Opinion
आनंद तेलतुंबडे : जनसंघर्षाचा पक्षपाती तत्वज्ञ
तेलतुंबडे का आणि कुणाला नको आहेत?
सर्वोच्च न्यायालयानं दिलेलं संरक्षण संपलेलं नसतानाही पुणे पोलिसांनी ज्या पदधतीनं डॉ. आनंद तेलतुंबडेंना अटक केली होती, ते पाहता हे सरकार, इथली राज्यव्यवस्था आनंदच्या अटकेसाठी टपून बसली होती, हे उघड आहे. सत्र न्यायालयानं ही अटक बेकायदेशीर ठरवत त्याला मुक्त करण्याचा आदेश दिला. यानंतर मुंबई उच्च न्यायालयानंही अटकपूर्व जामीनअर्जावरच्या अंतिम सुनावणीपर्यंत म्हणजेच २२ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम संरक्षण दिलं आहे. दरम्यानच्या काळात आनंदच्या अटकेचा अनेकांनी निषेध केला. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, लेखक, विचारंवंतांपासून ते आंतरराष्ट्रीय विचारवंतांपर्यंत निषेधाचा सूर उमटला. संयुक्त राष्ट्र संघातही हा निषेधाचा सूर उमटला.
या दरम्यान आनंदला अटक करण्याचा, त्याच्याभोवती खोट्या आरोपांचा फास आवळण्याचा प्रयत्न का होतो आहे, यावर मी बराच विचार करत होतो. आनंदवरील कारवाईसंदर्भात विचार करत असताना मला अनेक गोष्टी, घटना तुकड्या – तुकड्यात आठवतात. त्या इथं सांगणं महत्वाचं आहेच. त्याआधी आनंदवरच्या कारवाईची काही मुळं भूतकाळात गाडलेली दिसतात, त्याबद्दल सांगतो.
आनंद तेलतुंबडे माओवादी आहेत, ते आंबेडकरवादी असण्याचा आव आणून नक्षल समर्थक म्हणूनच काम करतात, असा एक अपप्रचार केला जातो आहे. मीडियातून, सोशल मीडियातून हा अपप्रचार आता दिसत असला, तरी भाजपच्या आय - टी सेलआधीच चार वर्षापुर्वी आर.एस.एसचं मुखपत्र असलेल्या ‘पान्चजन्य’मधून करण्यात आला आहे. पान्चजन्यच्या एप्रिल २०१५ च्या अंकात रमेश पतंगे यांनी एक लेख लिहिला आहे. पतंगे हे हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक समरसता मंचाचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी या अंकात ‘मायावी आंबेडकरभक्त’ नावाचा एक लेख लिहीलाय. या लेखात ते आनंद तेलतुंबडे, अरुंधती रॉय आणि गेल ऑम्वेट या तिघांना मायावी आंबेडकरभक्त म्हणतात. जातीनिर्मूलन आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष याबाबत आनंदनं जी मतं मांडलं आहेत, त्या मतांबदद्ल पतंगेंनी (अर्थात आरएसएसन) त्यांच्या सोयीचा, त्यांना उमगणारा जो अर्थ लावला आहे, त्यातून आनंदविषयी भाष्य करतात, ते आनंदविषयी म्हणतात,
‘पान्चजन्य’ मधील लेख. सौ- पान्चजन्य
“डॉ. आनंद तेलतुंबडे इस प्रकार की उत्तेजक भाषा का प्रयोग क्यो करते है? उनको दलितो से मार खाने का भय नही है क्योकि वे खुद दलित है. दलितेतर विद्वान इनकी बातो को उठा नही सकता क्योकि वो मार खाएगा. इनके पीछे जो उद्देश्य छिपा हुआ है, उसे समझना पडेगा.”
आनंद तेलतुंबडे यांना दलितांपासून मार खाण्याचं भय नाही, असं पतंगे म्हणतात. त्यांना काय अपेक्षित आहे यातून? दलितेतर विद्वान इनकी बातो को उठा नही सकता क्योकि वो मार खाएगा. यातून पतंगेंना काय सुचवायचं आहे? आनंद तेलतुंबडेंना मारण्याचा विचार ज्यांच्या डोक्यात येऊ शकतो, ते कोण लोक आहेत आणि ते का तेलतुंबडेंना मारण्याचा विचार करतील? याठिकाणी संबंध लेखात आनंद तेलतुंबडेबद्दल दलित – बहुजनांच्या मनात किंतु – परंतू, पूर्वग्रह निर्माण होतील, किंबहुना व्हावेत, यासाठीच पतंगेंनी सबंध लेखात त्यांच्याबद्दल वस्तुस्थितीची मोडतोड करुन त्यांना ‘मायावी’ ठरवलं आहे. ज्या दलित – बहुजनांच्या उत्थानासाठी आनंद काम करतो, संघर्ष करतो, वैचारिक योगदान देतो, त्यांच्यातच वाद, एकमेकांबद्दल अढी – पूर्वग्रह निर्माण करण्याचा हा कुटील डाव आहे.
या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात पतंगे काय लिहितात पहा, “इस लेख मे मैंने अत्यंत संक्षेप मे मायावी आंबेडकरभक्तो की सोच के कुछ उदाहरण रखने का प्रयास किया है. मायावी आंबेडकरभक्त अनेक कारणो से खतरनाक होते है. पहला कारण ऐसा कि, उनका सार्वजनिक चेहरा दलित, शोषित के उत्थान का होता है और असली चेहरा हिंदू समाज मे आग का बवंडर खडा करनेवाला होता है. गत कुछ सालो से देशभर मे लिंगायत, मराठा, रैदासी आदि अनेक समाजो मे इस प्रकार के आंदोलन चल रहे है कि हम हिंदू नही है, हमारी अलग पहचान है. लिंगायत अलग धर्म है, मराठो का शिवधर्म है, चर्मकारो का रैदासी धर्म है, इसकी जड मे जो अनेक लोग है, उनमे गेल आम्वेट का नाम अग्र पंक्ति मे आता है. इसी कारण इन मायावी लोगो के जाल को ध्वस्त करना राष्ट्रीय कर्तव्य़ बनता है. हमारे इतिहास, पुराणो मे रामायण, महाभारत मे ऐसे मायावी भक्तो के कई उदाहरण आते है और उनसे कैसे निपटना चाहिए, वह कथा यह भी बताती है. यह बौद्धिक लडाई है. उसे ध्यान मे रखकर हमे भी बौद्धिक योद्धा बनकर जंग के मैदान मे उतरना चाहिए.” या परिच्छेदात पतंगेंनी मायावी शब्द वापरला आहे. पुराणांमध्ये आपल्याला मायवी हा शब्द राक्षसांसाठी वापरलेला दिसतो.
इसी कारण इन मायावी लोगो के जाल को ध्वस्त करना राष्ट्रीय कर्तव्य़ बनता है. हमारे इतिहास, पुराणो मे रामायण, महाभारत मे ऐसे मायावी भक्तो के कई उदाहरण आते है और उनसे कैसे निपटना चाहिए, वह कथा यह भी बताती है.
या वाक्यातून पतंगेंना काय सुचवायचं आहे? पुराणांमध्ये मायावी राक्षसांचा कशा प्रकारे नि:पात केलेेला आहे, तशा प्रकारे तेलतुंबडेंना ध्वस्त करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? पुढे ते चतुराईनं, यह बौद्धिक लडाई है, उसे ध्यान मे रखकर हमे भी बौद्धिक योद्धा बनकर जंग के मैदान मे उतरना चाहिए.” असं म्हणतात. म्हणजे तेलतुंबडे हे शत्रू आहेत. मायावी आंबेडकरभक्त आहेत आणि त्यांना आपण ध्वस्त केलं पाहिेजे. ही जंग म्हणजेच युद्ध आहे, असं पतंगे सुचवतात.
वैचारिक योगदान देणे, अभ्यासपूर्ण लेखन करणे, विचारसरणींची चिकित्सा करणे, अध्यापन करणे या आनंदच्या कृती त्याला मायावी ठरवण्याइतक्या वाईट आहेत? हे आपलं (पतंगे आणि त्यांचे समविचारी) आनंद आणि त्याच्यासारख्या विचारवंतांशी चाललेलं युद्ध आहे, असं पतंगेंना का वाटतं? भारतीय लोकशाही राज्यात आनंदच्या विचार - मांडणीची टीका करणं, त्याचा प्रतिवाद करणं यापासून पतंगेंना किंवा आणखी कुणाला कुणी रोखलं आहे का? नसता २०१५ मध्ये हा लेख लिहिल्यानंतर मागील चार वर्षांत आनंदच्या मांडणीचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद किती आणि कोणत्या उजव्या विचारसरणीच्या अभ्यासक - विचारवंतांनी किंवा रमेश पतंगे यांनी केला? केवळ उजव्या - हिंदुत्ववादी विचारवंतांनी आनंदच्या मांडणीची मोडतोड करण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर तो स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या काही तथाकथित लेखक - विचारवंतांनीही केला आहे.
आनंदच्या मांडणीची अशी मोडतोड का केली जाते, हे समजून घेण्यासाठी त्यानं काय लिहून ठेवलं आहे, हे पाहणं महत्वाचं आहे. डॉ. आंबेडकर : प्रतीक, वास्तव व नवा अन्वयार्थ, Anti - Imperialism and Annihiliation of caste, Hindu and Dalit: perspective for understanding communal practice, Khairlanji, Ambedkar on Muslims, आर्थिक सुधार आणि दलित, जागतिकीकरण आणि कष्टकरी दलित बहुजन इ. महत्वाच्या ग्रंथ लेखनातून आणि हजारो परिषदांतील भाषणातून त्यानं दलित अत्याचाराचा आणि जातिअंताचा प्रश्न मुख्य प्रवाहात चर्चेत आणला. याशिवाय महत्वाची मांडणी म्हणजे दलितांचं शोषण केवळ जातीय शोषण नाही तर ते वर्गीय शोषणही आहे. राखीव जागांच्या संदर्भात, आरक्षणाच्या संदर्भात व्यापक अर्थानं त्यामुळे होणाऱ्या नुकसानाचंही अवलोकन केलं पाहिजे. या त्याच्या मांडणीमुळे आरक्षणाच्या लाभाने दलितांमध्ये जो एक नव मध्यमवर्ग उद्ययाला आला आहे, त्या वर्गाच्या मानसिकतेमुळे नवउदारमतवादी, साम्राज्यवादी विचार- धोरणांना कशा प्रकारे अधिष्ठान लाभतं आणि मूळ शोषण प्रक्रियेच्या आकलनात बाधा येतात या विचारांकडे पुढे सरकता येतं.तर बाबासाहेबांचे आर्थिक विचार यामध्ये त्यानं जातीचं वास्तव आणि त्याचा 'राज्य', अर्थनीती, वैश्विक भांडवलशाही, या घटकांचा संबंध दलितांच्या शोषणामध्ये किती महत्वपूर्ण आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दलित शोषण हे फक्त सामाजिक नाही तर राजकीय सुद्धा कशाप्रकारे आहे, हे त्याच्या लेखनातून दिसते. बाबासाहेबांचा मूळ उद्देश हाच होता.
आनंदच्या मूलभूत मांडणीमुळे नवीन अभ्यासकांना, कार्यकर्त्यांना या संबंध अकादमिक आणि बिगर-अकादमिक समाजशास्त्रीय मांडणीसाठी एक तात्विक चौैकट, सायंटिफिक फ्रेमवर्क मिळतं आणि हेच हिंदुत्ववाद्यांना नको आहे.
हिंदुत्ववाद्यांना आनंदच्या मांडणीचं - डिस्कोर्सचं इतकं भय का वाटतं? याचा विचार केला असता लक्षात येतं की आनंद हिंदुत्ववाद्यांच्या हिंदुराष्ट्राच्या अजेंड्याला उध्वस्त करणारे बाबासाहेब सांगतो. आनंदच काय पण ज्यांचा उल्लेख पतंगे मायावी म्हणून करतात, त्या अरुंधती रॉय आणि गेल ऑम्वेट पण हिंदुराष्ट्राच्या अजेंड्याला उध्वस्त करणारे बाबासाहेब सांगतात, हे हिंदुत्ववाद्यांचं खरं दुखणं आहे. प्रपोगंडा ऑफ हिंदुत्व या आनंदच्या पुस्तकात त्याने हिंदुत्व, हिंदुत्ववाद्यांच्या हिंदुराष्ट्र संकल्पनेची सखोल चिरफाड केली आहे.
आनंद बाबासाहेब समजून घेताना व त्याबद्दलची मांडणी करताना अस्मितावादी मांडणी करत नाही. आरएसएसला बाबासाहेबांचं अप्रोप्रिएशन करताना दलितांना उत्सवप्रिय मानसिकतेतच गुंतवून टाकायचं आहे. या अजेंड्याला आनंदची मांडणी छेद देते. दलित केवळ अस्मितावादी राजकारणात गुंतून पडले तर त्यांच्यापुढल्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल, आणि हेच उजव्या विचारंवंतांना हिंदुत्ववाद्यांना हवं आहे. भीमा कोरेगावच्या २०० व्या शौर्यदिनानिमित्त आनंदने ‘द वायर’वर जो लेख लिहिला होता आणि त्या लेखाचंही ज्या प्रकारे हिंदुत्ववाद्यांनी अप्रोप्रिएशन केलं, त्यातून हेच दिसून येतं.
एकंदरित दलित - बहुजन समाजातून जेव्हा एखादा विचारंवत पुढे येतो, तो सातत्याने समाजबदलाचे गतीनियम सांगण्याची भाषा करतो, आपल्या समूहाला प्रतिकांना अवास्तव महत्व देण्यातून बाहेर काढतो, तो समग्र समूहाच्या उत्थानाची बात करतो, तेव्हा प्रतिगाम्यांच्या उंतरडीयुक्त समाजाच्या चिर:काल स्वप्नांना तडा जातो. ब्राम्हणी, भांडवली व्यवस्थांच्या धुरीणांना, नियंत्रकांना शोषित समाज स्वत:च्या मुक्ततेकडे प्रवास करु लागलाय, याचं भय वाटतं. आपल्या हातातल्या सर्व प्रकारच्या शोषणाभिमुख साधनांना गाडलं जाईल की काय, आणि त्यासाठीच हे विचारवंत अशा तत्वज्ञानाची पायाभरणी करतायत, याचं भय वाटतं आणि या तत्वज्ञानाला संपवण्यासाठी असे विचारवंत कोंडण्याचे प्रयत्न होतात. हे परंपरा कोपर्निकस ते गॅलिलिओपासून तुकारामापर्यंत चालत आलीय.
आनंद तेलतुंबडे आणि आता अटक केलेले इतर मानवाधिकार कार्यकर्ते, कवी यांच्या बाबतीत नेमकं बोलायचं झालं तर विचारवंतांना मायावी वगेरे ठरवणं, अर्बन नक्षलवादाच्या थियरी निर्माण करुन तसा अपप्रचार करणं, या बाबी आता २०१८ - १९ मध्ये अचानक उगवून आलेल्या नाहीत. २००६ मध्ये खैरलांजी घडलं तेव्हाही त्याविरोधात झालेल्या आंदोलनांमध्ये नक्षलवाद्यांचा हात आहे, असा अपप्रचार केला गेला होताच. २००९ मध्ये आरएसएसच्या विवेक अग्निहोत्रीनं अर्बन नक्षलवादावर दिल्लीत एक सेमिनार घेतला होता. इतकंच नाही तर काही महिन्यांपुर्वी सुधा भारद्वाज, वरवरा राव यांना अटक होण्यापुर्वीही अग्निहोत्रीनं ट्विटरवर एक अपील केलं होतं, त्यात तो म्हणाला होता, “तुमच्या पाहण्यातल्या, अकादमिक वर्तुळातल्या अर्बन नक्क्षल्सची नावं सुचवा. अर्बन नक्षल्सची एक यादी तयार करायची आहे, हे काम करण्यासाठी तुमच्यापैकी पुढाकार घेऊ इच्छिणाऱ्या लोकांनी मेसेज करा.” गंमत म्हणजे या ट्विटला रिप्लाय करताना अनेकांनी ज्येष्ठ वकील असलेल्या इंदिरा जयसिंग, प्रशांत भूषण ते प्रकाश करात आदींची नावं अर्बन नक्क्षल म्हणून सुचवली होती. आता अग्निहोत्रीला अशी यादी का तयार करायची आहे? अशी यादी तयार करुन तो काय करणार आहे? त्याच्यावर गृहखात्याची जबाबदारी आहे का? हे प्रश्न आपल्याला विचारावेच लागतील. राृष्ट्र, राज्य, विकास याच्या हिंदुत्ववाद्यांच्या संकल्पनांशी जो जोडून घेत नाही, व याउलट त्यातल्या विसंगती दाखवतो, तो अर्बन नक्षल ठरवला जातो.
या पार्श्वभूमीवर एका बाजूला स्वत:ला आंबेडकरी विचारांचे पाईक म्हणवून घेणाऱ्यांनी आताहीआनंद तेलतुंबडे हे कसे एलिट विचारवंत आहेत, व त्यांचा जनचळवळींशी संबंध नसल्यानं त्यांच्या समर्थनार्थ आपण आपली उर्जा का खर्च करावी? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्यासाठी मी माझ्या आनंदशी असलेल्या वैयक्तिक संबंधातल्या एखाद - दोन महत्वाच्या गोष्टी सांगतो.
या माणसाशी माझा परिचय झाला, मी कॉलेजला असताना. औरंगाबादला २००५ च्या आसपास एकदा विद्यापीठात त्याचा व्याख्यानाचा कार्यक्रम होता. त्यावेळी मी बसपाचा केडर होतो. आनंदचा कार्यक्रम आम्ही काही मुलांनी उधळुून लावला. मीही त्यात अग्रस्थानी होतो. शेवटी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर ते व्याख्यान पार पडलं. त्यानंतर पुन्हा माझी भेट झाली ती २००६ - ७ च्या सुमारास. बीडमध्ये सोना खोट्टा या गावात सवर्णांनी एका दलिताची हत्या केली होती. ही गोष्ट समजल्यानंतर आनंद त्या गावातल्या दलित कुटूंबांना भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्या गावात जाण्यासाठी चांगला रस्ता, वाहनाची सोय नव्हती. आनंद वडवणी ते सोन्ना खोटा असं जवळपास पंधरा किलोमीटर चालून त्या गावातल्या कुटूंबाला भेटण्यासाठी गेला. तेवढंच पंधरा किलोमीटर अंतर पुन्हा वडवणीपर्यंत चालत आला. त्यावेळी तो पेट्रोनेट इंडियाचा मॅनेजिंग डायरेक्टर होता. देशातल्या महत्वाच्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ असलेला, जगातल्या महत्वाच्या विचारवंतांपैकी एक असलेला माणूस, एका पीडित दलित कुटूंबांच्या भेटीसाठी ३० किलोमीटर पायी चालताना मी पहिल्यांदा बघत होतो, त्यानंतर अर्थात या माणसाशी मी बोललो. चर्चा केली आणि तेव्हापासून मी आनंदला वाचत आलोय. पंधरा वर्षांपुर्वी आनंदचं व्याख्यान उधळून लावणारा मी ते माझ्या पुस्तकाला आनंद प्रस्तावना लिहितो, या प्रवासात त्याची वंचिंताशी असलेली बांधिलकी, ज्ञाननिर्मितीची आस, त्याच्या ठायी असलेला प्रामाणिकपणा या साऱ्याचा मी साक्षीदार आहे. अशा अनेक घटना आहेत. त्या माहित नसतानाही आनंद हा एलिट विचारवंत आहे, असा अपप्रपचार केला जातो.
आनंदसोबत आपण का उभं राहिलं पाहिजे, याची काही महत्वाची कारणं आहेत. पहिलं म्हणजे आनंद हा पुरोगामी चळवळींची एक मोठी आसेट आहे. तो मुक्तीदायी चळवळींचा पक्षपाती तत्वज्ञ आहे. त्याचा पक्षपातीपणा वंचिंतांच्या दु:खाशी - शोषणाशी नातं सांगणारा आहे. आनंदनं कधीही भूमिका घेण्यापासून स्वत:ला दूर ठेवलेलं नाही. आनंदचं वैचारिक योगदान निश्चितपणे पुरोगामी चळवळीला दिशा देणारं आहे. त्याची ज्ञाननिर्मितीशी असलेली कमिटमेंट वादातीत आहे. सद्य परिस्थितीतल्या प्रश्नांना कसं सामोरं जावं, याचं व्हिजन त्याच्याकडे आहे. मागील 15 वर्षातील लेखनाने एक नवा दृष्टिकोन आनंदने दिला आहे.
समताधारित समाज निर्मितीच्या लढ्यातील सर्व प्रवाहातील कार्यकर्त्यांना तो मार्गदर्शक ठरलाआहे. यामुळेच विषमतेच्या पाठिराख्याना आनंद जेल मध्ये हवा आहे.
असं असतानाही आनंदवरील कारवाई - आरोप यातला घटनाक्रम पाहिला तर त्यातला फोलपणा लक्षात येतो. त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन एक वर्ष झालं, तरी वर्षभरात एकदाही त्याला साधं चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलं नाही. वर्षभरात पोलिसांनी असा काय तपास केला, की त्याच्याविरोधातले काही प्रथमदर्शनी पुरावे सरकार बंद लिफाफ्यातून न्यायालयात देतं? सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यांचं संरक्षण दिलेलं असतानाही पुणे पोलीस त्याआधीच त्याला अटक करतात! यावरुन सरकारला आनंदविरोधात फेअर ट्रायल करायची नाही, हे दिसून येतं. २२ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालय काय निकाल देतं, त्यावर त्याचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे, मात्र या मुक्तीदायी चळवळींच्या पक्षपाती तत्वज्ञाला आपल्याला गजाआड जाऊ देण्याचा मॅकार्थीझम इरा नको असेल तर सर्वच पुरोगाम्यांना आनंदसोबत उभं राहणं गरजेचं आहे.
पुरोगामित्व ही केवळ मिरवण्याची गोष्ट नाही तर वेळ पडली तर आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून रस्त्यावर येण्याची, भूमिका घेण्याची गोष्ट आहे, अन ती वेळ कधीच आपल्या दाराशी येऊन ठेपली आहे. केवळ सभा, संमेलनं, व्याखानं, निषेधाच्या सभा यापुरतं पुरोगामित्व मर्यादित राहिलं तर अर्बन नक्षलवाद ते मॅकार्थीझम हे आव्हान मोडून काढणं अवघड आहे. प्रश्न केवळ आनंद तेलतुंबडेचा नाही तर तो काही बोलू पाहणार्या, प्रश्न विचारणार्या प्रत्येकाचा आहे. मानवाधिकारांची भाषा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे. प्रश्न समग्र शोषित वंचित समूहाच्या उत्थानाकडे होणाऱ्या वाटचालीचा, त्यासाठी आवश्यक त्या संघर्षाचा, ज्ञाननिर्मितीचा, तत्वज्ञानाच्या निर्मितीचा आहे.
(वरील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)