Quick Reads
पूर्णवेळ कार्यकर्त्याच्या बाबतीत चळवळीचा पाया चुकला आहे का?
चळवळीतल्या एका अत्यंत महत्वाच्या मुद्यावर चर्चा होणे आवश्यक बनले आहे.
औरंगाबाद येथील कार्यकर्ते बुद्धप्रिय कबीर यांचा अलीकडे अकाली मृत्यू झाला. डावी चळवळ आणि आंबेडकरी चळवळीत ते सक्रिय होते. कबीर यांचे जगणे जसे काळजावर चरा उमटवणारे होते तसाच त्यांचा मृत्यू सुद्धा हृदयद्रावक आहे. कबीर आज आपल्यात नाहीत पण या निमित्ताने चळवळीतल्या एका अत्यंत महत्वाच्या मुद्यावर चर्चा होणे आवश्यक बनले आहे.
कोण होते बुद्धप्रिय कबीर? कशासाठी झटत होते ते? ही व्यवस्था बदलली पाहिजे. मानवाची शोषणातून मुक्ती झाली पाहिजे. समतावादी समाज निर्माण झाला पाहिजे, असे त्यांना वाटायचे. व्यवस्था परिवर्तनाचे प्रचंड कार्य घरात राहून होऊ शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. ते घराबाहेर पडले. संजय उबाळे हे त्यांचे मूळ नाव. त्यांनी बुद्धप्रिय कबीर हे नाव नंतर धारण केले. ते झोकून देऊन चळवळीत काम करू लागले.
अशाप्रकारे कोणी एखादा शोधक वृत्तीचा तरूण चळवळीसाठी स्वतःला समर्पित करत असेल तर त्याची जीवनपद्धती काय असेल, जगण्याची व काम करण्याची साधने कोणती असतील? याचा कोणताही अधिकृत निर्णय किंवा त्याची कोणतीही सामुदायिक प्रक्रिया चळवळीत नाही. तो जर कुठल्यातरी एका संघटनेला बांधून घेऊन काम करणार असेल तर ती संघटना काही प्रमाणात तुटपुंजी व्यवस्था करते. पण हा कार्यकर्ता जर विविध प्रवाहांना जोडणारे प्रयोग करणार असेल. पंथ प्रवृत्तीत न अडकता सर्वव्यापी बनण्याचा प्रयत्न करत असेल आणि सम्यक चळवळ उभी करण्यासाठी धडपडत असेल तर मग त्याचे जगणे सोप्पे नसते.
कबीर नवे काही घडवू पाहत होते. पारंपरिक पद्धतींना फाटा देऊन नवे मार्ग शोधू पाहात होते. डावी चळवळ आणि आंबेडकरी चळवळ यांचे ध्येय एक आहे. मग आपण आपसात समन्वय करून का चालू नये. एकमेकांना पूरक का राहू नये, असे त्यांना वाटायचे. कष्टकर्यांचे प्रश्न, महिलांच्या समस्या, अल्पसंख्यांकांच्या अडचणी असो की जातीय अत्याचाराच्या घटना, ते प्रत्येक ठिकाणी लढ्याच्या पहिल्या फळीत असायचे. अशाप्रकारे विविध चळवळींना जोडणारा ते एक दूवा बनले होते.
संघटनेचे ऑफिस हेच त्यांचे घर आणि नातेगोते म्हणजे चळवळीतील माणसे. लोकं त्यांचा आदर करायची. जमेल तशी त्यांना मदत करायची. पण एकाकी अवस्था माणसाच्या शारिरिक-मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम करतेच. त्यांच्या दिनचर्येत कोणताच नियमितपणा नव्हता. काम आणि फक्त कामच त्यांच्या डोक्यात असायचे. राहण्याचा नीट ठिकाणा नाही, वेळेवर जेवण नाही अशा अवस्थेत त्यांनी अनेक वर्षे काढली. अखेर शारीरिक व्याधींनी ग्रस्त होऊन ते अकाली मृत्युमुखी पडले. मागे उरली फक्त हळहळ आणि एका शोकात्म नायकाच्या जीवन संघर्षाबद्दलची वांझोटी चर्चा.
वांझोटी चर्चा हा शब्द अनेकांना खटकू शकतो. पण जरा विचार करा. त्यांची स्वप्ने वांझोटी नव्हती. त्याचे जगणे वांझोटे नव्हते. ते ध्येय्यासाठी बेभान जगले. विपरित परिस्थिती आणि अपुऱ्या साधनांनीशी झुंजत राहिले. ते साधनहीन का होते? त्यांना जगण्याचे बळ पुरविणारा सांस्कृतिक परिवेश का नव्हता? सतत उभारी देईल असे वातावरण त्यांना का मिळाले नाही? चळवळीत अनेक गडगंज संस्था संघटना आहेत. त्यांचे गाडी-घोडे,स्थावर-जंगम मालमत्ता आहेत. तरी सुद्धा एक पूर्णवेळ कार्यकर्ता एकाकी का झुंजत राहतो? त्याच्या उर्मीला खतपाणी देणारी यंत्रणा चळवळीकडे का नाही? हे प्रश्न उपस्थित करून आपण सबंध चळवळीचे ऑडिट न करता केवळ अमुक एक कार्यकर्ता परवड होऊन मेला अशी खंतच केवळ व्यक्त करत राहिलो तर नक्कीच ती चर्चा वांझोटी ठरेल.
आपण कठोर आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. बुद्धप्रिय कबीर जे प्रयोग करू पहात होते त्यात आपले योगदान काय? आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो का? निदान आपण ते समजून घेण्याचा, त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न तरी केला का? व्यक्तीगत पातळीवर कोणी केला असेल. पण मुद्दा पक्ष आणि संघटनांच्या बाबतीत आहे. संघटनात्मक पातळीवर या प्रयोगाला स्वीकारण्याचा, खतपाणी घालण्याचा, अधिमान्यता देण्याचा प्रयत्न एखाद्या पक्ष संघटनेने केला का? आहे का तसे काही रेकॉर्ड? म्हणजे निकड आणि गरज फक्त बुद्धप्रिय कबीर यांनाच होती का? कुठल्याच पक्ष संघटनेच्या नेतृत्वाला वाटले नाही की या नवतरूणाला पुढे आणावे, त्याला मंच द्यावा, वाव द्यावा, निदान तो कशासाठी धडपडत आहे हे लोकांपर्यंत व्यापक पातळीवर पोहोचवावे तरी. आज त्यांचे गोडवे गायले जातायत. सोशल मीडियावर त्यांच्या सोबतचे जुने फोटो टाकून आठवणी जागवल्या जातायत. लेख लिहून भावनिक उमाळे व्यक्त केले जातायत. पण बुद्धप्रियच्या एकाकी प्रयोगात आपण कधीच त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलो नाही, हे वास्तव आहे.
जर आपण मागे वळून पाहिले तर आपल्याला काय दिसते. बुद्धप्रिय कबीर काही पहिला बळी आहे का? आपल्याला चळवळीत शोकात्म नायकांची मोठी फळीच आढळते. सुरेश पगारे, बाबु परुळेकर, कवी विश्वनाथ आठवले, शाहीर विलास घोगरे, शाहीर शंतनु कांबळे अन आता बुध्दप्रिय कबीर असे किती कार्यकर्ते व्यवस्थेच्या विरोधात लढता लढता अकाली गेलेत. अजिबात कुठेच नोंद न झालेले किंवा चर्चा न झालेले अनेक कार्यकर्ते आहेत. डाव्या, समाजवादी आणि आंबेडकरी चळवळीतील असंख्य कार्यकर्ते, काही कुंठित झाले, काही व्यसनाधीन झाले, काही स्किजोफ्रेनिक झाले, तर काही जगण्याचे उद्दिष्ट गमावून भरकटत राहिले. अनेकांनी कुटुंबियांच्या शिव्या खाल्ल्या. नातेवाईकांच्या लाथा खाल्ल्या. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पराधीन होऊन खंगत राहिले.
सरसकट असेच होते असे नाही. पण चळवळीतील कार्यकर्त्याचे जीवन जसे उमलायला हवे तसे उमलत नाही, हे ही तितकेच खरे. त्याला चळवळीत काम करतो म्हणून घरदारात सन्मान व मान्यता मिळत नाही. उलट नातेगोत्यात त्याच्याकडे तुच्छतेने बघितले जाते. ऐन तारुण्यात झोकून दिलेले अनेक जण आयुष्याच्या उतरत्या टप्प्यात उपेक्षित जीवन जगतांना आजही आढळतात. म्हणजे जोमाने काम करण्यासाठी घरदार सोडावे तर जगण्याची कोणतीच शास्वती नाही. अन कुटुंबात राहून सक्रीय व्हावे तर कोणताच आधार नाही. अशा अवस्थेत विवंचना आणि कुचंबणा सहन करत अनेक जण नैराश्याने गांजलेले दिसतात.
कार्यकर्त्यांचा नेमका प्रश्न काय असतो? नेमकी समस्या काय असते? ते का उद्ध्वस्त होतात. कबीरने घरदार सोडलं म्हणून त्याची अवस्था दारूण झाली असं म्हटलं तर जे घर-परिवारात राहिले किंवा आजही राहतायत त्यांची अवस्था तरी समाधानकारक आहे का? त्यांच्या जगण्याला दिशा मिळाली आहे का? चळवळीत काम करत असल्याचा सृजनात्मक आनंद त्यांनी मिळवलाय का? आता उतरत्या वयात असलेल्या कार्यकर्त्यांना चळवळीने जीवन साफल्याची अनुभुती दिली आहे का? उत्तर सकारात्मक मिळण्याची शक्यता अगदीच कमी असेल.
चळवळीत आलेले लोक सारख्याच सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतुन आलेले नसतात. त्यात दोन प्रकारचे लोक दिसतात. विपन्न गटातून आलेले आणि संपन्न गटातून आलेले.साठ-सत्तरच्या दशकात जे उच्च मध्यम वर्गातून आले होते. त्यांनी काही काळ चळवळ अनुभवली अन परत आपल्या सरळ धोपट वाटेवर निघून गेले. त्यांची कौटुंबिक स्थिती अशी होती की त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना पुन्हा सामावून घेतले. आर्थिक आधार दिला. महाराष्ट्रात आज संपन्न आणि प्रतिष्ठित असणारे बरेच लोक कधी एके काळी चळवळीत सक्रिय होते. त्यातील बरेच जन तर अगदी होल-टायमर सुद्धा होते. ती खडतर वाट सोडून ते आज सुरक्षित जीवन जगत आहेत. हे उच्च जाती-वर्गातून आलेले मध्यमवर्गीय लोक आहेत.
विपन्न गटातून आलेल्या कार्यकर्त्यांची परिस्थिती मात्र वेगळी असते. त्यांनी एकदा चळवळीत झोकून दिले की मागे फिरता येत नाही. वय उलटून जाते. पुन्हा शिक्षण करियर याचा ते विचार पण करू शकत नाहीत. त्यांच्याकडे कोणतेही सामाजिक-सांस्कृतिक भांडवल नसते. नाते-गोत्याचे कोणतेही पाठबळ नसते. संघटनेची अपेक्षा असते की त्यांनी मानधनावर काम करून समाधान मानावं. शेवटी चळवळीसाठी काहीना काही त्याग करावा लागेलच ना. कार्यकर्ता म्हणजे आदर्शवादी, त्यागी, कफल्लक, कलंदर, फकीर असावा असेच बिंबवले जाते. उच्च माध्यमवर्गातून आलेले लोक या गोष्टीचे ग्लोरिफिकेशन करतात. क्रांतीसाठी आपण हे केलेच पाहिजे असा रोमँटिक मुलामा ते देतात. कफल्लक असल्याचा आणि डी-क्लास झाल्याचा देखावा करणे या पेटी बुर्जुवाचा आवडता छंद असतो. त्यांना सामान्य स्थितीतून आलेल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने कळतच नाहीत. नेतृत्वस्थानी हे संपन्न गटातील लोकचं असल्यामुळे अंतिमतः त्यांचेच मत ग्राह्य धरले जाते.
चळवळीत ही चर्चा नवीन नाही. मध्यमवर्गाचा चळवळीतील रोल व त्याच्या मर्यादा यावर कम्युनिस्ट चळवळीत नेहमीच डिबेट्स होत आलेले आहेत. रशियन क्रांति आणि चीनच्या क्रांतीत सुद्धा हा विषय चर्चेत होता. माओने तर यावर विपुल लेखन केलेले आहे. मध्यम वर्गाचा रोल कोणीच नाकारलेला नाही. पण त्याने डी-क्लास होऊन चळवळीत उतरले पाहिजे, ही अट घालण्यात आलेली आहे. भारतात तर जातीव्यवस्थेचा संदर्भ पण लक्षात घ्यावा लागतो. इथे डी-क्लास आणि डी-कास्ट हे दोन्ही मुद्दे महत्वाचे ठरतात. चळवळीत निम्न जात-वर्गातून जसे लोक येतात तसेच उच्च जात-वर्गातूनपण येतात. यांच्यातील दरी कशी मिटवायची हा प्रश्न कायम राहिलेला आहे. कम्युनिस्ट आणि समाजवादी चळवळींच्या नेतृत्वस्थानी बहुसंख्येने उच्च जात-वर्गातून आलेले लोकं आहेत. तर कॅडर आणि फुटसोल्जर बहुसंख्येने निम्न जातीतील लोकं आहेत. या संरचनेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात नाही. कोणी केला तरी त्याची फारशी दखल घेतली जात नाही. कम्युनिस्ट नेतृत्व संघटनात्मक समस्यांबद्दल एक पालुपद नेहमी आळवते. ते असे की जनआंदोलनाला उतरती कळा आहे म्हणून संघटना अंतर्गत समस्या निर्माण होतात. जनआंदोलनाचा उभार आला की या समस्या आपोआप सुटतात. खरं तर त्या सुटत नाहीत. बाजूला पडतात किंवा दुर्लक्षिल्या जातात. मॉडेल्स आणि मेथड्स मधले दोष दूर होणार नाहीत, जो पर्यंत संघटनात्मक संरचनेत आमुलाग्र बदल घडणार नाहीत.
अनेक दशकं उलटून गेली. चळवळीत ही समस्या कायम आहे. यावर कधीच उघड चर्चा होत नाही. माणसं घडवायला आपण कमी पडलोय. हा आपला कॉमन प्रॉब्लेम आहे. पण या प्रॉब्लेमला आपण सगळे मिळून भिडत नाही. जो तो आपापले स्पष्टीकरण देऊ लागतो. आमच्या संघटनेत असे नाही. किंवा आमच्या पक्षात वेगळे वातावरण आहे. असे खुलासे देऊन वेळ मारून नेली जाते. समाजाचे समग्र रूपांतरण आपल्याला करायचे आहे. नवा समाज घडवायचा आहे. कसा घडणार हा नवा समाज? जो पर्यंत नवा माणूस आपण घडवू शकणार नाही, तोपर्यंत नव्या समाजाकडे आपण जाणार कसे?
केवळ चेतना, विचार, मूल्य, ध्येय मिळाले की झाले का? कार्यकर्त्याला एव्हढी रसद पुरेशी आहे का? माणूस म्हणून त्याच्या गरजा काय? भोवताली जी परिस्थिती असते त्याचे आंतर्विरोध कशाप्रकारे त्याच्यावर प्रभाव टाकतात. तो ज्या परिस्थितीतून आलेला आहे तिचे कोणते दबाव त्याच्यावर प्रभाव टाकत असतात. या सर्व बाबींचा सर्वंकष विचार होण्याची गरज आहे. पण चळवळीच्या नेतृत्वाने हे कधी गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही.
डाव्या संघटनेत कार्यकर्त्यांना किमान वेतनाइतके सुद्धा मानधन मिळत नाही. कामगारांना किमान वेतन मिळावे म्हणून हे कार्यकर्ते झगडतात. दर सहा महिन्यांनी जाहीर होणारा डीए (महागाई भत्ता) मालकांनी कामगारांना द्यावा म्हणून मॅनेजमेंटमागे हे कार्यकर्ते तगादा लावतात. पण स्वतः या कार्यकर्त्यांना मात्र महागाईत टिकून राहण्याइतके पण मानधन मिळत नाही. मग कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना चळवळीबद्दल आस्था आणि आपुलकी तरी कशी वाटणार. तुम्ही तुमच्या घरच्या लोकांचे मत परिवर्तन, करू शकत नाही तर तुम्ही समाजात काय बदल घडवणार, असे त्यांना ऐकून घ्यावे लागते. अर्थात ऐकविणारा कोण तर पेटी बुर्जुवा क्लासमधून आलेला तो नेता जो संघटनेचा सर्वेसर्वा असतो. संघटनेत म्हणायला डेमोक्रॅटिक सेंटरलिज्म असतो. पण निर्णय प्रक्रियेवर शेवटी प्रभाव पेटी बुर्जुवा क्लासचाच राहतो. संघटनेत म्हणायला सगळ्यांना सारखेच मानधन असते. पण त्याच रकमेत मार्जिनल क्लास मधून आलेल्या कार्यकर्त्याला आख्खे घर चालवायचे असते. तर पेटी बुर्जुवा क्लासमधून आलेल्या कार्यकर्त्याला ती रक्कम पॉकेटमनी सारखी असते. कारण त्याच्या जात-वर्गीय प्रिव्हलेज मुळे त्याला अनेक साधने सहज उपलब्ध झालेली असतात. घर चालविण्याचा बोजा त्याच्यावर नसतो. अशा परिस्थितीत सामान्य कार्यकर्त्याचा निभाव कसा लागणार? त्यामुळे पूर्णवेळ कार्यकर्ता ही संकल्पनाच फोल ठरते. समाजात त्याच्याबद्दल आस्था राहात नाही. कोणाला वाटेल की आपला मुलगा, भाऊ किंवा नवरा फुलटायमर बनावा? कोणालाच वाटणार नाही.
समाजवादी आणि कम्युनिस्ट चळवळीत टिकून राहिलेल्या ज्या पूर्णवेळ किंवा जीवनदायी नेत्यांचे कौतुक केले जाते, ते बहुसंख्य लोक मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गातून आलेले होते. जवळपास सर्वांच्या बायका नोकरी करीत होत्या. घर सांभाळत होत्या. घरची कोणतीच काळजी नसल्याने व आर्थिक चणचण नसल्याने त्यांनी त्यांच्या आवडीचे काम मनसोक्त केले. कम्युनिस्ट, समाजवादी आणि काही प्रमाणात आंबेडकरी चळवळीत असे अनेक कार्यकर्ते होते. दुसरी तऱ्हा अल्ट्रा लेफ्टवाल्यांची आहे. ते म्हणतात घरदार सोडा, भूमिगत व्हा, प्रोफेशनल रिव्हल्यूशनरी बना, बाकी काळजी करू नका, पक्ष तुमची काळजी घेईल. सर्व साधने पुरविल. पण पक्ष कुटुंबाची जबाबदारी घेणार नाही. कुटुंबाचे काय करायचे हे तुम्ही तुमची व्यवस्था करून या. जे लोक अत्यंत कष्टाने समाजात आपले स्थान निर्माण करतात, साधनहीन असूनही चळवळीत नवे प्रयोग करतात, नवी माणसे जोडतात त्यांना हे अल्ट्रा लेफ्टवाले एका झटक्यात जमीनीपासून, लोकांपासून तोडून टाकतात. कार्यकर्ता एकदा असा तुटला की तो पूर्ण पराधीन होतो. मग स्टेट आणि सेंट्रल कमिटीने दिलेल्या डायरेक्शननुसार चालत राहणे एव्हढेच उरते. हे एक चळवळीचे मॉडेल आहे. पण भारतात शहरी भागात ते कुठे फारसे रूजल्याचे आढळत नाही.
या विविध कार्यपद्धती, हे मॉडेल्स सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांचा विचार करून निर्माण झाले आहेत का? यात आर्थिक दृष्ट्या कमकुवत कार्यकर्ता कसे काय टिकू शकतो? २१ व्या शतकात पूर्णवेळ कार्यकर्ता किंवा व्यावसायिक क्रांतिकारी यांच्या व्याख्या काय? नव्या परिस्थितीत ते बदलले जाणार की नाही? हा कळीचा प्रश्न आहे.
आज मुळातच चळवळीकडे नवे लोक येण्याचा ओघ खूप कमी आहे. त्यांनी का यावे? असे काय आहे इथे की त्यांनी आकर्षित व्हावे? इथे टिकून राहावे? त्यांनी कोणाला फालो करावे? असे वातावरण,अशी परिस्थिती, तशी पूरक साधने तरी चळवळीत आहेत का?
माणूस जर चळवळीत यायचा आणि टिकायचा असेल तर किमान पाच मूलभूत गोष्टी अत्यावश्यक आहेत.
१. चळवळीने त्याला आत्मभान दिले पाहिजे. म्हणजे वैश्विक दृष्टिकोन दिला पाहिजे. इतिहासाच्या कोणत्या टप्प्यावर आपण उभे आहोत. सामाजिक रूपांतरणाच्या प्रक्रियेत आपली भूमिका काय. याचे सम्यक आकलन म्हणजे वैश्विक भान. डाव्या पक्ष संघटनेत हे काही प्रमाणात घडते. पण इतर संघटनांमध्ये याचा पूर्ण अभाव आढळतो. कार्यकर्त्याला बदलत्या विश्वाचे, त्याच्या बदलाचे कार्यकारण भाव समजावणे, त्याची विश्लेषण करण्याची कुवत वाढविणे आवश्यक असते. असे केले तर त्याला सेल्फ मोटीव्हेशन मिळू शकते.
२. आत्मभान टिकून राहावे यासाठी सांस्कृतिक साधने व तसा परिवेश निर्माण केला पाहिजे. म्हणजे कार्यकर्ता हा प्रथमतः माणूस आहे. यंत्र नाही. तो विचार करतो, अनुभवांचे सारसंकलन करू शकतो, सृजन करू शकतो, रसग्रहण करू शकतो. त्याच्या अंगी ना ना कला आहेत. कौशल्ये आहेत. चळवळीची रोजची कामे सुद्धा वरील गोष्टींना अनुसरून आखली गेली पाहिजेत. निरस पद्धतीची कामे म्हणजे चळवळीची कामे. कार्यकर्ता अशा निरस कामात बुडालेला असतो. हे जे चित्र आहे, ते बदलले गेले पाहिजे. चळवळीतला बुद्धिजीवी वेगळा, कलाकार वेगळा, कार्यकर्ता वेगळा अशी फाळणी नको.
३. प्रत्येकाला त्याच्या आवडी-निवडी-सवडीप्रमाणे काम करण्यास वाव दिला पाहिजे. कृतीकार्यक्रम केवळ वरून खाली नको तर खालून वर पण गेले पाहिजेत.
४. प्रत्येकाला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध होण्याची संधी मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. मी चळवळीत आलो म्हणून माझा आत्मिक विकास झाला. चळवळीत नसतो तर माझे विचारविश्व विकसित झाले नसते. भावविश्व दरिद्री राहिले असते. अशी भावना निर्माण होईल आणि प्रत्येकाला चळवळीत यावेसे वाटेल असे आश्वासक वातावरण नेतृत्वाला तयार करता आले पाहिजे.
५. जर तो पूर्णवेळ कार्यकर्ता असेल तर त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या किमान जगण्याची सोय केली पाहिजे.
वरील गोष्टी आज चळवळीत आहेत का? मग बुद्धप्रिय कबीर यांनी कशाच्या बळावर आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेतला. वरील परिस्थिती पाहिली तर त्यांनी एक प्रकारे अग्निकुंडातच उडी घेतली होती. जागतिकीकरणानंतर समाजाच्या संरचनेत खूप मूलभूत बदल झालेले आहेत. ट्रेड युनियन चळवळ लयाला गेली आहे, डाव्या जनसंघटना निष्प्रभ झाल्या आहेत, शेतकरी चळवळ इतिहासातील गोष्ट बनली आहे, जिकडेतिकडे एनजीओची घुसखोरी आहे, पुरोगामी म्हणविणारे पुण्या- मुंबईचे अनेक जण या एनजीओच्या धामधुमीत आपापले मजबूत इन्कम सोर्स बनविण्याच्या मोहिमेत मश्गुल आहेत. अशा आपमतलबी निगरगट्ट काळात कबीरसारखा तरूण समाज बदलण्याच्या ओढीने नव्या वाटा धुंडाळत फिरतो. काय आहे असे आश्वासक जे त्याला उभारी देईल.
असे काय होते इथल्या चळवळीत जे कबीर सारख्या कार्यकर्त्याच्या उर्जेला सामावून घेईल. त्याला माणूस म्हणून जगण्याचा आनंद देईल. एका सामुदायिक ध्येयासाठी कार्यरत असल्याची आटोकाट जाणीव देईल आणि महत्त्वाचे म्हणजे त्याला जीवन साफल्याची अनुभूती देईल.
कार्यकर्त्यांचे त्यागी, संघर्षरत असणे याचे ग्लोरिफिकेशन केले जाते. पण माणूस म्हणून तो एक ऍसेट आहे. त्याच्यात अनंत सुप्त क्षमता आहेत. त्या कशा बाहेर काढता येतील. त्याच्या अंगभूत कौशल्यांचा विकास कसा करता येईल. त्याचे स्किल्स वापरून चळवळ अधिक समृद्ध व व्यापक कशी करता येईल याची कोणतीही कार्यशैली विकसित झालेली नाही. सध्या चळवळीच्या नावावर जे चालते ते सर्व टाकाऊ आहे, निरर्थक आणि निकृष्ठ आहे असे नाही. तसेच प्रश्न विचारधारेबद्दल किंवा ध्येयाबद्दल नाहीत. प्रश्न ध्येयाकडे जाण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्याबद्दल आहेत. अशा प्रकारची चर्चा केल्याने आपल्या चळवळीचे नुकसान होणार नाही. उलट आपण आपल्यातील दोष दूर करून अधिक जोमाने सामाजिक क्रांतीकडे जाऊ शकू. आपल्या मेथड आणि स्ट्रक्चर मध्ये, कार्यपद्धती आणि निर्णय प्रक्रियेत काही दोष असतील तर ते तपासणे आपल्याच हिताचे नाही का? बाहेर परिस्थिती इतकी विकोपाला जातेय, व्यवस्था इतकी कुचकामी ठरतेय, लोकं पर्याय शोधतायत, मग चळवळ का वाढत नाही? चळवळीकडे नवी लोकं का येत नाहीत? आलेल्या लोकांना चळवळ का सांभाळू शकत नाही? का घडवू शकत नाही?
चळवळ माणसांची असते. मग चळवळीत माणसांची वानवा का ? खरं तर चळवळीतल्या संघटनांनी माणसं जोडणे, माणसं घडविणे हा विषय कधीच प्रामुख्याने त्यांच्या अजेंड्यावर ठेवला नाही. त्यासाठी धोरण-नीती आखली नाही. या बाबतीत नवनवीन प्रयोग केले नाही. चळवळीत अनेक जण आहेत, लिहिणारे, वाचणारे, भाषण देणारे, अभ्यास करणारे, विश्लेषण करणारे, पुस्तक छापणारे. पण माणसं घडविणारे कोण आहेत. विचाराने संपन्न झाल्यावर किती जण नव्या माणसांना शोधतात, समजावून घेतात, त्यांना घडवतात. जो वाचतो, विचाराने शहाणा होतो, तो आपल्याच लोकांना परत परत तेच सांगत राहतो. चळवळीत एक समुह कायम असा असतो जो स्वतःचे करियर सेट करण्यासाठी चळवळीत आलेला असतो. म्हणजे चळवळ वाढो न वाढो पण यांच्या व्यक्तीगत प्रगतीचा आलेख मात्र वाढत राहतो. ते एक पाय कायम चळवळीत ठेवतात. ते चळवळीला देतात खूप कमी पण घेतात खूप जास्त. चळवळ त्यांना कंटेंट देते, इनसाईट देते, इनपुट देते, नेटवर्क देते आणि ग्लॅमर देते. हे करियरिस्ट जळू चिटकल्या सारखे शोषत राहतात. हे दुसर्यांना उभे करत नाहीत. कोणाला घडवत नाहीत. हे फक्त स्वतः मोठे होत जातात.
आणखी एक गंभीर प्रश्न म्हणजे ठराविक लोकांनी निर्माण केलेल्या त्यांच्या वर्चस्वाचा. चळवळीचे स्ट्रक्चर उतरंडीवर आधारलेले आहे. जो ज्येष्ठ असेल तो वरिष्ठ असेल, त्याचंच सगळ्यांनी ऐकायचं. या ज्येष्ठाचे अनुभव जुने असतात. काळ वेगाने पुढे जात असतो. सोशीयो-कल्चरल डायनामिक्स वेगाने बदलत असतात. या ज्येष्ठाला ते नीट उमगत पण नाही. तो नव्या पिढीची स्पंदने ओळखू शकत नाही. तरूण कार्यकर्ता गतीशील असतो, उर्जावान असतो. त्या त्या वेळच्या वर्तमान परिस्थितीचा त्याचा आवाका अफाट असतो. पण चळवळीतला ज्येष्ठ त्याच्या वरिष्ठ स्थानामुळे सर्व निर्णय प्रक्रियेवर पकड कायम ठेवतो. बर्याच संघटनांच्या कार्यक्रमाला गेले तर तिथे म्हातारे-कोतारेच प्रामुख्याने दिसतात. दर दहा वीस वर्षांनी नेतृत्वस्थानी नवे ताज्या दमाचे लोक दिसायला हवेत. पण असे आढळत नाही. फारच टीका होईल म्हणून काही संघटना कोटा सिस्टिमनुसार काही तरुणांना पुढे आणतात. पण ते त्यांच्याच प्रवाहातले असतात. पूर्वसूरींच्या पावलांवर पाऊल टाकूनच ते चालतात. त्यामुळे नेतृत्वाच्या पातळीवर आमुलाग्र बदल घडत नाही. आयुष्याच्या शेवटापर्यंत म्हातारे-कोतारे नेतृत्वस्थानी आपला खुट्टा पकडून बसून राहतात. भारतीय समाजातील सांस्कृतिक लोचा चळवळीत पण पुरेपूर उतरला आहे. म्हणजे जो उच्च वर्गातून आलेला असेल, जो उच्च शिक्षित असेल,जो सिनियर असेल, वयोवृद्ध असेल त्याचेच ऐकायचे. तो म्हणेल ती योग्य दिशा. सगळ्या निर्णयप्रक्रियेवर त्याचाच प्रभाव. डाव्या, समाजवादी,आंबेडकरी कोणत्याही संघटना बघा त्यात अशाच प्रकारची कार्यप्रणाली दिसेल. आपण भारतीय सांस्कृतीतील मागासलेपण नाकारतो. विषमता नाकारतो. मग संघटनेचे मॉडेल आणि मेथड्स गुरुकुल पद्धतीच्या कशा काय? गुरुकुलात गुरू म्हणेल तसे शिष्याने चालायचे असते. काही संघटनांमध्ये तर कमी शिक्षित आणि मार्जिनल परिवारातून आलेल्या फुलाटायमर्सला अक्षरशः हरकाम्या बनवून ठेवले जाते.
चळवळ माणसाला 'खऱ्या' अर्थाने समृद्ध करते का? किती जण छातीठोकपणे सांगू शकतील की मी अमुक संघटनेत येण्यापूर्वी माझी जी क्षमता व कौशल्ये होती, जी जीवनदृष्टी आणि सौन्दर्यदृष्टी होती त्यात आमूलाग्र बदल झाला. माणूस म्हणून माझा सांस्कृतिक स्तर उंचावला. माझ्यात नवी भर पडली. सृजनाला नवे घुमारे फुटले, अभिरूचीची एक समृद्ध उंची मी गाठली. चळवळ माणसाला सातत्याने खुलवत राहण्याचा, उमलत राहण्याचा भोवताल देते का? नेते आणि उच्च जाती वर्गातून आलेले लोकं त्यांच्या जाती-वर्गामुळे मिळालेल्या सामाजिक-सांस्कृतिक भांडवलाचा पुरेपूर उपभोग घेतात.
त्यांच्या सर्कलमध्ये त्यांच्या लोकांशी, नातेगोत्यांशी ते बरोबर साटेलोटे जुळवून ठेवतात. तिथल्या सामाजिक-सामुहिक जीवनाचा आनंद पण लुटतात. प्रिव्हलेज्ड क्लासचे हे लोक चळवळीत असले तरी त्यांचा एक पाय त्यांच्या जाती-वर्गात, नातेगोत्यात असतो. ते वेळोवेळी बरोब्बर त्यांच्या कंपूत वावरत असतात. चळवळीत असलेल्या उच्च जात-वर्गीय लोकांचे स्वतःचे कंपू असतात. त्यात त्यांचे सोशल-कल्चरल लाईफ फुलते. सामान्य कार्यकर्ता तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याला त्या कंपूत प्रवेश पण नसतो. तो त्याचा वेगळा कंपू तयार करत नाही. त्याला ते शक्यही नसते. मार्जिनल क्लास मधून आलेल्या कार्यकर्त्याला मागचे सगळे दोर तुटलेले असतात. चळवळीचा शिक्का बसल्यावर त्याला त्याच्या नातेगोत्यात स्थान उरत नाही. स्थान जरी उरले तरी सगळीच विपन्नता असल्याने तिथून काही रसद मिळण्याची सुतराम शक्यता नसते. इकडे उच्च जाती-वर्गातील नेते त्यांच्या एक्सटेंडेड फॅमिलीचा भाग त्याला कधीच बनवत नाहीत. अशाप्रकारे कार्यकर्ता मध्येच लटकतो अन गटांगळ्या खातो. कधी विषय निघालाच तर चर्चा फक्त आर्थिक बाजूने होते. मानधन वाढवून द्यायला संघटना कशी असमर्थ आहे याची लाख कारणे दिली जातात. पण कार्यकर्त्याचा प्रश्न काय फक्त आर्थिक असतो का? त्याला चांगलं मानधन द्या. झालं, म्हणजे प्रश्न सुटला का? कार्यकर्ता काय पोटार्थी असतो का? बाहेर काही मिळत नाही म्हणून तो चळवळीत आलेला असतो का? चांगल्या नोकऱ्या, गडगंज पगार असलेल्या सहानुभूतीदारांच्या दातृत्वावर त्याने का जगायचे? शे-पाचशे रूपये मिळविण्यासाठी त्यांच्याकडे हेलपाटे मारायचे? अशा प्रकारे कोणाकडून व्यक्तिगत पातळीवर आर्थिक मदत घेतल्याने कार्यकर्त्याचा आत्मसन्मान अबाधित कसा राहणार?
इतक्या वर्षात आपण संस्थात्मक उभारणी करू शकलो नाही. आपण त्याकडे लक्षच दिले नाही. ते सुधारणावादी काम आहे. त्यात का अडकून पडावे. आपल्याला संघर्षातून समाज बदलायचा आहे, असे समजून आपण संघर्षच करीत राहिलो. रचनात्मक कामाकडे लक्षच दिले नाही. समाजवाद्यांनी काही प्रमाणात संस्था उभारल्या. पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दुसरे असे की त्या त्या प्रवाहांचे स्वतःचे छत आहे. त्या छताखाली त्या प्रवाहातल्या कार्यकर्त्यालाच आसरा मिळणार. पण जो कार्यकर्ता प्रवाहांच्या मर्यादा ओलांडून चळवळीचा व्यापक आणि सर्वसमावेशक प्रवाह तयार करण्यासाठी झटत असेल त्याला कोण आसरा देणार? असे पंथ निरपेक्ष छत आपण निर्माण केले आहेत का? हा मूळ प्रश्न आहे. सामाजिक कृतज्ञता निधीचा प्रयोग खूप स्तुत्य आहे. पण पुरेसा नाही. गरज खूप मोठी आहे. तसेच निधी उभा करून त्यातून मानधन देणे या कल्पनेत दयाभाव आहे. कार्यकर्त्याने अशा दयेवर का विसंबावे? जिथून वेल्थ निर्माण होईल असे सेल्फ जनरेटेड औद्योगिक-व्यावसायिक उपक्रम का निर्माण करू नयेत? कोणाच्या तरी दयेवर विसंबण्यापेक्षा माझ्या स्वकौशल्याने मी माझी उपजीविका मिळविन. ही भावना कार्यकर्त्याला नवे बळ देईल. उद्याचा माणूस जो घडवायचा आहे, त्याला यातून चालना मिळेल. कार्यकर्त्यांची फळी सांभाळू शकेल असे संस्थात्मक व्यावसायिक उपक्रमांचे जाळेच आपल्याकडे नाही. संघर्ष काही कायम नव्हता.मध्ये मध्ये शांततेचा काळ पण होता. त्या काळात आपण रचनात्मक उभारणी केली नाही. पतसंस्था, बँका, शिक्षणसंस्था, वृतसंस्था, प्रकाशन संस्था उभारल्या नाहीत. कारण ते व्हिजनच चळवळीच्या नेतृत्वाकडे नव्हते. आज ते असते तर शेकडो कार्यकर्त्यांनी ठराविक काळ चळवळीची सेवा बजावून त्यात त्यांना सामावून घेता आले असते. चळवळ ऑरगॅनिक पद्धतीने समाजात रूजली असती. खालपर्यंत झिरपली असती.
बुद्धप्रिय कबीर सारखे असंख्य एकलव्य किती खडतर वाटेवर प्रवास करतात याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. ते एक स्वप्न उराशी घेऊन जगले. अकालीच गेले. पण जातांना महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडून गेले. मरण अटळ आहे, एक ना एक दिवस मरायचेच आहे. मुद्दा मरायचा नाही जगायचा आहे. मुळात अमुक कार्यकर्ता जगला कसा किंवा आज असंख्य कार्यकर्ते जगतायत कसे याची चर्चा व्हायला हवी. जगण्याचे हे प्रयोजन आणि सार्थकता चळवळीत निर्माण झाली आहे का याची चर्चा व्हायला हवी. पूर्णवेळ कार्यकर्त्याच्या बाबतीत चळवळीचा पायाच चुकला आहे का? अशी शंका घ्यायला पुरेसा वाव आहे. जर पायाच चुकला असेल तर मूळापासून खूप काही बदलावं लागणार. तण खूप वाढले आहेत. सगळी जमीन उलटी-पालटी करून नांगरल्याशिवाय नवे उगवणार नाही. आपण अनेक विषयांवर चर्चासत्र घेतो, परिसंवाद आयोजित करतो. भागाभागात काही संमेलने आपण कार्यकर्ता या विषयावर आयोजित करायला हवीत. त्यासाठी आपण चळवळीतील सर्व प्रवाह एका मंचावर येतील असा प्रयत्न असावा.यावर लेख लिहावेत. विशेषांक काढावेत. कथा-कादंबर्यांमध्ये हा विषय उमटावा. याने नुकसान काही होणार नाही. झाला तर फायदाच होईल. कूस बदलण्याची वेळ आता आलेली आहे. चळवळीत अशाप्रकारच्या चर्चेची वानवा आहे. आजपर्यंत अजेंड्यावर न आलेल्या मुद्यांना पुढे आणायची गरज आहे. नेतृत्वाला मूळापासून हादरे देणार्या डिबेट्सची आज गरज आहे. पूर्णवेळ कार्यकर्त्याच्या बाबतीत चळवळीचा पाया नेमका कुठे चुकला आहे याचा आज मुळापासून शोध घेण्याची आज गरज आहे.