Quick Reads
जातींच्या या देशात, मुक्ती कोन पथे?
जातीवरून माणसाला किती किंमत द्यायची, त्याच्याशी काय व्यवहार करायचा हे ठरत असेल तर आपण ज्या देशात राहतोय तो देश नेमका कोणाचा.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्या दिवशी म्हणजे अगदी त्या दिवशी देशात कसे वातावरण असेल. लोकांना काय वाटत असेल. त्यांच्या मनात कोणत्या भावना येत असतील. वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे अनुभव असतील. याची आपण केवळ कल्पना करू शकतो. पुण्याजवळील देहुरोड हे ठिकाण. पुणे मुंबई रेल्वेलाईनवरचे एक छोटेसे स्टेशन. ब्रिटिश लष्कराचे महत्वाचे केंद्र. इंग्रज इथे दारूगोळा व इतर रसद साठवत असत. दुसर्या महायुद्धाचा तो काळ होता. रेल्वेने ती रसद व दारूगोळा युद्धाच्या आघाड्यांवर पाठविले जाई. देहुरोड ही ब्रिटिश लष्कराची छावणी म्हणजे कॅंटॉन्मेंट. हे देहुरोड कॅंटॉन्मेंट आजही आहे. त्यावेळी हे अगदी छोटे होते. म्हणजे मानवी वस्ती छोटी पण ब्रिटिश लष्कराचा पसारा बराच मोठा होता. अनेक डेपो होते. मिलिटरीची कार्यालये होती. इंग्रज अधिकार्यांचे बंगले होते. पण देहुरोडचा बाजार अगदी लहान होता. काही दुकाने आणि एखाद दुसरे हॉटेल. ते सर्व साधे म्हणजे चटाई, ताडपत्री किंवा पत्र्याचे.
या देहुरोड कॅंटॉन्मेंटमध्ये अगदी नुकतंच मिसुरडं फुटलेला एक कोवळा तरूण सफाई कामगार होता. तो हरियाणावरून आला होता. रोजगाराच्या शोधात इकडे आला आणि नातेवाईक आणि जातीतील इतर लोक करतात तसा तोही सफाईचे काम करू लागला. त्याला इंग्रज अधिकार्यांच्या बंगल्यावर संडास सफाईचे काम मिळाले. त्यावेळी ड्रेनेज सिस्टम नव्हती. मैल्याचे डबे वाहून न्यावे लागायचे. लोकांच्या दृष्टीने सफाईचे काम म्हणजे अत्यंत हीन दर्जाचे काम. हरियाणावरून आलेले हे सफाई कामगार इंग्रजांनी दिलेल्या बराकीत राहायचे. सगळे आपापले कुटुंब गावाकडे सोडून एकटेच इकडे आलेले. बराकीत हे लोक समूहाने राहायचे. गटगटाने स्वयंपाक करायचे. कधी कधी मिलिटरीच्या लंगरमध्ये (भटारखाना) उरलेले अन्न म्हणजे दाल-रोटी यांना मिळायचे. त्यावर यांचे भागायचे. तेव्हढीच बचत झाली असे यांना वाटायचे. चार पैसे कमविण्यासाठी गाव सोडून आलेले. गाव तिकडे लांब हरियाणात. कधी जायचे म्हटले तर गावात पोहोचायला चार दिवस लागायचे. त्याकाळी कोळश्यावर चालणारे इंजिन होते. रेल्वेला दिल्लीला पोहोचायला तीन दिवस लागायचे. तिथून पुढे हरियाणातल्या अंतर्गत ग्रामीण भागात असलेल्या गावात पोहोचायला आणखी एक दिवस. हे अंतर कापायचे म्हणजे त्याकाळी सामान्य लोकांच्या दृष्टीने खूप जिकरीचे होते. गावात मागे राहिलेले बायका मुलं म्हणायचे ‘म्हारा माणस परदेस गया ह’. गावातली लोकं महाराष्ट्राला परदेस म्हणायची. कुठे चालला तर परदेसला चालला. तिकडून इकडे एखादा निघाला की सगळे जमा होऊन त्याला सोडायला बस अड्ड्यावर यायचे. बायका हरियाणवी ग्रामीण लोकगीते म्हणत मागे मागे चालायच्या. बस अड्ड्यावर आले की सगळे एकमेकांच्या गळ्यात पडून रडायचे. माणूस इतक्या लांब चाललाय परदेशात. कुणास ठावूक तिथे काय होईल. एखादी अप्रिय घटना घडू नये. परत कधी भेट होईल खात्री नसायची. परत भेट व्हावी अशी आस मनात ठेऊन एकमेकांचा निरोप घेतला जायचा.
तर असे हे लोक. आपलं घरदार कुटुंब-कबीला सोडून इथे ‘परदेशात’ म्हणजे महाराष्ट्रात रोजीरोटीच्या शोधात आलेले. त्यात १४ – १५ वर्षांचा तो किशोरवयीन मुलगा. त्या दिवशी नेहमीप्रमाणे इंग्रज अधिकार्यांच्या बंगल्यावर काम संपवून तो परत आपल्या बराकीत चालला होता. कामगारांच्या या बराकी देहुरोड रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर पश्चिमेकडच्या मैदानात होत्या, जिथे आज एम.बी. कॅम्प आहे. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंट बेटन यांच्या नावाने हा भाग आज ओळखला जातो. इंग्रज अधिकार्यांचे बंगले स्टेशनच्या पलीकडे होते. तिथून बराकीकडे परत जातांना मध्ये देहुरोड बाजार लागे. अर्ध्या बाह्यांचा खाकी कुर्ता अन खाकी हाफ पॅंट घातलेला तो सफाई कामगार मुलगा काखेत झाडू घेऊन त्याच्याच तंद्रीत बाजारातून चालला होता. तेव्हढ्यात एका माणसाने त्याला जोरात आवाज दिला. तो मुलगा दचकला. काय झालं ? आपल्याकडून काही चूक झाली की काय ? आता मार बसणार बहुत्येक ... खालची जात म्हणवल्या जाणार्यांनी दबून राहण्याचाच तो काळ होता.
त्या मुलाच्या मनात भीती दाटली. गल्ल्यावर बसलेला हॉटेलचा मालक त्याला आवाज देत होता. थांबण्याचा इशारा करत जवळ बोलावत होता. मुलाच्या मनात विचार आला, आता या हॉटेल मालकाला आपल्याशी काय काम? का तो आपल्याला बोलावतोय? या हॉटेलमध्ये आपल्याला प्रवेश नाही. चहाचे कप समोरच्या वडाच्या ढोलीत ठेवलेले असतात. कधी प्यायचाच असेल तर झाडाच्या आडोशाला मातीत पडलेले कप आपण उचलतो विसळून त्यात चहा घेतो. आपल्या कपात चहा वरून टाकला जातो. बाहेर त्या झाडाखाली बसून आपण चहा पितो. आपले भाऊ-बंद सगळेच असे करतात. गावाकडे असा काही अनुभव नव्हता. कारण गावाकडे तेव्हा हॉटेल नावाचा प्रकारच नव्हता. त्या मुलाने हॉटेल सर्वप्रथम बघितले इकडे आल्यावर. सकाळी लवकर कामावर जावे लागे. परतेपर्यंत दुपारचे अकरा-बारा वाजत. उपाशी पोटात काव-काव सुरू झालेली असे. तेव्हढाच चहाचा आधार. कधी कधी तो त्या झाडाच्या आडोशाला बसायचा. गपचूप चहा प्यायचा अन जातांना पैसे गल्ल्यावर ठेऊन निघून जायचा. हॉटेलचा मालक ढुंकूनही आपल्याकडे पहात नाही की कधी काही बोलत नाही. मग आज का बोलावतोय? मुलगा घाबरतच त्याच्या जवळ गेला. मालक हसू लागला. कागदाचा पुडा मुलाच्या हातात ठेवत म्हणाला “अबे घबराता क्युं है?...ये ले !” पुड्यात लाडू आणि चिवडा होता. मुलाने मान उचलून पाहिले. “जा बैठ के खा, मौज कर. आज अपने देश को आजादी मिल गयी. १५ अगस्त है आज, आजादी का दिन,” हॉटेल मालक मोठ्या उत्साहात बोलत होता.
तो मुलगा म्हणजे माझे वडील, मांगेराम चंडालिया. देश स्वतंत्र झालाय हे त्यांना त्या प्रसंगातून कळले. पुढे त्यांच्या आयुष्याने अनेक वळणं घेतली. पण १५ ऑगस्ट आला की सहजच त्यांना ही घटना आठवायची. लहान असतांना आम्ही त्यांच्या आजूबाजूला बसून लक्ष देऊन ऐकायचो. पुढे चळवळीत आल्यावर, चार पुस्तकं वाचली अन माझ्या मनात प्रश्न पडू लागले. एकदा वडीलांना म्हणालो, कसलं स्वातंत्र्य ? जर आपण खरंच स्वतंत्र झालो असतो तर काही वेगळं घडलं असतं. वडीलांच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह. मी म्हणालो, त्या हॉटेल मालकाने आत बोलावून टेबलावर बसवून खायला दिलं नाही. तुम्हाला बाहेरच्या बाहेर ठेवलं. देश स्वतंत्र झाल्याचा आनंद त्याने साजरा केला पण त्या आनंदात तुम्हाला पूर्णपणे सामील करून घेतलं नाही. म्हणजे त्याचं स्वातंत्र्य वेगळं, आपलं वेगळं, असं नाही वाटलं का तुम्हाला? वडील माझ्याकडे पहात राहिले. थोडा वेळ काहीच बोलले नाहीत. मग म्हणाले, “वो समय अलग था, ये समय अलग है”.
त्यानंतर वडीलांच्या जीवनात अनेक घडामोडी घडल्या. ते परत गावी हरियाणात गेले. गावात आमच्या नात्या-गोत्याचाच ब्रास बँड होता. त्यात ते सामील झाले. ते ट्रंपेट वाजवायचे. ज्यावेळी सीझन नसेल त्यावेळी मोल मजूरी करायचे. पण त्या जगण्यात समाधान मिळेना. मुख्य म्हणजे गावाकडचे जातीय भेदभावाचे वातावरण सलू लागले. काही वर्षांनी परत पुण्यात आले. रेंज हिल्सला त्यांच्या काकाकडे राहू लागले. कामाच्या शोधात ते फिरत होते. एक दिवस पुण्यात फिरता फिरता आर्मीच्या सदर्न कमांडकडे गेले. तिथे भरतीची रांग पाहिली. रांगेत उभे राहिले अन मिलिटरीत भरती झाले. काही वर्ष मिलिटरीत काढली. त्याच काळात त्यांचे लग्न झाले. आईला नोकरीच्या ठिकाणी सोबत नेणे शक्य नव्हते. आई गावाकडेच होती. सोनीपत जिल्ह्यातील नदीपूर माजरा हे गाव. गावात जाट जमीनदारांचे वर्चस्व. जमीनदारांच्या शेतात मजूरी आणि त्यांच्या हवेल्यांची व गोठ्यांची झाड-लोट आमचे लोक करायचे. वैर आणि वैमनस्य तर पूर्वापार चालत आले होतेच. एकदा काही कारणांनी भडका उडाला.
त्या रक्तरंजित संघर्षात आमची चार माणसं मारली गेली. त्यावेळी वडील मिलेटरीत जबलपूरला होते.आई गावातच होती. जाटांनी आमच्या बगडवरच (वस्ती) हल्ला केला होता. माझ्या नात्यात आजोबा लागणारे दोन जण व दोन चुलत काका त्यात ठार झाले. बरीच माणसे जखमी झाली. आईला पण मार लागला होता. परिस्थिती बिकट होती. गावात तणाव होता. तिथे राहणे शक्य नव्हते. सगळी लोकं इकडे-तिकडे पांगली. आई माहेरी पानीपत जिल्ह्यातील बापोली या गावी आली. आईने गाव सोडताना दोन गोष्टी आठवणीने सोबत घेतल्या. एक म्हणजे ते ट्रंपेट जे वडील ब्रास बँडमध्ये वाजवायचे आणि दुसरे म्हणजे ती लाठी जी जमीनदारांशी लढतांना नेहमी कामी आलेली होती. त्या लाठीला वरच्या बाजूला लोखंडी कॅप आणि खालच्या बाजूला लोखंडी तारेचा वेढा होता. हरियाणात ग्रामीण भागात प्रत्येकाच्या हातात लाठी असतेच. लाठी हातात बाळगणे ही तिथली जीवनपद्धती आहे. आईने आणलेली लाठी तर आमच्या कुटुंबासाठी विशेष होती कारण स्वसंरक्षण करण्यासाठी ती आजोबांच्या काळापासून नेहमी उपयोगी पडत आली होती. आपलं गाव, आपलं सर्वस्व सोडतांना घेण्यासारख्या दोनच गोष्टी होत्या, त्या आईने सोबत घेतल्या, ट्रंपेट आणि लाठी.
वडील मिलिटरीतून रजा टाकून आले. आता गावात राहायचे नाही ठरले. मिलिटरी पण सोडायची, एव्हढेच नव्हे तर हरियाणात पण राहायचे नाही, हे वडीलांनी ठरवून टाकले. महाराष्ट्रात नगर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घोडनदी प्रकल्पावर आमचा एक मामा सफाईच्या कामावर चिटकला होता. तिथे अजून जागा निघाल्या होत्या. वडीलांनी तिथे यावे यासाठी तो आग्रही होता. पण मिलिटरी मध्येच सोडून देणे काही सहज शक्य नव्हते. त्यासाठी वडीलांना खूप खटपटी कराव्या लागल्या. हेडक्वाट॔रला त्यांना अनेक हेलपाटे मारावे लागले. मग कोणतीही सेवा सुविधा न देता त्यांना मिलिटरीच्या सेवेतून कमी करण्यात आले. ते घोडनदी प्रकल्पावर सफाई कामगार म्हणून लागले. पुढे आईला इकडे आणले. आईला पण सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली. आई-वडील दोघांना सरकारी नोकरी मिळाल्याने थोडे स्थैर्य आले. गावापेक्षा हा ‘देश’ चांगला अशी भावना निर्माण झाली. इथे महाराष्ट्रात आल्यावर चार बहीणींच्या पाठीवर माझा जन्म झाला.
आमच्या घरात दोन लोखंडी पेट्या होत्या. एक गडद हिरवी आणि दुसरी गडद निळी. त्या पेट्या कधी कधी उघडल्या जायच्या. वडील त्यातील सामान काढून साफ-सूफ करून पुन्हा व्यवस्थित ठेऊन द्यायचे. तिसरी- चौथी पासूनच मनात उत्सुकता होती की त्यात काय असेल. पुढे जरा मोठा झाल्यावर तर स्वतःच त्या पेट्या उघडून धुंडाळू लागलो. निळ्या पेटीत आईचे आणि आजी-आजोबांचे कपडे आणि चांदीचे दागिने होते. आजी आणि आईचे घागरा, कुर्ता आणि आजोबांचे जॅकेट, धोतर आणि बरंच काही. तर हिरव्या पेटीत होतं ट्रंपेट आणि वडिलांचे मिलिटरीचे समान. ते पितळी ट्रंपेट मला खूप आकर्षित करायचे. मी ते हातात घेऊन वाजवायचा प्रयत्न करायचो. पण त्यात खूप जोराने हवा फुंकायला लागायची. वडील मग ते वाजवून दाखवायचे. खूप मजा यायची. मिलिटरीचे सामान तर किती तरी वेळ पहात राहावे असे. त्यात वडिलांचा हिरवा गणवेश, फूल बाह्यांचे स्वेटर, निळ्या लोकरीची टोपी, टोपीवरचा बिल्ला, सिग्नल कोअर रेजिमेंटची एक कसली तरी डायरी, कागदपत्रं, आणि पितळी मूठ असलेली एक छडी. एक एक वस्तू हातात घेऊन बघायची ईच्छा व्हायची. त्याला स्पर्श करतांना होणारा रोमांच. आई म्हणायची घाला पुन्हा एकदा हे सर्व अंगावर. बघू द्या मुलांना तुमचे सैनिक रूप. आम्ही मुलं पण गलका करायचो. घाला, घाला, आम्हाला बघायचं आहे. वडीलांनी तो गणवेश कधीच घातला नाही. पण जिवापाड जपून ठेवला. मी नेहमी कल्पना करायचो, सैनिक म्हणून कसे दिसत असतील आपले वडील. पितळी मूठ असलेली ती छडी मला खूप आवडायची. काय करायचं तिचं. कशी वापरायची ती छडी. वडील सांगायचे अन मी करत जायचो. खांद्याजवळ तिची मूठ टेकवायची अन तिचे खालचे टोक हाताच्या पंजात पकडायचे. हात एकदम सरळ ताठ ठेवायचा अन कदम ताल शुरू, एक-दो, एक-दो, एक-दो ...
खरंच, आता जर आपले वडील मिलिटरीत असते तर, किती बरं झालं असतं. किती अभिमानाने आपण सांगितलं असतं सगळ्यांना. ते जाऊ द्या किमान कोणी विचारलं असतं, काय करतात तुझे वडील तर आपली मान अशी खाली गेली नसती. आपण तोंड लपवलं नसतं. कोणीही विचारायचं कधीही. मित्राच्या घरी गेलो की त्याच्या घरचे लोक किंवा वर्गात सर किंवा बाई विचारायचे अचानक. हा प्रश्न मला सगळ्यात जास्त डाचायचा. काय सांगू की माझे वडील झाडूवाला आहेत. इतर मुलांचा मला हेवा वाटायचा, किती बरं आहे यांचं. हे सहज सांगू शकतात की यांचे वडील काय काम करतात. मी नेहमी धास्ती घेऊन असायचो मनात. वाटायचं नकोच कोणी मित्र. आपण आपले एकटेच बरे. पण नकोच शाळा असं म्हणता यायचं नाही. आठवी-नववीत असतांना मनात यायचं, आपण का जन्म घेतला या घरात? आपल्याला का असे आई-वडील मिळाले? ज्यांच्या सोबत आपण उघडपणे कुठे जाऊ शकत नाही. आपली ओळख बेधडक सांगू शकत नाही. मी मनातल्या मनात आई-वडीलांना खूप शिव्या द्यायचो. शाळेत जाण्याच्या वाटेवर कधी वडील तर कधी आई समोरून यायचे. मी रस्ता बदलायचो, नाहीच जमलं तर तोंड दुसरीकडे फिरवायचो. सोबत चालणारी मुलं ओरडायची, ए बघ तुझी आई चालली झाडू घेऊन, तुझे वडील चालले झाडू घेऊन. मी सुन्न. कानशिलं तापायची. छातीत गुदमरायचं. आज इतक्या वर्षांनंतर ते सर्व आठवल्यावर वाटतं, बालपण करपणं यालाच म्हणतात का?
डहाणूजवळच्या सूर्याप्रकल्पावरच्या पाटबंधारे खात्याच्या आमच्या कॉलनीत १५ ऑगस्ट साजरा केला जायचा. झेंडा वंदनाला सगळे जमायचे. वडील तिथे आवर्जून जायचे. चांगले स्वच्छ धुतलेले कपडे घालून, गांधी टोपी लावून. पण मी जायचो नाही. टाळायचो. जिथे ते तिथे मी नको. आपली ओळख उघड होते. ती प्रकल्पावरची कॉलनी. शहरापासून लांब जंगलात वसलेली. एक छोटेसे गावच जणू. सगळेच एकमेकांना ओळखायचे. त्यामुळे तर जास्त पंचायत होती. मी कल्पना करायचो जर वडील मिलिटरीत असते तर इथे या कॉलनीतील झेंडावंदनात त्यांचा सत्कार झाला असता. किती अभिमान वाटला असता मला. काहीपण असं चित्र मनात रंगवत बसायचो. ज्याला काही आधार नसायचा. कळायचं नाही की जर वडील मिलिटरीत असते तर आम्ही इथं कशाला आलो असतो. एक दिवस मी वडीलांना विचारलेच, तुम्ही मिलिटरी का सोडली ? सोडली नसती तर आज तुम्ही हे काम करत नसता. किती बरं झालं असतं. वडील म्हणाले, तिथं पण हेच काम करायला लागायचं. जातीचं काम सुटत नाही कुठेही गेलं तरी. त्यादिवशी मला प्रचंड धक्का बसला. सैनिक म्हणून वडिलांचं मी रंगवलेलं मनातलं चित्र धाडकन कोसळलं. मनाला प्रचंड ग्लानी आली. अनेक वर्ष त्या ग्लानीत गेली. वाटायचं प्रचंड खोल अशा दरीत आहे मी. आजूबाजूला उंचच उंच दगडांच्या शिळा. कठोर वास्तव आणि गुदमरणारा जीव. बाहेर पडायचा कोणताच मार्ग नाहीये. मी चाचपडतोय, धडपडतोय सगळीकडे. खूप वर्ष गेली त्यात. आधी बालपण करपलं तसं आता अकाली प्रौढत्व आलं असं वाटायला लागलं. कॉलनीच्या आजूबाजूला चहूकडे पसरलेल्या डोंगरांच्या अन टेकड्यांच्या असंख्य रांगा. झरे, ओढे, नाले अन आदिवासी पाडे. भटकत राहायचो त्यात. तो निसर्ग मनाला उभारी द्यायचा. किती ऋतु आले ऋतु गेले पण मी त्याचा खर्या अर्थाने आनंद घेऊच शकलो नाही. मनात सतत घालमेल चालू असायची. मानसिक पातळीवर अथांग पसरलेल्या त्या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग मला दाखविला पुस्तकांनी. पहिल्यांदा हातात पडले ‘जेव्हा मी जात चोरली’, मग ‘बलुतं’, मग ‘गोलपिठा’, मग गोर्कीचं ‘आई’ आणि मग अशी अनेक पुस्तकं ज्यांनी माझा हात पकडून अलगद मला त्या अंधार कोठडीतून बाहेर काढलं. जिथे राहून मी माझ्या आप्त-स्वकियांचाच तिरस्कार करू लागलो होतो. आई-वडीलांनाच दुषणे देत होतो. स्वतःला अपराधी मानत होतो. या नव्या जाणिवेने माझे मन उजळून निघाले. माझ्या मनात माझ्या आई-वडीलांबद्दल आणि त्यांच्यासारख्या समस्त कष्टकरी लोकांबद्दल अपार करूणा निर्माण झाली. आता मला माझ्या आई-वडीलांची लाज वाटत नव्हती. वाटायचं वेदनेच्या वाटेवरचे ते प्रवासी आहेत. मजल दर मजल करत चालले आहेत.
मनाच्या पातळीवर या घडामोडी जेव्हा घडल्या त्यानंतर खूप मोठा काळ लोटून गेलाय. आता आई-वडील दोघेही या जगात नाहीत. विस्मृतीत गेलेल्या अनेक घटनांचा थरावर थर साचलाय. उलटा-पालटा अन आडवा-तिडवा. पण काही घटना अशा असतात ज्या काहीही झालं तरी कधीच विसरल्या जात नाहीत. त्या स्मृती पुन्हा धाडकन आपल्या समोर येऊन उभ्या राहतात. अशीच एक आठवण १५ ऑगस्ट आला की उसळून वर येते. नाशिक जिल्ह्यातील वैतरणा धरण प्रकल्पावर आम्ही होतो. तेव्हा मी चौथीत असेन. पंधरा ऑगस्ट जवळ आला. बालपणाचा तो उत्साह भारी. झेंडावंदनाला जायची हौस. आदल्या रात्री तांब्यात निखारे टाकून वडिलांनी त्यांच्या आणि माझ्या कपड्यांना इस्त्री केली. सकाळी लवकर उठून आंघोळी करून आम्ही सज्ज झालो. शाळा घरापासून जरा लांब कॉलनीच्या बाहेर होती. चालत जावे लागायचे. आम्ही आमच्या चाळीतून बाहेर निघून शाळेचा रस्ता धरला. चतुर्थ श्रेणीच्या कामगारांच्या चाळी, मग रावसाहेब-भाऊसाहेबांची निवासस्थाने आणि मग अधिकार्यांचे बंगले अशी कॉलनीची ठेवण होती. आठवले साहेबांचा बंगला लागला. हा बंगला मला खूप आवडायचा. बंगल्याला छानसे कुंपण होते. कुंपणाला एक मस्त गेट होते. गेटवर एक छानशी कमान होती. कमानीवर वेलीचा मांडव होता. बंगल्याच्या आत कुंड्यांमध्ये अनेक रंगबेरंगी फूलझाडे होती. मी उत्साहात उड्या मारत वडीलांसोबत चाललो होतो. अशी फुलं आपण आपल्या अंगणात लावू या हे वडीलांना सांगत होतो. तेव्हड्यात मोठयाने ओरडण्याचा आणि कोणीतरी कोणाला तरी रागवत असल्याचा आवाज आला. आवाज बंगल्यातून येत होता. वडील लक्ष देऊन ऐकू लागले. नंतर गेटमधून मुकादम बाहेर पळत येत असलेला दिसला. तो आमच्या कडे येत होता. आम्ही थबकलो. मुकादम वडीलांना म्हणाला, “ बरं झालं तू भेटलास, मी आता तुझ्याकडेच चाललो होतो. चल लगेच चल, उचल त्या कुत्र्याला.” वडील गोंधळले. आता आज? सुट्टीच्या दिवशी ? कसलं काम काढलं ? असे अनेक प्रश्न त्यांच्या चेहर्यावर मुकादमाने भर भर वाचले असणार. हातघाईवर येत तो म्हणाला, “चल बाबा, चल लवकर, आता लगेच उचल त्या मेलेल्या कुत्र्याला. वास सुटलाय त्याचा. साहेब लई चिडलेत.” साहेबाची आज्ञा. टाळणार कशी. तिथे कोणतीही सबब चालणार नव्हती. माझा ओढा झेंडावंदनाकडे होता पण वडीलांच्या डोक्यावर वरिष्ठाची आज्ञा येऊन आदळली होती. त्यापुढे कोणाचेच काही चालणार नव्हते.
वडीलांनी आसपास एखादी दोरी मिळते का हे शोधायला सुरूवात केली. बरीच शोधा शोध करून ती सापडली. बंगल्याच्या मागे कुंपणाच्या बाहेर ते काळं कुत्रं मरून पडलं होतं. झाडा-झुडपांमुळे कोणाच्या ते लक्षात आलं नाही. घाण वास सुटल्यावर साहेबाचा पारा चढला. त्याने मुकादमाला फर्मान सोडले अन मुकादमाने ते माझ्या वडीलांवर लादले. वडीलांनी रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मला उभे केले. दोरी घेऊन वडील बंगल्याच्या पाठीमागे गेले. झाडाखाली मी तसाच उभा होतो. बर्याच वेळाने ते आले. त्यांच्या हातात दोरीचे एक टोक होते. दुसरे टोक कुत्र्याच्या पायाला गच्च बांधलेले होते . ते जोर लावून दोरी खेचत कुत्र्याला फरपटत घेऊन चालले होते. मातीतून फरपटत जाणारे ते काळे कुट्ट शव, त्याचे उघडे तोंड, फाकलेले डोळे बघून माझ्या अंगावर काटा आला. मी उभा होतो तिथून काही अंतरावरून ते गेले. माझ्यासाठी भयावह दृश्य होते ते. मी डोळे मिटून घेतले. बर्याच वेळाने वडील आले. लांब नेऊन एका खड्यात त्यांनी त्या कुत्र्याला पुरले. वडीलांचे कपडे मातीने माखले होते. झेंडावंदनाची वेळ निघून गेली होती. शाळेतून परत येणारी मुलं वाटेवर दिसत होती. झेंडावंदनानंतर खाऊ मिळतो हे मला माहीत होते. खाऊ हातात घेऊन येणार्या त्या मुलांचा मला हेवा वाटू लागला. तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.
घडून गेलेल्या या घटनांची आज इतक्या वर्षांनंतर मनात जुळवाजुळव करतो तेव्हा काय चित्र उभे राहते. स्वातंत्र्याचा आनंद साजरा करणार्या हॉटेल मालकाकडुन अनपेक्षितपणे खाऊ मिळणारे वडील अन त्याच स्वातंत्र्यदिनाला अनपेक्षितपणे खाऊ गमवणारा मी. काय बदलले. स्वातंत्र्याने काय दिले. आमच्या जीवनात नेमका काय बदल झाला. स्वातंत्र्याला सत्तर वर्ष झाली. माझ्या पूर्वजांनी त्यांची जन्मभूमि सोडून पण जवळपास तेव्हढाच काळ लोटलाय. जगाने एकविसाव्या शतकात प्रवेश करून पण दोन दशकं उलटून गेली आहेत. आजही आम्ही गावात गेलो तर बस अड्ड्यावर उतरल्या उतरल्या आम्हाला आमची जात विचारली जाते. कधी तरी जातो. अनोळखी भासतो म्हणून बस अड्यापासून गावात आमच्या बगडमध्ये (वस्तीत) जाईपर्यंत भेटणार्यांनी येनकेन प्रकारेण आमची जात पडताळणी केलेली असते. जात कळल्यावर त्याच्या डोळ्यातील भाव मला डागण्या दिल्यासारखे वाटतात. हरियाणा हे असे राज्य आहे जिथे आजही उघडपणे कोणालाही त्याची जात विचारली जाते. जातीवरून माणसाला किती किंमत द्यायची, त्याच्याशी काय व्यवहार करायचा हे ठरत असेल तर आपण ज्या देशात राहतोय तो देश नेमका कोणाचा? १५ ऑगस्टला ज्या स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला जातो ते स्वातंत्र्य कोणाचे? असे प्रश्न मनात निर्माण होतात. स्वातंत्र्याचा अर्थ काय? मुक्ती कोन पथे? हे प्रश्न आपल्या देशात आजही अनुत्तरित आहेत.
(लेखक लिहीत असलेल्या आत्मकथनातील काही भाग)
(लेखक सामाजिक-सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत)