Quick Reads

ज्यो लूक नान्सी: आपणाला हे संकट म्हणजे स्वतःला पुन्हा समजून घेण्याची संधी आहे

फलसफी सदर

Credit : French Culture

सगळ्या जगात COVID-१९ ने निर्माण केलेल्या अरिष्टात एकीकडे एकाधिकारशाही प्रवृत्ती असलेला यंत्रणांबद्दलची स्वीकारार्हता वाढीस लागण्याची शक्यता असताना दुसरीकडे उदारमतवादी कल्याणकारी राज्य व्यवस्थादेखील पुन्हा उभारी घेऊ पाहत आहे. अशा द्वंद्वात, माणूस असण्याची वैश्विक जाणीव काय असावी याबाबत चिंतन व्यक्त करत आहेत, फ्रेंच तत्त्ववेत्ते ज्यो लूक नान्सी. नान्सी आपल्या लेखाची सुरुवात 'कम्युनिस्ट चीन'वर टीका करत करतात आणि या काळात आपणाला मार्क्स प्रणित कम्युनिझमची धारणा शक्य आहे का, याबद्दल भाष्य करण्याचा प्रयत्न करतात. 

हा विषाणूचा जो चीन सारख्या कम्युनिस्ट देशातून आलाय आणि जो आपणाला पुन्हा एकदा सामूहिक जाणिवेकडे नेत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. नान्सी यांच्या मते corona हा शब्द 'क्राऊन' या राजेशाही प्रतिकाची आठवण करून देतो, तर त्याउलट communo हा शब्द corona ला उखडून टाकणाऱ्या सामूहिक ऊर्जेसाठी योग्य शब्द आहे.

Communo या शब्दाचा पहिला अर्थ आपणाला चीनच्या कम्युनिस्ट व्यवस्थेच्या अनुषंगाने पाहावा लागेल. खरंतर कम्युनिस्ट समाजात खाजगी मालमत्तेचं उच्चाटन झालेलं असतं. पण कम्युनिस्ट चीन ने त्यांच्या विशेष चिनी प्रारूपाद्वारे सामूहिक (राज्यसंस्थेची मालकी) व खाजगी मालकी द्वारे स्वतःचं नवीन कम्युनिस्ट स्वरूप जपलं आहे.

आपणाला माहीतच आहे की सामूहिक आणि खाजगी, या दोन्ही प्रकारच्या संपत्तीच्या संतुलनाच्या आधारे आज चीन हा जगातील आर्थिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता बनला आहे. या विकासात एक प्रश्न अनुत्तरित राहतो, की चीन कोणत्या अर्थाने कम्युनिस्ट आहे आणि चीननं कशा पद्धतीनं अति-उदारमतवादी, व्यक्तिवादी स्पर्धेच्या विषाणूचा नियंत्रित संसर्ग करून अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे? पण हे प्रश्न अनुत्तरित असून देखील COVID19 च्या उदयानंतर चीननं आपल्या सामूहिक व्यवस्थेचं व राज्यसंस्थेचं स्वरूप सगळ्या जगासमोर ठेवलं आहे. याचाच एक परिणाम म्हणजे चीन या अरिष्टात इटली, फ्रांस, भारत इत्यादी राष्ट्रांना या अरिष्टाच्या अनुषंगाने मदत ही पुरवत आहे.

जरी या काळात चीन सरकार जगभरात मदत पुरवत असलं, तरी त्याच्या एकाधिकारशाही प्रवृत्तीविरोधात जगभरात टीका चालूच आहेत आणि हा एक योगायोगच म्हणावा लागेल की या विषाणूच्या अस्तित्वामुळे चीन ला स्वतःच्या ऑफिशियल communism चं गुणगाण करता येत आहे. परंतू या सगळ्यात communism या शब्दाचा जो मूळ अर्थ आहे, तो धूसर होतोय व अजूनच अस्पष्ट होतोय.

 

 

Communism चा दुसरा अर्थ नान्सी मार्क्सच्या पॅरिस संहितेच्या अनुषंगानं स्पष्ट करतात. इथं मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, मार्क्स communism ही संज्ञा दोन अर्थानं वापरतो, पहिलं तर negation of negation (नकाराचा नकार) म्हणून. इथं बुर्ज्वा राज्यसंस्था तिची संरचना आणि खाजगी मालमत्ता इत्यादी गोष्टीचं उच्चाटन अपेक्षित आहे. याची द्वंदात्मक परिणीती म्हणजे communism as affirmation (साकाराची पूर्तता) अर्थात क्रांतीनंतर निर्माण झालेली कामगारवर्गीय सत्ता, स्टेट, सामूहिक संपत्ती या सगळ्याचं विघटन झाल्यानंतरच्या काळात माणूस फक्त माणूस असतो, त्याच्या सर्व गोष्टी त्याच्याकडे परत आलेल्या असतात, जिथे मूल्य नावाची गोष्ट संपुष्टात आलेली असते, त्या सकारात्मक अवस्थेस देखील मार्क्स communism म्हणतो. नान्सी या दुसऱ्या अर्थाने communism ही संज्ञा आपल्या काळाची गरज आहे असं जाहीर करतात. 

मार्क्स म्हणतो, की खाजगी मालमत्ता व सामुहिक मालमत्ता जेंव्हा संपुष्टात येईल त्यानंतर फक्त नव्यानं निर्माण झालेल्या 'व्यक्तीची' संपत्ती उरेल. या व्यक्तीची संपत्ती म्हणजे 'एका व्यक्तीने संपत्ती बाळगणे' असा नव्हे, तर याचा अर्थ पूर्ण अर्थानं 'स्व' बनण्याची शक्यता किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं झाल्यास स्वतःला परिपूर्ण करण्याची शक्यता होय. स्वतःला परिपूर्ण करणं म्हणजे वस्तूची मालकी प्राप्त करणं नव्हे, तर माणूस म्हणून सर्जनशील बनणं होय.

या अनुषंगानं आपणाला communiovirus च्या दुसऱ्या अर्थाकडं जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल. प्रत्यक्षात बघायला गेलं, तर हा विषाणू आपलं सामूहिकीकरण करत आहे. हा आजार आपल्याला समानतेच्या आधारावर एक करत आहे व त्याचसोबत वैश्विक भूमिका घेण्यासाठी आपणाला एकत्रित येण्यासाठी भाग पाडत आहे. यामध्ये आपलं प्रत्येकाचं स्वतःपासून वेगळं राहणं हे विरोधाभासाच्या अनुषंगानं आपलं सामुहिकत्व अनुभवणं आहे. आपण एकत्रीतरित्याच विशेष असू शकतो, या विशेषाचा सामूहिक अर्थच आपणास 'विशेष' समूह बनवत असतो.

आपण नेहमीच आणि रोजच स्वतःला आपल्या एकत्रितपणाची, अवलंबनाची व दृढ ऐक्याची आठवण करून देत असतो. आपल्या या ऐक्याबाबत विभिन्न मतं सुध्दा यायला लागली आहेत. याचं एक उदाहरण म्हणून आपण पर्यावरणातील जो नाटकीय बदल झाला आहे, त्याकडे बघू शकतो आणि काही लोक या उदाहरणाच्या आधारे डिजिटल भांडवलशाही कोलमडून पडत आहे, असेही भाष्य करत आहेत पण आपण अशा नाजूक विषयाबाबत उपहास न करता आपण स्वतःला आपल्या समूहाबाबत अजून चांगल्या अर्थाने कसं समजून घेऊ शकतो, याची विचारणा केली पाहिजे.

खरंतर याकाळात खूप बृहद प्रमाणात आपणाला एकमेकांप्रती एकता जाहीर करणं आणि प्रत्यक्ष राबवणं अत्यंत गरजेचं आहे पण प्रत्यक्षात मात्र कल्याणकारी राज्यसंस्थेच्या मागणीचा बोलबाला आपणाला आढळून येत आहे. या काळात आपण स्वतःला मर्यादा घालणं गरजेचं आहे पण आपणाला असं प्रतीत होत आहे की आपणास बाह्य परिस्थितीनं मर्यादित केलं आहे, आणि हे स्वमर्यादित करणं आपल्या आत्महिताचं असलं, तरीही आपण तसा विचार करत आहोत. विलगिकरण हे आपल्या स्वसंरक्षणासाठी असलं तरीही आपण त्याला आपल्या अधिकारांची वंचितता म्हणून पाहत आहोत. 

हे खरं आहे की आपण एकलकोंडं जीवन जगत नाही, आपणाला एकमेकांना भेटणं गरजेचं असतं, एकत्रित मजा-मस्ती करणं गरजेचं असतं आणि आजकाल जी अचानक आपल्या फोन कॉल्स मध्ये वाढ झाली आहे, किंवा इतर समाजमाध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधण्याचा जो प्रयत्न करत आहोत, हे सगळं आपल्या तातडीच्या गरजा दाखवून देतंच, पण त्याचसोबत एकमेकांना गमावण्याची भीती सुद्दा दाखवून देतं.

 

 

याचा अर्थ असा आहे की, आपला हा समाज आपण अधिक चांगल्या पद्धतीनं समजू शकतो, पण दुर्दैवानं या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा हा व्यक्तिवादी विषाणू समाजाच्या चिनी प्रारूपात (surveillance model) व फ्रेंच प्रारूपात (welfare model) समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे. या दोन्ही प्रारूपात फक्त हा विषाणू समान संपत्ती म्हणून टिकून आहे. 

जर ही परिस्थिती असेल तर खाजगी व सामूहिक संपत्तीच्या पलीकडे जाणं म्हणजे काय, हे जाणून घेण्यासाठी आपण काही विकास करणार नाही. म्हणजेच दोन्ही पद्धतीच्या संपत्ती ओलांडणं आणि व्यक्तीने वस्तूची मालकी बाळगणं यापलीकडे जाणं. मार्क्सनं व्यक्तीचं स्वरूप असं सांगितलं आहे की, 'आदर्श परिस्थितीत व्यक्ती अतुलनीय असते, विशेष असते,' हे त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. व्यक्ती म्हणजे वस्तू संचित करणारा नव्हे. व्यक्ती म्हणजे विशेष असणं, व्यक्ती म्हणजे स्वपूर्णतेची अनन्य शक्यता असणं, ही परिपूर्णता सगळ्यांमध्ये वा सगळ्यांसोबत, त्याचबरोबर सगळ्यांच्या विरोधात आणि सगळे नसताना देखील पण सतत नातेसंबंधातून व आंतरसंबंधातूनच परिपूर्ण होत असते. व्यक्ती हे मुल्य आहे जे पैशासारखं मोजमाप करणारं वैश्विक मुल्य देखील नाही किंवा पिळवणूकीतून/शोषणातून निर्माण झालेलं वरकड मुल्य देखील नाही. हे असं मुल्य आहे जे मोजता येत नाही.

आपण अशा पद्धतीचा विचार करायला सक्षम आहोत? हे एका प्रकारे चांगलंच आहे की communovirus ने आपणाला असे प्रश्न विचारायला भाग पाडले आहे. ही परिस्थितीच या परिस्तिथीतून बाहेर पडण्याच्या मार्गांचा विचार करण्यासाठी योग्य आहे. आणि असं झालं नाही, तर आपण जिथून सुरवात केली आहे तिथंच जाऊन पडू. आपण पुन्हा नव्यानं जग बघू, पण मग आपणाला दुसऱ्या महामारीसाठी तयारी ठेवली पाहिजे.