India
राजस्थानमध्ये कॉंग्रेसंच निघाली भाजपची बी टीम
राजस्थानमधील भारतीय ट्रायबल पार्टीनं (BTP) अशोक गेहलोत यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.
राजस्थानमधील भारतीय ट्रायबल पार्टीनं (BTP) अशोक गेहलोत यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. राजस्थानमधील डुंगरापूर येथील जिल्हा परिषद प्रमुखाच्या निवडणुकीत थेट भाजपशीच हातमिळवणी करणाऱ्या कॉंग्रेसला उत्तर म्हणून हा निर्णय घेतला जात असल्याची घोषणा बीटीपीचे प्रमुख छोटूभाई वसावा यांनी शुक्रवारी केली.
बीटीपी हा पक्ष राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारसोबत सत्तेत आहे. डुंगरापूर येथील स्थानिक निवडणुकीत बीटीपीच्या पार्वती डोडा डुंगरापूर जिल्हा परिषद प्रमुखपदाच्या निवडणुकीत उतरल्या होता. एकूण १३ सदस्यांचा पाठिंबा मिळवलेल्या डोडा यांना बहुमताचा १४ हा आकडा गाठण्यासाठी फक्त एका मताची गरज होती. मात्र, कॉंग्रेसच्या ६ सदस्यांनी फक्त ८ जागा मिळवलेल्या भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. याच कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर बहुमताचा १४ हा आकडा गाठत जिल्हा परिषद प्रमुखपदाची ही माळ भाजपच्या उमेदवार सुर्या आहारी यांच्या गळ्यात पडली. यामुळे चिडलेल्या बीटीपीनं आता राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.
२०० सदस्यसंख्या असलेल्या राजस्थान विधानसभेत कॉंग्रेसचे एकूण १०५ आमदार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २, राष्ट्रीय लोकदल पक्षाचा १, स्वातंत्र्य निवडून आलेले १३ आणि बीटीपीच्या २ आमदारांच्या जोरावर कॉंग्रेसनं राजस्थानमध्ये सत्ता स्थापन केली होती. बीटीपीचे २ आमदार बाहेर पडल्यानं विद्यमान सरकारला कुठला धोका निर्माण होणार नसला तरी इतक्या उघडपणे युतीतील पक्षाशी दगाफटका करून थेट भाजपसोबत जाणाऱ्या कॉंग्रेसच्या हा राजकीय खेळीबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
कॉंग्रेसच्या या राजकीय दगाफटक्यावय प्रतिक्रिया देताना बीटीपीचे प्रमुख छोटूभाई वसावा यांनी ट्वीट करत म्हटलं, " इतके दिवस भाजप आणि कॉंग्रेसची लपून असलेली युती आता उघडी पडली आहे. आत्तापर्यंत आपल्याविरोधात जाणाऱ्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवणारी कॉंग्रेसंच भाजपची बी टीम ठरलीये." या नव्या युतीबद्दल उपरोधिक टोमणा मारत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं या नव्या आघाडीबद्दल अभिनंदन केलंय. "ऑगस्ट महिन्यात जेव्हा भाजपनं उचापती करून राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा बीटीपी कॉंग्रेससोबत ठामपणे उभा राहिली. आता वेळ आल्यावर आमच्याच विरोधात भाजपसोबत जाणाऱ्या कॉंग्रेसला पाठिंबा द्यायला आमच्याजवळ कारणंच उरलेलं नाही. राज्यातील आमच्या पक्षाचा वाढता प्रभावाची धास्ती घेऊनच भांबावलेल्या कॉंग्रेसनं हे अतिरेकी पाऊल उचललंय, "अशी तीव्र प्रतिक्रिया बीटीपीचे राजस्थानमधील आमदार रामप्रसाद यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना दिली.
चिडलेल्या बीटीपीनं आता कॉंग्रेस विरोधात ऑनलाईन आघाडीसुद्धा उघडली असून #BJPकॉंग्रेस_एक_है असा ट्रेंडही ट्विटरवर पक्षाकडून चालवण्यात येतोय. गुजरातमधली भरूच आणि नर्मदा जिल्हा परिषदेत कॉंग्रेससोबत असलेल्या युतीतूनही बाहेर पडत असल्याची घोषणा आता पक्षानं केलीये. इतकंच नाही तर भाजपला लपून साथ देणारी कॉंग्रेस दिल्लीतील भाजपविरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन देखील हायजॅक करू शकते. कॉंग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आणि देशातील जनतेनंही कॉंग्रेसचा खरा चेहरा ओळखून योग्य तो निर्णय घ्यावा, असं अपीलही यावेळी पक्षातर्फे करण्यात आलं.