Opinion

मुंबई तरुण भारतने आनंद तेलतुंबडे यांच्याविषयी लिहिलेल्या तथ्यहीन लेखाचा प्रतिवाद

डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या लिखाणाचा काही संदर्भ देऊन १७ मार्च २०२० रोजीच्या एका लेखातून लोकांत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

Credit : मुंबई तरुण भारत

काहीसा उजव्या विचारांकडे कल असणाऱ्या मुंबई तरुण भारत या वर्तमानपत्रात डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या लिखाणाचा काही संदर्भ देऊन १७ मार्च २०२० रोजीच्या एका लेखातून लोकांत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. तसा हा लेख इतकी दाखल घेण्यास पात्र नसला, तरी लेखातील चुकीच्या तपशिलास योग्य तथ्यात्मक नोंद उपलब्ध असावी म्हणून हा लेख.

मुंबई तरुण भारताच्या या लेखातील काही मुद्दे व दावे खालीलप्रमाणे: 

१) Examining logic of revolutionary violence या लेखात डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी हिंसेचे समर्थन केले आहे.

२) डॉ.तेलतुंबडे यांनी अनुराधा घांदीच्या लेखाचं संपादन केलेले आहे.

३) डॉ.तेलतुंबडे हे अनुराधा घांदी मेमोरियल कमिटी वर काम करतात.

४) डॉ. तेलतुंबडे 'माओवाद्यांनी स्थापन केलेली' CPDR ही संस्था चालवतात.

५) डॉ.तेलतुंबडे यांनी रॅडिकल आंबेडकर हे पुस्तक लिहलं!

१) प्रथमतः Examining Logic of Revolutionary Violence (क्रांतीकारक हिंसेच्या तर्काचे परीक्षण) या मथळ्याचा हा लेख एक वैचारिक लेख आहे जो JNU चे राज्यशास्त्राचे प्राध्यापक अजय गुडावर्ती यांनी संपादित केलेल्या आणि जगातील प्रतिष्ठित 'सेज' या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या "Revolutionary violence versus Democracy: Narrative from India" या पुस्तकातील एक लेख आहे.

हा लेख डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांनी चार भागात विभागला आहे. पहिला भाग आहे 'हिंसेचा' अर्थ, दुसरा आहे 'क्रांती व क्रांतिकारक हिंसेची उत्पत्ती', तिसऱ्या भागात 'मार्क्सवादाचे जनक मार्क्स व एंगल्स यांचे क्रांतीमधील स्थान' विषयी चर्चा आहे आणि चौथ्या भागात या तीन विभागातील चर्चेच्या परिपेक्षात भारतातील माओवादी चळवळीचे अवलोकन आहे.

पहिल्या भागात ते प्रत्यक्ष हिंसा (म्हणजे एखाद्या व्यक्तीने वा समूहाने केलेली हिंसा) व संरचनात्मक हिंसा (म्हणजे शासकीय वा नागरी संस्थेने समाजातील सार्वजनिक धोरणाच्या माध्यमातून विस्तृत प्रभागावर अन्न, वस्त्र, आरोग्य सेवा व शिक्षण इ. पासून वंचित ठेवल्याने वा सामाजिक रूढी  परंपरा इत्यादीतून चाललेली अदृश्य हिंसा) या दोन हिंसा प्रकाराचा उहापोह केला आहे. इतिहास पाहता आपल्याला दिसून येते की, संरचनात्मक हिंसेचा प्रकार हा प्रत्यक्ष हिंसेच्या प्रकारापेक्षा कितीतरी पटीने जास्त अपायकारक असतो. संरचनात्मक हिंसेला आपण weapon of mass destruction म्हणू शकतो. कारण सरकार वा तत्सम सर्वव्यापी व्यवस्था आपल्या धोरणातून शेकडो व हजारो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते.

वासाहातीक काळात याच धोरणातून दुष्काळांमध्ये आणि युद्धांमध्ये लाखो लोक मारले गेले. कोट्यावधी लोकांना मारणे या हिंसा प्रकारात मोडते. क्रांत्याशी संबंध असलेली हिंसा प्रत्यक्ष हिंसा प्रकारात मोडेल आणि तिला या संरचनात्मक हिंसेचा एक प्रकारे प्रतिवाद म्हणता येईल. दुसऱ्या भागात याच गोष्टीचे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. याच भागात क्रांती आणि क्रांतिकारी हिंसेची मार्क्सवादाची पायाभूत विचारसरणी जिला द्वंदात्मक भौतिकवाद म्हणतात, त्याच्या अनुषंगाने सैद्धांतिक चर्चा आहे. त्यातच स्पष्टपणे दाखवून दिलेल आहे की क्रांती म्हणजे 'संख्यात्मकतेतून गुणात्मक बदल'. या प्रक्रियेत भौतिकशास्त्रातील latent heat (अनुनुभूत उष्णता) सारखी केंद्रिय ऊर्जेची आवश्यकता असते. तिला काही उत्साही मार्क्सवाद्यांनी हिंसा समजलं. त्यांनी तिथे समजावून सांगितले आहे की concentrated ऊर्जा काही हिंसा नसते. त्यानंतरच्या प्रभागात मार्क्स एंगल्सच्या हिंसेबाबत विचारांचे परीक्षण केले आहे. आणि दाखवून दिले आहे की तरुणपणी जरी मार्क्स हा क्रांतीसाठी हिंसेला अपरिहार्यता समजत असला तरी त्यानंतर एंगल्स बरोबर तोसुद्धा हिंसेशिवाय क्रांतीची आवश्यकता पाहायला लागला होता.

याप्रमाणे तिनही प्रभागातून हिंसेचा एक समग्र परिपेक्ष साधल्या नंतर ते चौथ्या भागात भारतातील माओवादी हिंसेचे परीक्षण करतात आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे सहा दशकातील वसाहतोत्तर भारतात सरकारच्या धोरणांमुळे संस्थांत्मक हिंसा कशी अशा प्रतिक्रियांना जन्म देते, हे सांगत माओवाद्यांच्या हिंसेवरील अवलंबनाला प्रश्नांकित केले आहे. ते हे सुद्धा स्पष्ट करतात की, हिंसा ही सिद्धांताचा भाग नसते. ती एक strategy and tactic चा भाग असते आणि त्या परिपेक्षातुन पहाता माओवाद्यांचे बंदुकीवर अवलंबन किती चुकीचे आहे हे ते समजावून सांगतात. इतकेच नव्हे एकंदरीत कम्युनिस्टांच्या क्रांतीबाबत कल्पनांविषयी ते बरेच प्रश्न उपस्थित करतात आणि त्याकडे डोळसपणे विचार करण्याची आवश्यकता प्रतिपादित करतात.

मुंबई तरुण भारताच्या लेखातील हा खोटारडेपणा यावरून कोणाच्याही लक्षात यावा.

२) दुसरा खोटारडेपणा हा डॉ.आनंद तेलतुंबडे यांनी अनुराधा घांदी यांच्या लेखाचे संपादन केले म्हणून त्यांचा माओवाद्यांची संबंध जोडण्याबाबत आहे. तेलतुंबडे यांनी आपल्या अनेक मुलाखतीमध्ये याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, अनुराधा घांदी विद्यार्थीनी असताना PROVOM या संघटनेची व त्यानंतर CPDR (कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट) या मानवाधिकार संघटनेची सहसंस्थापक होती. ती Witson College मुंबई व नागपूर विद्यापीठात शिकवत सुद्धा होती. ती ज्यावेळी मरण पावली तिच्या मित्रमंडळींनी तिच्या स्मृतीप्रित्यर्थ "अनुराधा घांदी मेमोरियल ट्रस्ट' स्थापन केला आणि त्यामार्फत लोकशिक्षणासाठी व्याख्याने वगैरे आयोजन करण्याचे ठरवले.

हा ट्रस्ट अगदी कायद्यानुसार रजिस्टर ट्रस्ट आहे. याचे बँकेत खातेदेखील आहे. इतकेच नव्हे तर पॅन नंबर सुद्धा आहे. या ट्रस्टतर्फे मागच्या दशकभर देश-विदेशातील प्रख्यात व्यक्तींची जाहीर व्याख्याने आयोजित केलेली आहेत. या ट्रस्ट मध्ये गुरबीर सिंह यांच्यासारखे वरिष्ठ पत्रकार व पि.के.दास यांच्यासारखे सन्मानित आर्किटेक्ट, वकील अशा लोकांचा समावेश आहे. डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा यात समावेश असला तरी त्यांच्या आयआयटी खरगपुर व त्यानंतर गोव्यातील वास्तव्यामुळे सहभाग नाममात्र आहे, असं त्यांनी आपल्या भीमा कोरेगाव केस नंतर अनेक निवेदनात स्पष्ट केले आहे. मात्र भाजपा व आर एस.एस.कडून या सर्व गोष्टींना जाणून-बुजून मोड तोड करून पुन्हा पुन्हा प्रोपौगंडा म्हनुन वापरलं जातं आहे.

हा निव्वळ खोटारडेपणाचा नाही तर उजव्या शक्तींच्या प्रचारतंत्राचाही तो एक भाग आहे. जर सरकारला ही ट्रस्ट माओवाद्यांशी संबंधित असल्याची शंका येत असेल व त्यांच्या जवळ त्याचा पुरावा असेल तर सरकारने त्याला ताबडतोब बंद केलं पाहिजे होतं. पण आजपर्यंत तरी तसे झालेलं दिसत नाही.  

तिसरा मुद्धा. तरुण भारत मधील लेखात CPDR ला सुद्धा माओवाद्यांनी स्थापन केलेली संस्था असं म्हटलं आहे. आणीबाणीनंतरच्या काळात लोकशाही हक्कांची पायमल्ली थांबवण्यासाठी देशातील बहुतेक राज्यात मानवी अधिकार संस्था उदयास आल्या आणि सीपीडीआर ही त्याच शृंखलेत १९७८ साली स्थापन करण्यात आली. तिच्याशी प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर, माधव साठे, ज्योती पुनवानी यासारखी प्रतिष्ठित महाराष्ट्रीय मंडळी संबंधित होती. डॉ. आनंद तेलतुंबडे त्यांच्या मद्रास व कलकत्ता बदलीनंतर १९९५ मध्ये मुबंई मध्ये  परत आल्यानंतर CPDR मध्ये औपचारिकपणे काम करू लागले व सेबास्ट्रीयनच्या मृत्यूनंतर केवळ त्यांच्या इच्छेखातर खरगपूर IIT ला असताना त्याचे सचिव झाले. 

मात्र CPDR  च्या मंथली मीटिंगला सुद्धा ते कधी हजर राहू शकले नाहीत. CPDR चा माओवाद्यांशी कसलाही संबंध नाही. काही पोलिस अधिकाऱ्यांना साऱ्याच मानव अधिकार संघटना त्यांच्या बेमालूम वागणुकीस  कायम अडसर वाटतात आणि म्हणूनच त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणात अशा मानवधिकार कार्यकर्त्यांना माओवाद्यांशी संबंध असल्याचे बिनबुडाचे आरोप लावून UAPA सारख्या कायद्याचा  दुरुपयोग करीत तुरुंगात डांबले आहे.हे आर एस एस चे षड्यंत्र आहे. हेच या तरुण भारतच्या अपप्रचार तून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

चौथी गोष्ट म्हणजे डॉ.आनंद तेलतुंबडे यांनी अनुराधा घांदीच्या लेखाचे सहसंपादन केले आहे म्हणून त्यांचा माओवाद्याची बादरायण संबंध जोडणे. अनुराधा घांदी, वर म्हटल्याप्रमाणे तथाकथित माओवादी याव्यतिरिक्त बरच काही होत्या आणि त्यांनी स्वतःचे खूप काही लेखन मागे ठेवले आहे. अनुराधा घांदी मेमोरियल कमिटीने त्यांचे हे लेखन प्रकाशित करण्याचं काम हाती घेतले. संपादनासाठी तेलतुंबडे यांना विचारणा केली कारण त्या लेखात अनुराधा घांदी मेमोरियल कमिटी तर्फे हे पुस्तक प्रकाशित झालं आणि आजवर त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. ते आता नेट वर ही  उपलब्ध आहे. दहा वर्षापूर्वी जाहीरपणे प्रकाशित झालेल्या या पुस्तकावरून त्याच्या संपादकावर माओवाद्याशी संबंध जोडणे किती खोटारडे पणाचे आणि हास्यस्पद आहे!

शिवाय संपादन करणे हे म्हणजे लेखकाच्या मताशी सहमत असणे असे सुद्धा होत नाही. जसे दानिश प्रकाशनाचा माओवाद्यांशी संबंध जोडता येणार नाही, त्याच प्रमाणे डॉ. आनंद तेलतुंबडे चा सुद्धा  त्याच्याशी समंध जोडता येणार नाही!

 

लेखकाच्या सर्व मतांशी इंडी जर्नल पूर्णतः सहमत असेल असे नाही. वरील लेखातील मत हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.