Europe

दिवंगत प्रिन्सेस डायनाच्या १९९५ च्या वादग्रस्त मुलाखतीवरून बीबीसी वृत्तवाहिनी अडचणीत

२५ वर्षांपूर्वी झालेल्या या मुलाखतीमधील गैरप्रकारांची कसून चौकशी करण्याचं आश्वासन बीबीसीकडून देण्यात आलेलं आहे.

Credit : Shubham Patil

'माझ्या बहिणीची ती मुलाखत घेण्यासाठी बीबीसी आणि बीबीसीचे पत्रकार मार्टिन बशीर यांनी खोटी माहिती आणि कागदपत्रे दाखवून आमची फसवणूक केली. त्यामुळे बीबीसीनं रीतसर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू,' अशी भूमिका दिवंगत प्रिन्स डायनाचे भाऊ चार्ल्स स्पेंसर यांनी घेतल्यानंतर जागतिक स्तरावरील आघाडीच्या बीबीसी या वृत्तवाहिनीच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. २५ वर्षांपूर्वी झालेल्या या मुलाखतीमधील गैरप्रकारांची कसून चौकशी करण्याचं आश्वासन बीबीसीकडून देण्यात आलेलं असलं तरी स्पेंसर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हे प्रकरण बीबीसीच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. 

नोव्हेंबर १९९५ ला बीबीसीचे त्यावेळचे तरुण पत्रकार मार्टिन बशीर यांनी इंग्लंडच्या राजघराण्याची प्रिन्सेस डायनाची घेतलेली मुलाखत प्रचंड गाजली होती. घराण्यातील खासगी आणि कौटुंबिक गोष्टी सार्वजनिक क्षेत्रात किंवा माध्यमांसमोर उघड न करण्याचा नियम इंग्लंडच्या राजघराण्यात कटाक्षानं पळाला जातो. मात्र, १९९५ ची ही मुलाखत याला अपवाद ठरली होती. प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या नात्यात आलेला दुरावा आणि दोघांच्याही विवाहबाह्य संबंधांची कबुली खुद्द प्रिन्सेस डायनानंच या मुलाखतीमध्ये दिल्यानं त्यावेळी प्रचंड खळबळ माजली होती. याच मुलाखतीनंतर वर्षभराच्या आत प्रिन्स चार्ल्स व प्रिन्सेस डायना यांचा कुप्रसिद्ध घटस्फोटही झाला होता. १९९७ साली प्रिन्सेस डायनाचा कार अपघातात मृत्यू झाला होता. तर प्रिन्स चार्ल्स यांनी नंतर कार्मेला पार्कर बॉवेल्स (जिच्यासोबत त्यांचे डायना पत्नी असताना विवाहबाह्य संबंध होते) सोबत लग्न केलं. प्रिन्स चार्ल्स हेच आता इंग्लंडची राणी इलिथाबेथ - २ यांचे सर्वात जेष्ठ पुत्र असल्यानं इग्लंडच्या गादीचे तेच वारसदार आहेत.

 

 

या मुलाखतीची परवानगी घेण्यासाठी बीबीसीनं आपल्याला खोटी कागदपत्रं दाखवून आणि माहिती सांगून दिशाभूल केल्याचा आरोप स्पेंसर यांनी केलाय. "ब्रिटनचं राजघराणं माझ्या बहिणी विरोधात कट रचून तिचा काटा काढण्याच्या प्रयत्नात आहे, असं भासवण्यासाठी मार्टिन बशीर यानं आपल्याला खोटी कागदपत्र दाखवली. माझी बहीण प्रिन्सेस डायनावर नजर ठेवण्यासाठी राजघराण्यानं खासगी गुप्तहेर नेमल्याचं दाखवून आमचा विश्वास जिंकला. आणि खोटा बनाव रचलेल्या अशा अवस्थेत प्रिन्सेस डायनाला बोलतं करून मुलाखत मुद्दाम वादग्रस्त बनवण्यात आली," असा गंभीर आरोप स्पेंसर यांनी बीबीसीवर केलाय. तेव्हा ही मुलाखत घेतलेले मार्टिन बशीर हे आता बीबीसीच्या संपादक मंडळावर असून कोव्हीडची लागण झाल्यामुळे त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यामुळे या आरोपांबद्दल त्यांची चौकशी करणं आता अवघड आहे. 

बीबीसीचा त्यावेळचा एक ग्राफिक डिझायनर मॅट विस्लर याला मार्टिन बशीर यानं बँकेची नकली स्टेटमेंट्स बनवायला लावली होती. याच नकली कागदपत्रांच्या जोरावर राजघराणं तुमच्याविरुद्ध कट रचत असल्याचं भासवून बशीरनं प्रिन्सेस डायना आणि तिचा भाऊ स्पेंसर यांचा विश्वास संपादन केला. स्वतःच्या मानसिक आजारापासून विवाहबाह्य संबंध आणि आपल्या पती आणि राजघराण्याविषयी असलेल्या नाराजीविषयी डायनाला बोलतं करण्यात मार्टिन बशीरला मुलाखतीत यश मिळालं. या एका मुलाखतीमुळे पत्रकार म्हणून मार्टिन बशीरचा दबदबा अचानक वाढला. जगभरात तब्बल २.३ कोटी लोकांनी ही मुलाखत पहिली. बीबीसीच्या या पॅनारॉमा शोची लोकप्रियता या एका मुलाखतीनं एका रात्रीत वाढली. मात्र, मुलाखतीसाठी केलेला हा खोटारडेपणा उघडकीस आल्यानंतर एका ग्राफिक डिझायनरला बळीचा बकरा बनवून बीबीसीनं आपले हात वर केले होते. आता २५ वर्षांनंतर प्रिन्सेस डायनाचा भाऊ स्पेंसर यानं पुराव्यांसह हे प्रकारण पुन्हा उकरून काढल्यानं बीबीसीच्या पत्रकारितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.