Quick Reads

जाओ जाकर पेहले नेहरू-गांधी से पूछो..

प्रत्येकी तासाभराच्या दोन्ही भाषणात मोदी बरेच हैराण झालेले दिसून आले.

Credit : इंडी जर्नल

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत दोन्ही सभागृहात भाषण केलं. प्रत्येकी तासाभराच्या दोन्ही भाषणात ते बरेच हैराण झालेले दिसून आले. भाषणादरम्यान प्रत्येक मुद्द्याला हात घालताना त्याची सुरुवात ते 'लेकिन मै हैराण हू' या वाक्यानेच करताना दिसले. पण नेहमीप्रमाणे त्यांची प्रभावी शब्दफेक, शाब्दिक कोट्या, तर्काला बगल देण्याची क्षमता यामुळे त्यांचं भाषण ऐकणारेही तेवढेच हैरान झाले असतील. अंतर्विरोध या संकल्पनेला नीट समजवून घ्यायचं असेल तर जगातील काही मोजक्या गोष्टींचा अभ्यास केला तरी पुष्कळ आहे. मोदी हे त्या यादीत कायम आघाडीवर असतील यात काही दुमत नाही. भारतातील किंबहुना जगातील सर्वात प्रभावी आणि ताकदवान नेता असूनही मलाच कसं टार्गेट केलं जातंय, मी कसा गरीब आहे अशी सहानुभूती मिळवणं हे कोण्या येड्यागबाळ्याचं काम नव्हे. राजकारणाचाच भाग होत राष्ट्रीय राजकारणातील सर्वोच्च पद भूषवत असतानाच स्वतःला राजकारणाचाच व्हिक्टिम म्हणून प्रोजेक्ट करण्यात मोदींचा हात कोणी धरू शकत नाही, हे विरोधकही मान्य करतील.

आपल्या या कौशल्याचा दाखला मोदींनी दोन्ही सभागृहातील आपल्या पहिल्याच भाषणात दिला. या भाषणात त्यांनी मागच्या पाच वर्षात केलेली कामं, यंदाच्या निवडणुकीतील विजय आणि अर्थात पुढील पाच वर्षांमधला त्यांचा नवा भारत यावर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या समस्यांपासून आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर पर्यंत बऱ्याच विषयांना त्यांनी हात घातला. मोदींनी गेल्या काही वर्षात आपल्या राजकीय संवादाची टोन थोडी बदलली आहे. रोजच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नात पुरेसं राजकीय भान नसलेल्या नाहीरे  वर्गाचा इगो कुरवाळत त्यांची कला मोदींनी अवगत केलेली आहे. फक्त मोदीच नव्हे तर जगभरात फोफावणाऱ्या पॉप्युलिस्ट राजकारणाचं हे व्यवच्छेदक लक्षण आहे. लोकांना तुम्ही मूर्ख आहात त्यामुळे पहिला शहाणे व्हा आणि आम्हाला मतदान करा, हे सांगण्यापेक्षा तुम्ही शहाणे आहात, त्यामुळे मला मत द्या, हे सांगणं जास्त सोप्पं आणि सोयीचं असतं. मोदी नेमकं तेच करत आले आहेत. जगभरातील पुरोगामी (लिबरल) राजकारण्यांसमोर मुख्य आव्हान हेच आहे की लोकांना तुम्ही मूर्ख आहात हे सांगणं. आता हे त्यांच्या इगोला न दुखावता कसं सांगायचं यासाठी नव्या पद्धतीचा राजकीय संवाद आणि नरेटिव्ह विकसित करण्याची गरज आहे. अर्थात मोदी तोपर्यंत फार पुढे गेलेले असतील पण त्याला आता काय पर्याय नाही.

उदाहरणादाखल भाषणात भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल दिल्याबद्दल मोदींनी मतदारांचे आभार मानले. सामान्य मतदार, शेतकरी, कामगार वर्ग हा राजकीयदृष्ट्या पुरेसा सजग आहे आणि याचेच प्रतिबिंब निकालात दिसून येत असल्याचे ते म्हणतात. प्रत्यक्षात बहुतांशी मतदार हा जातीय आणि धार्मिक अस्मितेच्या प्रभावाखालीच मतदान करतो हे मोदींना स्वतः ठाऊक असेलच.  पण त्यावर बोट ठेवून ते काय स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार नाहीत. ते काम विरोधकांनी करणे अपेक्षित आहे. पण काँग्रेस जिवंत असेपर्यंत तरी ते शक्य नाही. पाच वर्ष विरोधक राहूनही विरोधकाची नेमकी भूमिका काय हे न समजलेल्या कॉंग्रसची मोदींनी आपल्या भाषणात चांगलीच खिल्ली उडवली. देशाला जर भाजपला पर्याय हवा असेल तर त्यापूर्वी काँग्रेसला पर्याय उभा करणं गरजेचं आहे. राहता राहिला प्रश्न मतदारांची राजकीय सजगता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावण्यासाठी लोकशाहीतील माध्यमं, टीकाकार, अभ्यासक इत्यादी घटकांचा रोल.  मोदींनी या घटकांना केव्हाच फाट्यावर मारलेलं आहे. ते मन की बात करत थेट मतदारांचा इगो कुरवाळत राहतात. माध्यमांचा अडथळा मोदींना अपेक्षित नाही हे त्यांच्या न झालेल्या पत्रकार परिषदा, मुलाखतीवरून स्पष्टच आहे. या अर्थानं मोदी पर्यायानं भाजप देशभरात अँटी इंटेलेक्च्युअल वातावरण तयार करण्यात यशस्वी झालेली आहे. याचाच प्रत्यय म्हणून मतदारांच्या राजकीय अज्ञानावर बोट ठेवणाऱ्या अभ्यासकांनाच जनतेविरोधी, लोकशाहीविरोधी किंबहुना घटनेविरोधी म्हणूनही मोदींनी कालच्या भाषणात फाट्यावर मारलं

शेतकऱ्यांना कुरवाळणाऱ्या गोष्टी बोलत राहायच्या मात्र धोरणं उद्योगपतींच्या हिताची राबवायची हा नवा मोदी पॅटर्न आता भारतात चांगलाच जम बसवतोय. तो तसाच चालू राहणार याचा प्रत्यय मोदींच्या परवाच्या भाषणावरून आला. त्या अर्थानं मोदी हे ते शिक्षक आहे जे वर्गातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना आपले वाटतात. पण इंटर्नल मार्क मात्र वर्गातल्या अंबानी,अडाणीलाच जास्त देतात. या भाषणात मोदींना एकसामायिक निवडणूका, सरदार पटेल भारताचे पहिले पंतप्रधान असते तर, NRC इत्यादी जुन्या कॅसेट पुन्हा वाजवल्या. त्याचबरोबर त्यांनी पूर्वी मौन साधलेल्या प्रश्नांवरही उत्तरं दिली. मात्र, निराशाजनक बाब ही की ती उत्तरं पुन्हा मोदींच्या शैलीतील होती. उदाहरणादाखल झारखंडमधील मॉब लिंचींगच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, झारखंडला मॉब लिंचींगचं राज्य म्हणणं झारखंडच्या अस्मितेला दुखावणारं आहे असंही ते म्हणाले. इथे पुन्हा मूळ समस्येला बगल देत झारखंडवासियांच्या इगोला  कुरवाळण्याचा प्रयत्न मोदींनी केला. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी मोदींनी आपल्या भाषणात दिल्लीला बलात्काराची राजधानी म्हटलं होतं. जाहिरातबाजी वरून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना मोदी म्हणाले की जाहिरात आणि जागृती अभियानात फरक असतो! पण बहुतेक ते हे विसरले की दोन्हीकडे फोटो फक्त मोदींचाच असतो. मोदींचे अशे तर्क त्यांच्या समर्थकांनाही समजत नसतीलच पण मोदी समर्थकांसाठी मोदी म्हणजे कीक मधला सलमान खान आहे, 'जो दिल मे तो आता है पर समज मे नही.'  समर्थकांसाठी मोदींची प्रत्येक लाथ (किक) ही आवडीने खाण्यासाठीच आहे. जे विरोधक मोदींच्या आॅर्ग्युमेंटमधील तर्क समजून घेण्याचा प्रयत्न करणार असतील त्यांना तो तर्क समजेपर्यंत मोदी नवीन अॉर्ग्युमेंट घेऊन आलेले असतात.

लोकसभेत पाशवी बहुमत असतानाही राज्यसभेत मात्र बहुमत नसल्यानं मोदींनी दुःख व्यक्त केलं. यामुळे राज्यसभेत अडवणूक करून विरोधक मला त्रास देत असल्याचं सांगताना मोदी शहारले होते. देशातील लोक राज्यसभेतील चर्चेवर लक्ष ठेवून असतात आणि हीच लोकं विरोधकांना धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. ज्या देशातील लोक चांगल्या सिनेमात आइटम सॉन्ग असल्याशिवाय तो सिनेमा बघायला जात नाहीत ती लोक राज्यसभेतील गंभीर, आशयघन चर्चा पाहतील हे बोलायला काय दर्जाचा आत्मविश्वास आणि विनोदबुद्धी लागत असेल?

भाषणात मोदींनी भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष आणि गांधींची 150 वी जयंती जोरात साजरा करण्याचा मानस व्यक्त केला. मोदींकडून गांधी आणि राज्यघटनेचं केलं जाणारं उदात्तीकरण ही मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. उदाहरणादाखल मोदींनी काही वर्षांपूर्वी मन की बात कार्यक्रमात स्वच्छता अभियानाबाबत केलेलं भाषण हे गांधींच्या 'The ideal Bhangi' या गाजलेल्या वादग्रस्त लेखाचं जवळपास रिपीट टेलिकास्ट म्हणता येईल इतपत सारखं होतं. त्या अर्थानं मग मोदी खरे गांधीवादी ठरतात. 1931 च्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत दलित प्रतिनिधित्वावरून गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती. तेव्हा भारतातील सगळ्या दलितांचा प्रतिनिधी आंबेडकर अथवा इतर कोणी नसून मीच एकटा आहे, यावर गांधी अडून राहिले होते. अर्थात या घटनांचे संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे. पण ते जागेअभावी इथे शक्य नाही. तूर्तास मोदींचा गांधीअनुनयाचा पुळका समजून घेण्यासाठी एवढं पुरेसं ठरेल.

मोदींना पर्यायानं भाजपला आंबेडकरांचंही असलेलं कौतुक हे राज्यघटनेपुरतंच सीमीत आहे. उदाहरणादाखल राज्यघटनेव्यतिरिक्त आंबेडकरांनी Annihilation of caste आणि State and minorities ही दोन महत्त्वाची पुस्तकं लिहिली होती. ही दोन्ही पुस्तकं भारतातील सामाजिक स्थिती आणि भविष्यावर भाष्य करणारीच आहेत. किंबहूना मोदींना अपेक्षित असलेल्या सामाजिक न्याय बद्दल सविस्तर आणि परखड चर्चा करणारी आहेत. पण मोदींनी आंबेडकरांना डोक्यावर घेताना या पुस्तकांचा चुकुनही उल्लेख केलेला आढळून येत नाही. अर्थात प्रथमदर्शनी मोदींनी ती वाचली आहेत की नाही याबाबतही मी साशंक आहे. पण वाचली असतील तर हे आंबेडकर मोदींना अप्रोप्रिएट करता येणं शक्य नाही आणि त्यांना परवडणारंही नाही. त्यामुळे फक्त राज्यघटनेतील आंबेडकरांची सोयीनुसार महती गात राहणं, एवढंच मोदींच्या हातात होतं. ते त्यांनी अतिशय चलाखीनं केलेलं आहे. आपल्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्याच भाषणात हा अजेंडा मोदींनी सेट केला आहे. येणाऱ्या नव्या इंडियासाठी सर्वांना शुभेच्छा. देव करो आणि मोदींसारखी सहानुभूती मिळवण्याची कला तुम्हालाही अवगत होवो. बाकी मोदींचं आत्मविश्वासपूर्ण तर्कहीन पहिलंच भाषण ऐकून मै मी हैरान हू भाई!