Quick Reads

फ्रँको बेरार्डी: आपल्याला माहित असलेलं जग पुन्हा येणं शक्य नाही

फलसफी सदर

Credit : इंडी जर्नल

फ्रँको बेरार्डी त्यांच्या COVID19 बद्दल च्या दुसऱ्या विवेचनात सामाजिक व्यवस्था कशी कोलमडून पडली आहे याचं विवेचन करतात. पण सामाजिक व्यवस्था कोलमडून पडण्याचं मूळ कारण हे कालपर्यंत आपण जी सामान्य परिस्थिती म्हणून मान्य केलेली गोष्ट ती परिस्थितीच आहे. आणि उद्या जेव्हा जग पुन्हा नव्याने उभे राहील तेंव्हा अस्तित्वात असलेल्या सामान्य परिस्थितीकडे पुन्हा परत न जाता जगाचा नव्याने विचार करावा लागेल आणि या नव्या जगाची धारणा 'फायदा' या तत्वावर आधारित न राहता उपयोग या तत्वांवर आधारित असणं ही काळाची गरज असेल.

ऑफलाईन हा शब्द आज जगातील पर्वणीचा शब्द बनला आहे. आपला ऑफलाईन ते ऑनलाईन हा प्रवास साधारणपणे १९७० नंतर सुरू झालाय (भारतात १९९० नंतर). या चाळीसएक वर्षात आपण माणूस म्हणून आपल्या रोजच्या जगण्यातील क्रिया या आपल्या संबंधांच्या, निकटवर्तीयतेच्या आणि बौद्धिक आकलनाच्या अनुषंगाने फारच बदललेल्या आहेत. या काळात आपले परस्पर संबंध हे शाररिक संयोजनापासून बदलून ते भाषिक विनिमयामध्ये बदललेले आहेत. संगणकाच्या माध्यमातून हा भाषिक विनिमय डिजीटल स्वरूपात आणला जातो. आपल्या उत्पादनाच्या कृती या काही अंशी स्वयंचलीय यंत्राकडे हस्तांतरित झाल्या आहेत. या सर्व प्रक्रियेत आपण एकमेकांचा शाररिक संपर्क न येताच संवाद प्रस्थापित करत आहोत. जगातील बहुतांश जनतेचं रोजचं आयुष्य हे इलेक्ट्रॉनिक साधनांनी बांधलं गेलेलं आहे आणि त्याद्वारे लोक अतिप्रचंड प्रमाणात वीदा उत्पादनाचं कार्य करताना आढळून येत आहेत.

या आपल्या तीस चाळीस वर्षाच्या सामाजिक आर्थिक वास्तवात COVID19 या जैविक वाहकाने आपल्या या सामाजिक अखंडतेत प्रवेश करत ही व्यवस्था उलथवून लावली आहे, कोलमडून पाडली आहे.  एकमेकांसोबतचे संयोजन हे याच संसर्गाचं मूळ कारण ठरत आहे. त्याचसोबत आपलं भौतिक अवकाशात एकत्र येण ही गोष्ट सुध्दा धोकादायक ठरत आहे. याचा परिणाम म्हणून आपण आपला बहुतांश वेळ ऑनलाईन असण्यात घालवत आहोत, कारण आपली सर्व प्रकारची नाती स्पर्श आणि एकत्रिता या पासून दूर ठेवली नाही तर ती आपणालाच धोकादायक ठरणार आहेत. या काळात सतत ऑनलाईन असल्यामुळे कदाचित आपण ऑनलाईन असण्याच्या क्रियेला आजाराच्या अनुषंगाने बघायला लागू, याचा या पेक्षा भयावह काळ म्हणजे या नंतरच्या काळात कदाचित आपल्या हा एकटेपणाच्या आठवणीमुळे व या महामारीच्या आठवणीमुळे एक दिवस अचानक आपण सर्वच आपल्या ऑनलाईन स्क्रिन्स बंद ही करू. अर्थात या महामारीच्या काळात सतत ऑनलाईन असल्याने त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यवर होणार आहे हे नक्कीच. भारतासारख्या देशात कदाचित हा परिणाम शारीरिक आरोग्यावर देखील होण्याची शक्यता आपणास नाकारता येणार नाही.

 

 

आपल्या शाररीक व मानसिक आरोग्याचा संबंध येणाऱ्या काळातील अर्थव्यवस्थेशी जोडणं गरजेचं आहे. आज वित्त व्यवस्थेची समाजावरील पकड सैल होतेय, शेअर बाजार हळूहळू कोलमडून पडत आहेत, मागणी पुरवठा या तत्त्वावर आधारित अर्थशास्त्र कोलमडताना दिसत आहे. या परिस्थितीत आपणाला संपत्ती व समृध्दीची व्याख्या बदलताना दिसून येत आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे यावर आता तुमची संपत्ती सिद्ध होऊ शकत नाही त्या ऐवजी तुमच्या०कडे किती भक्कम मानसिक स्थैर्य आहे, या आधारे तुमची संपत्ती निश्चित होईल. या काळात पैशाच्या कार्याचं निलंबन हे भांडवलशाहीमधून बाहेर पडण्याची किल्ली आहे, आणि याच द्वारे आपण भांडवल, पैसे आणि संसाधनांची संधी यांच्यातील नात संपुष्टात आणून नव्या जगाची निर्मिती करु शकतो. या नव्या जगात संपत्तीच मूल्य हे पैशावर न ठरवता आपण किती दर्जात्मक जीवन जगतो यावर ठरेल.

यानंतर या अरिष्टाचे पर्यावरणावर, इतर मानवीय अरिष्ठांवर आणि राजकारणावर काय परीणाम झाले आहेत, याचं विवेचन बेरार्डी आपल्या समोर मांडतात. अर्थात हे विवेचन मार्च २०२० पुर्वीचं साधारण जग आहे आणि या जगाकडे का परत जाऊ नये याचं विवेचन त्यानंतर आपल्या समोर मांडतो. 

मार्च २०१९ मध्ये इटलीत तरुण-तरूणी जागतिक तापमानवाढी विरोधात तेथील वृद्ध लोकांविरुद्ध किंवा आपल्या अगोदरच्या पिढी विरुद्ध रस्त्यावर उतरले होते. या आपल्या अगोदरच्या पिढीने आपणाला विषारी जग बहाल केले आहे, या पिढीने स्व स्वार्थापोटी या पर्यावरणीय नाश केला आहे आणि या विरोधात हे तरुण तेल व कोळशाचा उपभोग कमी करावा याची मागणी करत होते, अर्थात ही मागणी मान्य झालीच नाही. या सारखी आंदोलन जगभरात चिरडली गेली आहेत. पर्यावरणाचा असमतोल अजूनच बिघडला आहे, विषारी वायूचं उत्सर्जन सुध्दा कमी झालेलं नाही आणि या परिस्थितीत स्वतः पृथ्वीने तरुणांच्या बाजूनं उभं राहत मार्चच्या मध्यात हा हल्ला चढवला आहे. यानंतर पर्यावरणात जगभर काही प्रमाणात बदल झालेला दिसत देखील आहे पण त्यासाठीची किंमत मात्र खूपच मोठ्या प्रमाणात देऊ करण्यात आली आहे. अर्थव्यवस्था कोलमडत असतांना व पर्यावरणात नव्याने बरे बदल होत असतानाच आजपर्यंतच्या जगातील इतर काही मानवीय अरिष्ट आहेत, ती मात्र संपुष्टात आलेली नाहीत. मध्यपूर्वेतील देशांमध्ये, आफ्रिकेतील देशांमध्ये चालू असणाऱ्या गृहयुद्धात मृत्युमुखी पडणारांची संख्या फार कमी झालेली नाही, विस्थापित व निर्वासितांचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये अजूनच वाढ झालेली आपल्याला दिसत आहे.

या अरिष्टाचा राजकीय परिणाम म्हणजे 'अमेरिका फर्स्ट' या ट्रम्प यांच्या धोरणामुळे जर्मन नाझीसारखंच अमेरिकन नाझी व्यवस्था जन्माला येऊ शकते. बेरार्डी यांच्या मते, या सर्व परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल, तर भीती ही गोष्ट आपल्या चिंतनाचा पाया असली पाहिजे. कारण भीतीमुळेच आपण बदलाला प्रवृत्त होऊ शकतो. आपल्या समोर तीन भीतीची कारणं आहेत, आजाराची भीती, निरसपणाची भीती आणि आपण या सगळ्यातून कधी बाहेर पडू व त्याचबरोबर, येणारं जग कसं असेल याची भीती. जर या भीतीमुळे आपण बदलासाठी प्रवृत्त होणार असू तर आपणाला बदलासाठी जाणीवपूर्वक परिस्थिती सुद्धा निर्माण करावी लागेल. त्या अनुषंगाने आपणाला स्वयंचलीत व्यवस्थेचा, आरोग्य व्यवस्थेचा, शहरांचा, अन्नपुरवठ्याचा आणि आपल्या रोजच्या जगण्याचा पुनर्विचार करावा लागेल. हा समाज पुन्हा सुरू करायचा असेल तर आपली जुनी कार्यपद्धती नाकारावी लागेल, व्यापार धर्म आणि व्यक्तिवादी उदारमतवाद या धारणा दुष्कृत्य म्हणून जाहीर कराव्या लागतील, गेल्या चाळीस वर्षात ज्यांनी सामाजीक आरोग्य खर्चात कपात करून खाजगीकरणाला प्रोत्साहन दिले आहे त्या सर्व अर्थतज्ञानंच सामाजिक विलगीकरण करावं लागेल. या काळात जे कुणी सर्वसाधारण परिस्थितीकडे परत जाण्याची मागणी करत आहेत, त्यांना उद्देशून बेरार्डी म्हणतात की काही काळ व्यवस्था बंद ठेवून काहीच घडलं नाही अशा धारणेने व्यवस्था नव्यानं सुरू केली तर ही महामारीची साथ पुन्हा नव्यानं सुरू होईल, आणि त्यानंतर असंख्य लोक मारले जाऊ शकतील, आणि म्हणून या सर्वसाधारण परिस्थितीकडे आपण मागे जाऊ शकत नाही कारण आज जे काही उद्भवलेलं आहे त्यास ही भांडवली साधारण परिस्थिती कारणीभूत आहे. याच परिस्थितीने पृथ्वीला व सर्व सजीवांना नाजूक बनवलेलं आहे आणि याच परिस्थितीमूळे ही महामारी पसरलेली आहे.

एका महिन्याच्या लॉकडाऊन नंतर पर्यावरणात बदल झालेला असला तरी आपणाला या बदलासाठी फार मोठी किंमत मोजावी लागली आहे, सोबत अनेक लोकांना मृत्यूला समोर जावं लागलं आहे आणि सर्व जगच भीतीच्या वातावरणात जगत आहे. ही किंमत उद्या ही कधी न अनुभवलेल्या आर्थिक संकटाला सामोरं जाऊन द्यावी लागणार आहे. या सगळ्या गोष्टी भांडवली 'पूर्वसाधारण' परिस्थितीमुळे निर्माण झाल्या आहेत, आणि आपण जर या परिस्थितीकडे परत जायचं ठरवलं तर त्याची किंमत आपल्या पृथ्वीवरील अस्तित्वाच्या ऱ्हासानं मोजावी लागेल.त्याचसोबत कदाचित आपणाला हिंसा, निरंकुशता, येणारं अरिष्ट, हे मुळात अरिष्ट नसून ते एका प्रकारचं RESET बटन आहे. म्हणजे सध्या अस्तित्वात असलेली मशीन काही काळासाठी बंद करून ती पुन्हा सुरू करणे. पण आपण ही मशीन पुन्हा सुरू करू तेंव्हा आपल्यासमोर दोन पर्याय असतील: एकतर पूर्वी जसं होतं, तसं स्वीकारून आयुष्य जोखमीत टाकणं किंवा या मशीनला विज्ञान, जाणीव व संवेदनशीलतेच्या आधारे पुनःप्रोग्रॅमिंग करणं.

 

 

या अरिष्ठांतुन बाहेर पडत असताना शेअर बाजारासाठी काय चांगलं आहे, याचा विचार करणं हे आपलं काम नाही आणि आपण याबद्दल विचारही करु नये. याउलट आपणाला माणुस म्हणून काय उपयोगाचं आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. उपयोगिता हा शब्द आपल्या उत्पादन, तंत्रज्ञान आणि कृतीचा आधारभूत शब्द असला पाहिजे. याचाच अर्थ असा की भांडवली विनिमय आणि उपभोग या दोन गोष्टीना नकार देत 'उपयुक्तता' या मानवीय गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. आपण जे काही निर्माण करतो ते उपयोगासाठी निर्माण करतो विनिमया साठी नाही. याच सोबत आपण या नव्या गोष्टी उपयोगाच्या अनुषंगाने निर्माण करत असताना त्यांच्या निर्मितीमुळे पर्यावरणाला हानी पोहचणार नाही किंवा मानवीय नाश सुध्दा होणार नाही याचा देखील आपणाला विचार करावा लागेल.

याचसोबत अजून एका महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार करणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टीचे निर्णय कोण ठरवणार? कारण निर्णय कोण ठरवणार या प्रश्नासोबत एक अजून प्रश्न निर्माण होतो आणि तो म्हणजे आदिमान्यतेचा स्तोत्र काय असणार आहे? आणि हा प्रश्न परिवर्तनाच्या क्रांतीची सुरवात करणारा प्रश्न आहे.