Quick Reads

पीटर हॉलवर्ड: आता आपण ठरवायचं आहे आपल्याला कशा जगात जगायचं आहे

फलसफी सदर

Credit : ICI Berlin

आपणाला नेहमीच आपलं जग कसं असावं याबाबत काही गोष्टी ठरवण्याची संधी मिळत असते, परंतु ही संधी नेहमीच येते असं नाही. त्याचसोबत प्रस्थापित जग आणि व्यवस्था स्वतःचं हित जपण्यासाठी हे आहे ते जग बदलण्याची संधी आपणास देत नाही. जग बदलायचं असेलच तर कुठल्या तरी बाह्य गोष्टीनं हे जग व त्याची व्यवस्था अस्ताव्यस्त करावी लागते, याचसोबत जी शक्ती या व्यवस्थेचं पुनर्निर्माण करत असते, जपत असते, ती मूळ शक्तीच उखडून टाकणं गरजेचं असतं.

आज उद्भवलेलं संकट हे क्रांतिकारक आहे किंवा ते येणाऱ्या काळात व्यवस्थेत उलथापालथ होण्याचा संकेत देत आहे, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. मात्र या संकटांमुळे आपणाला काही तातडीचे आणि ठोस निर्णय घेणं क्रमप्राप्त झालं आहे, जे निर्णय जेवढ्या लवकर घेतले जातील, तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे आणि त्याच अनुषंगानं या निर्णयाचे दीर्घकालीन परिणामही दिसणार आहेत.

आज उद्भवलेल्या या जागतिक संसर्गानं जो धोका निर्माण केला आहे, तो धोका या व्यवस्थेला सुरुंग लावण्याऐवजी या व्यवस्थेला अधिक बळकट करताना दिसत आहे. २००८ नंतरच्या अरिष्टातून ही व्यवस्था अजूनही बाहेर आलेली नसताना हे नवीन संकट समोर आलेलं आहे, आणि म्हणून या वेळी संकटातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी या व्यवस्थेला स्वतःला तिच्या अंतिम टोकापर्यंत ताणाव लागणार आहे. या अरिष्टानंतर जे काही आर्थिक नुकसान होणार आहे त्याची मोजमापही करता येण शक्य नाही. हे सर्व होत असताना एकाधिकारशाहीची खांदेपालट होताना दिसत आहे. याच काळात राज्यसंस्था आणि बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा कॉर्पोरेट हाऊस या संकटाच्या काळात देखील स्वतःचा फायदा करून घेण्यात गर्क आहेत, या दोन्ही प्रभुत्ववादी घटकांना शक्य तेवढ्या कमी नुकसानीत ही व्यवस्था टिकवून ठेवायची आहे.

हे अरिष्ट आपल्या जीवनावर बेतले असल्याने जगातील लोक अस्तित्वात असलेल्या दोन्ही प्रभुत्ववादी घटकांचं वर्चस्व व त्याचसोबत त्यांच्याकडून लादले जाणारे आक्रमक सुरक्षात्मक उपाय काही विरोध न करता स्वीकारत आहेत.

COVID19 चे तात्काळ परिणाम हे अतिभयंकर आणि दुःखद असले तरीही जगातील इतर गंभीर प्रश्नांनसोबत हा प्रश्न अति गंभीर स्वरूपाचा असणार आहे, याचं भान अजूनही कुणाला आलेलं दिसत नाही. जे राज्यकर्ते COVID19 विरोधात युध्द जाहीर केल्याची वल्गना करत आहेत, ते राज्यकर्ते बहुदा युद्ध म्हणजे काय, हेच विसरले आहेत.

या क्षणाला आपणाला तात्काळरित्या आपल्या वर्तमानाला प्राध्यान्य देणं गरजेचं आहे, कारण जगातील प्रत्येक व्यक्ती या संकटाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सामोरं जात आहे आणि म्हणून आपल्या समोर महत्त्वाचा प्रश्न उभा आहे की आपण या प्रश्नाला कसे भिडणार आहोत?

 

 

माणसानं आजपर्यंत अनुभवलेल्या किंवा आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या अरिष्ठांपेक्षा हे अरिष्ट नक्कीच वेगळं आहे त्यामुळे याबद्दलच्या उपाययोजना अमूर्त स्वरूपात जाहीर करून किंवा भविष्यकालीन योजनांवर सोडून देऊन चालणार नाही. या अरिष्टाविरोधात आपण लढत असतानाचे उपाय कितीही मर्यादित असले तरीही असं आपण पहिल्यांदाच पाहत आहोत की जगभरातील सर्वच क्षेत्रांतील मानवी ज्ञान एकाच विषयावर केंद्रभूत झाले आहे. या अनुषंगानं जग पहिल्यांदा काही ठोस उपाय, जसे की मास्क, व्हेंटिलेटर, एकमेकांमधील अंतर, विलगीकरणं करत आहे तर दुसऱ्या बाजूला वैश्विक पातळीवर पुरेसे उत्पन्न व मदत इत्यादी गोष्टी देण्याबाबत ही जगाच एकमत आहे. 

जग कधी नव्हे ते पहिल्यांदा जागतिक क्षमता, जागतिक प्राध्यान्यक्रम या संकल्पनाना महत्व देत आहे.

जगातील जवळ जवळ सर्वच लोकांना या संकटाचे परिणाम देखील माहीत आहेत आणि उपायदेखील मात्र त्याचसोबत आपणाला हे देखील माहीत आहे की याच जगातील प्रभुत्ववादी राज्यसंस्था आणि लोक यांना हे प्रश्न मिटवण्याची किंवा त्याचं निराकरण करण्याची इच्छा देखील नाही. आपणास हा संसर्ग मुळापासून रोखायचा असेल, तर जगातील सर्व व्यक्तींना मास्क देणं गरजेचं आहे, सगळयांच्या चाचण्या घेणं गरजेचं आहे व त्याचसोबत एकमेकांपासून विलगीकरणं करणं सुध्दा गरजेचं आहे आणि या सर्वच गोष्टी सर्वत्र करणं गरजेचं आहे कारण वैद्यकीय निकष हे सर्वच ठिकाणी समान असले पाहीजेत. अस्तित्वात असलेल्या जगातील प्रभुत्ववादी लोकांनी व जगातील प्रगत देशांनी जर यापूर्वी जगाचा विचार केला असता, तर या विषाणूचा जो परिणाम जास्त लोकसंख्या असण्याऱ्या भागातील किंवा देशातील लोकांवर किंवा झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांवर किंवा जा लोकांनी उपजीविकेची साधने गमावली आहेत त्यांच्यावर किंवा कारागृहातील लोकांवर अथवा बंदिस्त छावण्यांमधधील लोकांवर ज्या वाईट पद्धतीने होत आहे किंवा होणार आहे तो नक्कीच कमी झाला असता. या विषाणूचा परिणाम TB असणाऱ्या, HIV असणाऱ्या किंवा कुपोषित लोकांवर काय परिणाम करू शकतो याबद्दल आपणाला काहीच कल्पना नाही. या सगळ्या गोष्टींबाबतचा विचार यापूर्वीच आपण केला असता, तर कदाचित हा परिणाम आपणाला वेगळा दिसला असता. 

या सगळ्यात काही मुलभूत प्रश्न निर्माण झालेले आहेत, आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं काही लोकांचे जीव हे इतर लोकांच्या जीवापेक्षा अति महत्त्वाचे आहेत? आपणाला अशा जगात राहायचं का जिथं आपली अस्तित्वात राहण्याची किंमत ही आपल्या जन्मभूमीआधारे, अथवा आपल्या कौटुंबिक परिस्थितीच्या आधारे किंवा आपल्या पैसे खर्च करण्याच्या कुवतीवर ठरणार असेल? आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं संपत्ती मुठभर लोक बहुतांश लोकांची लुबाडणूक करून निर्माण करत असतात? आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं ठराविक लोकांची भरभराट ही बहुतांशाच्या जोरावर होत असते? आपणाला अशा जगात राहायचं का, जिथं बहुतांश लोकांना काय पाहिजे आणि त्या गोष्टी कशा प्रत्यक्षात आणायच्या या बद्दल निर्णय घेण्याचा अधिकार नाही? आपणाला अशा जगात जगायच आहे का, जिथं आपल्या जीवनशैलीवर आणि उत्पन्नावर व त्याचसोबत कॉर्पोरेट अर्थव्यस्थेवर, उत्तरदायित्व नसलेल्या खाजगी शोषणकर्त्यांचे वर्चस्व आहे? आपणाला अशा जगात जगायच आहे का जिथं आपली सरकारं या बड्या भांडवली कॉर्पोरेट हाऊसचे आणि त्यांच्या नफ्याचे प्रतिनिधित्व करतात?

 

 

या व्यतिरिक्त आपणाला मूलभूत प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे उपचार, आरोग्यसेवा, औषधासंबंधीचे संशोधन, श्रमविभागणी, श्रमवेळ, श्रम वेतनाची किंमत इत्यादी महत्त्वाच्या गोष्टीचे निर्णय हे कॉर्पोरेट हाऊसतर्फे घेतले जावेत की लोकांच्या प्रतिनिधीद्वारे घेतले जावेत? आपणाला अशा जगात जगायचं आहे का जिथं लोकांपेक्षा नफा जास्त महत्त्वाचा मानला जातो?

हे सर्वच प्रश्न आपणाला नवे नाहीत आणि अस ही नाही की या काळात हे प्रश्न लगेचच सोडवणं शक्य देखील आहे. हे प्रश्न येणाऱ्या भविष्यातही लगेच सुटतील असंही नाही. या प्रश्नांना साद घालणारे 'आपण' अजूनही उदयास येत आहोत. पण या सर्व जुन्या प्रश्नांची आजची निकड मात्र नक्कीच नवीन आहे. There is no alternative या वाक्याच्या तीस वर्षाच्या प्रभुत्वानंतर आपणाला या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची संधी चालून आली आहे. या सर्व परिस्थितीत आपण काय करणार आहोत?

येणाऱ्या भविष्यात काय करावं आणि काय करू नये या बाबत काही भविष्य वर्तवू शकत नाही पण काही महत्त्वाच्या गोष्टीची यादी मात्र नक्कीच करू शकतो.

१. शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण या मूलभूत गोष्टी आहेत म्हणून त्यांना अतिरिक्त प्राधान्य द्यावं.

२. खाजगी आर्थिक साधनं आपण आपले सामाजिक सामूहिक ध्येय गाठण्यासाठी उपयोगात आणावीत.

३. राष्ट्रीयकरणास अधिकाधिक वाव द्यावा.

४. खाजगी संपत्ती व नफ्यावर अधिक कर वाढवावा.

५. सर्वच पद्धतीच्या श्रमांना समान मान्यता द्यावी व त्यानुसार वेतन द्यावे.

६. श्रमिक, पर्यावरण आणि प्राणिमात्रांचे कल्याण या गोष्टीना प्राधान्य द्यावे.