Quick Reads
फलसफी: तत्त्वज्ञानाचं उद्दिष्ट असतं नव्या इच्छा निर्माण करणं
आलान बाद्यु यांच्या व्याख्यानांवर आधारित लेखमालिका: भाग २
मागच्या लेखात आपण तत्वज्ञानाची तत्कालीन गरज समजून घेतली. दुसऱ्या भागात बाद्यु प्रामुख्याने तीन गोष्टींची मांडणी करतात - तत्त्वज्ञानाच्या वर्गातील प्राध्यापक व विध्यार्थी यांच्यातील द्वंदात्मक नाते संबंध, हा द्वंदात्मक नातेसंबंधच तत्त्वज्ञानाच्या एका व्याख्येला जन्म देतो - तत्त्वज्ञान म्हणजे नव्या इच्छांना जन्म देणं. तत्त्वज्ञानाच्या एखाद्या प्राध्यापकाचं काम असतं समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात नव्या आराखड्याची किंवा कल्पनांची पेरणी करणं, इच्छांना जन्म देणं. हे इच्छांना जन्म देणं म्हणजे, 'बंदिस्त प्रश्नांची बंदिस्त सोडवणूक करणं', म्हणजे 'तत्त्वज्ञान' नव्हे तर खुल्या, प्रवाहित प्रश्नांची प्रवाहित/द्वंदात्मक सोडवणूक करणं म्हणजे तत्त्वज्ञान. परंतु तत्त्वज्ञानाची ही व्याख्या सुध्दा अंतिम किंवा ठोस व्याख्या नाही कारण तत्त्वज्ञान कोणत्याही प्रश्नाचं ठोस उत्तर देत नाही. या व्याख्यानाचा शेवट विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान विरुध्द द्वंदात्मक तत्त्वज्ञान या आजच्या काळातील सर्वश्रुत वादात द्वंदात्मक तत्त्वज्ञान स्वीकारणं म्हणजे तत्त्वज्ञान करणं असं प्रतिपादन आपल्याला पाहायला मिळतं.
बाद्युच्या मते तत्त्वज्ञान हे इतर ज्ञानशाखांच्याप्रमाणे बंदिस्त ज्ञान नाही किंवा तत्त्वज्ञानात/ तत्त्वज्ञानाच्या वर्गात इतर ज्ञानाशाखांच्या वर्गाप्रमाणे विशिष्ट स्वार्थानं प्रेरित होऊन ज्ञानार्जन केलं जात नाही. याउलट तत्त्वज्ञानाच्या वर्गात एक तत्त्वज्ञानात्मक कर्तव्य असतं, हे कर्तव्य कोणत्याही पध्दतीच्या मानवी स्वार्थानं बरबटलेलं नसतं, तर या कर्तव्याचं स्वरूपच तत्त्वज्ञानात्मक असतं. म्हणजे हे कर्तव्य स्वार्थहीन असतं. थोडक्यात तुमच्या कर्तव्यात स्वार्थहीनता असते आणि तुमचं कर्तव्य व्यावसायिक नसेल तर हे कर्तव्य तत्त्वज्ञानात्मक असतं. बाद्युसाठी तत्त्वज्ञानाचा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की तत्त्वज्ञानाचा वर्ग हा गणिताच्या किंवा भूगोलाच्या वर्गापासून वेगळा कसा असतो? बाद्यु असं म्हणतात की तत्त्वज्ञानाच्या द्वंदात्मक स्वरूपामुळे तत्त्वज्ञानाचा वर्ग हा इतर ज्ञान शाखांच्यापासून वेगळा असतो.
बाद्युच्या मते तत्त्वज्ञानाचं द्वंदात्मक स्वरूप हे तत्त्ववेत्ता आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक नवीन नातं निर्माण करतं. कारण तत्त्वज्ञानाच्या वर्गात तत्त्ववेत्ता आणि विध्यार्थी हे दोघे मिळून एक सामाईक इच्छा निर्माण करत असतात. आणि म्हणून बाद्यु म्हणतात की, 'ठोस प्रश्नांची उत्तरं देणं हे तत्त्वज्ञानाच काम नाही, तर नव्या इच्छांना जन्म देणं हे तत्त्वज्ञानाचं काम आहे.' तत्त्वज्ञान या इच्छा सर्वांमध्ये निर्माण करू शकतं आणि या इच्छा सर्वांमध्ये निर्माण होण्यापाठीमागचं कारण म्हणजे आपल्या सर्वांमध्ये एक समान दुआ आहे, म्हणून एक नवीन समूह किंवा नवीन इच्छा आपल्यामध्ये जन्म घेऊ शकते. बाद्युच्या मते आपल्या द्वंदात्मक स्वरूपामुळं आपण नवीन इच्छा निर्माण करू शकतो; म्हणजेच सुरवातीला तत्त्ववेत्ता आणि विध्यार्थी हे समान पातळीवर नसतात, तत्त्ववेता बोलतो, विध्यार्थी ऐकतात किंवा मी हे सांगत आहे तुम्ही हे वाचत आहात. तर सुरवातीला आपण समान पातळीवर नसतो पण आपण उद्देश हा ही भिन्नता अमर्याद काळासाठी अशीच ठेवणं हा नाही, तर आपला उद्देश हा काहीतरी समान निर्माण करणं हा आहे आणि हे समान निर्माण करणं म्हणजेच नवीन इच्छा निर्माण करणं होय. याप्रकारची इच्छा निर्माण करणं आपल्या आधीच्या भिन्न भूमिकांमुळंच शक्य होतं.
म्हणून बाद्यु म्हणतो, की तत्त्वज्ञानाचा उद्देश हा नवीन ज्ञानाची निर्मिती करणं, अथवा नविन ज्ञान संचित करणं, हा नाही, तर तत्त्वज्ञानाचा उद्देश सामुहिक इच्छांच्या निर्मितीद्वारे गुणात्मक व्यक्तिनिष्ठ बदल करणं हा आहे. तत्त्वज्ञानाच्या वर्गात किंवा तत्त्वज्ञानाचं पुस्तक वाचत असताना आपण 'नवीन' ज्ञान मिळवत नसतो, साहिजकच शिकणं किंवा वाचणं यातून ज्ञान मिळतं पण या सगळ्या गोष्टी/कृती या साधन मात्र आहेत. जेंव्हा आपण तत्त्वज्ञानाचं पुस्तक वाचतो किंवा तत्त्वज्ञानाच्या वर्गात बसतो तेंव्हा इथं यशस्वी होण्याची धारणा ही तत्त्वज्ञानात्मक आहे, हा बारीक व्यक्तिनिष्ट बदल असला तरी, हा बदल जगाच्या नव्या शक्यतेच्या निर्मितीमधलाही एक छोटा बदल आहे.
बाद्युसाठी नवीन शक्यतेची निर्मिती ही नव्या सार्वत्रिक शक्यतेच्या निर्मितीचा एक भाग आहे आणि म्हणून बाद्यु म्हणतात की तत्त्वज्ञान एकाचवेळी व्यक्तिगतही असतं आणि वैश्विकसुध्दा. तत्त्वज्ञान तत्त्वज्ञानाचं संघटन ऊभा करत नाही किंवा तत्त्वज्ञानाचा पक्ष निर्माण करत नाही आणि म्हणून तत्त्वज्ञानाचा उद्देश हा नवीन क्रांतिकारी पक्ष निर्माण करणं हा नाही. म्हणून बाद्यु म्हणतो की तत्त्वज्ञान हे व्यक्तिगत असतं, कारण तत्त्वज्ञान हे कुणाच्यातरी नव्या इच्छेची शक्यता असतं. तत्त्वज्ञान हे व्यक्तिगत असलं तरी तत्त्वज्ञानाच्या वर्गात जर तत्त्वज्ञानाचा उद्देश हा जगाच्या नव्या इच्छेबाबत असेल तर किंवा जीवनाच्या नव्या इच्छेबाबत किंवा शक्यतेबाबत असेल तर, किंवा अस्तित्वाच्या शक्यतेबाबत असेल तर या सर्वच इच्छा या वैश्विक स्वरूपाच्या असतात कारण त्या सामुहिक बदलांबद्दल असतात.
तत्त्वज्ञानाचं हे द्वंदात्मक स्वरूप हे व्यक्ती आणि जग यांच्या नात्याबद्दल असतं, एवढंच नव्हे, तर व्यक्ती आणि जग यांच्यातील नात्याच्या बदलांबद्दल असतं, हे स्वरूप विचारांतून आणि विचारांमधील नवीन इच्छांमधून प्रत्यक्ष साकारत असतं.
बाद्युसाठी तत्त्वज्ञान म्हणजे नव्या इच्छांना जन्म देणं, किंवा जगाच्या नव्या शक्यतेच्या इच्छेला जन्म देणं. हि व्याख्या हासुद्धा तत्त्वज्ञानाचा एक प्रश्न आहे. थोडक्यात तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाचा प्रश्न हा तत्त्वज्ञानाचाच प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे बाद्युच्या मते तत्त्वज्ञान वस्तुनिष्ठपणे प्रतिक्षिप्त असतं. जर तत्त्वज्ञानानं 'तत्त्वज्ञान म्हणजे काय' हा प्रश्न स्वतःमध्ये अंतर्भुत केला नाही तर तत्त्वज्ञान हे इतर ज्ञानशाखांप्रमाणे ज्ञान होईल किंवा 'विशिष्ट गोष्टीचं' ज्ञान होईल. जर तत्त्वज्ञानाचा उद्देश हा नव्या जगाच्या शक्यतेच्या इच्छा निर्माण करणं हा असेल तर 'तत्त्वज्ञान म्हणजे काय' हा प्रश्नच तत्त्वज्ञानात्मकच असावा लागेल आणि तेंव्हा तत्त्वज्ञान हे कोणत्याही पद्धतीच्या बंदिस्थ ज्ञानाबद्दल राहणार नाही.
जर तत्त्वज्ञानाची सुरवात बंदिस्त प्रश्नापासुन झाली तर तत्त्वज्ञान त्या प्रश्नाचे बंदिस्त उत्तर देईल आणि म्हणून जर आपणाला काही मुक्त/खुलं निर्माण करायचं असेल, तर सर्व तत्त्वज्ञानसुध्दा खुलंच असलं पाहिजे. म्हणून बाद्यु म्हणतो की तत्त्वज्ञान हे 'मला तत्त्वज्ञान माहीत आहे' या धारणेनं सुरू होत नाही. तत्त्वज्ञान नेहमीच 'तत्त्वज्ञान म्हणजे काय' याच प्रश्नानं सुरू होतं. हा प्रश्नदेखील खुला असतो आणि आणि या प्रश्नाचं उत्तरदेखील खुलंच असतं व म्हणूनच तत्त्वज्ञानाच्या इतिहासात आपणाला हा प्रश्न सतत आढळतो, त्याचसोबत याच प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं देखील आढळतात आणि म्हणूनच तत्त्वज्ञान हे मुक्त असतं.
तत्त्वज्ञानानं मुक्त असणं ही तत्त्वज्ञानाची गरज असते, कारण तत्त्वज्ञानाची सर्वच पद्धतीची परिसमाप्ती (closure) ही तत्त्वज्ञानाचा अंत असते, जेंव्हा लोक/व्यक्ती नव्या शक्यतांनबद्दल विचार करण्यासाठी मुक्त असतात तेंव्हाच तत्त्वज्ञान जिवंत असतं.
'तत्त्वज्ञान म्हणजे नवा विचार निर्माण करण्याची शक्यता' असं आपण मान्य केलं तर तत्त्वज्ञान हे अस्तित्वात असलेल्या जगाविरुध्दच असतं. कारण यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे, अस्तित्वात असलेल्या जगाची प्रस्थापित धारणा ही स्थितीवादी (conservative) धारणा आहे आणि म्हणून तत्त्वज्ञानाची सुरुवात या धारणेपासून होऊ शकत नाही, कारण तत्त्वज्ञान हे अस्तित्वात असलेल्या जगापासून नेहमीच वेगळं असतं. तत्त्वज्ञानाच्या याच स्वरूपामुळं आपणाला तत्त्वज्ञानाच्या इतिहासात विभिन्न तत्त्ववेत्ते आढळतात, आणि तरीही या सर्वच तत्त्ववेत्त्यांमध्ये एकच समान दुवा असतो, तो म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानासोबत 'तत्त्वज्ञान म्हणजे काय' हा प्रश्न देखील सातत्यानं बदलत असतो. आपण इतकंच म्हणू शकतो की तत्त्वज्ञानाचा प्रश्न चालूच राहतो. याच अनुषंगानं बाद्यु असं म्हणतात, की तत्त्वज्ञानाचा इतिहास हा सातत्याचा इतिहास नसून तो खंडत्वाचा इतिहास आहे (history of rupture) आणि प्रत्येक तत्त्ववेत्त्याची सुरवात ही त्याच्या पुर्वीच्या तत्त्ववेत्त्यापेक्षा नेहमीच वेगळी असते, जसं की मार्क्स ची सुरवात ही हेगेल पासून वेगळी आहे.
जर तत्त्वज्ञानाचा इतिहास हा खंडत्वाचा इतिहास आहे असं ग्राह्य धरलं, तर तत्त्वज्ञान या धारणेनुसार क्रांतिकारकच असतं कारण या अर्थानं तत्त्वज्ञान हे संकल्पनात्मक पातळीवर प्रस्थापित विचारातील खंडनाची संकल्पना आहे, ही नव्या मार्गाची संकल्पना आहे. तत्त्वज्ञानाच्या या धारणेमुळं तत्त्वज्ञान अस्तित्वात असलेल्या जगाशी सुसंवादी नसतं, कारण प्रस्थापित जग हे 'जग जसं आहे, तसंच प्रवाहित ठेवण्याशिवाय पर्याय नाही, कारण आहे त्या जगाची पर्यायी शक्यता उपलब्ध नाही' असं प्रतिपादित करतं. त्याचसोबत असंही जाहीर करतं, की मानवतेचं अंतिम यश हे लोकशाही-भांडवली जग आहे. बाद्युसाठी तत्त्वज्ञानात जगाचं असं 'अंतिम' यश असणं शक्य नसतं, कारण तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञान म्हणजे काय या प्रश्नाचं ठोस उत्तर कधीच देत नाही.
आपण जरी वरची भुमीका मान्य केली, तरीही तत्त्वज्ञानात मात्र एक स्थितिवादी भुमिका अस्तिवात असते, जी तत्त्वज्ञानाला इतर ज्ञानशाखांप्रमाणे पाहते - ही धारणा असं प्रतिपादित करते की तत्त्वज्ञान हे इतर ज्ञानांप्रमाणे चांगल्या प्रश्नांची चांगली उत्तरं देऊ शकतं. तत्त्वज्ञानाच्या या धारणेला विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान (analytic philosophy) असं म्हणतात. विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञान हे विवेकवादी असावं असा हट्ट धरतं आणि तत्त्वज्ञान हे सामुहिकरित्या गृहीत धरलेल्या प्रश्नांची परंपरा असतं, जी चांगली व वाईट उत्तरं देतं. थोडक्यात बाद्युच्या मते विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान हे गृहीत धरलेल्या प्रस्थापित प्रश्नांची उत्तरं देतं, म्हणजेच या धारणेनुसार तत्त्वज्ञान हे नव्या इच्छा, नवं जग, नवं भविष्य, इत्यादी प्रश्नांनबाबत नसतं. विश्लेषणात्मक तत्त्वज्ञानाच्या मते तत्त्वज्ञान हे तार्किक, व्याकरणीय व भाषाशास्त्रीय ज्ञानाशी जोडलेलं असतं व याचसोबत तत्त्वज्ञान हे स्पष्ट संकल्पनात्मक ज्ञान, स्पष्ट नियम, निहित नियम, ठाम भूमिका आणि स्पष्ट व निहित अवकाश या सगळ्याचं तंतोतंत ज्ञान असते. तत्त्वज्ञानाची ही धारणा तत्त्वज्ञानाला फक्त शैक्षणिक कसरती पुरतीच मर्यादित करते, या अर्थाने तत्त्वज्ञान फक्त विध्यापिठीय वर्तुळात मर्यादित राहतं आणि तत्त्वज्ञान संपुर्ण मानवतेला न भिडणारी ज्ञानशाखा बनतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्लेषणात्मक तत्त्वज्ञानाचं द्वंदात्मक स्वरूप नष्ट करतं. विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान जेंव्हा तत्त्वज्ञानाची उद्दिष्टं आणि नियम ठरवतं, तेव्हा ते तत्त्वज्ञानातील सर्जनशीलता संपुष्टात आणतं. म्हणून बाद्यु म्हणतात, 'की विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान तत्त्वज्ञानाचं द्वंदात्मक स्वरूप नष्ट करतं.
जेंव्हा विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान तत्त्वज्ञानाच्या प्रश्नाला ठोस उत्तर देतं, तेंव्हा ते 'चांगलं जग म्हणजे काय' या प्रश्नाला उत्तर देत असतं आणि साहजिकच चांगलं जग म्हणजे आज जग जसं आहे ते. याअर्थानं विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान आजच्या जगातली प्रस्थापित धारणा आहे आणि म्हणून याच अर्थानं, ही धारणा तत्त्वज्ञानाची परिसमाप्ती आहे, तत्त्वज्ञानाचा अंत आहे. याद्वारे बाद्यु आपल्यासमोर तत्त्वज्ञानातील जगाकडं अभिमुख होण्याचे दोन दृष्टीकोण मांडतो: १. द्वंदात्मक दृष्टीकोण २. विश्लेषणात्मक दृष्टीकोण. म्हणून बाद्यु म्हणतात की आजच्या जगातील प्रश्न हा विश्लेषणात्मक द्वंदात्मक दृष्टिकोणातील विरोधाभास आहे.
जेंव्हा तत्त्वज्ञानातील हा विरोधाभास आपण सार्वत्रिक करतो तेंव्हा आपणाला तत्त्वज्ञानाची अजून एक व्याख्या मिळते: 'तत्त्वज्ञान हे लक्षण (symptom) म्हणजेच जगाचं लक्षण असतं, कारण तत्त्वज्ञानातील भेद हे जगातीलही भेद असतात.' आपण ग्राह्य धरलेला तत्त्वज्ञानातील भेद हा प्रत्यक्ष जगातील राजकीय परिस्थितीचं लक्षण मात्र आहे. आजचं युद्ध हे पश्चिमात्य जग विरुद्ध मागं राहिलेलं जग या दोन परीसमाप्तीमधील युध्द आहे. हे युद्ध, जग जसं आहे तसं चालू ठेवण्याची परिसमाप्ती आणि भुतकाळाकडं परत जाण्याची परिसमाप्ती, यांच्यातील युध्द आहे. परंतु जे आहे त्याचं सातत्य राखणं आणि भुतकाळाकडं परत जाणं. या दोन्ही भूमिकांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे या दोन्हीही भूमिका भविष्य नाकारतात, सत्याचा आधार असलेलं भविष्य नाकारतात, या भूमिका कोणतीही पर्यायी शक्यता नाकारतात आणि म्हणून हे युद्ध फक्त दोन पुराणमतवादी भुमिकांच्या मधील युद्ध नसून, हे दोन असत्य परिप्रेक्षांमधील युद्ध आहे आणि पर्यायानं दोन बंदिस्त अवकाश असणाऱ्या विश्लेषणात्मक भुमिकांच्यामधील युद्ध आहे.
बाद्युच्या मते स्थितीवादी दृष्टिक्षेप प्रामुख्यानं सुरक्षिततेबद्दल आहे, तर याउलट द्वंदात्मक दृष्टीकोण हा विशिष्ट प्रकारची जोखिम पत्करण्या बद्दल आहे. या अर्थानं विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान हे सुरक्षिततेबद्दलचं तत्त्वज्ञान आहे, तर द्वंदात्मक तत्त्वज्ञान हे सर्जनशीलतेबद्दलचं तत्त्वज्ञान आहे. हा वाद सुरक्षितता विरूद्ध सर्जनशीलता यामधील वाद आहे. आज विश्लेषणात्मक भूमिका हीच प्रस्थापित भूमिका आहे कारण संपुर्ण मानावजातच यामध्ये विभागली गेली आहे, आज बहुतांश मानवजातीला सुरक्षितता प्रिय आहे, आज म्हणून जग ही सुरक्षिततेची मागणी करत आहे. हे युद्ध आपल्या व्यक्तिनिष्ठतेमधील (subjectivity)युद्ध आहे.
इतिहास साक्ष आहे की तरुणांना भ्रष्ट केल्याच्या आरोपावरून सॉक्रेटिस ला मृत्युदंडास सामोरं जावं लागलं होतं. पण तरुणांना भ्रष्ट करणं म्हणजे काय? भ्रष्ट करणं म्हणजे त्यांना हे शिकवणं, कि सुरक्षितता/ स्थिरता ही माणसाची खरी इच्छा नाही, व याचसोबत त्यांना द्वंदात्मक दृष्टीकोण देणं गरजेचं आहे, हा दृष्टीकोण त्यांना ठराविक जोखिम पत्करणं शिकवेल, हा दृष्टीकोण अनिश्चितता शिकवेल आजी याच सोबत एकसारखेपणाच्या अट्टाहासाविरुद्ध भिन्नतेची ईच्छा देखील शिकवेल. तत्त्वज्ञानात्मक भ्रष्टीकरण हे त्यांना सध्यकालिन जगापासून तत्त्वज्ञान हे वेगळं आहे हा दृष्टीकोण बहाल करेल.
थोडक्यात एक प्रकारचं तत्त्वज्ञान, 'जसं जग आहे त्याचं ज्ञान देईल, ते काही चांगल्या प्रश्नांची चांगली उत्तरं देईल. याउलट दुसऱ्या प्रकारचं तत्त्वज्ञान जोखिम पत्करायला शिकवेल, ही जोखिम परिवर्तनाबाबतची असेल, हे परिवर्तन नक्कीच लघु स्वरूपातिल असेल पण हा बदल आपल्या समुहाच्या व्यक्तिनिष्ठ भुमिकांसाठी दिशा बदलणारा आघातबिंदू असेल.
(क्रमशः पुढील भाग बुधवार ७ ऑगस्टला प्रकाशित होईल.)