांचा अभ्यास केला. जातिभेद व कर्मकांड यातून मुक्त असलेल्या तत्वज्ञानाचा शोध त्यांना बौद्ध धम्मापर्यन्त घेऊन गेला होता. आता ते बौद्ध भिख्खू झाले होते. बौद्ध भिख्खूच्या रूपात त्यांनी पूर्वेकडच्या अनेक देशांचा प्रवास केला. 

बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी ते तिबेटला पण गेले. येतांना त्यांनी तिथून अनेक दुर्मिळ ग्रंथ आणले. त्यांचा हा सर्व प्रवास पायी घडला. येताना सोबत इतकी पुस्तके होती की त्यांना ती ३० खेचरांवर लादून आणावी लागली. आधुनिक जगाला अज्ञात असलेले हे ज्ञान प्रथमच जगासमोर आले. आज इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. एका क्लिकवर ज्ञानाचे अगाध विश्व आपल्यासमोर उभे राहते. पण एकेकाळी एक व्यक्ति पायी प्रवास करून एकामागून एक भूप्रदेश पादाक्रांत करीत केवळ ज्ञान जमा करण्यासाठी वणवण फिरत होती, वर्ष दोन वर्ष त्या भागात राहून तिथल्या लोकांचा विश्वास संपादन करीत अनेक ग्रंथ गोळा करीत होती, ते शेकडो ग्रंथ खेचरांवर लादून भारतात आणत होती. ही कल्पनाही आज अद्भुत वाटते. ज्ञानाची ती ओढ, तो व्यासंग किती उच्च दर्जाचा होता. आज ती सर्व ग्रंथसंपदा पाटण्याच्या राष्ट्रीय ग्रंथगारात सुरक्षित आहे. पुढच्या पिढ्यांना संशोधनासाठी या संदर्भसाहित्याचा खूप उपयोग झाला. 

 

हिंदू धर्माप्रमाणे अस्पृश्यता, जातिभेद, अंधश्रद्धा, कर्मकांड हे दोष बौद्ध धम्मात नाहीत म्हणून राहुल सांकृत्यायन त्या तत्वज्ञानाकडे आकर्षित झाले. बौद्ध धम्माचा अभ्यास करता करताच ते भांडवलशाही व्यवस्थेने व ब्रिटीशांनी चालविलेले जनतेवरचे जुलूमही बघत होते.राहुल सांकृत्यायन यांच्या मनात शोषणवादी भांडवलशाही बद्दल प्रचंड तिटकारा निर्माण झालेला होता. इंग्रज साम्राज्यवाद्यांच्या राज्यसत्तेविरुद्ध शेतकरी कामगारांसह तमाम भारतीय जनतेच्या लढ्याचा तो काळ होता. १९१७च्या रशियन क्रांतिने जगभरच्या शोषितांपुढे शोषणमुक्तीचा नवा आदर्श घालून दिला होता. केवळ धर्माने लादलेल्या मानसिक बौद्धिक गुलामगिरीचा प्रश्न नव्हता तर भांडवली-सरंजामी व्यवस्थेने लादलेल्या आर्थिक गुलामगिरीचा प्रश्नही जनतेसमोर होता.

१९२२ ते २७ हा काळ त्यांच्या वैचारिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. याच काळात त्यांनी मानवीजीवन, समाज, तत्वज्ञान व राजकारणाचा सखोल अभ्यास केला. यातून त्यांचा भौतिकवादी तत्वज्ञानाकडे ओढा वाढत गेला. १९३३ पर्यन्त ते पूर्ण अनिश्वरवादी बनले होते. बौद्ध तत्वज्ञानाचा त्यांच्या दृष्टीकोनावर विशेष प्रभाव पडला. १९२७-२८ याकाळात त्यांनी श्रीलंकेतील वास्तव्यात बौद्ध धर्माला जाणून घेतले. यानंतर ते दोन वेळा सोवियत रशियाला जाऊन आले. १९३३-३७ याकाळात त्यांनी मार्क्सवादी तत्वज्ञानाचा अंगीकार केला. राहुल सांकृत्यायन म्हणत की आपण ज्ञान का मिळवायचे, केवळ जगाला जाणून घेण्यासाठी? नाही!अशी निरुद्देश ज्ञानसाधना काय उपयोगाची. ज्ञान केवळ जगाला जाणून घेण्यासाठी नाही तर ते बदलण्यासाठी असावे.

परिवर्तनाची ही धडपडच राहुल सांकृत्यायन यांच्या गतिमान जीवनाचा सार आहे. त्यांचे मत होते की जनता इतिहासाची निर्माती आहे. जनता स्वतः सज्ज झाल्याशिवाय कोणताही समाज शोषणमुक्त होऊ शकत नाही. समता व न्यायावर आधारित आणि सर्वप्रकारच्या शोषण व भेदभावापासून मुक्त असा समाज निर्माण करण्याचा शोध राहुल सांकृत्यायन यांना मार्क्सवादापर्यंत घेऊन गेला. ते जनतेच्या लढ्यात सामील झाले. श्रमिक कष्टकर्‍यांची शोषणातून मुक्ति हेच त्यांच्या जीवनाचे धेय्य बनले.’भागो नही,(दुनिया को) बदलो!’, ‘२२वी सदी’, ‘साम्यवाद ही क्यों?’ अशा छोट्या पुस्तिका लिहून त्यांनी जनतेचे प्रबोधन केले. एकीकडे मज्झिम निकाय, दिघ निकाय, संयुत्त निकाय या बौद्ध ग्रंथांच्या हिंदीत अनुवादाचे प्रचंड कार्य पार पाडीत असतानाच जनतेला राजकीय दृष्ट्या सजग करण्यासाठी सोप्या सुटसुटीत भाषेत छोट्या पुस्तिकांचे लेखनही ते करीत. अकादमिक कार्य करीत असले तरी त्यांनी जनतेशी व जमिनीशी आपली नाळ कधीच तुटू दिली नाही.

त्यांचे लेखन ‘स्वांत सुखाय’ पद्धतीचे नव्हते. तर त्या लेखनामागे निश्चित उद्देश होता. जनतेला शिक्षित करणे व तिला नवा दृष्टिकोन देणे यासाठी ते अखंड लिहीत होते. त्यांचा पिंड संशोधकाचा होता. पण ते भूतकाळाचे उदात्तीकरण करण्यात अडकून पडले नाही. त्यांनी आपल्या लिखाणातून नवविचार दिला. त्यांचे लिखाण विविधांगी होते. कथा,कादंबरी,प्रवास वर्णन, जीवनचरित्र, आत्मकथा असे साहित्याचे सर्व प्रकार त्यांनी हाताळले. वर्षभर राजस्थान मध्ये राहिले तेव्हा त्यांनी राजस्थानातील राजवाड्यांमधील स्त्रियांच्या घुसमटलेल्या जीवनावर ‘राजस्थानी रनिवास’ ही कादंबरी लिहिली. इजिप्तचा प्रवास करून ‘विस्मृती के गर्भ मे’ ही इजिप्तचे जीवन व संस्कृति चितारणारी कादंबरी लिहिली. कार्ल मार्क्स, लेनिन, स्टॅलिन, माओ यांची जीवनचरित्रे त्यांनी लिहिली. ४ कथासंग्रह,९ कादंबर्‍या,१६ व्यक्तींची जीवनचरित्रे, ९ प्रवास वर्णने, ‘मेरी जीवन यात्रा’ या नावाने स्वतःचे ४ खंडातील आत्मचरित्र व जवळपास १७ वैचारिक व संशोधनपर ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत

‘वैज्ञानिक भौतिकवाद’ या पुस्तकात तत्वज्ञान म्हणजे काय? तत्वज्ञानाचा विकास कसा झाला? तत्वज्ञानामागे असलेले वर्गीय हितसंबंध  कोणते? या प्रश्नांची उकल अगदी सोप्या सुटसुटीत पद्धतीने त्यांनी केलेली आहे.  तर पृथ्वीची उत्पत्ति कशी झाली? पृथ्वीवरचा पहिला जीव कोणता व तो कसा जन्माला आला? मानवीसमाज कसा निर्माण झाला? त्याच्या विकासाचे आजपर्यंतचे टप्पे कोणते? यापुढे मानवीसमाजाचे भवितव्य काय? अशा मूलभूत प्रश्नांचे अगदी सोप्या पण शास्त्रीय भाषेत 'मानव समाज’ या पुस्तकात सचित्र वर्णन करण्यात आलेले आहे. खरंतर हे पुस्तक माध्यमिक शाळेत अभ्यासक्रमात असायला हवे. 

 

‘वोल्गा ते गंगा’ हे त्यांचे आणखी एक अप्रतिम पुस्तक आहे. त्यात इसवी सन पूर्व ६००० ते १९४२ पर्यंतचा काळ १९ कथांच्या माध्यमातून रेखाटला आहे. युरोपातील वोल्गा नदी ते भारतातील गंगा नदी यांच्या काठी उदयाला आलेल्या मानवी संस्कृतीचे दर्शन या कथांमध्ये घडते. ८ हजार वर्षात सुमारे १० हजार चौरस किलोमीटरच्या परिघात घडलेल्या मानवी समाजाच्या घडामोडींचे प्रातिनिधीक चित्र या कथांमध्ये आहे. युरेशियाच्या पर्वतांकडून वोल्गा नदीच्या खोर्‍यात आर्य कसे स्थलांतरित झाले, नंतर त्यांनी हिंदुकुश ओलांडून हिमालयाचा मैदानी प्रदेश कसा व्यापला. पुढे ते भारतीय उपखंडात कसे पसरले याचे सचित्र वर्णन यात आहे.इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावरचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संघर्ष या कथांमध्ये चित्रित करण्यात आला आहे. इतिहासाचा इतका मोठा काळ सर्वहारा वर्गाच्या वैश्विक दृष्टिकोनातून कथात्मक पद्धतीने मांडणारे हे भारतातील एकमेव पुस्तक असेल. भारतातील जवळपास सर्व भाषांमध्ये व विदेशातील अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झालेले आहे. नव्या पिढीच्या हातात हे पुस्तक असले पाहिजे म्हणजे त्यांना भारतीय उपखंडाचा खरा इतिहास कळू शकेल.

निश्चितच राहुल सांकृत्यायन यांचे व्यक्तिमत्व व कार्य  साहित्य, अध्यात्म, विज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, राजकारण, भाषा, संस्कृति, धर्म किंवा तत्वज्ञान यातील कुठल्या एका चौकटीतून बघण्यापेक्षा समग्रतेने त्याचे आकलन केले पाहिजे.त्यांच्या कार्याची तुलना चीनचे लेखक लू शून यांच्या कार्याशी करता येईल. लू शून यांना चीनचा सांस्कृतिक सेनापती म्हटले जाते. त्यांनी चीनच्या जनतेची मानसिक-वैचारिक-सामाजिक गरज ओळखून लेखन केले. चीनच्या अत्यंत मागासलेल्या रूढीवादी जनतेला आपल्या लेखनातून पुरोगामी जाणीव दिली. नवा समाज घडविण्याच्या युगपरिवर्तनकारी कार्यासाठी जनतेला सज्ज केले. राहुल सांकृत्यायन यांनी अगदी अशीच भूमिका भारतात पार पाडली. त्यांनी भारतीय समाजाचे चित्रण करतांना समाजाच्या पुरोगामी विकासाला बाधक ठरणार्‍या नेमक्या प्रवृतींवर बोट ठेवले. 

ते रूढी परंपरांच्या मुळापर्यंत पोहोचले. समाजाच्या विकासाला अडथळा ठरणारे  संकुचित दृष्टीकोण, अंधविश्वास, पोथीनिष्ठता यावर त्यांनी सातत्याने प्रहार केले. प्रवासवर्णन, कादंबरी, आत्मकथन, निबंध, जीवनचरित्र इत्यादी कोणत्याही शैलीत जरी त्यांनी लिखाण केले तरी त्यांचा मुळ उद्देश वाचकाला जुनाट मानसिकतेतून बाहेर काढून त्याला नवी सम्यक दृष्टी देणे हाच होता. अशाप्रकारे त्यांनी पूर्ण एका पिढीला आपल्या साहित्यातून भविष्योन्मुखी बनविले. त्यामुळे ते आधुनिक भारताचे सांस्कृतिक सेनापती ठरतात. युरोपात पुनर्जागरण (Renaissance) काळात दिदेरो, व्हालटेयर इत्यादींनी जनतेचे ज्याप्रकारे प्रबोधन केले अगदी तशीच भूमिका राहुल सांकृत्यायन यांनी बजावली असे म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. जनतेचे कोणतेही लढे असो,स्वातंत्र्य चळवळीतला संघर्ष असो की जमीनदारांच्या विरोधातील शेतकर्‍यांची आगेकूच असो, ते प्रत्येक लढ्यात जनतेसोबत राहिले.

राहुल सांकृत्यायन यांनी शेतकर्‍यांच्या लढ्यात हिरिरीने भाग घेतला. १९२९ ते ४९ या काळात ते उत्तर व मध्य बिहारच्या शेतकरी चळवळीत सक्रिय होते. बिहारमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या स्थापनेनंतर ‘किसान सभा’ ही शेतकर्‍यांची संघटना उभारण्यात आली. शेतकर्‍यांची परिस्थिती खूप वाईट होती. इंग्रज सत्तेचे अत्यंत जाचक नियम व कायदे तसेच स्थानिक जमीनदार व सावकारांची प्रचंड दडपशाही अशा दुहेरी चक्रात ते सापडले होते. कॉंग्रेस पार्टी इंग्रज सत्तेविरुद्ध आवाज उठवीत असे, आंदोलने उभारली जात पण जमीनदार व सावकारांच्या बाबतीत त्यांची भूमिका बोटचेपेपणाची होती. कारण कॉंग्रेस पार्टीच्या नेतृत्वात जमीनदार-सावकार वर्गातून आलेल्या लोकांचा भरणा होता. जमीनदारांचे वाढते अत्याचार व शेतसार्‍यात झालेली प्रचंड वाढ यामुळे शेतकर्‍यांपुढे नवी संकटे उभी राहिली. पण इंग्रज सत्ताधारी व कॉंग्रेसने जमीनदार-सावकारांना नेहमी पाठीशी घातले. चंपारण येथे गांधींनी शेतकरी आंदोलनाचे कसे नेतृत्व केले याची चर्चा वारंवार केली जाते. पण हा लढा नीळ शेतीच्या सक्ती विरोधातील लढा होता. गांधी किंवा कॉंग्रेसने जमीनदार-सावकारांच्या विरोधात कधीच स्पष्ट भूमिका घेतली नाही. तसे केल्याने शेतकर्‍यांमध्ये विभागणी होऊन स्वातंत्र्यलढा कमजोर होईल अशी मांडणी ते करीत.

स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेने इंग्रजसत्तेसोबतच जमीनदारशाहीविरुद्ध देखील दंड थोपटले. या लढ्यात राहुल सांकृत्यायन सक्रिय सहभागी होते. त्यांचे स्पष्ट मत होते की केवळ ब्रिटिश सत्ताच नाही तर साम्राज्यवादाचे आधार असलेल्या इथल्या जमीनदारशाहीला देखील समूळ नष्ट केले पाहिजे. समाजव्यवस्थेत मुलभूत परिवर्तन घडविण्यासाठी ते शेतकरी चळवळीत उतरले होते. बिहार प्रांत किसान सभा व कम्युनिस्ट पार्टी मार्फत त्यांनी शेतकरी व कष्टकर्‍यांच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. कष्टकर्‍यांना राजकीयदृष्टया जागृत करण्यासाठी त्यांनी ‘तुम्हारी क्षय’, ‘कम्युनिस्ट क्या चाहते है’, ‘जीने के लिए’, ‘भागो नही दुनिया को बदलो’ अशा छोट्या पुस्तिका अत्यंत सुगम भाषेत लिहिल्या. शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते, युवक व विद्यार्थ्यांना या पुस्तिकांमधून ठोस मार्गदर्शन मिळाले. 

सांकृत्यायन गावोगावी जाऊन शेतकर्‍यांच्या बैठका घेत. सातत्याने त्यांचे राजकीय शिक्षण करीत. साम्राज्यवाद व सरंजामशाहीच्या विरोधात शेतकरी प्रथमच इतक्या प्रखर जाणिवेने व व्यापक प्रमाणात उभे ठाकले. कारण याआधीचे लढे उत्स्फूर्त होते किंवा विशिष्ट भागापुरते मर्यादित होते. केवळ सुधारणा नकोत तर शोषणाचे मुलाधार साम्राज्यवाद व सरंजामशाही समुळ नष्ट करण्याचा क्रांतिकारी विचार त्यात होता. किसान सभेची संघटनात्मक ताकद वाढतच गेली. सदस्यसंख्या पाच वर्षात तेहतीस हजारावरून अडीच लाखावर पोहोचली. राहुल सांकृत्यायन यांच्या साहित्यावर शेतकरी चळवळीचा मोठा प्रभाव आढळतो. त्यातील बहुसंख्य पात्रे ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेली असतात. बिहारच्या गया, पाटणा, शाहबाद, मुंगेर, दरभंगा, चंपारण, सारन इत्यादी भागात ते सक्रिय होते. त्यांच्यावर अनेक वेळा जमीनदारांच्या सशस्त्र गुंडांनी हल्ले केले. अनेक वेळा त्यांना अटका झाल्या. 

१९३८-३९ साली त्यांना देवली कॅम्प येथील तुरुंगात दोन वर्षांचा तुरुंगवास होता. तेथे अजय घोष, शचिंद्रनाथ सान्याल, बी.टी.रणदिवे, कॉ. डांगे यांना ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांना १९४० साली पुन्हा अटक झाली तेव्हा हजारीबागच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. तिथल्या दोन वर्षांच्या वास्तव्यात ते बौद्धिकदृष्ट्या सक्रिय राहिले. याच काळात त्यांनी ‘बाईसवी सदी’ व ‘वोल्गा से गंगा’ ही पुस्तके लिहिली. आज राहुल सांकृत्यायन यांचे स्मरण करणे म्हणजे ते केवळ व्यक्तिमहात्म्य सांगण्यासाठी नाही तर त्यांच्या जीवनदृष्टीचा अंगीकार करण्यासाठी. शोषणमुलक समाजव्यवस्था आजही तशीच आहे. सरंजामी उत्पादनसंबध अस्तित्व टिकवून आहेत. साम्राज्यवाद देशाची सर्व साधनसंपत्ती गिळंकृत करीत देशाला एका प्रचंड बाजारात रूपांतरित करण्यासाठी सरसावलेला आहे. इथल्या शासकवर्गाने जनतेच्या हिताला तिलांजली देत बहुराष्ट्रीय कंपन्यांना रान मोकळे सोडले आहे. अशा संघर्षमय काळात राहुल सांकृत्यायन यांचे जीवन व कार्य समजाऊन घेणे म्हणजे त्यातून नवी प्रेरणा घेणे आहे.

राहुल सांकृत्यायन यांचे सगळे जीवन सृजनात्मक होते. ते जिथे गेले तिथल्या भाषा त्यांनी शिकून घेतल्या. लोकांमध्ये मिसळून तिथल्या संस्कृती व लोकजीवनाचा बारकाईने अभ्यास केला. छत्तीस भाषा त्यांना अवगत होत्या. ते तथ्यान्वेषी व जिज्ञासू वृतीचे होते. त्यांनी सर्व धर्मांच्या ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. विविध धर्मात मांडलेल्या तत्वज्ञानांची त्यांनी पडताळणी केली होती. त्या आधारेच त्यांनी जगातल्या सर्व तत्वज्ञानांची तुलनात्मक मांडणी करणारा ‘दर्शन दिग्दर्शन’ हा ग्रंथ लिहिला. दक्षिण भारतात असतांना संस्कृत ग्रंथांचे, तिबेटच्या प्रवासात पाली ग्रंथांचे तर लाहोरला गेल्यावर अरबी भाषा शिकून घेऊन इस्लामी धर्मग्रंथांचे अध्ययन त्यांनी केले.  

 

सतत फिरस्ती, वेगवेगळ्या चळवळींमधील सहभाग, स्वातंत्र्य लढ्यात अनेक वर्षांचा तुरुंगवास असे धकाधकीचे आयुष्य असूनही त्यांनी अभ्यास केला कधी, टिपणे काढली कधी, संदर्भ जमविले कधी, हे आज अगदी अदभूत वाटते. भारतातील समस्त साहित्यिकांमध्ये सर्वात जास्त प्रवास केलेले ते एकमेव साहित्यिक आहेत. हिन्दी मध्ये भ्रमंतीला घुम्मकडी म्हणतात. राहुल सांकृत्यायन गमतीने स्वतःचा उल्लेख ‘घुम्मकडशास्त्री’ असा करीत. प्रचंड भ्रमंती केल्यामुळे त्यांचा जीवनानुभव विशाल व दृष्टिकोन अत्यंत व्यापक होता.त्यांनी पर्यटन, प्रवास व भ्रमंतीला अभ्यासाचे मुख्य अंग मानले.जगातील महापुरुषांनी जी महान कामगिरी केली त्याचे रहस्य त्यांच्या सततच्या प्रवास होते,असे ते म्हणत. नवनव्या प्रदेशात विभिन्न लोकांच्या संपर्कात आल्याने तिथले लोकजीवन व संस्कृती अभ्यासता येते. विशेष म्हणजे राहुल सांकृत्यायन यांनी केवळ जगभर भ्रमंतीच केली नाही, तर ती कशी करावी याचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणारे ‘घुम्मकड शास्त्र’ (भ्रमंती विज्ञान) हे पुस्तक देखील लिहिले. १९२९-३० साली त्यांनी केलेला तिबेटचा प्रवास तर अफाटच होता. त्यावेळी भारतीयांना तिबेट प्रवासाला मनाई होती. त्यामुळे राहुल सांकृत्यायन यांना वेश बदलून तिबेट मध्ये प्रवेश मिळविला. प्रवास खूप कठीण होता. अनेक पर्वत ओलांडावे लागले. सातत्याने बदलणार्‍या हवामानाचा सामना करावा लागला.इस्माईल मेरठी यांचा शेर त्यांना  खूप आवडत असे .

सैर कर दुनिया की गाफिल जिंदगानी फिर कहां ?

जिंदगी गर कुछ रही तो नौजवानी फिर कहां ?

हे त्यांनी स्वतःच्या जीवनाचे ब्रीद वाक्यच बनविले होते.

१९५८ साली त्यांच्या ‘मध्य एशिया का इतिहास’ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९६३ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. राहुल सांकृत्यायन यांच्या स्मृति जपण्यासाठी टपाल खात्याने १९९३ साली त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने टपाल तिकीट काढले. बिहार सरकारने पाटण्यात राहुल सांकृत्यायन संग्रहालय उभारले आहे. उत्तर प्रदेशात त्यांच्या जन्मगावी देखील असे एक संग्रहालय आहे. परंतु केवळ पुरस्कार, मान-सन्मान देऊन सरकारची जबाबदारी संपते का? राहुल सांकृत्यायन यांचे कार्य व्यक्तिगत मानसन्मान मिळविण्यासाठी नव्हते. सरंजामशाही व भांडवलशाहीच्या जोखडातून समाजाला मुक्त करून समतावादी समाज निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यांचे स्वप्न आजही अपूर्ण आहे. शोषित जनसमुदाय आजही त्यासाठी लढत आहेत. या लढणार्‍या जनसमुदायांच्या हातात राहुल सांकृत्यायन यांचे विचार दिले पाहिजेत. पण शासकवर्गाला नेमेके हेच नको आहे.

इलाहाबादच्या लोकभारती प्रकाशनने ६० च्या दशकात त्यांचे काही साहित्य प्रकाशित केले होते. पण त्यातील बरीचशी पुस्तके आज उपलब्ध नाहीत. अलीकडे ‘आलोचना’ या गोरखपूरच्या संस्थेने त्यांची काही पुस्तके हिंदीत प्रकाशित केली आहेत.त्यांचे साहित्य मराठीत मात्र उपलब्ध नाही. लोकवाङमयगृहाने  काढलेले ‘वोल्गा ते गंगा’ हा मराठीत एकमेव अपवाद. सामाजिक भान असलेल्या प्रकाशन संस्था त्यांचे साहित्य प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण साधनांअभावी हे प्रयत्न अपुरे पडतात.  

सरकारने ठरविले तर त्यांचे सर्व साहित्य पुनर्प्रकाशित केले जाऊ शकते. भारतीयांचे आधुनिक लोकमानस घडविण्यात मौलिक कार्य करणारे, संशोधनाच्या क्षेत्रात ठोस योगदान देणारे, इतके प्रतिभावान व्यक्तिमत्व आज दुर्लक्षित आहे. आजच्या पिढीला त्यांच्याबद्दल विशेष काहीच माहित नाही.शालेय पाठयक्रमात त्यांच्या बद्दल जवळपास काहीच नाही. विद्यापीठांमध्ये त्यांची पुस्तके अभ्यासक्रमात नाहीत.असे का ? तर त्यांच्या साहित्याचा वाचक  प्रस्थापित जात-धर्म-वर्ण-वर्ग व्यवस्थेचे गौडबंगाल ओळखू लागतो. तो समाजव्यवस्था बदलण्याच्या जाणिवेने सज्ज होतो. त्याला वैज्ञानिक भौतिकवादी दृष्टीकोण मिळाल्याने तो नव्या युगाचा प्रतिनिधी बनतो. अशी पिढी जर घडली तर तिच्यात क्रांतिच्या उर्मी निर्माण होतील,म्हणून राहुल सांकृत्यायन यांना हेतुपूरस्पर टाळण्यात आलेले आहे.