Opinion

आंबेडकरी नरेशन म्हणजे नक्की काय असतं?

कोणीही आंबेडकरवादी नाही, हे कशाचा आधारावर ठरवलं जातं?

Credit : स्क्रोल

"हिरावून घेतले गेलेले अधिकार शोषकाच्या नैतिक धारणेला साद घालून नव्हे तर सात्यत्यपूर्ण संघर्षातून परत मिळवावे लागतात."

- बाबासाहेब आंबेडकर

या देशातल्या सत्ताधारी वर्गाने स्वतःच्या सोयीनुसार राष्ट्रवादाची व देशभक्तीची एक कल्पना उभी केली आहे. समस्त भारतीय लोकांनी त्यांनी ठरवलेल्या राष्ट्रवादाच्या व देशभक्तीच्या कल्पनेशी मानसिकरित्या जोडून घेतले पाहिजे किंवा त्याच्या प्रति पूर्णपणे निष्ठा ठेवली पाहिजे, असा सत्ताधारी संघ आणि भाजप परिवाराचा आग्रह आहे. जे कोणी त्याच्याशी या बाबतीत सहमत होणार नाहित ते त्यांना 'देशद्रोही' ठरवून तुरुंगात डांबण्याची परंपराच आहे. त्याचाच भाग म्हणून डॉ.आनंद तेलतुंबडे व गौतम नवलखा यांच्यासह याआधी सुद्धा भारद्वाज, रोना विल्सन अशा इतरही सामाजिक कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबल गेलं आहे.

१ जानेवारी २०१९ ला भिमा कोरेगाव मध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या संदर्भाने म्हणजे भिमा कोरेगाव हिंसाचाराचे 'माओवादी कनेक्शन' जोडत डॉ.आनंद तेलतुंबडे यांना त्यात गोवलं गेलं. या कारस्थानाविरोधात आवाज उठविण्याची गरज असताना फेसबुकच्या माध्यमातुन डॉ. तेलतुंबडे हे आंबेडकारवादी आहेत का? त्यांचे नॅरेशन आंबेडकरवादी आहे का? ते एलिट आहेत की दलित? आंबेडकरवादाला त्यांचे काही योगदान आहे की नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कुठल्यातरी स्वयंघोषित अधिकाराचा आधार घेत, आंबेडकरवादी कुणाला म्हणायचं? याची प्रमाणपत्रं वाटली जात आहे. जरी विचारायचेच असतील, तरी असे प्रश्न पुरेशा तार्किक निकषांवर उभे करण्याची गरज असताना, आपल्याशी, किंवा एका बहुसंख्य कल्पित एकजिनसी समूहाशी फारकत घेणारा कोणीही आंबेडकरवादी नाही, हे कशाचा आधारावर ठरवलं जातं? यातून हे दिसते की आपल्याला आंबेडकरी नरेटिव्ह किंवा कथनाबद्दल बोलायचे नसते, त्याच्या कोअर कन्सरण लक्षात घ्यायचा नसतो.

मात्र अशा एकांगी कथनातून, आंबेडकरी विचारविश्वाला संकुचित करून त्याचं प्रवाहीपण संपवलं जातं याचं असं करणाऱ्यांना भान राहत नाही. महापुरुषाच्या विचारांच्या चिकित्सेचा अर्थ ते महापुरुषाचं आणि त्यांच्या विचारांचं जाणून-बुजून केलेलं अवमूल्यन असा लावत आहेत. चिकित्सा करणाऱ्याच्या विचारांचा विपर्यास करत त्याच्या सामाजिक निष्ठेवर संशय घेत, त्यांना सामाजिक जीवनातून उठवू पाहत आहेत. कोण आंबेडकरवादी आणि कोण गैर याचं कुठलंही शास्त्रीय किंवा तार्किक परिमाण न सांगता जातपंचायती सारखे फतवे काढले जात आहेत!  

स्वतःला अंबेडकरी म्हणवून घेनारा हा सोशल मीडियावरती व्यक्त होणार एक मोठा समूह महात्मा फुले-बाबासाहेब यांचे विचार मूलगामी पद्धतीनं समजून न घेताच 'कडवा' समर्थक बनला आहे. हा टोकाचा व्यक्तिपुजक बनून गेला आहे. महापुरूषाचं दैवतीकरण झालं की 'भावना दुखावल्या' ही लोकप्रिय ढाल पुढं करून वाचन/ चिंतन न करताच त्याच्याकडून कुठल्याही समीक्षेवर मूलतत्त्ववाद्यासारखी प्रतिक्रिया दिली जात आहे. हे सांगत असताना पुन्हा अधोरेखित करावं वाटतं की हा सर्वच आंबेडकरी समूहाचा प्रश्न नसून, बहुतांशी जनचळवळीच्या प्रत्यक्ष कामापासून दूर, संवाद तुटलेला आणि निवडक विचार वाचून मत बनवलेला एक मोठा तरुण वर्ग आहे. 

अर्थात त्यामुळं डॉ.तेलतुंबडे हे कोणाच्याच प्रश्नाच्या कक्षेत येत नाहीत, असा मुळीच दावा नाही. मात्र कुठल्या ही विचाराच्या तार्किक मांडणीचा निकष लावून तपासून न घेताच त्यांना 'तो आपला नाही, पण त्यांच्या अटकेचा निषेध' अशी उदारमतवादी दयेची भूमिका घेत आहेत. शोकांतिका अशी की, सर्व धर्मांध आणि भांडवली, सरंजामी पक्षात सेटर असलेल्या, सेटिंग म्हणजेच राजकारण असे समजणाऱ्या काही प्रवृत्ती या मोहिमेच्या नेतृत्वस्थानी आहेत! कोणतेही  तत्वज्ञान कालसापेक्ष जिवंत ठेवायचे असेल तर त्याचा कालसुसंगत विकास करण्याची गरज असते. बौद्ध तत्त्वज्ञानाचा विकास करताना बुद्धा नंतरच्या नागार्जुन, धर्मकीर्ति, असंग, दिग्नाग,वसूबंधू या बौद्ध तत्वज्ञानाचे वारस असलेल्या दार्शनीकांनी बुद्ध तत्त्वज्ञानाच्या अनित्य आनात्म आणि प्रतित्यसमुद्पाद या 'मूलभूत अर्काला'  लक्षात घेत आपापल्या काळात बौद्ध तत्वज्ञानाला रिलेट करीत त्याला प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मकीर्ती, नागार्जुन यांचा बुद्ध जसा वेगळा आहे तसा तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा वेगळा आहे. परंतु हे सर्व लोक बुद्धाचे वेगळेपण मांडत असताना ते बुद्धाला कुठेही कालबाह्य करत नाहीत वा नाकारीत नाहीत, तर आपापल्या काळात बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला अधिक कालसुसंगत करून त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्याला प्रवाही करतात!

खरे तर 'आंबेडकरवाद' नावाचा कोणताही पूर्णतः स्वतंत्र असा 'वाद' स्वतः डॉ. आंबेडकरांनी आपल्या हयातीत कधीही सांगितलेला नाही. त्यामुळं नंतरच्या अभ्यासकांसमोर आंबेडकरवाद स्वतः डॉ.आंबेडकरांच्या विविध भूमिकांमधून समजून घ्यावा लागतो. तेव्हा डॉ.आंबेडकर यांच्या जीवनसंघर्षातून आणि त्यांच्या लेखनातून कालसुसंगत असं त्यांचं तत्त्वज्ञान उभं करण्याचा प्रश्न होता. अशा वेळी डॉ.रावसाहेब कसबे यांनी आंबेडकरवाद: तत्व आणि व्यवहार, कॉम्रेड शरद पाटील यांनी माफुआ व डॉ.आनंद तेलतुंबडे यांनी 'डॉ. आंबेडकर: प्रतीक वास्तव आणि नवा अन्वयार्थ' या पुस्तकातून डॉ. आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाची काही एक कालसुसंगत मांडणी करण्याचा प्रयत्न केला. आनंद यांच्या मांडणीशी अनेकजण असहमत असले तरी किरकोळ शेरेबाजी पलीकडे जाऊन  त्यांच्या मांडणीचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद मात्र आजपर्यंत कोणी केलेला माझ्या माहितीत तरी नाही. अपवाद उगाच आपण चर्चेत यावे यासाठी आनंद यांनी आंबेडकरांविषयी केलेल्या अथवा इतर वक्तव्यांचा संदर्भहीन वापर करत अथवा त्यांच्या कोणत्याही पुस्तकाचा कसलाही संदर्भ लक्षात न घेता दलित जनतेच्या भावना चाळविण्याचा उद्योग महाराष्ट्रातील काही नव-बुद्धिवंत अधून मधून करतच असतात. 

खरंतर ज्ञानाच्या क्षेत्रात वाद-प्रतिवादाचे एक अन्यसाधारण असं महत्त्व असतं.  त्यामुळं विचारांचा, ज्ञानाचा विकास होण्यास मदतच होत असते. महाराष्ट्राच्या विचारविश्वात आंबेडकरी चळवळीचे डाव्या चळवळीशी, तिच्या विचारधारेशी, एकमेकांच्या वर्तन व्यवहाराशी असलेल्या मतभेदावर अनेक वाद-प्रतिवाद झाले आहेत. राजा ढाले, नामदेव ढसाळ, प्रा. अरुण कांबळे, गौतम शिंदे, सुधाकर गायकवाड, उद्धव कांबळे यांनी आपले मतभेद वेळोवेळी नोंदविलेले आहेत. अलीकडच्या काळात प्रा.देवेन्द्र इंगळे, प्रा. राहुल कोसंबी, प्रा. सचिन गरुड यांनीही काही लेखन केले आहे. पण या त्यांच्या मतांमागे अभ्यास, वाचन आणि वाद-प्रतिवाद करण्याची एक 'वैज्ञानिक-समाजशास्त्रीय' चिकित्सा आहे.

 

फुले-शाहू-आंबेडकर यांचा आणि त्यांच्या चळवळीचा कन्सर्न कायम 'जाती-अंत' राहिला आहे. आंबेडकर विचारांच्या संशोधक-अभ्यासक धम्मसंगिनी यांनी त्यांच्या या वादाच्या संबंधाने लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे, की "डॉ आनंद यांचे डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचे 'जातीबाबत ओरिएंटेशन' करण्यात डॉ. आनंद यांचे महत्वाचे योगदान आहे. मात्र आंबेडकरी चर्चा विश्वात त्यांच्या लेखनाचा परिणाम सध्यातरी नगण्य आहे."

तेलतुंबडे आपल्याला हव्या असणाऱ्या पारंपारिक चौकटीतले आंबेडकरवादी आहेत की नाहीत, या चर्चेपेक्षा 'आंबेडकरवादी' असण्याचा मुख्य कन्सर्न किंवा उद्देश काय आहे, काय असायला हवा आणि त्याच्याशी तेलतुंबडे याचा जो काही संबंध आहे, तो खरंतर तपासायला हवा. डॉ.आनंद यांना जेंव्हा आपण 'अभ्यासक' म्हणतो, तेंव्हा त्यांच्या अभ्यासाबद्धल बोललं पाहिजे आणि त्यांचा अभ्यास जातीअंतच्या चळवळीसाठी महत्वाचा असेल आणि फुले-शाहू-आंबेडकर पेरियार यांच्या चळवळीचा 'कोअर कंसर्ण' जातीअंत असेल तर 'तो आपला नाही?' ही जाणीव येतेच कोठून?

फुले-शाहू-आंबेडकर-पेरियार यांचा कन्सर्न कायम  जाती-अंत राहिला आहे. धम्मसंगिनी त्यांच्या लेखात "आनंद यांचे डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचे जातीअंतचे ओरिएंटेशन करण्यात योगदान आहे." हे मान्य करतात. जातीअंत हा आंबेडकरी तत्त्वज्ञानाचा पाया असलेला विषय आहे. तो मार्क्‍सवादाचा नाही, असं म्हणत असताना, दुसऱ्या बाजूला आंबेडकरी तत्वज्ञानाचा कोअर असलेल्या 'जातीअंत' बाबत डॉ.आनंद  मार्क्सवादी कार्यकर्त्याचे ओरिएंटेशन करत असतील, ते जातिअंताच्या अजेंड्याकडे मार्क्सवादी कार्यकर्त्यांना घेऊन येत असतील, एकप्रवाही लोकांना ते बहुप्रवाही करत असतील. मार्क्सवादी कार्यकर्त्यांना आंबेडकरी तत्त्वज्ञानाची ओळख करून देत असतील तर त्यांच्या या योगदानाची आंबेडकरवाद्यांनी सकारात्मक दखल घ्यायची की नाही?

आनंद तेलतुंबडे हे पारंपारिक आंबेडकरवाद्यांच्या साचेबद्ध चौकटीत कधीच लिहीत नाहीत वा बोलत नाहीत. सर्वसाधारण लोकांना त्यांच्या चुकीच्या धारणेच्या झोपेतून जागे केलेले कधीच आवडत नाही आणि डॉ.आनंद कायम तेच करत आले आहेत. ते काहींच्या पारंपारिक धारणा तोडत आले आहेत. अज्ञानातुन, चुकीच्या आकलनातुन अथवा वेगवेगळ्या हितसंबंधातुन निर्माण झालेल्या चौकटी तोडणे अवघड जात असेल म्हणून, काही का असेना गेली ५० -६० वर्ष डावे अथवा आंबेडकरवादी ज्या धारणा कवटाळून बसले आहेत, त्या दोघांनाही डॉ.आनंद यांनी प्रश्नांकिंत केले आहे. कवटाळलेल्या धारणा आजच्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तपासून पाहण्याचा विचार मांडला आहे आणि तेच या काही आंबेडकरवाद्यांना आवडत नाही असं वाटतं. महाराष्ट्रातील आंबेडकरवादाला अशाप्रकारे संकुचित कारण्यामागं उत्सवप्रियता लोकप्रिय करणं, दलित साहित्याच्या चौकातील आत्मचरित्रात्मक लेखनाच्या पलीकडं जाऊ न देणं आणि स्वतःच्या पांडित्याचं दर्शन घडवत लोकप्रिय अधिमान्यता मिळवेल अशीच विशलेषण निर्माण करणं, यांचा हात आहे.   

 

याउलट आनंद कोणत्याही हितसंबंधाची भीडभाड न बाळगता सतत बोलत आले आहेत. मुक्तीच्या प्रचलित समजांना, जातीच्या कवटाळलेल्या अनेक पूर्वग्रहांना ते सतत धक्के देत आले आहेत. या त्यांच्या धक्का देण्याच्या मांडणीवर दलितांची तीव्र प्रतिक्रिया उमटणं साहजिकच असलं, तरी त्या प्रतिक्रियेचा पोत काय असला पाहिजे होता ह्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. पूर्वग्रहदूषिततेच्या पुढे जाऊन परिस्थितीला समजून घेत त्यात हस्तक्षेप करण्याची ज्यांची कुवत असते तेच नवं समाजभान विकसित करण्याच्या प्रयत्नात असतात. 

विविध मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यात उच्चपदस्थ म्हणून काम करीत असताना नेहमी सर्वहारा दलित शोषित समाजाच्या समस्यांच्या सोडवनुकीसंदर्भाने मूलगामी चिंतन करण्याचं काम आनंद यांनी केलं आहे. 

डॉ .आंबडेकर यांच्या भक्तीच्या पलीकडं जाऊन दलितांच्या खऱ्या खुऱ्या मुक्तीप्रति कमालीची निष्ठा असणाऱ्या लोकांनी खरंतर तेलतुंबडे यांनी केलेल्या चिकित्सेला आपलं मानलं पाहिजे. त्यांनी चिकित्सेची जी सूत्रं सांगितली आहेत, त्याचा विचार व्हायला हवा. आनंद जातीअंताबद्दल बोलतात, जात-पितृसत्तेबद्दल बोलतात हे आंबेडकरवादी नरेशन नाही का?

दलित हिंसेची अर्थ-राजकीय उकल करून सांगतात हे आंबेडकरवादी नरेशन नाही का? आनंद तेलतुंबडे जात-लिंग-वर्गाच्या शोषणाला समजावून सांगतात हे आंबेडकरवादी नरेशन नाही का? ते शोषणाची अर्थ-राजकीय व्यवस्था समजावून सांगतात हे आंबेडकरवादी नरेशन नाही का? कल्याणकारी राज्याचा प्रवास, लोकसंहारक स्टेटकडे आणि भांडवलदारांच्या एजंट बनण्याकडे कसा होतो आहे, हे समजावून सांगणे हे आंबेडकरवादी नरेशन नाही का? जागतिकीकरणामध्ये दलितांच्या मुक्तीचं काय होणार, याबद्दल ते सांगतात हे आंबेडकरी नरेशन नाही का? दलित-आदिवासी यांच्यावरच्या हिंसेबद्धल खेड्यापाड्यात फिरून त्यांच्या न्यायाची भूमिका ते घेतात (सोंनाखोटा इथे दादाराव डोंगरेच्या खुनावेळी आनंद वडवणी ते सोंनाखोटा हे १५ किलोमीटर अंतर पायी चालत सोंनाखोटा या गावी आले  होते) तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, बंगाल, ओरिसा, छत्तीसगड इथं चालणाऱ्या जनतेच्या आंदोलनांमध्ये सहभागी होतात. त्यांच्या मुक्तीच्या संघर्षाला तत्वज्ञानाचा भक्कम आधार देण्यासाठी झटतात.  डॉ. आंबेडकरांच्या समग्र साहित्याचे जगात सर्वप्रथम डिजिटायझेशन करतात, देशातील आणि देशाबाहेरच्या लोकांपर्यंत आंबेडकरी वाङ्मय पोहचले पाहिजे यासाठी जगभर प्रवास करून जगातल्या ऑक्सफर्ड पासून केंब्रिज पर्यंतच्या सर्व विद्यापीठांमध्ये जाऊन दलित असर्शन आणि आंबेडकरवादाबद्दलची मांडणी करतात, समग्र शोषणाचा अंत झाला पाहिजे यासाठी नेहमी शंभरपेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन करतात आणि केवळ लेखन करून न थांबता जनतेच्या लढ्यात कृतीशील भूमिका घेत राहतात, हे आंबेडकरी नरेशन नाही का? 

आरक्षण,अस्मिता याबद्दल बोलणं, पडद्याआड जगण्यासाठी नको त्या तडजोडी, प्रस्थापित होण्याची केविलवाणी धडपड आणि फेसबुक वरच्या गांभीर्याचा आव आणत एकूण गांभीर्यपूर्ण चर्चेला मूठमाती देणाऱ्या पोस्टी लिहीत राहणे हे मात्र आंबेडकरी नरेशन आहे का? 

आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. प्रबोधन पोळ म्हणतात, "एका बाजूला चळवळीचं भांडवल वापरून बडेजाव करणारे लोक आपल्याकडं भरपूर आहेत, पण दुसऱ्या बाजूला ज्या लोकांमुळे ही चळवळ उभी राहिली आणि टिकली त्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना समाजाने सुनियोजितपणे जरी नसलं तरी सोयीस्करपणे बाजूला केले आहे!"

चळवळीमुळे निर्माण झालेल्या सांस्कृतिक-राजकीय भांडवलाचा उपयोग करून व त्याचं 'मार्केट' इथल्या सधन नोकरदार दलित मध्यम वर्गाने पुढाकार घेऊन बनवले. भावनात्मक आव्हाने करून आपली नवी सांस्कृतिक मिरासदारी रुजवण्याचा प्रयत्न झाला. पण दुसऱ्या बाजूला चळवळ उभी करणाऱ्या आणि टिकवणाऱ्या मनुष्यबळाचे आबाळ केले. आताच तेलतुंबडे यांचे महत्त्व लोकांना कळणार नाही. कदाचित येत्या दहा वीस वर्षांत आपल्याला याचे विनाशकारी परिणाम कळतील, जेव्हा आपण फॅसिझमच्या चिखलात पूर्ण रुतून गेलेलो असू. 

आंबेडकरी चळवळ जेव्हा राजकारण बाजूला सारून सांस्कृतिक प्रतिकांवरच अधिक लक्ष देते तेव्हाच ती त्या अस्मितेच्या आणि भांडवलशाहीच्या सापळ्यात अडकुन जाते. मग बुद्धमय भारत, मूलनिवासी सिद्धांत, दलित अभ्यास (dalit studies) आणि साहित्य याचे उदात्तीकरण सुरू होते. 'मार्केट' एव्हाना तयार झालेलेच असते. मग इथल्या कार्यकर्त्यांचे मूल्यही ठरवले जाते व त्यांची या मार्केट मधली उपयुक्तता बघून त्यांची लायकी ठरवली जाते. मात्र त्या कार्यकर्त्यांमध्ये तेलतुंबडेसारखे लोक वेगळे पडून जातात, कारण ते या 'मार्केट' साठी कधीच नसतात. त्यांना एकतर गौरविकरण किंवा बहिष्कार या तराजु मध्येच अडकवले गेलेले असते!

लेखातील अनेक मुद्दे अभ्यासक डॉ.विप्लव विंगकर, डॉ. प्रबोधन पोळ, दयानंद कनकदांडे यांच्याशी केलेल्या चर्चेतून घेण्यात आले, त्यांचे आभार. 

वरील मतं लेखकाची वैयक्तिक आहेत. त्यातील सर्व मुद्द्यांशी इंडी जर्नल सहमत असलेच असे नाही.)