Opinion

प्रा. हरी नरके: ज्ञानपरंपरेचे मारेकरी

प्रा. नरकेंसारखे विचारवंत राजरोसपणे ज्ञानाचे निकष पायदळी तुडवत आहेत म्हणून उलटतपासणी घेणे महत्त्वाचे आहे.

Credit : इंडी जर्नल

सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणा!

- गौतम बुद्ध

गौतम बुद्ध यांचे हे वचन ज्ञानपरंपरेचा पाया आहे. प्राचीन काळी उच्चवर्णाच्या हितसंबंधांनी व्यापलेले एक अंधारयुग भारतीय समाजाने भोगलेले आहे. त्यावेळी ज्ञानाचा कब्जा पूर्णपणे अभिजन जात वर्गानी घेतलेला होता. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धाने ज्ञानाचा दिवा पेटविला. आणि सामान्य माणसापर्यंत ज्ञानाचा प्रकाश ते घेऊन गेले. ज्ञानाची ही परंपरा अनेक अडथळे पार करत, प्रतिकाराचा सामना करत इथपर्यंत पोहोचली आहे. 

ज्ञानपरंपरेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य नावाजलेले आहे. इथे ऊहापोह, विश्लेषण आणि चिकित्सेची मोठी परंपरा आहे. अनेक समाज क्रांतिकारक आणि विचारवंतांनी त्यात मोलाची भर घातली आहे. तथ्य तपासून, तथ्याशी कोणतीही छेडछाड न करता निष्पक्ष पद्धतीने आकलन मांडणे ही ज्ञानाची प्रथम अट मानली जाते. म्हणून ‘सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणा’ असे गौतम बुद्ध म्हणतो. 

आज ज्ञानाचा हा निकष कसा पायदळी तुडवला जातोय याची अनेक उदाहरणे आपल्याला आसपास पहायला मिळतात. दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रा. हरी नरके यांनी लिहिलेला ‘बाबासाहेब आणि चीन’ हा लेख याचे ताजे उदाहरण आहे. प्रा. नरकेंसारखे सामाजिक विचारवंत म्हणविणारे लोक राजरोसपणे हे करतायत, म्हणून त्याची उलटतपासणी करणे अत्यावश्यक बनले आहे. 

 

प्रा.हरी नरके यांचे मुद्दे

"साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्या प्रमाणे आहे. तो सर्वच भस्मात  करत जातोय. अगदी लोकशाही सुद्धा. आज नसला तरी भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे."

नरकेंनी वरील वाक्य लिहून लेखाची वातावरण निर्मिती केली तसे अतिरंजित वाक्य, संपूर्ण भाषणात डॉ. आंबेडकरांच्या तोंडी नाही. डॉ. आंबेडकरांनी संसदेत जे भाषण केले आहे, त्याचा मूळ गाभा परराष्ट्र नीति संदर्भात आहे. शेजारी राष्ट्राशी संबंध ठेवतांना कोणत्या गोष्टींचा विचार व्हावा, याबाबत डॉ. आंबेडकरांनी मत मांडले आहे. हे दोन विचारसरणीच्या संदर्भातील मत नसून शेजारी राष्ट्रांच्या परस्पर संबंधांच्या बाबतीत कोणते धोरण असावे, याबद्दलचे त्यांचे मत आहे. प्रा. नरकेंनी मात्र खोडसाळपणे डॉ. आंबेडकरांचे हे एका विशिष्ट विचारसरणी विरूद्ध मत असल्याचा दावा केला आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर  अमेरिका आणि रशिया या दोन गटात जग विभागले होते. अशा वेळी भारताने अलिप्त न राहता कुठल्या तरी गटात गेले पाहिजे  आणि अमेरिकेच्या गटात जाणे अधिक योग्य राहील ही डॉ.आंबेडकरांची भूमिका होती. आणि त्यासाठी ते  रशियावर त्याच्या विस्तारवादी भूमिकेबाबत रोष व्यक्त करत होते. थोडक्यात त्यांच्या भाषणाचे सारांश असा सांगता येईल. डॉ. आंबेडकरांच्या आधी जवाहरलाल नेहरु बोलले होते. त्यानंतर डॉ. आंबेडकरांचे भाषण झाले.त्यांच्या भाषणात ते म्हणतात, सरकारचे परराष्ट्र धोरण ज्यावर आधारित आहे त्या तत्वांची चर्चा आज आपण करणार आहोत. 

त्यांच्या भाषणाआधी पंतप्रधानांनी प्रामुख्याने तीन तत्वे मांडली होती. शांतता, साम्यवाद व मुक्त लोकशाही यांच्या दरम्यान सहअस्तित्व आणि तिसरे सिएटोला (SEATO) विरोध. या तीन गोष्टींवर त्यांचे परराष्ट्र धोरण आधारित असेल. या तत्वांची वैधता आणि पुरेसेपण यांचे मुल्यांकन करण्यासाठी पार्श्वभूमी समजून घेणे महत्वाचे आहे. जागतिक पातळीवर कम्युनिझमचा प्रसार विशेषत: चीन आणि रशियात झाल्यामुळे भारताने चीनसोबत संबंध प्रस्थापित करताना भौगोलिक स्थानाला महत्व दिले पाहिजे. ल्हासावर कब्जा मिळवण्यासाठी भारत सरकार चीनला मदत करत आहे, त्यामुळे चीन अजून भारताच्या जवळ येणार आहे.त्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे, असे डॉ. आंबेडकरांना वाटत होते.

पूढे डॉ. आंबेडकर म्हणतात, मे १९४५ मध्ये जेंव्हा महायुध्द संपले तेव्हापर्यंत रशियाने दहा युरोपीय राज्ये गिळंकृत केली होती. शिवाय जर्मनी, ऑस्ट्रीया, नार्वे आणि डँनिश बेटाचा भाग रशियाने हस्तगत केला आहे. पूर्वेला रशियाने चीनचा प्रदेश, मंच्युरिया, कोरीया जोडून घेतला आहे. अशा वळणाचे डॉ. आंबेडकरांचे हे भाषण आहे. प्रामुख्याने रशियापासून काय धोका होऊ शकतो याचा यात सांगावा आहे. अर्थात त्याला तत्कालीन संदर्भ आहेत. ते लक्षात घेऊनच डॉ. आंबेडकरांचे भाष्य समजून घ्यायला हवे. कोणत्याही व्यक्तिला त्याच्या काळाच्या संदर्भात समजून घ्यायला पाहिजे, एव्हढे साधे तत्व सुद्धा प्रा. नरके पाळत नाहीत.  

"सुरूवातीला लेखात चीनने विषाणू प्रयोगशाळेत तयार केला की निसर्गातून जन्मला?" असा प्रश्न हरी नरके उपस्थित करतात आणि नंतर मात्र चीनने लादलेल्या जैविक युद्धामुळे संपूर्ण जग होरपळून निघत आहे, असे विधान बिनधास्तपणे करतात. पुढे लगेच ते असा दावा करतात की, सर्व प्रगत राष्ट्रे चीनच्या विषाणूमुळे कोलमडून पडली आहेत आणि  चीनची ही पद्धतशीर रणनीती असू शकते. अशाप्रकारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जे चीनबद्दल बोलतात तीच भाषा नरके बोलू लागतात. भारतात हे नॅरेटिव्ह कोण पेरतंय हे वेगळं सांगण्याची गोष्ट नाही. याचा अर्थ चीनबद्दल आपण चिकित्सक असू नये किंवा निरपेक्ष मैत्रीभाव पाळावा असे नव्हे. मात्र चिकित्सा ही समग्रतेत करायला हवी. चीनच्या परराष्ट्र धोरणाबद्धल परराष्ट्र धोरणाचे इतर अभ्यासक काय म्हणत आहेत? याचा काही संदर्भ नरके देत नाहीत. आजचा चीन साम्यवादी तरी आहे का? ज्या देशाचे नेतृत्व पूर्णपणे विस्तारवादी नफेखोर भांडवलशाहीच्या आहारी गेले आहे, त्याला साम्यवादी ठरवून नरके त्याआडून कसा बुद्धिभेद करतायत हे आपल्याला जाणवते. 

दुसरी गोष्ट अशी की, ज्या विषाणूबद्दल तथाकथित साम्यवादी चीनला दोष दिला जातोय त्या विषाणूला व्यवस्थित आणि खंबीरपणे कोणते देश सामोरे गेले, ही बाब का नजरेआड केली जात आहे. क्युबा किंवा भारतातील केरळ राज्यात सत्तेवर असणाऱ्यांचे विचार कोणते आहेत, हे नरकेंना माहीत नाही काय? चीनचा आक्रमक स्टेट कॅपिटालिज्म व भांडवली देशांची आक्रमक वित्त भांडवलशाही हे सर्व भांडवलीच आहे. त्यामुळे चिकित्सा करतांना ही गोष्ट का अधोरेखित केली जात नाही. उलट त्याकडे मुद्दाम कानाडोळा करत नरके साम्यवादी नसलेल्या चीनला साम्यवादी ठरवून 'साम्यवादाचा धोका' हे घोषवाक्य बनवून निरर्थक काथ्याकूट करत बसतात. इथे कोणत्याही विचारधारेची पाठराखण करण्याचा मुद्दा नाहीये. मुद्दा आहे की हरी नरके सारख्या सामाजिक अभ्यासक म्हणविणाऱ्याने किमान वस्तुस्थिती तरी नीट मांडावी ना!

"१९५४ साली मुंबईत आपण महात्मा फुलेंना कधीही सोडणार नाही असे सांगताना, बाबासाहेबांनी मार्क्सला आपण सोडत असल्याचे जाहीरपणे सांगितले," असे प्रा. नरके त्यांच्या लेखात मांडतात. मुळात डॉ. आंबेडकर यांचे मूळ विधान असे आहे, "पूर्वीच्या राजकारणात आम्ही जोतिबांच्या मार्गाने जात होतो. पुढे मराठे आमच्यातून फुटले. कोणी कॉंग्रेसमध्ये उष्टे खाण्यासाठी गेले. त्यांच्याच पैकी आमचे रा.ब. बोले हे हिंदू महासभेत गेले. ते इथे हजर आहेतच. कोणी कोठेही जावोत, पण आम्ही मात्र ज्योतीबांच्याच मार्गाने जाऊ. जोडीला कार्ल मार्क्स घेऊ किंवा दुसरे काही घेऊ पण ज्योतिबाचा मार्ग सोडणार नाही."

मार्क्स आणि आंबेडकर यांच्यातील वैचारिक संबंधाने डॉ.आंबेडकर यांच्या विचारांची मोडतोड करण्याची ही काही प्रथम वेळ नाही. परंतु डॉ.आंबेडकर स्वतः मार्क्स आणि मार्क्सवादाकडे कसे पाहत होते हे त्यांच्याच भूमिकेतुन समजून घेऊ. १९२७ साली मुबंई विधिमंडळ सदस्यांच्या नोंद वहीत डॉ. आंबेडकर यांनी त्यांची राजकीय विचारसरणी "स्वतंत्र कामगारवादी" अशी दर्शवली आहे.

१९३७ साली गोलमेज परिषदेच्या वेळी कामगार नेते जॉर्ज लान्सबेरी यांनी अनेक कामगार नेत्यांचा डॉ.आंबेडकर यांना पाठींबा मिळवून दिला (गायकवाड, २००१). १९३८ साली डॉ. आंबेडकरांनी मांडले आहे की "कम्युनिस्ट तत्वज्ञान कितीही सुंदर असले तरी त्याचा कितपत उपयोग करता येईल हे पाहिले पाहिजे. आणि त्या दृष्टीने कार्य केल्यास रशियन लोकांना जे यश मिळावयास बरेच श्रम व कालावधी लागला तितका हिंदुस्थानातील परिस्थितीमुळे लागणार नाही असे मला वाटते. आणि म्हणून मला श्रमजीवी वर्गाच्या चळवळीच्या लढया बाबत कम्युनिस्ट तत्वज्ञान अधिक जवळचे वाटते".

नोव्हेंबर १९४०ला त्यांचे वक्तव्य आहे की, "फ्रेंच क्रांती ही पोळी आहे. रशियन क्रांती पोळीतील पुरण आहे. फ्रेंच क्रांती ही कळी आहे व रशियन क्रांती हे विकास पावलेले फूल आहे. परंतु या रशियन क्रांतीच्या हिंदुस्थानातील उपासकांना आमचा असा सवाल आहे की तुम्ही फक्त हा दिवस साजरा करणार व स्वस्थ बसणार काय? रशियन क्रांतीने ज्या तत्वांना जन्म दिला त्या तत्त्वांच्या रक्षणार्थ तुम्ही काय प्रयत्न करणार”.

२९ फेब्रुवारी १९५२ रोजी दादासाहेब गायकवाड यांना लिहलेल्या पत्रात डॉ.आंबेडकर म्हणतात की, "माझी तर तयारी आहे की आपल्या लोकांनी त्यांच्या त्रासावर तात्काळ उपाय ते देऊ शकत असतील  तर त्यांनी कम्युनिस्टांनाही सामील व्हावं”.

१९५३ साली डॉ. आंबेडकर यांनी बीबीसीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी साम्यवादाबद्दल मत व्यक्त केले ते अशाप्रकारे.   

बीबीसी: एखादी योजना, एखादी संस्था जी ही व्यवस्था बदलू शकेल याला पर्यायी व्यवस्था काय असू शकते?

आंबेडकर: एखादी साम्यवादी व्यवस्था याला पर्याय असू शकते.

बीबीसी: त्याचा देशाला फायदा होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं का? लोकांचे जीवनमान सुधारेल असं वाटतं का?

आंबेडकर: होय! सुधारू शकेल. लोकांना निवडणुकांपेक्षा आपल्या मूलभूत गरजांची काळजी जास्त असते.

 

 

४ डिसेंबर १९५६, डॉ.आंबेडकर यांचा शेवटच्या दिवसाचा दिनक्रम नानकचंद रत्तू यांनी सांगितला आहे, १६डिसेंबर १९५६ या दिवशी मुंबईमध्ये दीक्षा देण्याचा कार्यक्रम होता. त्या साठी १४ तारखेच्या रेल्वेची तिकिटे नोंद करायला सांगितली. त्यानंतर त्यांनी आपल्या ग्रंथालययातून मार्क्सच्या "दास कॅपिटल" हा ग्रंथ घेऊन बुद्ध आणि कार्ल मार्क्स ह्या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण लिहून टंक लेखनासाठी दिले.

या सगळ्या उदाहरणातून असे दिसते की डॉ. आंबेडकर मार्क्सबद्दल आणि त्याच्या तत्वज्ञानाबद्धल काही मतभेद व्यक्त करीत असले तरी ते त्यात  आयुष्यभरासाठी बौद्धिक दृष्ट्या एंगेज राहतात आणि ते त्यामध्ये अधिक काही तरी शोधू पाहतात. महत्वाचे म्हणजे त्यांना साम्यवादाबद्दल दुरावा वाटत नव्हता. मार्क्सवाद समजून घ्यायला हवे अशीच त्यांची मानसिकता जाणवते. ते संपादित करीत असलेल्या ‘जनता’ साप्ताहिकाच्या २३ जुलै १९३२च्या अंकात त्यांनी कार्ल मार्क्स व फ्रेडरिक ऐंगल्स यांचा चरित्र परिचय छापला आहे. तर ३० जुलै पासूनच्या पुढच्या अंकात भांडवल या ग्रंथाचा अनुवाद क्रमशः छापला आहे. त्याशिवाय साप्ताहिक ‘जनता’च्या ऑक्टोबर १९३२च्या अंकापासून पुढे मॅक्सीम गोर्गी यांच्या ‘आई’ या कादंबरीचा अनुवाद क्रमशः पद्धतीने छापला आहे.  या सर्व ठोस दाखल्यांवरून हे जाणवते की डॉ. आंबेडकर यांचा साम्यवादाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मित्रभावी होता.  ते या तत्वज्ञानाकडे आस्थेने व उत्सुकतेने पहात होते.

 

 

प्रा. हरी नरके त्यांच्या लेखात असे विधान करतात की, "स्वतंत्र मजूर पक्षाची १९३६ साली स्थापना केली त्यावेळी काही कम्युनिष्ट  मित्रांशी जवळीक होती. मात्र पुढे ह्या मार्क्सवादी मंडळींनी बाबासाहेबांचे काही सहकारी कार्यकर्ते पळवले."

याबद्दल तथ्यजनक पुराव्यांवर आधारलेली ठोस माहिती अशी आहे की कॉम्रेड आर.बी. मोरे, अनंत चित्रे, श्यामराव परुळेकर आणि मडके बुवांचे चिरंजीव एस. बी. जाधव हे सुरवातीला डॉ. आंबेडकर यांचे कार्यकर्ते होते. आपण कम्युनिष्ट पक्षात का गेलो या बाबत कॉम्रेड आर. बी. मोरे त्यांच्या पुस्तकात म्हणतात की, "चळवळीच्या काळात डॉ. आंबेडकरांनी काही वर्तमानपत्रे चालवली. त्यातील ‘बहिष्कृत भारत’ चालवण्यात तर केवळ माझ्या एकट्याचेच साह्य घेतले. पुढे ‘समता’ आणि  ‘जनता’ या पत्रांच्या वेळी देवराव नाईक, भास्कर कद्रेकर अशी मंडळी पुढे आली. अर्थात ‘बहिष्कृत भारत’च्या सुरवातीपासून मला बाबासाहेबांनी वर्तमानपत्रात काम करावयास घेतले. 

ते पुढे ‘समता’ व ‘जनता’ ही पत्रे निघाली तरी त्यांनी मला बाजूला सारले नाही. इतकेच नव्हे तर मी समर्पित कम्युनिष्ट असतांनाही त्यांनी मला ‘जनता’च्या संपादक मंडळावर घेतले होते. पुढे कामगार शेतकरीवर्गाच्या चळवळीच्या व्यापामुळे मी बाबासाहेब यांच्या संमतीनेच आपण होऊन ‘जनता’ पत्र सोडले.पुढे साम्यवादी विचारसरणीकडे प्रस्तुत लेखक वळला  त्याची जी काही इतर कारणे आहेत. त्यामध्ये बाबासाहेबांची शिकवण हे  प्रमुख कारण आहे. त्यांना मी त्याच वेळी समक्ष  सांगितले होते आणि म्हणूनच त्यांना आपला एक निष्ठावंत अनुयायी  माझ्यापासून स्फूर्ती घेऊन साम्यवादी  झाला, त्याने  जनहितासाठी त्यागी जीवनाचा स्वीकार केला, हे पाहून त्यांना समाधान वाटत होते. त्यांनी त्यांच्या परिनिर्वाणापर्यंत अत्यंत आपुलकीने वागवले. त्या वरून कुणालाही सहज कळून येण्या सारखे आहे".

 

कॉ.मोरे व डॉ. आंबेडकर  

 

शरद चित्रे यांच्या ‘वेगळ्या वाटेवरचा प्रवासी’ या पुस्तकात अशी नोंद आढळते की, मुबंई प्रांतिक निवडणुकीत १९३६ साली परुळेकर आणि चित्रे हे स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. १९४२ साली शेड्यूलकास्ट फेडरेशन निर्माण झाल्यामुळे चित्रे नाराज झाले. आणि १९४६ च्या निवडणुकीत शे.का.फे.कडून निवडणूक लढवायला त्यांनी नकार दिला. पुढे  १९५१साली ते शेतकरी कामगार पक्षात गेले. परंतु १९५२ सालच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत अनंत चित्रेसह सगळे जुने सहकारी डॉ.आंबेडकरांच्या प्रचार सभेत सक्रिय होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मुबंईत कामगारांनी पुकारलेल्या संपाचे नेतृव केल्यामुळे ब्रिटिशांनी परुळेकर यांना तुरुंगात टाकले होते.१९४० साली जेंव्हा ते तुरुंगातून बाहेर आले तेंव्हा त्यांनी कम्युनिष्ट पक्षात प्रवेश केला. आर.बी. मोरे, अनंत चित्रे, शामराव परुळेकर कम्युनिस्ट पक्षात का गेले याचे संदर्भ वर त्या त्या व्यक्तींनी त्यांच्या लिखाणात स्पष्ट केले आहेत. परंतु एस.बी. जाधव कम्युनिस्ट पक्षात का गेले? याचा संदर्भ आजतरी उपलब्ध नाही किंवा माझ्या पाहण्यात नाही. हा संदर्भ जर नरके यांच्याकडे असेल तर कम्युनिष्टांनी डॉ. आंबेडकरांचे कार्यकर्ते ‘पळवले’ या बाबतचा ठोस संदर्भ दिला पाहिजे.

डॉ.आंबेडकर आणि कम्युनिस्ट नेते यांच्यात कसे संबंध होते? मिरजकर सांगतात की, “डॉ. आंबेडकर बॅरिस्टर होऊन मायदेशी परतले. त्यावेळी  त्यांच्या सत्कार समारंभात माझे ही भाषण  भाषण झाले होते. ‘इंडिया चायना’ या पुस्तिकेवरून माझ्यावर व इतरावर ब्रिटिशांनी खटला भरला होता. तेव्हा स्वतः आंबेडकर वकील म्हणून कोर्टात हजर होते.  शिक्षा न होता आम्ही निर्दोष सुटलो. याबाबत मी त्यांचा अत्यन्त ऋणी आहे”.१०

प्रा. हरी नरके यांच्या लेखात एक विधान असे आहे की "मार्क्सवाद्यांनी स्त्रीप्रश्न आणि जातीचा प्रश्नांबाबत अनास्था दाखवली." 

वास्तवाचा विपर्यास करणारे आणि टोकाचे बेजबाबदार असे हे विधान आहे. वस्तुस्थिती अशी आहे की अनेक मार्क्सवादी स्त्रीवादी, कॉम्रेड शरद पाटील, गेल ऑमवेट किंवा अगदी मार्क्स-एंगेल्स यांनी याबाबतीतील चर्चा कितीतरी पुढे नेली आहे. आणि त्यातून मार्क्सवाद विविध अंगांनी भारतात व जगभर विकसित होत गेला आहे. त्यामुळे नरके यांचे  विधान सरधोपट आणि किमान माहितीचा अभाव असणारे आहे. जात व लिंगभावाच्या बाबतीत डाव्या पक्ष संघटनाच्या  अनेक मर्यादा राहिल्या आहेत.  मात्र त्याची चिकित्सा होऊन त्यात झालेले मूलभूत बदल प्रा. नरके लक्षात घेऊ इच्छित नाहीत. डाव्या अकादमीक जगात तर जात व स्त्री प्रश्न याला घेउन प्रचंड चर्चा झाली आहे. किमान नुमना  दाखल म्हणून EPW यांनी १९५८-२०१३ या काळातील जात प्रश्नावरील संपादित पुस्तक ‘The Problem of Caste’ बघितलं तरी हे लक्षात येईल. गेल्या दोन तीन दशकात तर डाव्या चळवळीत जात प्रश्न व लिंगभावाबद्दलचे  भान प्रचंड विकसित होत गेले आहे.

प्रा. हरी नरके त्यांच्या लेखात मांडतात की “काठमांडू येथे ‘बुद्ध की मार्क्स’ या भाषणात मार्क्स नाही तर बुद्ध आपला मार्गदाता असल्याचे डॉ. आंबेडकरांनी जाहीरपणे घोषित केले.”

काठमांडूच्या भाषणाचा प्राचार्य म.भी.चिटणीस यांनी ३ ऑगस्ट १९५७ च्या ‘प्रबुद्ध भारत’च्या अंकात ‘बौद्ध धर्म व मार्क्सवाद’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या मूळ मजकूरातील मार्क्स आणि मार्क्सवादाच्या मतभेदाचा मूळ मजकूर खालील प्रमाणे आहे.

१) तत्वज्ञानाचे कार्य हे जगाचा अन्वयार्थ लावण्याचे, पुनर्मांडणी करण्याचे आहे त्या जगाचे मूळ शोधण्यात खुलासा करण्यात वेळ घालवण्याचे नाही.

२) वर्गावर्गात हितसंबंधाकडून सतत संघर्ष चालू असतो .

३) संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे समाजातील संपत्ती असलेल्या एका वर्गाला, गटाला सत्ता मिळते तर दुसऱ्याला, संपत्ती नसलेल्या वर्गाला, गटाला संपत्तीतून होणाऱ्या शोषणामुळे दुःख व दैन्य मिळते .

४) न्याय्य समाज निर्मितीसाठी, समाजातील शोषण दुःख नष्ट करण्यासाठी, संपत्तीचा खाजगी अधिकार नष्ट करणे आवश्यक आहे.

 

डॉ. आंबेडकरांचे कार्ल मार्क्स वरील टीकेचे काही महत्त्वाचे मुद्दे

१) समाजवाद अपरिहार्यपणे येईल हे कार्ल मार्क्सचे म्हणणे पूर्णता खोटे ठरले यात तिळमात्र शंका नाही.

२) क्रांतीनंतर श्रमिकांची हुकूमशाही येईल हेही कार्ल मार्क्सचे म्हणणे खरे ठरले नाही.

३) कार्ल मार्क्सने क्रांतीनंतर राज्य नाहीसे होईल असे म्हटले ते खोटे ठरले.

४) साध्य साधनांचा परस्पर संबंधांच्या आधारे हिंसेचा विचार करता मार्क्सचे हिंसेचे समर्थन चुकीचे ठरते.

५) कार्ल मार्क्स वर मोठ्या प्रमाणावर टीका झाली त्यामुळे विचाराच्या ठिकर्‍या उडाल्या.

६) इतिहासाचा विचार करता जगभर मार्क्स म्हणतो तसे उत्तरोत्तर दारिद्र्य आले असे म्हणता येणार नाही.

७) कार्ल मार्क्स केवळ आर्थिक दृष्टिकोनातून विचार करतो तो पुरेसा नाही हे आता सर्वमान्य झाले आहे .

८) शेवटी मार्क्सवाद यशस्वी झाला नाही तो अपयशी झाला.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ भाषण वाचल्यावर कोणत्याही सामान्य बुद्धीच्या माणसाच्या लक्षात येईल की, दोन्ही विचारसरणी शोषणाच्या विरोधात आहेत. खाजगी मालमत्तेचा हव्यास हेच शोषणाचे मूळ कारण असल्याचे दोघांनाही मान्य आहे. समाजवादी अर्थव्यवस्था दोघांनाही अपेक्षित आहे. संसदीय लोकशाहीच्या मर्यादा दोन्ही पक्ष जाणून आहेत. पण उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गा प्रति मात्र मतभेद आहेत. आंबेडकर हिंसेच्या माध्यमातून क्रांती घडविण्याच्या विरोधात आहेत. त्यांना लोकशाही मार्गाने घडवलेले परिवर्तन  चिरस्थायी वाटते. 

बुद्ध आणि मार्क्स या बाबतीतील नरके सरांनी किमान रावसाहेब कसबे, कॉ. शरद पाटील आणि प्रदीप गोखले यांचे साहित्य प्रामाणिकपणे डोळ्याखालून घातले असते तर बुद्ध व मार्क्स यांच्या बाबतीत चाललेल्या  आकलनाच्या व विश्लेषणाच्या ज्ञानपरंपरेत त्यांनी खोडसाळपणा केला नसता. 

या क्रमात तत्वज्ञानाचे प्राध्यापक प्रदीप गोखले यांचे विवेचन पाहणे महत्वाचे आहे, म्हणून ते इथे नोंदवित आहे. प्रदीप गोखले मांडतात की, 

१. भारतीय संदर्भात लोकायत हे महत्वाचे भौतिकवादी दर्शन होते. तर जागतिक संदर्भात मार्क्सवाद हे महत्वाचे भौतिकवादी दर्शन होते. आंबेडकरांनी सिद्ध केलेला लोकायत व बौद्ध दर्शनातील समन्वय हा पर्यायाने मार्क्सवादी व बौद्ध दर्शन यांच्यातला समन्वय होता.

२. आंबेडकरांनी स्वतंत्र, समता, बंधुता या तत्वत्रयींशी सुसंगत नितीशी बांधिलकी ही नुसत्या निर्दयी व्यवस्था परिवर्तनापेक्षा महत्वाची वाटत होती. पण त्याच बरोबर दुःख निवारण्यासाठी व्यवस्थापरिवर्तन आवश्यक आहे, असेही वाटत होते. आंबेडकरांनी बुद्धाच्या विचारात जे मार्क्सवादी घटक जाणीवपूर्वक अंतर्भुत केले त्याचे कारण हेच असावे.

३. भारतीय दर्शनांच्या संदर्भात बुद्ध- लोकायत समन्वय तर जागतिक संदर्भात बुद्ध मार्क्स समन्वय हे ह्या आंबेडकरी बौद्ध धम्माचे, आंबेडकरी नवबौद्धयानाचे असावे लागेल. तसेच राबसाहेब कसबे म्हणतात, आंबेडकरांचा बुद्ध मार्क्स सदृश बुद्ध झाला आहे. हे स्पष्ट दिसते.११ 

प्रदीप गोखले यांच्या वरील मांडणीतून हे स्पष्ट होते की, बुद्ध आणि मार्क्सवाद याबद्दलचा विचार महाराष्ट्रामध्ये अतिशय गंभीरपणे चर्चिला गेला असतांना नरके यामधून काहीच शिकू इच्छित नाहीत. उलट हे कसं परस्परविरोधी आहे असं बिनधोकपणे मांडतात. हे राजकारण ते का करू पाहतात? ते कोणाला खुश करू इच्छितात? हा प्रश्न त्यांना सडेतोडपणे विचारला गेला पाहिजे. 

‘बाबासाहेब आणि चीन’ हा हरी नरके यांचा म.टा. मधील लेख म्हणजे चीनच्या परराष्ट्रनीतीचे निमित्त करून बाबासाहेब आंबेडकर यांना चुकीच्या पद्धतीने अधोरेखित करत संघ परिवाराच्या बाजुने नॅरेटिव्ह उभे करणारा आहे. प्रा. नरके यांची मांडणी उथळ असून त्यांनी तथ्यांची मोडतोड करून अजब निष्कर्ष काढले आहेत. प्रा. नरके स्वतःला समाजशास्त्राचा अभ्यासक म्हणवितात, त्यांनी त्यांच्या लेखनातून कोणती अभ्यास प्रक्रिया पुढे नेली? हा मोठा गहन प्रश्न आहे. या लेखात एकीकडे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात चुकीचे दृष्टिकोन उभे करतात. तर दुसरीकडे चीन या विषयाचे आणि परराष्ट्र नीतीचे तज्ञ असल्यासारखे तथ्यहीन व बिनबुडाची  विधाने करीत सुटतात. जे चीन विषयाचे तज्ञ मानले जातात आणि ज्यांना अकादमिक परिवेशात मानाचे स्थान आहे त्या प्रा.गो.पु. देशपांडे यांना तरी प्रा. नरके यांनी एकदा अभ्यासावे, म्हणजे नरके यांचे भ्रम किमान दूर होऊ शकतील. 

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातले सेंटर फॉर ईस्ट एशियन स्टडीजमधले चीन विषयक प्राध्यापक गो. पु. देशपांडे यांनी एक छान निरीक्षण नोंदवले आहे. ते म्हणतात, "चीनबरोबर कुणालाही संघर्ष घेता येत नाही, कोणतेही दावे संघर्षाने मिटवता येत नाहीत. रशियाचा चीनबरोबर सीमावाद होता. त्यात रशियाने बरीच आदळ आपट केली. पण शेवटी चीनचीच भूमिका रशियाला मान्य करावी लागली. आग्नेय आशियात चीनबरोबर संघर्ष घेणारांनाही अद्याप तरी माघारच घ्यावी लागली आहे. त्यामुळे आपण या देशाबरोबरचे संबंध फार काळजीपूर्वक प्रस्थापित केले पाहिजेत." गो. पु. देशपांडे यांचे या संदर्भात मत लक्षणीय आहे. त्यांच्या मते चीनच्या लेखी कोणत्याही देशाशी असणाऱ्या संबंधात स्वतंत्र,  वेगवेगळे किंवा सुटेसुटे विषय किंवा विचार असे काही नसतात. 

गो.पु. देशपांडे यांच्या वरील कोट मधून हे स्पष्ट होते की, चीन साम्यवादी नाहीच उलट चीन फक्त त्याचे व्यापारी हितसबंध जोपासणारा देश आहे.

प्रा. हरी नरके हे मुळात संशोधक नाहीत. म.टा.च्या या लेखातून तर त्यांनी जणू हे सिद्धच केले आहे की ते अभ्यासक पण नाहीत. कारण, संदर्भ तपासतांना सत्याचा शोध घेण्याचा अभ्यासकाकडे जो प्रामाणिकपणा हवा आणि आपले आकलन तथ्यांच्या कसोटीवर तपासून बघण्याची जी तटस्थ वृती हवी त्याचा प्रा. नरकेंकडे अभाव जाणवतो. हरी नरके यांच्या संशोधनाच्या अभ्यास पद्धतीबद्दल सुहास पळशीकर यांनी ‘आखूड लोकांचा प्रदेश’ या लेखात एक महत्त्वाची नोंद केली आहे. ते म्हणतात की, ‘बाळ गांगल यांनी महात्मा फुलेंची बदनामी केल्यानंतर फुल्यांचे  खंबीरपणे समर्थन करण्यास हरी नरके हिरिरीने उतरले. आणि त्या सार्वजनिक वाद परंपरेचं क्षणिक पुनरुज्जीवन  झालं. य.दि. फडक्यांच्या संशोधनाच्या ट्रक मागून जाणाऱ्या नरकेंना वाट सोपी गेली. असं तेव्हा कोणीतरी गंमतीने म्हटलं होतं. पण नरकेंना भारी घाई. (नावच हरी!) त्यामुळे हिंदी सिनेमातल्या हिरो सारखी यांची मोटर सायकल फडक्यांच्या ट्रक वरून उडी मारून पुढे गेली’.१२ अगदी याच तर्काने बघितले तर डॉ. आंबेडकरांच्या साहित्य संशोधन संबंधाने चांगदेव खैरमोडे आणि वसंत मून यांनी केलेल्या संशोधनाच्या ट्रक वरून प्रा. नरके आपली फटफटी मस्त उडवत आले आहेत. असे ‘अभ्यासक’ जर असतील तर ज्ञानपरंपरेचे वाटोळे होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.  

पुरोगामी मुखवटा घालुन स्वार्थी, जातीय आणि धार्मिक मानसिकता कायम ठेवुन पुन्हा मुळ वळणावर जाणारे अनेक ‘विद्वान’ महाराष्ट्राने पाहिले आहेत, आजही समाज जीवनात असे महाभाग वावरत आहेत. खरे म्हणजे आता वेळ आली आहे हे मुखवटे फाडण्याची. महामानवांचे नाव घेऊन त्यांचे विचार न सांगता त्यांचे गौरविकरण करणारे, ब्राह्मणांना शिव्या घालुन टाळ्या मिळविणारे आणि त्या बरोबरच जाडजूड पाकीटाची बिदागी मिळविणारे भाषणखोर कोणती ज्ञानपरंपरा जोपासत आहेत? हा खडा सवाल विचारण्याची आज गरज आहे.

प्रा. हरी नरके यांना चीनवर, साम्यवादावर, मार्क्सवादावर जी टीका करायची आहे ती त्यांनी अवश्य करावी. परखड चिकित्सा ही झालीच पाहिजे. पण यासाठी त्यांनी तथ्य पडताळणी तरी निष्पक्ष पद्धतीने करावी. साम्यवादी नसलेल्या चीनला साम्यवादी ठरून आणि बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन डाव्या राजकारणाला त्यांनी  लक्ष्य केले आहे. तसेच आंबेडकरवाद आणि साम्यवाद जणू काही परस्परांचे शत्रू आहेत असे चित्र त्यांनी उभे केले आहे. या लेखातील मुद्दे तसे म्हटले तर नवीन नाहीत. गेली अनेक दशके एका विशिष्ट विचारसारणीचे लोक जी कुजबूज मोहीम राबवितात, त्याचाच हा भाग आहे. यात वेगळेपण येव्हढेच की प्रा. नरके यांनी त्यांची पूर्वग्रहदूषित मांडणी करण्यासाठी या लेखात बंदूक सरळ-सरळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावर ठेवली आहे. आंबेडकरी जनतेचा बुद्धिभेद करण्याचा हा कुटिल डाव आहे. यामुळे प्रा. हरी नरके ज्ञानपरंपरेचे मारेकरी ठरतात. म्हणून अभ्यासकांनी आणि आंबेडकरी जनतेने सावध राहण्याची गरज आहे.  

 

संदर्भ

१. Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol.15, page No. 874. Edited by Vasant Moon, First Edition by Education Department, Govt. of Maharashtra: 26 January 1997 Re-printed By Dr. Ambedkar Foundation: January 2014. 

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे-भाग -३, खंड -१८, डॉ . बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई, पान ४०२.  

३. गायकवाड प्रदीप (संपा.), कामगार चळवळ : आंबेडकरांची निवडक भाषणे व लेख, क्षितिज पब्लिकेशन, नागपूर,२००१, पान ५. 

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे-भाग -२, खंड -१८, डॉ . बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई, पान ७६.   

५. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता,खंड-२०, डॉ . बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई, पान ३०८. 

६. Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 21, page no 368, Edited by Narke Hari, Govt. of Maharashtra, 2006.

७. धनंजय किर, डॉ . बाबासाहेब आंबेडकर, पाप्युलर प्रकाशन, मुंबई, १९६६, पान ५६७. 

८. मोरे आर. बी., महाडच्या दोन ऐतिहासिक  परिषदा, विनिमय प्रकाशन, मुंबई, १९७७, पान ३६ व ३७.

९. चित्रे  शरद, वेगळ्या वाटेचा प्रवासी, अक्षर प्रकाशन, मुंबई, २००६. 

१०. मिरजकर, एस. एस., अंधारातून प्रकाशाकडे, लोकवाङ्मय गृह, मुंबई, १९८०. पान १३३. 

११. प्रदीप गोखले,आंबेडकरांचे नवबौद्धयान, समाज प्रबोधन पत्रिका, जानेवारी- मार्च, १९९१.

१२. पळशीकर सुहास, आखूड लोकांचा प्रदेश, महाअनुभाव,  दिवाळी अंक, मुबंई, २००७.

 

अधिक वाचनासाठी 

१. रावसाहेब कसबे, आंबेडकरवाद: तत्त्व आणि व्यवहार , सुगावा प्रकाशन, पुणे,२००४.  

२. रावसाहेब कसबे, आंबेडकर आणि मार्क्स , सुगावा प्रकाशन, पुणे,१९८५.   

३. उद्धव कांबळे, डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवाद: नवे आकलन नव्या दिशा, लोकवाङ्मयगृह, मुंबई, २०१८.

 

लेखातील मतं लेखकाचे वैयक्तिक आहेत. इंडी जर्नल त्यांच्याशी संपूर्णतः सहमत असेल असं नाही.