Opinion
जरांगे पाटील, मराठा आरक्षण आणि आदर्श राजकीय कृती
जरांगे यांचं उपोषण ही एक राजकीय कृती आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी २ महिन्याची मुदत मागितली आहे. त्यामुळे तुर्तास जरांगे यांचं उपोषण आणि मराठा जातीचे मोर्चे थांबले आहेत. हेगेल म्हणतो तसं, "दिवस संपलाय आणि आता दिवसाबद्दल बोलायला तत्ववेत्ता तयार आहे!" या धारणेनुसार मराठा आरक्षण चळवळ, जरांगे यांची राजकीय कृती याबद्दल भाष्य करण्याची ही योग्य वेळ आहे म्हणून हा अट्टाहास.
जरांगे यांचं उपोषण ही एक राजकीय कृती आहे. अन्याय झालाय, अन्याय होतोय म्हणून शासकाला आपला आवाज पोहचावा, शासकानं आपलं म्हणणं ऐकावं आणि न्याय द्यावा या साठी केलेली एक अहिंसक कृती म्हणजे उपोषण अथवा अन्नत्याग. यामागील नैतीक आणि राजकिय उद्देश स्पष्ट असतो, स्वतःला आत्मक्लेश देऊन निर्दयी शासाकाच्या नैतिकतेला आव्हाहन करुन इच्छित न्याय प्राप्त करणं. अर्थात उपोषण ही राजकीय कृतीच गांधींच्या सत्याग्रह संकल्पनेतून विकसीत झालेली एक विरोधाची कृती आहे. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह, अट्टाहास नव्हे. गांधी, सत्याग्रह ही विरोधाची कृती मांडताना, तिचा आधार नैतीक आणि अहिंसक असावा असा अट्टाहास धरतात आणि तो योग्य आहे. जर सत्याग्रह हा नैतीक धारणेवर असेल तर सत्याग्रह करणारी व्यक्ती, म्हणजे सत्याग्रही देखील नैतीक असली पाहिजे आणि त्याच्यसोबत त्या व्यक्तीची कृती देखील तितकीच नैतीक असली पाहिजे, तरच तो सत्याग्रह आणि त्याचा उद्देश योग्य मानण्यात येईल.
गांधींनंतर देशात आणि जगभरात, तुम्ही गांधींना मानत असाल किंवा नसाल, तुम्ही जेव्हा राजकीय कृती करत असता तेव्हा तुमची राजकीय कृती गांधींनी प्रतीपादित केलेल्या राजकीय कृतींपैकीच एक असते. सहज म्हणून सांगतो, स्वतः बाबासाहेब आंबेडकर कडवे गांधी विरोधक असूनही त्यांनी स्वतः त्यांच्या सुरवातीच्या राजकिय कारकीर्दीत सत्याग्रह पद्धतच विरोधाची कृती म्हणून वापरली आहे. खरंतर फ्रेंच राज्यक्रांती नंतर आजपर्यंत जगभरात ज्या काही राजकीय चळवळी होतात त्या सर्व चळवळीमधील कृती या एकतर फ्रेंच राज्यक्रांती, लेनिन, गांधी, माओ आणि मंडेला यांनी मांडलेल्या वेगवगेळ्या राजकीय कृतींच्या प्रारुपांची कॉपी असतात. जुन्या शतकातील विचारधारा आणि जीवनपद्धती नाकारली असली तरीही नव्या शतकात विरोधाच्या चळवळीची नवीन प्रारूपं आपण तयार करु शकलेलो नाही.
देशभरात वेगवेगळ्या मागण्यांनासाठी जी आंदोलनं होत असतात, उपोषणं होत असतात, ही एक प्रकारचा सत्याग्रहच आहेत.
जरांगेंचं आंदोलन, किंवा देशभरात वेगवेगळ्या मागण्यांनासाठी जी आंदोलनं होत असतात, उपोषणं होत असतात, ती सर्व उपोषणं, आंदोलनं, ही एक प्रकारचा सत्याग्रहच आहेत. आता मुद्दा हा आहे की, हे सर्व लोक, त्यांची कृती, ही सत्याग्रह आणि सत्याग्रही, या संकल्पनांची जी चौकट आहे ती पुर्ण करतात का? अर्थात उत्तर नाही असंच येईल. इथं लोक असं म्हणू शकतात की आम्हाला न्याय हवाय आणि त्यासाठी उपोषण हा मार्ग आम्ही स्वीकारला आहे. आम्हाला सत्याग्रहाच्या नैतीक चौकटीचं काही एक देणंघेणं नाही. मुद्दा हा आहे की उपोषण सत्यासाठी, न्यायासाठी केलं जातं. वर उल्लेख केल्याप्रमाणे, तुम्ही उपोषणाद्वारे शासकाच्या हृदयाला स्पर्श करु पाहत आहात. इथं हे ग्राह्य आहे की ज्याचा तुम्ही विरोध करत आहात तो निर्दयी आहे, तो अनैतिक आहे आणि म्हणून त्यानं तुमच्यावर अन्याय केलाय आणि याचा विरोध म्हणून तुम्हाला न्यायी आणि नैतिक असावं लागेल, तरच तुमची विरोधाची कृती न्यायी असेल.
म्हणजे फक्त मागणी न्याय्य असून चालत नाही तर तुम्ही स्वतःदेखील चांगलं आचरण पाळणारे असला पाहिजे, तुमच्यात आणि तुमच्या विरोधी घटकात मूलभूत नैतीक फरक असला पाहिजे तरच तुमचं उपोषण, सत्याग्रह नैतीकतेला धरून आहे. जर हे उपोषण, सत्याग्रहाच्या चौकटीत नसेल, तुम्ही स्वतः तुमच्या नैतीक धारणा आणि आचरण हे विरोधकापासुन वेगळं नसेल, तर कदाचीत तुमची मागणी योग्य असेल, मात्र ती पुर्ण करण्यासाठी जी पद्धत (उपोषण) तुम्ही वापरत आहात तो निव्वळ अट्टाहास आहे, हट्ट आहे. तुम्ही स्वतःचं शरीर पणाला लावून, आत्मक्लेश करुन, समोरच्या व्यक्तीवर/संस्थेवर फक्त दबाव आणत आहात आणि मागणी पूर्ण करुन घेत आहात. अशी कृती ही स्वतःच्या शरीरावर बॉम्ब लावणाऱ्या किंवा आत्मदहन करणाऱ्या व्यक्तिपासून फारशी वेगळी नाही. दोन्ही कृतीत फक्त उद्देश महत्त्वाचा आहे, उद्देशाचं साधन महत्वाचं नाही! शासक आणि शोषित यांच्यात जर नैतिक फरक नसेल तर शोषितांनी न्यायासाठी केलेला विरोध हा अनैतिक, अराजकतेकडे जाणाराच असेल.
दुसरी गोष्ट, मराठा क्रांती मोर्चा हा न्याय मिळवण्यााठी निर्माण झालेलं आंदोलन आहे. या आंदोलनाचा उद्देश आरक्षण आहे आणि ही मागणी रास्तच आहे. हे आरक्षण त्यांना मिळालंदेखील पाहिजेच याबाबत दुमत नसावं. मुद्दा हा, की जेव्हा तुम्ही न्याय मागत असता, तेव्हा या न्यायाच्या धारणेला एक वैचारिक आणि राजकिय पाया असला पाहिजे, एक ठोस नेतृत्व असलं पाहिजे, एक दीर्घकालीन उद्देश आणि त्यासाठीचं स्पष्ट राजकारण असलं पाहिजे. जेव्हा मी राजकिय आणि वैचारिक पाया असला पाहिजे असं म्हणत आहे? तेव्हा आरक्षण का मिळालं पाहिजे? किती प्रमाणात आणि कसं मिळालं पाहिजे? आरक्षणाच्या मागणीची कारणं काय आहेत? ही परिस्थिती का निर्माण झाली? आरक्षण मिळालं तर भविष्यात त्याचे परिणाम काय होतील? या सगळ्याच शहाणपण लोकांना देणारा एक बुद्धिजीवी वर्ग प्रत्येक चळवळीत असला पाहिजे आणि मराठा क्रांती मोर्चादेखील या बुद्धिजीवी वर्गाची गरज आहे. उदाहरणार्थ आज मराठा समूह राजकिय, सामजिकदृष्टीनं प्रबळ असला, तरी शैक्षणिक, आर्थिक दृष्टीनं प्रबळ नाही आणि म्हणून आरक्षण गरजेचं आहे, हे सरळ सोपं गणित आहे. पण ही परिस्थिती का आली आहे, तिची मुळं कुठवर आहेत, याची मांडणी करून लोकांना ती समजून सांगितली पाहिजे!
या उलट जे काही 'प्रबोधन' आपल्याला आजकाल दिसतं, ते इंस्टा रिल्स वरून किंवा व्हॉट्सऍप मधून जे 'शहाणपण' प्रसारित होत आहे, ते प्रबोधन बेसलेस आहे, त्यामध्ये मत्सर आहे, द्वेष आहे, घृणा आहे आणि सोबतच प्रचंड अस्मिताआधारित अंहकार देखील आहे! न्याय म्हणजे, 'त्याला मिळालं आहे म्हणून मला द्या' या तुलनाआधारित मत्सरातून, किंवा, 'त्याला आहे मला नाही, मग त्यालापण देऊ नका आणि मलापणा देऊ नका!' या द्वेषानं मागितला जाऊ शकत नाही. न्याय म्हणजे, ज्याचं जे आहे, त्याला ते देणं! म्हणजेच समानता ही मराठा समुहाचीदेखील गरज आहे, किंवा शैक्षणिक-भौतिक संसाधनाचं न्याय्य वितरण, ही मराठा समूहाची गरज आहे आणि 'ती पुर्ण होत नाही म्हणून आम्हाला न्याय हवाय' ही मूलभूत वैचारिक धारणा असणं गरजेचं आहे. इंस्टाग्राम रील्स आणि व्हॉट्सऍप मधून जर लोकांना तुम्ही, 'आरक्षण का हवं आहे' हे सांगत असाल आणि अर्धवट ज्ञान असलेले इन्फ्लुएन्सर्स हे तुमचे वैचारिक प्रतिनिधीत्व करत असतील तर परिस्थिती अवघड होऊन बसेल यात शंका नाही!
आधुनिक महाराष्ट्राला छत्रपती शाहूंपासुन चालत आलेली मराठा प्रबोधनाची एक महान परंपरा आहे.
आधुनिक महाराष्ट्राला छत्रपती शाहूंपासुन चालत आलेली मराठा प्रबोधनाची एक महान परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजवर एक प्रदीर्घ राजकिय व वैचारीक वारसा असलेल्या जातसमूहाचं नेतृत्व, इंस्टाग्रामवरची कोवळी पोरं-पोरी करत असतील तर शांतपणे विचारकरण्याची गरज आहे. आरक्षणाची कारणं संरचनीय आहेत आणि पोरं द्वेष आणि मत्सराने प्रेरित रिल्स टाकून, मेसेज फॉरवर्ड करुन, 'गाढव पुढं जातंय म्हणून आरक्षण पाहिजे', असले जोक्स मारून जर न्यायाची मागणी करत असतील, तर राजकीयदृष्ट्या हे कितपत रास्त आहे याचा विचार व्हायला हवा.हे शहाणपण तुम्हालाच का पाजळायचं? असा प्रश्न पडत असेल, तर बंधुनो, तुम्ही या राज्यातील फक्त एक जातसमूह नाही तर भविष्यातील पायंडे आणि आदर्श निश्चित करणारा एक प्रभुत्वशाली घटक आहात. तुम्ही आज जे राजकीय प्रारूप, कृती या राज्यासमोर द्याल तेच प्रारूप, त्याच कृती उद्या उर्वरित समाज अंगिकारणार आहे, हे लक्षात असूद्यात. गर्दीचं राजकारण फक्त तत्कालीक राजकीय उद्दिष्ट साध्य करेल, परंतू वैचारीक आणि व्यापक राजकारणच खऱ्या अर्थानं दीर्घकालीन उद्दिष्टं पुर्ण करु शकेल. असंही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचं राजकारण तुमच्यावरच केंद्रित आहे. फक्त नेतृत्व आणि कृतीकार्यक्रम लोकभिमुक केला तरी उद्दीष्ट सफलच होतील.
आणि आता तिसरा मुद्दा आरक्षणाचा! तर लोकहो, आरक्षण ही व्यवस्था जादूची कांडी नाही. आज आरक्षण मिळालं आणि उद्या सगळं बदललं, असं काही होणार नाही. उद्या आरक्षण मिळेलही आणि मिळालंच पाहिजे, पण या आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ किती होणार आहे आणि कुणाला होणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे आरक्षण मिळालं, तरी ते प्रत्यक्षात मिळण्यासाठी सरकारनं नोकरभरती केली पाहिजे, जी हळूहळू बंद पडत आहे. सरकार नवीन रोजगार उपलब्ध करणार नसेल, तर आरक्षण मिळून काय उपयोग? दुसरी गोष्ट म्हणजे नेमकं किती आणि कुणाला आरक्षण मिळेल? उदाहरण म्हणून १०% जागा मराठा आरक्षणासाठी आरक्षित असतील असं गृहीत धरलं, तर त्यासाठी जवळपास एक हजार उमेदवार स्पर्धेत उतरतील आणि त्यापैकी फारतर दहा उमेदवारांना फायदा होईल. उर्वरित ९९० लोकांच काय? आणि हे ९९० लोक जातीनं मराठा असतील, पण वर्गानं? म्हणजेच ज्या १० लोकांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे ते मराठा समाजातील वर्गीय मलिदा असतील आणि उर्वरित मराठा हे गरीब किंवा मध्यमवर्गीय मराठा असतील. हा जो वर्गीय अन्याय आहे, असमानता आहे, ती व्यवस्थात्मक आणि संरचनात्मक आहे. ही विषमता आरक्षण दुर करु शकत नाही.
आपणाला नव्या व्यवस्थेची गरज आहे, जी सर्वांना फक्त अमुर्त समानता बहाल करणार नाही, तर ठोस समानता आणि संसाधनांचं वाटप करेल
खरंतर ही आर्थिक विषमता फक्त आरक्षणानंतर येईल अस नाही. आजही महाराष्ट्रातील आर्थिक आणि भौतिक संसाधन मराठा समाजातील मुठभर लोकांकडे आहेत आणि उर्वरित मराठा समाज आजही भौतिक आणि आर्थिक संसाधनाच्या दृष्टीनं मागास आहे, म्हणजेच आजही एक स्पष्ट वर्गीय विषमता ठळक दिसून येत आहे. आरक्षण ही वर्गीय विषमता दुर करणार आहे का, तर त्याचं उत्तर नाही, असंच येणार आहे. याचा अर्थ आरक्षण ही न्यायाची जुनी पद्धत झाली आहे आणि आपणाला नव्या व्यवस्थेची गरज आहे. नवी व्यवस्था, जी सर्वांना फक्त अमुर्त समानता बहाल करणार नाही, तर ठोस समानता आणि संसाधनांचं वाटप करेल, सर्वांगिन विकासासाठी सुयोग्य परिस्थिती निर्माण करेल.म्हणजे एकतर आपली मागणी अशी असावी, की शिक्षण, रोजगार, आरोग्य, दळणवळण इत्यादि मूलभूत सेवांचं राष्ट्रीयीकरण करावं आणि त्याचसोबत युनिव्हर्सल बेसिक इनकम, म्हणजे वैश्विक किमान उत्पन्न, यासारखी व्यवस्था निर्माण करुन सर्वांना जगण्यासाठी किमान सुविधा बहाल कराव्यात, रोजगार इच्छेनुसार असावा, रोजगार संधी मुबलक प्रमाणात असावी, रोजगाराचे तास कमी असावेत, अशा मागण्या आजच्या परिस्थितीत रास्त ठरतील.
तुम्ही म्हणाल या सगळ्या मागण्या संपुर्ण देशासाठी लाभदायक आहेत, आम्ही का या मागाव्यात? तर लोकहो, प्रस्थापित जात म्हणून जसे मराठे उर्वरित समाजासमोर आदर्श घालून देऊ शकतात, तसेच आपली लोकसंख्या जास्त असल्यानं, सरकार कडून मिळणाऱ्या सुविधांचा अभाव असल्यामुळं भांडवली विकासाचे जे दुष्परिणाम होणार आहेत, होत आहेत, त्याचा पहिला बळी तुम्ही असणार आहात. थोडक्यात भांडवली प्रगतीमुळे आजचा तुमचा जो आर्थिक दर्जा आहे, त्यावरून घसरण होण्याच्या प्रक्रियेत तुम्ही पुढं असाल. याला दुसऱ्या भाषेत कामगारवर्गीयकरण म्हणतात. वर जी जातीअंतर्गत आर्थिक विषमता मांडली आहे, ती या कामगारवर्गीयकरणाचा भाग आहे.कामगारवर्गीयकरणाची ही प्रक्रिया न थांबणारी आहे, याचा परिणाम जसा तुमच्यावर होत होणार आहे, तसाच परिणाम उर्वरित समाजावर होणार आहे, आणि होत आहे. या प्रक्रियेच्या विरोधाचं जे राजकारण उभं राहील, त्याचं नेतृत्व मराठा आणि इतर भूधारक जाती करु शकतील, कारण याच जाती या प्रक्रियेत सगळ्यात जास्त गमवणार आहेत आणि म्हणून तुम्ही आरक्षणाच्या पलीकडे जाऊन नवीन वैश्विक न्यायाच राजकारण उभं केलं पाहिजे.
शेवटचा मुद्दा म्हणजे राजकरण. आजपर्यंत मराठा क्रांती मोर्चाचं कौतुक एक अहिंसक, नेतृत्वहीन, शिस्तप्रिय राजकीय चळवळ म्हणून होत आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे मराठा क्रांती मोर्चा त्याचं उद्दिष्ट पुर्ण करेलच, पण पुढं काय? तर लोकहो, गेल्या दशकात जगात दोन क्रांत्या झाल्यात, तहरीर स्क्वेअर (इजिप्त) आणि जॅस्मिन रिवोल्यूशन (लिबिया) आणि याला 'अरब स्प्रिंग' किंवा अरब जगतातला वसंत देखील म्हणतात. या क्रांत्यादेखील नेतृत्वविहीन, अहिंसक, शिस्तप्रिय स्वरूपाच्या होत्या, त्याचसोबत त्या अनपेक्षित घटनांमधूनही निर्माण झालेल्या होत्या. या क्रांत्यानी मुबारक आणि गद्दाफी या दोन वेगवेगळ्या हुकूमशहांची सत्ता उलटून लावली आणि लोकशाही स्थापन केली. परंतु नवी सरकारं जुन्या व्यवस्थेपासुन फारशी वेगळी नव्हती! सरकार तर बदललं, पण प्रश्न मात्र तसेच राहिले! मराठा क्रांती मोर्चाला एक राजकीय अथवा पक्षीय स्वरूप आलं नाही, तर उद्या हा जनसमूह त्याचं उद्दिष्ट साध्य देखील करेल, पण त्यानंतर काय, हा प्रश्न अनुत्तरीतच राहील आणि या मोर्चाचं आणि राजकारणाचं भविष्य अरब स्प्रिंग किंवा जॅस्मिन क्रांतीपेक्षा फारसं काही वेगळ असणार नाही.