India

'ईडीनं आता सरळ भाजप कार्यालयातुन काम करावं', विहंग सरनाईकांच्या अटकेवर संजय राऊतांची टीका

प्रताप सरनाईक यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी विरोधातील खटला पुन्हा सुरू केला होता.

Credit : शुभम पाटील

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) धाड टाकली आहे. आज सकाळीच सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावरदेखील ईडीचं पथक दाखल झालं असून सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीनं चौकशीसाठी नुकतंच ताब्यातही घेतलंय. मनी लॉंडरिंग आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीनं ही कारवाई केली असून अर्णब गोस्वामी आणि कंगना रानावतविरोधात आवाज उठवणाऱ्या सरनाईकांवर ईडीनं केलेल्या या कारवाईवरून राज्यातील भाजप विरूद्ध शिवसेना वाद पुन्हा तापणार असल्याची चिन्हं आहेत. 

प्रताप सरनाईक यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी विरोधातील खटला पुन्हा सुरू केला होता. शिवाय मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणाऱ्या अभिनेत्री कंगना रानावतवरही अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडणारेही सरनाईकंच होते. त्यामुळे ईडी राजकीय सूड उगवण्यासाठी आजची ही कारवाई करतेय का? असा साहजिक प्रश्र्न राजकीत वर्तुळात विचारला जातोय.

 

 

ईडीच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार टॉप्स ग्रूप आणि संबंधित सदस्यांची ही शोधमोहिम सुरू आहे. मनी लॉंडरिंग आणि भ्रष्टाचाराच्या संशय प्रकरणी मुंबई आणि ठाण्यातील एकूण १० ठिकाणी ईडीनं छापे टाकले आहेत. यात प्रताप सरनाईक आणि त्यांचे दोन पुत्र पूर्वेश आणि विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीची ही शोधमोहीम सुरू असून विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन मुंबईला नेण्यात येत आहे. सरनाईक यांच्या टॉप्स ग्रूपच्या सिक्युरिटी कंपनीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याच्या संशयातून आज सकाळी ८ वाजल्यापासून ईडीनं ही कारवाई सुरू केलीये. 

या कारवाईचे पडसाद अर्थातंच राज्यातील राजकारणावर पडत असून दोन्ही बाजूंचे राजकीय नेते तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. "ईडीनं आता सरळ भाजप कार्यालयात त्यांचं कार्यालय उघडावं. नोटिसा कसल्या पाठवता‌. हिम्मत असेल तर सरळ अटक करा. ईडी कोणाच्या इशाऱ्यावर या कारवाया करतंय, हे सगळ्यांना माहितीये‌. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. अशा पद्धतीनं राजकीय सूड उगवण्याचा प्रकार तुम्ही आता सुरू केला असला तरी त्याचा शेवट आम्ही करू," असं म्हणत शिवसेनेच्या संजय राऊतांनी आता भाजपला पुन्हा अंगावर घेतलंय. दुसऱ्या बाजूला ईडी करत असलेल्या या कारवाईचा आमच्याशी काही संबंध नसून भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई होणारंच, असा युक्तीवाद देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि निलेश राणे या राज्यातील भाजप नेत्यांनी केलाय. 

 

 

"ठाणे हे भ्रष्टाचाराचं विद्यापीठ बनलंय. इथल्या बिल्डिंग आणि बांधकाम क्षेत्रात सर्रास गैरव्यवहार चालतो. आणि ठाण्यातील शिवसेना नेत्यांचेच हात या काळ्या धंद्यात बरबटलेले असल्याचं मला आधीपासूनंच माहिती होतं," असा दावा यावेळी भाजप खासदार निलेश राणे यांनी यावेळी केला.

यावर प्रत्युत्तर देताना "ईडीसारख्या स्वायत्त तपास यंत्रणा भाजपच्या गुलाम बनल्या आहेत. कोणाचे काय काळे धंदे आहेत, मनी लॉंडरिंग नेमकं कसं चालतं, निवडणुकीतला इतका पैसा कसा आणि कुठून येतो, बेनामी आणि बोगस कंपन्या कशा आणि कोण चालवतं, हे ईडीला नसलं तरी आम्हाला माहितीये. पण त्यांच्यावर कारवाई करायची हिम्मत ईडीत नाही. कारण सगळ्याच तपास यंत्रणा भाजपच्या नोकर असल्यासारखं वागत आहेत. काय करायची ती कारवाई करा, आम्ही घाबरत नाही. आणि अशा कारावाय करून तुमची सत्ता महाराष्ट्रात येईल, अशी स्वप्न बघणं आता सोडून द्या," अशी उघड चेतावणीच यावेळी संजय राऊतांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेनेचं राजकीय शीतयुद्ध आता या कारवाईमुळे आणखी जोर पकडण्याची चिन्हं आहेत.