Oceania

सिडनी टेस्ट: भारतीय खेळाडूंवर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिप्पणी केल्यानं सामना थांबवला

मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत सलग दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंना उद्देशून वर्णद्वेषी शेरेबाजी केली.

Credit : AP

सिडनीतील भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान  मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत सलग दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंना उद्देशून वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याबद्दल स्टेडियममधून प्रेक्षकांची आज हकालपट्टी करण्यात आली. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना मागच्या दोन दिवसांपासून काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षक वर्णद्वेषी शेरेबाजी करून डिवचत हैते.

रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या भारताच्या मोहम्मद सिराजला उद्देशून काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी पुन्हा वर्णद्वेषी शेरेबाजी सुरू केली. सामना सुरू असतानाच सिराजनं अम्पायर पॉल रायफल यांच्याकडे याची तक्रार केली. कर्णधार अजिंक्य रहाणेनंही सदरील प्रकरणाचं गांभीर्य ओळखून जवळपास १० मिनिटं सामना थांबवून ठेवला. शेवटी मैदानावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी आणि न्यू साऊथ वेल्सच्या पोलिसांनी वर्णद्वेषी शेरेबाजी करणाऱ्या या प्रेक्षकांना स्टेडियमधून हाकलून दिल्यानंतरच भारतीय संघानं पुन्हा खेळणं सुरू केलं.

खरंतर मागच्या दोन दिवसांपासून सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियन प्रेक्षक वर्णद्वेषी शेरेबाजी करून डिवचत असल्याचे प्रकार होत होते. काल म्हणजेच सामन्याच्या तिसऱ्या दिवशी याची रितसर तक्रारही आयसीसीकडे भारतीय संघाकडून करण्यात आली होती. न्यू साऊथ वेल्सच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू आधीच केला असून सदरील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत या प्रेक्षकांच्या वतीनं ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं दिलगिरीही व्यक्त केली आहे. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख सीन कॅरल यांनी या सर्व प्रकरणावार क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीनं आपली भूमिका स्पष्ट केली, " न्यू साऊथ वेल्स पोलिसांसोबतंच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानंदेखील या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. दोन्ही देशांच्या खेळाडूंकडून स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असताना काही मोजके लोक खेळभावनेला‌ काळीमा फासत वातावरण खराब करत आहेत‌. या प्रेक्षकांविरोधात कडक कारवाईचं आश्वासन देण्याबरोबरंच भारतीय खेळाडूंसोबत झालेल्या गैरप्रकाराबाबत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या वतीनं मी माफी मागतो," असं ते म्हणाले.

क्रिकेटच्या मैदानावरील वर्णद्वेषी वागणूकीविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाकडून 'झिरो टोलरन्स' अशी भूमिका घेण्यात आलेली आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर' चळवळीचे पडसाद आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर पडले होते. या चळवळीमुळे वर्णद्वेषाविरूद्धची आपली भूमिका आयसीसीनं आणखी कडक केली. क्रिकेटमधील वर्णद्वेष संपवण्याच्या निर्धार करून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघांनी वेळोवेळी प्रतीकात्मकरीत्या 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर' चळवळीला आपला पाठिंबा क्रिकेटच्या मैदानातूनही दर्शवला होता‌. 

ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंडच्या प्रेक्षकांकडून वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय खेळाडूंना उद्देशून वर्णद्वेषी शेरेबाजी केल्या गेल्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. मात्र, आजच्या प्रसंगानंतर सामना तात्काळ थांबवत या प्रेक्षकांची हकालपट्टी करण्याचं उचललं गेलेलं पाऊल वर्णद्वेषाविरूद्ध क्रिकेटजगत आधीपेक्षा जास्त एकवटलेलं असल्याचं पाहायला मिळालं. 

ऑस्ट्रेलियाच्याच अनेक आजी-माजी खेळाडूंनी सदरील प्रकरणाचा तीव्र निषेध करत या प्रेक्षकांवर मैदानात येण्यापासूनंच कायमची बंदी घालण्याची मागणी केलीये. अशा वर्णद्वेषी क्रिकेटरसिकांना ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये जागा नसल्याचं सांगत शेन वॉर्न, मायकल हसीसह ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनीही या फॅन्सना झिडकारलं आहे. आययीसीच्या नियमावलीनुसार पुढील दोन आठवड्यांच्या आत सदरील प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करणं ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डासाठी बंधनकारक आहे.