Quick Reads

फलसफी: बुद्धाचं तत्त्वज्ञान समजून घेताना

निर्वाणाच्या अनुषंगाने दुःख अज्ञानामधून निर्माण होतं.

Credit : Ariyamagga

'थिसिस ऑफ फोयरबाख' या त्याच्या पुस्तकातल्या पहिल्या थिसिस मध्ये मार्क्स पुढील वाक्य लिहतो, 'The active side was developed abstractly by idealism-which, of course, does not know real, sensuous activity as such.' म्हणजे, आपण जी सर्जनशील कृती सत्यात आणतो, तिची सुरुवात अमूर्त स्वरूपात जाणिवेच्या पातळीवर होते.  


इथं महत्त्वाचा शब्द आहे 'active side' म्हणजे सरळ सोप्या भाषेत बोलायचं झालं तर माणसाने आजतागायत जाणीवपूर्वक केलेल्या सर्जनशील कृती. मार्क्सचं मोठेपण हे आहे, की माणुस-निसर्ग-माणुस या संबंधातून ही द्वंदात्मक 'active side' मार्क्सनं दाखवून दिली आहे. त्यामुळं ती फक्त जाणीवेच्या पातळीवर न राहता ती जाणीवपूर्वक कृतीवर देखील पोहचते. मार्क्सच्या आधीही माणसाची ही बाजू सांगणारे तत्त्ववेत्ते होऊन गेले आहेत. परंतु या सर्व तत्त्ववेत्त्यांनी या कृतिशील बाजूचं द्वंद्व अमूर्त स्वरूपात निसर्ग, भाषा आणि आणि जाणिवेच्या पातळीवर दाखवून दिले आहे.

 

उदाहरण म्हणून बोलायच झालं तर आदि-तत्त्ववेत्त्यांच्या (थेल्स, अनक्सीमांडर)  विरोधात हेरॅक्लिटस ही कृतिशील बाजू, logos अर्थात निसर्गाच्या द्वंद्वात्मक मूलभूत नियमाच्या स्वरूपात दाखवून देतो तर प्रोटागोरस, गॉजिअसच्या विरोधात सॉक्रेटिस हीच बाजू भाषेच्या मुक्त संवादातून मांडतो. म्हणजे जे मनात आहे, ते शब्दांच्या स्वरूपात संकल्पनात्मक मूर्त रूप धारण करू लागतं. याच कृतिशील बाजूचा आधुनिक अविष्कार कान्ट आणि हेगेल मध्ये आढळतो आणि अर्थात फॉयरबाख नंतर मार्क्स मध्ये.


हा सगळा पसारा सांगण्याचं कारण म्हणजे भारतीय परंपरेत ही कृतिशील बाजू पहिल्यांदा जन्माला घालणारा आणि या बाजूचा एकमेव पुरस्कर्ता म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध!


तथागत, उपनिषदीय ब्रह्मणची नित्यता आणि चार्वाकीय जडतेची नित्यता या दोन ऑन्टॉलॉजिकल ट्रुथस (सत्ताशास्त्रीय सत्य, जे काही अस्तित्वात आहे, त्याबाबतचं सत्य) विरोधात स्वतःचं सत्ताशास्त्र उभं करत असताना पहिल्यांदा दाखवून देतात की हे सत्य प्रवाहित आहे, अस्मिम सती, ईदम भवती। अर्थात जे आहे, ते घडत आहे. It is becoming without any telos, ते कुठल्याही उद्दिष्टाशिवाय अस्तित्वात येत आहे. जे आहे ते नुसतंच प्रवाहित नाही तर आत्महिन आहे. म्हणजेच त्यामध्ये नित्य, विभू (संपुष्ठात न येणारं) असं सारभूत (essential) काही नाही. 

 

इथं एक लक्षात घेणं गरजेचं आहे, की तथागतापूर्वी अजितने त्याच्या भुतचैतन्यवादात जाणीवेची उत्पत्ती ही महाभूतांच्या संयोगातुन होत असते किंवा कृतिशील संयोगातून होत असते हे दाखवुन उपनिषदीय ब्रह्मणचा फोलपणा दाखवून दिला आहे. उदाहरणार्थ विड्याच्या पानात काथ, सुपारी आणि चुना असतो, पण त्यात लाल रंग लाळेच्या संपर्कात येऊन सर्व एकत्र होतं तेव्हाच निर्माण होतो. म्हणजेच जी विश्वाची पंचमहाभूतं आहेत, ती एकत्र आल्यावरच चैतन्य निर्माण होतं. 

 

 

तथागत अजित कडून आलेला भूतचैतन्यवाद अप्रत्यक्षपणे स्वीकारत ऑन्टॉलॉजिकल ट्रुथच्या प्रवाही स्वरूपाचं नातं मानवी जाणिवेशी अर्थात ज्ञानमीमांसेशी जोडून घेत कृतिशील बाजूचा सिध्दांत जाणिवेच्या पातळीवर पहिल्यांदा मांडतात.


म्हणजेच बुध्द जाणीव कशी निर्माण होते या सत्याच्या पलीकडे जाऊन ही जाणीव जर वस्तूच्या संपर्कात आली, तर त्यामधून जाणिवेच्या पातळीवर दुःख निर्माण होतं हे मांडणारा पहिला तत्ववेत्ता आहे. व त्याचसोबत याच जाणिवेनं वस्तुचं मूळ स्वरूप जाणून घेतले तर ज्ञानदेखील प्राप्त होतं, हेही तो दाखवुन देतो.


तत्वज्ञान प्रामुख्यानं 'What is?' किंवा 'काय आहे?' या प्रश्नाचं उत्तर देत असतं किंवा त्यासोबत हे 'असणं' कसं समजून घ्यावं हे सांगत असतं अथवा जे आहे ते समजून घेण्यात येणाऱ्या 'ख्याती' किंवा मिथ्या काय आहेत हे सांगते. परंतु जे आहे त्याचा तुमच्या जाणिवेशी किंवा कृतीशी संबंध आला तर काय निर्माण होऊ शकतं, याबाबत मात्र क्वचित भाष्य केलं जातं. भारतात बुद्ध तत्वज्ञानाव्यतिरीक्त ही गोष्ट फक्त शांकर वेदांतामध्ये आढळून येते.


बुध्द महान आहे याचं कारण म्हणजे त्याची थियरी ऑफ डिझायर (तृष्णेचा सिद्धांत). इतर भारतीय तत्त्वज्ञानात तृष्णेऐवजी ऐवजी मिथ्था अर्थात माणसाकडून कुठल्याही बाबतीत सहजप्रवृत्तीनं होणाऱ्या चुकीच्या समजुतीवर जास्त भर दिला गेला आहे. म्हणजे तुम्ही जग या चुकीच्या समजूतीतूनच जाणून घेता त्यामुळं तुम्हाला जगाचं मूळ स्वरूप जाणता येत नाही.


याउलट बुद्ध म्हणतो की, 'जगाचं/वस्तूचं/व्यक्तीचं मूळ स्वरूप तिच्या प्रवाहिपणातच आहे. त्याचसोबत याच जगाप्रती, व्यक्तीप्रती, वस्तूप्रती आपल्या जाणिवेला इच्छा असते. परंतु वस्तूचा/व्यक्तीचा प्रवाहीपणा आपल्या स्वतःचा प्रवाहिपणा लक्षात न आल्यानं दुःख निर्माण होतं. म्हणजेच दुःख ही माणसानं निर्माण केलेली जाणीवपूर्वक कृती आहे ती समजूतीतली चूक नाही किंवा अज्ञान देखील नाही. अर्थात निर्वाणाच्या अनुषंगाने दुःख अज्ञानामधून निर्माण होतं.


म्हणजे निसर्गावर कृती करून माणूस वस्तू निर्माण करतो आणि ती वस्तू दुसऱ्या माणसाला विकून संपत्ती निर्माण करतो, तसंच माणूस जाणीवेद्वारे इच्छा जाणीवपूर्वक जगामध्ये/वस्तू/व्यक्तींमध्ये गुंतवून दुःख निर्माण करतात. इच्छा आणि वस्तू यामधील संबंध हा तांत्रिक नसून तो जाणीवपूर्वक कृतिशील आहे. परंतु ही कृतिशीलता जाणिवेच्या पातळीवरच मर्यादित आहे. जग हे 'ऑब्जेक्ट् ऑफ डिजायर' आहे, पण हे ऑब्जेक्ट् नित्य नाही तर ते प्रवाहित आहे, तृष्णेला हा प्रवाहिपणा न समजल्यामुळे तृष्णा दुःखाला जन्म देते. तृष्णेच्या विषयवस्तूचं स्वरूप जर जाणिवेनं जाणलं, तर जाणीव तृष्णेतून मुक्त होते आणि तृष्णेचा अस्त झाला की दुःख नष्ट होते. पण म्हणून वस्तूचा प्रवाहिपणा थांबत नसतो किंवा जाणिवेचा प्रवाहीपणा स्थिर झालेला नसतो तर फक्त जाणिवेला मुळ स्वरूप कळलेलं असतं एवढंच.

आपण असं म्हणू शकतो, की In Buddha, active side is a conscious activity instead of sensuous activity, म्हणजे बुद्धासाठी माणसाची कृतिशीलता जाणिवेच्या पातळीवर घडते मात्र भौतिक स्वरूपात घडत नाही आणि हीच जाणीवपुर्वक कृती जर प्रज्ञेने केली तर व्यक्तीला दुःखा ऐवजी संबोधि अथवा निर्वाण प्राप्त होते. म्हणजे तुम्हाला एकदा जाणिवेच्या पातळीवर कळालं की तुम्हाला इच्छित असलेली एखादी वस्तू ही अनित्य आहे, तेव्हा तुम्ही तिच्या भौतिक स्वरूपातील नश्वरतेला मान्य करून त्यातून होणाऱ्या दुःखावर विजय प्राप्त करता.


अर्थात बुद्धाची ही कृतिशील बाजू पुर्णतः चिद्वादाकडे जाणारी नाही किंवा पुर्णतः भौतिकवादाकडे जाणारी सुद्धा नाही. परंतू ती उपनिषदातील चिद्वादापेक्षा आणि चार्वाकीय भौतिकवादापेक्षा नक्कीच वेगळी आहे. जसं उपनिषद बाह्य सत्याला ब्रम्हण सारखं नित्य तत्त्व मानतं, त्याउलट बुद्ध बाह्य सत्याला प्रवाहित भौतिक तत्त्व मानतो आणि जसे चार्वाक शरीरालाच आत्मा मानतात, त्याउलट बुद्ध 'स्व' ला जाणिवेची द्वंद्वात्मक शृंखला मानतो. 

महान आहे बुध्द,
महान आहे त्याचा धम्म.