Quick Reads
फलसफी: तत्त्वज्ञान आज उपयोगी आहे का?
आलान बाद्यु यांच्या व्याख्यानांवर आधारित लेखमालिका: भाग १
आलान बाद्यु यांनी २०१० मध्ये युरोपियन ग्रॅज्युएट स्कूल इथं, ‘तत्त्वज्ञान म्हणजे काय?’ या विषयावर दिलेल्या १२ व्याख्यानांपैकी काही व्याख्यानांचा गोषवारा देण्याचा हा प्रयत्न आहे.
‘तत्त्वज्ञान म्हणजे काय?’ या प्रश्नाचं उत्तर निरंतर चालणारं आहे, बदलणारं आहे, विस्तारणारं आहे. प्रत्येक तत्त्ववेत्त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर नेहमी वेगळं असतं. बाद्यु याच परंपरेला अनुसरून २०१०च्या संदर्भात 'तत्त्वज्ञान म्हणजे काय?' या प्रश्नाची उकल प्रत्यक्ष भौतिक-राजकीय जगाचे द्वंद्व (द्वंद्व हे ढोबळमानानं वास्तव आणि इच्छित यातील परस्परपूरक तरी अंतर्विरोधी संबंध असतो) आणि आजच्या काळातील विश्लेषणात्मक विरुद्ध द्वंदात्मक तत्त्वज्ञान यांच्या मधील अंतर्विरोध दाखवून करतात.
या मालिकेतलं पहिलं व्याख्यान, 'तत्त्वज्ञान म्हणजे नव्या इच्छांना जन्म देणं' या व्याख्येनं सुरू होतं. बाद्युच्या मते आज जगात दोन परस्परविरोधी भूमिका आढळून येतात १. स्थितिवादी २. प्रतिगामी. यामधील पहिली भूमिका म्हणजेच स्थितीवादी भूमिका ही आज जगातील सर्वच राज्यसंस्थानी मान्य केलेली भूमिका आहे म्हणजेच ही आजच्या जगातील प्रस्थापित भूमिका आहे. या भूमिकेनुसार आज आहे त्या परिस्थितीत जग कसं असावं याबाबतची कोणतीही पर्यायी शक्यता उरलेली नाही आणि म्हणून आज जग जसं आहे तसंच आपणास स्विकारावं लागेल. थोडक्यात मार्गारेट थॅचर यांनी म्हटल्याप्रमाणे 'There is no alternative' अशीच ही भूमिका आहे. याउलट जी प्रतिक्रियावादी, प्रतिगामी, मागं पाहणारी भूमिका आहे, ती असं जाहीर करते की जे जग आता आहे ते फारसं चांगलं नाही आणि म्हणून आपण पुन्हा जुन्या जगाकडं परत जाणं गरजेचं आहे कारण जुनं जग, आहे त्या जगापेक्षा अधिक चांगलं होतं. थोडक्यात एका बाजूला लोकशाही-भांडवली समाज आहे जो म्हणतो की उपलब्ध जगाला आता कोणताही पर्याय उपलब्ध असू शकत नाही, पाश्चिमात्य लोकशाही राज्यसंस्था आणि भांडवली व्यवस्था या दोनच गोष्टी जगासाठी योग्य, रास्त आणि सिद्ध व्यवस्था आहेत आणि त्यांना अजून काही पर्याय असू शकत नाही. म्हणजेच बर्लिनच्या भिंतीच्या पाडावानंतर फ्रान्सिस फुकुयामा यांनी 'इतिहासाचा अंत' जाहीर केला होता त्याचं हे मूर्त स्वरूप होय. याविरोधातील जो पर्याय आहे तो फॅसिस्ट जगाचा पर्याय आहे, जो धार्मिक मूलतत्त्ववादी, भाषावादी, वंशवादी जगाचा आदर्श प्रारूप म्हणून स्विकार करतो. या दोन्ही परस्परविरोधी भूमिकांतील मूळ अंतर्विरोध म्हणजे या दोन्ही भूमिका तिसऱ्या रास्त नव्या पर्यायाची शक्यताच नाकारतात.
बाद्युच्या मते जेव्हा लोक म्हणतात की तत्त्वज्ञान निरुपयोगी आहे, तेव्हा आपण असं म्हटलं पाहिजे की तत्त्वज्ञान उपयोगी आहे. कारण तत्त्वज्ञानासाठी जग हे जग जसं आहे तसं नसतं तर हे जग जसं आहे आणि ते कसं असावं याच्या मधोमध असतं. म्हणून बाद्यु म्हणतो की 'जग कसं असावं' याची संकल्पना तत्त्वज्ञान देतं म्हणून ते उपयोगी आहे.
ही मांडणी बाद्यु सध्य परिस्थितीमधील भाषेचं आकलन आणि त्यामधून निर्माण होणारं स्थितीवादी व प्रतिक्रियावादी द्वंद्व या पलीकडं तिसरा पर्याय काय असू शकतो या विवेचनाद्वारे करतात. बाद्यु म्हणतो की आज तत्त्वज्ञान कोणत्या भाषेत अस्तिवात आहे हा कळीचा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या दोन शक्यता आपण बघू शकतो. पहिली शक्यता म्हणजे तत्त्वज्ञानानं जागतिकीकरणानंतरची जी प्रभुत्वशाली भाषा अर्थात इंग्रजी भाषा ही तत्त्वज्ञानाची भाषा म्हणून स्विकारली आहे, म्हणजेच तत्त्वज्ञान जग जसं आहे तसं मान्य करून, त्या जगामध्ये स्वतःचं अस्तिव जपून आहे आणि म्हणून तत्त्वज्ञान वैश्विक इंग्रजीचा वापर करतं. परंतु बाद्युसाठी तत्त्वज्ञान हे एकाच भाषेत निर्माण होणं ही खरंतर त्याची मर्यादा आहे.
बाद्युच्या मते तत्त्वज्ञान हे विविध भाषांमध्ये निर्माण होणं आवश्यक आहे आणि तसं करणं म्हणजे वास्तविक क्रियाशील शक्यतांची निर्मिती करणं ठरेल. बाद्युच्या मते तत्त्वज्ञान आपण एकाच भाषेत निर्धारित करू शकत नाही, कारण तत्त्वज्ञान जर एकाच भाषेत व्यक्त करू लागलो तर ते अर्थात वैश्विक होणार नाही. परंतु या प्रश्नाची दुसरी बाजू अधिक क्लिष्ट आहे. बाद्यु इथं जर्मन तत्त्ववेत्ता हायडेगरचं उदाहरण देतात. हायडेगर यांनी तत्त्वज्ञानाच्या भाषेबद्दल भाष्य करताना म्हटलं होतं की प्राचीन ग्रीक भाषेनंतर तत्त्वज्ञानाची भाषा ही जर्मन आहे आणि म्हणून जर्मन बोललं पाहिजे. (युरोपियन तत्त्वज्ञान प्रामुख्याने तीन भाषांमध्ये निर्माण झालेलं आहे: ग्रीक, जर्मन आणि फ्रेंच २०व्या शतकात आपणाला इटालियन किंवा स्पॅनिश या भाषांमध्ये तत्त्वज्ञान बहरताना दिसतं, तर २१व्या शतकाच्या सुरुवातीला आपणाला पुर्व युरोपियन भाषांमध्येही तत्त्वज्ञान निर्माण होताना दिसतं). परंतु अशा प्रकारचा विशिष्ट भाषेचा हट्ट हा राष्ट्रवादी किंवा फॅसिस्ट विचारांचा समर्थक वाटतो, तत्त्वज्ञानाच्या भाषेबद्दलची भूमिका पुर्णतः तत्त्वज्ञानाच्या वैश्विकते विरोधातील आहे. (ही भूमिका हायडेगर यांचे नाझी पक्षाशी असलेले संबध या संदर्भात समजून घ्यावी.)
बाद्युच्या मते मानवता ही विभिन्न संस्कृती आणि भिन्नतांमधून अस्तिवात येते परंतु संस्कृतीचं व भिन्नतेचं अनेकत्व किंवा मानवतेचं बाहुल्य त्याच्या एकात्मते मध्ये मान्य करणं आवश्यक आहे. थोडक्यात प्रत्यक्ष जीवनात सर्वसमावेशक किंवा व्यापक मानवता अस्तित्वात असते आणि ही व्यापक मानवता ही कोणत्याही सर्वव्यापी भिन्नतांमध्ये किंवा कोणत्याही विशिष्टतांमध्ये विभाजित करता येत नाही.
बाद्यु भाषेच्या वापराद्वारे पहिला विरोधाभास मांडतो - एका बाजूला तत्त्वज्ञानाने जागतिकतेची अर्थात व्यापारी जगाची भाषा म्हणजे इंग्रजी वापरली पाहिजे, परंतु तत्त्वज्ञान हा व्यापार नाही म्हणून तत्त्वज्ञान स्वतःला या व्यवसायाच्या जगात व त्याच्या भाषेत घटित करू शकत नाही, परंतु या भांडवली वैश्विकतेला विरोध म्हणून येणारा विचार हा फॅसिस्ट राष्ट्रवादी विचार आहे जो इंग्रजीविरोधातही एकाच विशिष्ट भाषेचं समर्थन करतो. आजच्या जगाच्या या दोन्ही परस्परविरोधी धारणा हे वास्तव आहे पण तत्त्वज्ञान हे जे आहे त्याला पूरक नसतं आणि म्हणूनच या दोन्ही धारणांच्या पलीकडं जाणं गरजेचं आहे. या दोन्ही परस्परविरोधी भूमिकांच्या पलीकडं जाताना आपणाला हे ग्राह्य धरावे लागेल की जग हे वैश्विक आहे आणि या जगाची एकात्मता आहे आणि व्यापकताही आहे त्याच सोबत मानवतेची देखील व्यापकता आणि एकात्मकता आहे, पण याच सोबत दुसऱ्या बाजूला याच जगात भिन्नता आहेत आणि भाषेच्या विभिन्नता देखील आहेत आणि म्हणून या विरोधाभासाच्या पलीकडे जाणे हा तत्त्वज्ञानाचा पहिला द्वंदात्मक प्रश्न आहे.
वर नमूद केलेला वैश्विकतेचा आणि विशिष्टतेचा प्रश्न हा राजकीय परिस्थिती मध्ये अजून क्लिष्ट आहे. आज अस्तित्वात असलेली अमूर्त वैश्विकता ही साम्राज्यवादी वैश्विकता आहे, ती भांडवली वैश्विकता आहे आणि या वैश्विकतेची भाषा ही इंग्रजी आहे. या विरोधात आपणाला विभिन्न संस्कृतींचा विरोध दिसून येतो. हा विरोध हा शुध्द विशिष्ट साकाराच्या स्वरूपात अस्तिवात आहे. तत्त्वज्ञान हे नेहमीच प्रभुत्ववादी वैश्विकतेच्या विरोधात म्हणजेच जी वैश्विकता भिन्न लोकांचे आयुष्य नाकारते, भाषा नाकारते, तिच्या विरोधात व त्याच सोबत तत्त्वज्ञान प्रतिक्रियाशील विशिष्टाच्या विरोधात नेहमीच उभे राहिलेलं आहे व या दोन्ही विरोधाभासांच्या पलिकडं गेलं आहे आणि म्हणूनच आदर्श तत्त्वज्ञान हे प्रभुत्ववादी भांडवली भाषेचा स्वीकार करत नाही आणि विशिष्ट संस्कृतीच्या भाषेचा देखील स्वीकार करत नाही.
हा विरोधाभास फक्त भाषेचा किंवा संस्कृतीचा अथवा तत्त्वज्ञानाचा नाही तर हाच विरोधाभास आपणाला राजकारणात ही आढळून येतो. आजच्या जगाची एक बाजू असं ठासून सांगते की मानवी समूहाचं जागतिकीकरण, व्यवसाय आणि इंग्रजी याच गोष्टी 'दैव' आहेत, याच गोष्टी संपूर्ण मानवी समाजाच्या शक्यता सीमित आहेत. बाद्यु या भूमिकेला तत्वज्ञानाच्या भाषेत 'अमूर्त वैश्विकता' म्हणतो. ही अमूर्त वैश्विकता आजच्या पाश्चिमात्य जगाची राजकीय भूमिका आहे जी जाहीरपणे सांगते की आपल्यापुढं आज फक्त एकच राजकीय शक्यता आहे आणि ती म्हणजे जग जसं आहे तसंच स्वीकारणं. ही भूमिका जाहीरपणे स्वतःला जगभरात विस्तारित करत असं ठणकावून सांगते की जे जग आहे त्याला काहीही पर्याय उरलेला नाही आणि म्हणून जग जसं आहे तसंच ते विकसीत केलं पाहिजे. या भूमिकेला बाद्यु व्यवसायाची 'शांतता' किंवा 'शांततेचा व्यवसाय' देखील म्हणतो, 'शांतता' जी जगाच्या काही भागात युद्धाद्वारे लादली जाते. आणि म्हणून ही राजकीय भूमिका हा महत्त्वाचा शत्रू आहे.
याउलट जी भूमिका आहे ती अंधारकमय जगाला मानणारी भूमिका आहे आणि या भूमिकेला आपण पुराणमतवादी किंवा प्रतिगामी भूमिका मानतो, पण खरी पुराणमतवादी भूमिका ही वर नमूद केलेली भूमिका आहे. प्रतिगामी भूमिका ही साधारपणे जुन्या जगाचा स्वीकार करते, ती जुन्या कायद्यांचा स्विकार करते किंवा ईश्वराच्या जगाचा स्वीकार करते. ही भूमिका धार्मिक प्रतिक्रियावादी भूमिका आहे, जी आहे त्या जगाला पर्याय नाही म्हणुन जुन्या जगाकडं परत जाण्याचा अट्टाहास करते. साहजिकच ही भूमिकासुध्दा भयानक आहे आणि या भूमिकेविरोधातही उभं राहणं गरजेचंच आहे, पण आपण हेदेखील मान्य केलं पाहिजे की ही भूमिका स्थितीवादी भूमिकेची मात्र प्रतिक्रिया आहे. आपला खरा शत्रू हा प्रतिक्रियावादी भूमिका नसून स्थितीवादी भूमिका आहे आणि ही भूमिका जगातील सर्वच मोठ्या राज्यसत्तांची भूमिका आहे. जगातील मोठ्या राज्यसत्ता अर्थात अमेरिकन आणि युरोपियन व आशियाई यांच्यामध्ये भिन्नता आहेत आणि विरोधाभासही, मात्र या सर्व सत्ता एक मुलभूत गोष्ट मान्य करतात - या आजच्या जगासाठीची संपुर्ण नव्या पर्यायी जगाची शक्यता संपुष्टात (आणण्यात) आलेली आहे, नव्या पर्यायी जगाची शक्यता फक्त 'युटोपीया' म्हणून किंवा कथा म्हणून संपुष्टात आलेली आहे असं नाही तर प्रत्यक्ष खरीखुरी शक्यताच संपुष्टात आली आहे. ही प्रवृत्ती आजच्या जगाची मुलभूत प्रवृत्ती आहे जी जाहीररित्या पुष्टी करते की आजच्या जगाच्या पोटातुन नव्या दिशेची शक्यता संपलेली आहे.
आपल्यासमोर अस्तित्वात असलेल्या दोन्ही भूमिका एकच गोष्ट नाकारतात आणि ते म्हणजे आपणाला वास्तविक भविष्य उपलब्ध नाही. वास्तविक भविष्य उपलब्ध नसणं म्हणजे वर्तमानच चालू ठेवणं, आज ज्या काळात आपण जगत आहोत तो काळ भिन्न भविष्य नाकारत सर्वच गोष्टी वर्तमानात घटित करतो. एका अर्थानं हेगेल म्हणतो हा तसा अंत आहे: जे जग आहे तसं स्वीकारणं म्हणजे अंताला पोहोचणं. आणि जर जग जसं आहे तसंच चालू ठेवायचं असेल तर हा इतिहासाचा अंत आहे, हे भविष्याचे उन्मुलन आहे.
आपण सुरुवातीला एक प्रश्न उभा केला होता-'तत्त्वज्ञान हे आजच्या जगात उपयोगी आहे का?' तर याचं उत्तर आपण 'होय' असं देऊ शकतो कारण तत्त्वज्ञान हे अस्तित्वात असलेल्या खोट्या विरोधाभासांच्या पलीकडं जाण्याची भूमिका घेतं. आपल्या समोरील विरोधाभासही अर्थातच स्थितीवादी जग आणि प्रतिक्रियावादी जग यांच्यातील विरोधाभास आहे. पण हा विरोधाभास या दोन्हींमध्ये पर्यायाची शक्यता नाकारण्याची समानता असल्यामुळं खोटा ठरतो. जे जग आहे त्याला दुसऱ्या पर्यायी जगाची शक्यता नाही म्हणून देखील भविष्य नाही आणि जुन्या जगाकडं परत जाण्याशिवाय आपल्याकडं इतर कोणतीही इच्छा नाही तेव्हाही भविष्य नाही. आणि या परिस्थितीत आपण तत्त्वज्ञानाचा एक उद्देश ठरवू शकतो: जर तत्त्वज्ञान उपयोगाचं आहे तर ते फक्त शैक्षणिक व्यवहारापेक्षा काही तरी वेगळं असलं पाहिजे. जर तत्त्वज्ञान आपल्या जगण्यात खरच उपयोगी असेल तर तत्त्वज्ञानानं खऱ्या पर्यायी जगाची शक्यता मांडली पाहिजे किंवा प्रत्यक्ष ठोस भविष्यासाठी परिस्थितीचं विश्लेषण केलं पाहिजे. आणि हा आजच्या तत्त्वज्ञानाचा मुलभूत प्रश्न आणि उद्दिष्ट आहे.
या पहिल्या व्याख्यानाच्या पहिल्या भागात बाद्यु ही द्वंदात्मक परिस्थिती मांडतात. अशा परिस्थितीत तत्त्वज्ञानाचं प्रमुख काम आहे ते म्हणजे हेच जग शाश्वत किंवा प्राक्तन म्हणून न स्वीकारता, पर्यायी जगाची शक्यता काय असू शकते किंवा पर्यायी जगाची धारणा काय असू शकते याचं प्रतिपादन करणं. सॉक्रेटिसच्या संवादात्मक पद्धतीमधील प्रवाहिता किंवा ओपन एंडेडनेस अथवा तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील द्वंदात्मक प्रवाहिता बाद्यु आपल्यासमोर मांडतात. आजच्या तत्वज्ञानाच्या भाषेत याला 'स्पेक्युलेटिव्ह टर्न' असंही म्हणतात. यामध्ये विशिष्ट वर्तमान किंवा विशिष्ट भुतकाळ यांचा अट्टाहास टाळला जातो, हेदेखील आपण पाहिलं आहे पण याचा अर्थ असाही नाही, की बाद्यु विशिष्ट भविष्याचा देखील अट्टाहास मान्य करतात. बाद्युच्या तत्त्वज्ञानात पर्यायी भविष्याच्या शक्यतेचं नाव 'कम्युनिझम' हे आहे, पण इथं कम्युनिझम म्हणजे राज्यसंस्था या अर्थानं बाद्यु वापरत नाही तर ती मार्क्सच्या द्वंदात्मक पद्धतीनं वापरली आहे. खूपच ढोबळ शब्दात बोलायच झाल्यास, ते एका कल्पित व्यवस्थेचं नाव नसून, माणसाच्या प्रगत अवस्थेचं नाव आहे पण ही अवस्था सुध्दा द्वंदात्मक असेल म्हणजेच ही अवस्था मानवी जगाचा अंत किंवा अनंत स्थिती नसेल.
(क्रमशः पुढील भाग शनिवार, ३ ऑगस्टला प्रकाशित होईल.)